अमेरिकेत ट्रम्प विरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शनं, 50 राज्यांत 1200 ठिकाणी आंदोलकांची गर्दी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी न्यूज
अमेरिकेत ठिकठिकाणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी आंदोलक एकत्र जमल्याचं पाहायला मिळालं. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात होणारं हे पहिलंच मोठं आंदोलन आहे.
'हँड्स ऑफ' नावाच्या या आंदोलनात अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये जवळपास 1200 ठिकाणी ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनांचं आयोजन करण्यात आलं. शनिवारी बॉस्टन, शिकागो, लॉस एंजल्स, न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन डीसीसह इतर शहरांमध्ये मोठ्या संख्येनं लोकांची गर्दी पाहायला मिळाली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवरून आणि धोरणांवरून त्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.
ट्रम्प यांनी जगातील बहुतांश देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर लंडन, पॅरिस आणि बर्लिनसह अमेरिकेतही अशा प्रकारची निदर्शनं पाहायला मिळाली.
ट्रम्प यांच्या विरोधातील नाराजी
अमेरिकेत काही विद्यापीठात विद्यार्थ्यांवर इमिग्रेशनशी संबंधित छापे टाकले जात आहेत. त्यामुळं काही जणांना अटक आणि हद्दपारही करण्यात आलं आहे. त्यामुळं या आंदोलनात सहभागी झाल्याचं बॉस्टनमधील काही आंदोलक म्हणाले.
तर कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या केटी स्मिथनं बीबीसी न्यूजला सांगितलं की, तिला तुर्कीयेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनी रुमेसा ओझटर्ककडून प्रेरणा मिळाली होती. रुमेसाला गेल्या महिन्यात बोस्टन-एरिया टफ्ट्स विद्यापीठाजवळ मुखवटा घातलेल्या अमेरिकन एजंट्सनी अटक केली होती.
"मी सहसा अशा आंदोलनात सहभागी होत नाही. पण तुम्ही एक तर आज उभं राहावं किंवा तुमच्यावर अशी वेळ येईल," असं केटी म्हणाला.
लंडनमध्ये आंदोलक 'WTAF अमेरिका?', 'लोकांना त्रास देणे थांबवा' आणि 'तो मूर्ख आहे' असे फलक हाती घेत आंदोलनं केली.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणातील बदलांचा निषेध करत त्यांनी, हँड्स ऑफ कॅनडा, हँड्स ऑफ ग्रीनलँड, हँड्स ऑफ युक्रेन अशा घोषणा दिल्या. ट्रम्प यांनी कॅनडा आणि ग्रीनलँडला आपल्यात विलीन करण्यात वारंवार रस दाखवला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी त्यांचा सार्वजनिक वादही झाला आणि युक्रेन आणि रशियामधील शांतता करारावर वाटाघाटी करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला.
वॉशिंग्टन डीसीमध्ये हजारो आंदोलक डेमोक्रॅटिक खासदारांची भाषणं ऐकण्यासाठी जमले होते. त्यापैकी अनेकांनी ट्रम्प प्रशासनात महत्त्वाची भूमिका निभावणारे श्रीमंत देणगीदार आणि प्रामुख्यानं इलॉन मस्क यांच्यावर टीका केली.
फ्लोरिडा काँग्रेसचे सदस्य मॅक्सवेल फ्रॉस्ट यांनी "आमचं सरकार अब्जाधीशांनी ताब्यात घेतलं आहे", असं म्हणत टीका केली.
ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला फ्लोरिडा काँग्रेसच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी फरकानं विजय मिळवता आला. तसंच विस्कॉन्सिनच्या मतदारांनी राज्याच्या सर्वोच्च न्यायालयासाठी डेमोक्रॅटिक न्यायाधीशाची निवड केली. इथं मस्क यांचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला जवळपास 10 टक्के मतांनी नाकारले .
दोन्ही राज्यांमध्ये डेमोक्रॅट्सनी ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांविरोधी आणि इलॉन मस्क यांच्याबद्दल मतदारांच्या मनात असलेल्या रागाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.

फोटो स्रोत, Getty Images
काही सर्वेक्षणांमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या रेटिंगमध्ये थोडीशी घसरण दिसून येत आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या रॉयटर्स/इप्सॉस पोलमध्ये त्यांचे अप्रुव्हल रेटिंग 43% पर्यंत घसरल्याचे समोर आले. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा नीचांकी आकडा आहे. शपथवधीवेळी त्यांचे अप्रुव्हल रेटिंग 47% होते.
त्याच सर्वेक्षणानुसार 37% अमेरिकन लोक त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या हाताळणी पाठिंबा देत आहेत तर 30% लोक अमेरिकेतील दैनंदिन जीवनातील खर्चाला तोंड देण्याच्या धोरणांना पाठिंबा देणारे आहेत.
तसंच हार्वर्ड कॅप्स/हॅरिसच्या अलिकडच्याच एका सर्वेक्षणात असं आढळून आलं की, 49% नोंदणीकृत मतदार ट्रम्प यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. हे प्रमाण गेल्या महिन्यात 52% होतं. त्याच सर्वेक्षणानुसार 54% मतदारांच्या मते, ट्रम्प बायडेन यांच्यापेक्षा चांगलं काम करत आहेत.
व्हाईट हाऊसने ट्रम्प यांच्या समर्थनार्थ एक निवेदन काढलं. ट्रम्प यांचे एक प्रमुख सल्लागार टॉम होमन यांनी शनिवारी फॉक्स न्यूजशी बोलताना म्हटलं की, आंदोलकांनी त्यांच्या न्यूयॉर्कमधील घराबाहेर रॅली काढली. पण ते त्यावेळी वॉशिंग्टनमध्ये होते.
"ते रिकाम्या घराचा निषेध करू शकतात," असंही होमन म्हणाले. त्यांच्यामुळं यंत्रणेवर ताण आला आणि अधिकाऱ्यांच्या इतर महत्त्वाच्या कामांत अडथळा आला. "या आंदोलन आणि रॅलीला काही अर्थ नाही," असंही होमन म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











