म्यानमार : परदेशी पत्रकारांना बंदी, जागोजागी सरकारचे खबरे-गुप्तचर एजंट; बीबीसीच्या गुप्त रिपोर्टिंगमधून भूकंपाचं भीषण वास्तव समोर

- Author, योगिता लिमये
- Role, मंडाले, म्यानमार, बीबीसी न्यूज
(सूचना : या लेखातील काही वर्णन तुम्हाला विचलित करू शकतं.)
भूकंपाच्या धक्क्यातून म्यानमार अजूनही सावरलेले दिसत नाही. 7.7 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याने म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्तहानी झाली. या भूकंपामुळे झालेल्या विध्वंसाचं भीषण दृश्य मंडालेच्या रस्त्यांवर दिसतंय.
आम्ही ज्या भागात गेलो विशेषत: शहराच्या उत्तर आणि मध्य भागात, तिथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या इमारती आणि अनेक इमारतींचे ढिगाऱ्यात रुपांतर झाल्याचं दिसले.
आम्ही जेवढ्या इमारती पाहिल्या त्या प्रत्येक इमारतीला किमान एक तरी तडा गेल्याचं दिसलं. त्यामुळं इमारतीमध्ये जाणं अत्यंत धोकादायक आहे. शहरातील प्रमुख रुग्णालयातील रुग्णांवर त्या रुग्णालयाच्या इमारतीबाहेरच उपचार सुरू असल्याचं दिसलं.
म्यानमारच्या लष्करी सरकारनं भूकंपानंतर कोणत्याही परदेशी पत्रकारांना देशात येऊ देणार नाही, असं सांगितलं. त्यामुळं आम्ही तिथं अत्यंत गुप्तपणे गेलो.
आम्हाला खूप सावधगिरीनं काम करावं लागलं. कारण जागोजागी सरकारचे खबरे आणि गुप्तचर एजंट वावरत होते, जे सामान्य लोकांवर लक्ष ठेवून होते.
या भीषण आपत्तीनंतर लोकांना अत्यल्प मदत मिळत असल्याचं आम्हाला दिसून आलं.
आपल्या मुलाची वाट पाहत असलेली एक आई
"शक्यता खूप कमी आहे, पण तरीही मला तो जिवंत असल्याची आशा आहे," असं 41 वर्षीय नान सिन हेन म्हणाल्या.
नान सिन गेल्या पाच दिवसांपासून कोसळलेल्या पाच मजली इमारतीसमोर आपल्या मुलाची वाट पाहत होत्या.
त्यांचा 21 वर्षीय मुलगा साई हान फा हा एक मजूर असून तो त्या इमारतीत इंटिरियरचं काम करत होता. या इमारतीत पूर्वी हॉटेल होतं आणि त्याचं आता कार्यालयात रूपांतर केलं जात होतं.
"जर त्यांनी आज त्याला बाहेर काढलं तर त्याच्या जगण्याची आशा असेल," असं नान सिन म्हणतात.

7.7 तीव्रतेचा भूकंप झाला, तेव्हा इमारतीचा खालचा भाग ढासळला आणि वरचा भाग रस्त्याकडे झुकला होता. इमारत केव्हाही कोसळू शकते असं वाटत होतं.
साई हान फा आणि इतर चार कामगार आत अडकले होते.
बचावकार्य कुठपर्यंत आलं?
जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा इमारतीत बचावकार्य सुरूही झालं नव्हतं आणि बचावकार्य कधी सुरू होईल, याची काही माहितीही नव्हती. मदतीची खूप कमतरता होती आणि याचं मुख्य कारण देशातील राजकीय परिस्थिती होती.
भूकंपाच्या आधीपासूनच म्यानमारमध्ये अंतर्गत अशांततेची परिस्थिती होती. तिथे गृहयुद्ध सुरू होतं. त्यामुळं आतापर्यंत सुमारे 35 लाख लोक बेघर झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीनंतरही लष्करानं बंडखोर गटांविरुद्ध लष्करी कारवाई सुरूच ठेवली आहे.
याचा अर्थ सुरक्षा दलांना मदत आणि बचाव कार्यात फारशी मदत करता येत नाहीये. काही ठिकाणं सोडली तर मदतीसाठी मंडालेमध्ये आम्हाला मोठ्या संख्येने सैनिक दिसले नाहीत.
लष्करी सरकारनं आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतीसाठी आवाहन केलं आहे. परंतु, ब्रिटन आणि अमेरिकेसह इतर अनेक देशांशी त्यांचे तणावपूर्ण संबंध आहेत. त्यामुळं या देशांनी मदतीचं आश्वासन तर दिलं आहे. परंतु प्रत्यक्षात मदतीबाबत फारसं काही होताना दिसलं नाही.
सध्या भारत, चीन आणि रशियासारख्या काही देशांचे बचाव पथक म्यानमारमध्ये सक्रिय आहेत.
सध्या ज्या इमारतींमध्ये जास्त लोक अडकले असण्याची शक्यता आहे, तिथे बचावकार्य सुरू आहे. जसं की स्काय व्हिला कॉन्डोमिनियम कॉम्प्लेक्स. हे एकेकाळी हजारो लोकांचं निवासस्थान होतं आणि तेथे यू ह्या थीन बौद्ध अकादमी होती. भूकंपाच्या वेळी तिथे अनेक बौध्द भिक्खू परीक्षा देत होते.

