भारतावर 26 % टॅरिफ लावल्यानंतर ट्रम्प म्हणाले 'मोदी माझे मित्र', 10 महत्त्वाच्या गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफची (परस्पर शुल्क) घोषणा केली आहे. म्हणजेच, अमेरिकेतून भारतात येणाऱ्या वस्तूंवर जितकं आयात शुल्क असतं तितकंच शुल्क अमेरिकेनंही भारतातून तिथं आयात होणाऱ्या वस्तूंवर लादलं आहे.
असा टॅरिफ लावलेल्या जवळपास 100 देशांची यादी व्हाईट हाऊसने 2 एप्रिलला प्रसिद्ध केली.
मात्र, हे 100 देश अमेरिकेवर जेवढा आयात कर लावतात त्यापेक्षा अर्धा आयात कर अमेरिकेनं लावला आहे. म्हणूनच ट्रम्प यांनी त्याला 'डिस्काऊंटेड रेसिप्रोकल टॅरिफ' असं नाव दिलंय.
पण या यादीत काही असेही देश आहेत ज्यावर अमेरिकेनं जशास तसा कर लावलाय. त्याशिवाय 10 टक्क्यांनी बेसलाईन टेरिफही लावला आहे.
टेरिफ लावल्याची घोषणा करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, "आज मुक्ती दिवस आहे. या दिवसाची वाट अमेरिका अनेक काळापासून पहात होती."
"आजच्या दिवशी जणू अमेरिकन उद्योगांचा पुर्नजन्मच झाला आहे. अमेरिका पुन्हा समृद्धीच्या मार्गाला लागल्याचा दिवस म्हणून याची नेहमी आठवण काढली जाईल."
अमेरिकेचा फायदा घेत जगभरातल्या देशांनी अमेरिकाला लूटलं आहे असंही ते म्हणाले.
"गेली 50 वर्ष आपल्या करदात्यांना फसवलं जात होतं. पण आता असं होणार नाही. "
बुधवारी एक कार्यकारी आदेश काढत ट्रम्प यांनी टॅरिफ लागू केला. त्याबद्दलच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊ.
1. भारतावर किती टॅरिफ ?
व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार भारत अमेरिकेवर 53 टक्के टॅरिफ लावतो. पण 'डिस्काऊंटेड रेसिप्रोकल टॅरिफ' अंतर्गत अमेरिकेनं भारतावर 26 टक्के टॅरिफ लावणार असल्याची घोषणा केली आहे.
ही घोषणा करताना अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भारताचा ठळकपणे उल्लेख केला.
ते म्हणाले, "भारताचे पंतप्रधान काही दिवसांपूर्वीच इथं येऊन गेले. ते माझे फार चांगले मित्र आहेत. मी त्यांना म्हटलं की, तुम्ही माझे मित्र असलात तरी माझ्या देशावर अन्याय करत आहात."
"ते आपल्यावर 52 टक्के कर लावतात. तुम्हाला कळतंय का? या तुलनेत गेली कित्येक वर्ष, दशकं आपण त्यांच्याकडून काहीच कर घेतलेला नाही," असंही ट्रम्प पुढे म्हणाले.
2. कधीपासून लागू होणार टॅरिफ?
परदेशात उत्पादीत होणाऱ्या सर्व ऑटोमोबाईल्सवर 25 टक्के कर लादण्यात आला आहे. तो आज रात्री (बुधवार-गुरुवार मध्यरात्री) अमेरिकेच्या वेळेनुसार 12.01 वाजता लागू होईल.
याशिवाय, अमेरिकेच्या वेळेनुसार 5 एप्रिल रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून सर्व देशांवर 10 टक्के बेसलाइन टॅरिफ लागू केला जाईल.

फोटो स्रोत, Getty Images
तर 10% पेक्षा जास्त दर असलेले टॅरिफ 9 एप्रिल रोजी अमेरिकेच्या वेळेनुसार 12.01 वाजल्यापासून लागू होतील.
3. शेअर बाजारावरील परिणाम
ट्रम्प यांच्या 'डिस्काऊंटेड रेसिप्रोकल टॅरिफ'मुळं जगभरात आर्थिक गोंधळ निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
टॅरिफच्या घोषणेनंतर आशिया-पॅसिफिक भागातील देशांच्या शेअर बाजारात घसरण दिसून आली आहे.
जपानचा शेअर बाजार चार टक्क्यांनी घसरला आहे, तर ऑस्ट्रेलियाचा शेअर बाजार दोन टक्क्यांनी घसरला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरीकडे, ट्रम्पच्या टॅरिफचा परिणाम सोन्याच्या किमतीवरही दिसून आला आहे. सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे.
4. 10 टक्के बेसलाइन टॅरिफ कोणत्या देशांवर?
ट्रम्प यांच्या भाषणापूर्वी, व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले की, ट्रम्प सर्व देशांवर 10 टक्के बेसलाइन टॅरिफ लादणार आहेत.
पण ट्रम्प यांनी काही मोजक्याच देशांवर फक्त बेसलाइन टॅरिफ लादले आहे. तर काही देशांवर जास्त टॅरिफ लादले आहेत.