भारतीय आपत्ती पथकाचे नेतृत्व करणारे नीरज सिंह हे बौद्ध अकादमीमध्ये बचाव कार्य करत आहेत. त्यांनी इमारती "पॅनकेक" प्रमाणे कोसळल्याचं सांगितलं. एका थरावर दुसरा थर अशा पद्धतीने इमारत कोसळली आहे.
"इमारत ज्या प्रकारे कोसळली ते पाहता वाचलेल्यांचा शोध लागण्याची शक्यता फारच कमी आहे. परंतु, आम्ही अजूनही आशावादी आहोत आणि सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
कडक ऊन आणि 40 अंश सेल्सिअस उष्णतेमध्ये बचाव पथकं काँक्रीटच्या मोठ्या तुकड्यांचे ड्रिल आणि कटरच्या सहाय्याने लहान तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे खूपच थकवणारं काम आहे. क्रेनने काँक्रीट जागेवरुन हटवताच मृतदेहांचा उग्र वास हवेत पसरतो, जो सहन करणं कठीण होऊन जातं.
बचाव पथकाला चार ते पाच मृतदेह सापडतात. पण एक मृतदेह काढण्यासाठी अनेक तास लागतात.
मृतदेह मिळवण्यासाठी लोकांची प्रतिक्षा
बौद्ध अकादमीच्या कॅम्पसमध्ये तात्पुरत्या तंबूखाली चटईवर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे चेहरे चिंता आणि दुःखाने भरलेले आहेत. एक मृतदेह सापडल्याचे समजताच सर्व नातेवाईक रुग्णवाहिकेकडे धाव घेतात.
काही लोक बचाव पथकातील एका कार्यकर्त्याभोवती जमतात. तो कार्यकर्ता त्याच्या मोबाईल फोनवर मृतदेहाची छायाचित्रं दाखवतो.

कुटुंबासाठी हा सर्वात कठीण क्षण आहे. ते छायाचित्र काळजीपूर्वक पाहतात, मृतदेह त्यांच्याच एखाद्याचा आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करतात. पण मृतदेह इतका विद्रूप आणि कुजलेल्या अवस्थेत असतो की त्याची ओळख पटणं शक्य नसतं.
शेवटी, मृतदेह शवागारात पाठवला जातो. तिथे फॉरेन्सिक तपासणीद्वारे त्याची ओळख पटवली जाते.

मृतदेहाची वाट पाहत उभ्या असलेल्या कुटुंबीयांमध्ये 29 वर्षीय यू थुझानाचे वडील देखील आहेत. आता त्यांना आपला मुलगा जिवंत असल्याची आशा नाही.
यू ह्या आंग रडत रडत म्हणाले, "माझ्या मुलाचे असे हाल झाल्याचा विचार करून मी आतून एकदम तुटलो आहे. मी खूप दुःखी आहे."
अनेक ऐतिहासिक स्थळांचेही झाले मोठे नुकसान
मंडाले पॅलेस आणि महामुनी पॅगोडा यासह मंडालेमधील अनेक ऐतिहासिक स्थळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. परंतु, आम्ही तेथे जाऊन किती नुकसान झालं आहे हे पाहू शकलो नाही.
भूकंपग्रस्त भागात जाऊन पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटणं सोपं नव्हतं. कारण लष्करी सरकारच्या भीतीने लोक पत्रकारांशी बोलण्यास धजावत नव्हते.

पॅगोडाजवळ, एका कोसळलेल्या इमारतीच्या बाहेर, आम्ही एका बौद्ध जोडप्यावर अंत्यसंस्कार होत असल्याचं पाहिलं. हे घर यू ह्ला आंग खाइंग आणि त्यांची पत्नी दॉ ममार्थे यांचे होते. दोघेही 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते.
त्यांच्या मुलानं आम्हाला सांगितलं, "मी आई-वडिलांसोबतच राहत होतो, पण भूकंप झाला तेव्हा मी बाहेर होतो. त्यामुळं मी वाचलो. एका क्षणात मी माझे आई-वडील गमावले."
त्यांचे मृतदेह प्रशिक्षित बचाव कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले नाहीत. स्थानिक लोकांनी ते बाहेर काढले. यू ह्ला आंग खाइंग आणि त्यांची पत्नी दॉ ममार्थे यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी दोन दिवस लागले. त्यांचे मृतदेह सापडले तेव्हा ते एकमेकांच्या मिठीत होते.