फोटो स्रोत, Reuters
या देशांवर बेसलाइन टॅरिफ :
ब्रिटेन
सिंगापूर
ब्राझील
ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंड
तुर्कीये
कोलंबिया
अर्जेंटिना
एल सेल्व्हाडोर
संयुक्त अरब अमिराती (UAE)
सौदी अरेबिया
5. सर्वाधिक दर कुठे?
व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने सुमारे 60 देशांवर हे टॅरिफ लावले आहे. म्हणजेच या देशांवर सर्वाधिक कर लादण्यात आला आहे.
रेसिप्रोकल टॅरिफचा सामना करणारे काही देश:
युरोपियन युनियन (20%)
चीन (34%)
व्हिएतनाम (46%)
थायलंड (36%)
जपान (24%)
कंबोडिया (49%)
दक्षिण आफ्रिका (30%)
तैवान (32%)
6. कॅनडा आणि मेक्सिकोला दिलासा
या नव्या टॅरिफ घोषणांमध्ये कॅनडा आणि मेक्सिकोचा उल्लेख नाहीये. पूर्वीच्या आदेशावर आधारित आराखड्यानुसारच या देशांबरोबर व्यवहार होतील असं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे.
या पूर्वीच्या आदेशांमध्ये कॅनडा आणि मेक्सिकोवर फेंटानिल आणि सीमेसंदर्भातील मुद्दे पुढे करुन शुल्क लावण्यात आलं होतं.


ट्रम्प यांनी दोन्ही देशांवर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केला होता मात्र नंतर ते कमी करण्यात आलं.
कॅनडा आणि मेक्सिकोवर शुल्क थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी अनुमोदन दिलं.
7. ऑटो आयातीवर 25 टक्के शुल्क
याशिवाय राष्ट्राध्यक्षांनी परदेशात तयार झालेल्या गाड्यांवर पंचवीस टक्के शुल्क जाहीर केले आहे. ते तीन एप्रिलच्या रात्रीपासून लागू होतील.
ट्रम्प यांच्या घोषणेचा सर्वात जास्त परिणाम अमेरिकेतल्या गाड्यांवर होणार आहे. अमेरिका मोठ्या प्रमाणावर गाड्या आयात करते, आता त्यांची किंमत वाढणार आहे
8. जगातले विविध नेते काय म्हणतात?
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी अमेरिकन टॅरिफ अयोग्य असल्याचं म्हटलं आहे, यामुळे व्यापारयुद्ध भडकू शकतं असं त्या म्हणाल्या.
आम्ही अमेरिकेशी करार करण्याचा शक्य ते सर्व प्रयत्न करू, व्यापारयुद्ध थांबवण्याचा आमचा मानस आहे, अशा व्यापारयुद्धामुळे पाश्चिमात्य देश कमकुवत होतील असंही त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Reuters
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिज यांनी टॅरिफ व्यवहार्य नाही तसेच पूर्णपणे चुकीचे आहेत.
टॅरिफला काहीही तर्काधार नाही. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या मैत्रीविरोधातलं हे पाऊल आहे, एखादा मित्र असं वागू शकत नाही.
9. अमेरिकेतल्या या वस्तू महागणार
टॅरिफच्या घोषणेमुळे सर्वात जास्त परिणाम गाड्यांच्या किंमतीवर होणार, एका अंदाजानुसार गाड्या 4000 ते 10000 डॉलर्सनी महाग होतील.
अमेरिकेत आता बिअर, व्हिस्की, टकिलासारखी मद्यार्कपेयं महाग होती, मेक्सिकोतून येणारी मोडेलो आणि कोरोनासारखी बिअर अमेरिकेत महागणार.
ट्रम्प यांनी युरोपियन संघातून येणाऱ्या दारूवरही टॅरिफ लावलं आहे. त्यामुळे शँपेन तसेच जर्मन बिअर महागणार आहे. त्याचप्रमाणे इंधनं, मेपल सिरप, अवाकाडोही अमेरिकेत महागात मिळेल.
10. अमेरिकेची सूचना- प्रत्युत्तराचा विचारही करू नका
अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट व्हिन्सेंट यांनी अमेरिकेच्या टॅरिफविरोधात कोणीही प्रत्युत्तरादाखल टॅरिप जाहीर करू नये अशी सुचना केली.
फॉक्स न्यूजशी बोलताना त्या म्हणाल्या, सर्व देशांना माझा सल्ला आहे, त्यांनी प्रत्युत्तर देऊ नये. आरामात बसावं, पुढे काय होतंय ते पाहावं. जर तुम्ही पलटवार केलात तर हे प्रकरण चिघळेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