भूकंपग्रस्त भागात मदतीअभावी लोक त्रस्त
मंडालेतील उद्यानं आणि खुली मैदाने आता तात्पुरत्या छावण्यांमध्ये बदलली आहेत. राजवाड्याच्या आजूबाजूच्या खंदकाच्या काठावर तंबू ठोकून लोकांना राहावं लागत आहे.
शहरातील लोक आपल्या घराबाहेर चटई आणि गादीवर झोपत आहेत. कारण त्यांना इमारती कधीही कोसळू शकतात याची भीती आहे.
मंडालेमध्ये लोक दहशतीत आहेत आणि त्यामागं एक कारणही आहे. शुक्रवारपासून (4 एप्रिल) दररोज रात्री तिथे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.
पण नुसत्या भीतीने लोक बाहेर झोपत नाहीत, तर त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नाही. या भूकंपात त्यांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत.

72 वर्षीय दॉ खिन सॉ मिंट पाणी भरण्यासाठी रांगेत उभ्या असताना आम्ही त्यांना भेटलो. त्यांची छोटी नातही त्यांच्यासोबत होती.
त्या म्हणाली, "आता मी काहीही विचार करू शकत नाही. भूकंप झाला तो क्षण आठवून माझं हृदय अजूनही भीतीनं धडधड करतं."
"आम्ही कसंतरी बाहेर पळालो, पण माझं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. आता मी एका झाडाखाली राहते. चला बघा."
दॉ खिन कपडे धुण्याचे काम करतात आणि त्यांचा मुलगा अपंग आहे.
दॉ खिन म्हणतात, "मी आता कुठं जाऊ? मी खूप त्रासात आहे. मी एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ राहते. काही लोकांनी मला तांदूळ आणि कपडे दिले आहेत. भूकंपावेळी घरातून पळून आलो. त्यावेळी अंगावर जे कपडे होते तेच कपडे आजही आमच्या अंगावर आहेत."
"आम्हाला वाचवायला कोणीही आलं नाही. कृपया आम्हाला मदत करा." असं म्हणत त्या रडू लागल्या.
त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या आणखी एक आजीबाई डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या, "आज अजूनपर्यंत कोणीही अन्न वाटप केलेलं नाही. आम्ही सगळे सकाळपासून उपाशी आहोत."

आम्ही तिथे मदत वस्तूंचे वाटप करणाऱ्या बहुतांश छोट्या व्हॅन्स पाहिल्या. त्यात खूप कमी सामान होते. हे मदत साहित्य काही स्थानिक लोक आणि संस्थांनी पाठवले होते.
मात्र गरजूंची संख्या इतकी जास्त होती की, ही मदत पुरेशी नव्हती. जे काही मदत साहित्य मिळेल ते मिळविण्यासाठी तिथं गोंधळ उडाला होता.
मंडालेच्या मुख्य रुग्णालयाचा काही भाग नुकसानग्रस्त झाला आहे. परिस्थिती आधीच खराब होती आणि आता रूग्णांना रुग्णालयाबाहेर बेड टाकून ठेवलं जातंय.
14 वर्षीय श्वे ग्या थुन फ्योच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिचे डोळे लाल झाले. ती शुद्धीवर होती, पण काहीही प्रतिसाद देत नव्हती. तिचे वडील तिला आराम देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते.
रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या खूपच कमी होती. त्यामुळं त्यांचे कुटुंबीयच रुग्णांची काळजी घेत होते.

झार झार यांच्या पोटात गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळं त्यांचं पोट सुजलं होतं. त्यांची मुलगी त्यांच्या मागे बसून त्यांना आधार देत होती. उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी हाताच्या पंख्याने हवा देण्याचा प्रयत्न करत होती.
पोलीस किंवा सैनिक आपल्याला पकडू शकते या भीतीने आम्ही रुग्णालयात जास्त वेळ थांबू शकलो नाही.
आता बचावकार्य हळूहळू मंदावत असल्याने जखमींऐवजी बहुतांश मृतदेह रुग्णालयात आणले जात आहेत.
नान सिन हेन या त्यांचा मुलगा अडकल्याची बातमी समजल्यानंतर कोसळलेल्या इमारतीच्या बाहेर थांबल्या होत्या. सुरुवातीला त्या शांत दिसत होत्या, पण आता त्यांच्या चेहऱ्यावर वेदना आणि भीती स्पष्ट दिसत होती.
त्या म्हणाल्या, "माझं मन दु:खी आहे. माझ्या मुलाचं माझ्यावर आणि त्याच्या लहान बहिणींवर खूप प्रेम होतं. आमची काळजी घेण्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करत होता."
"आता मला फक्त माझ्या मुलाचा चेहरा पाहायचा आहे, जरी तो या जगात नसला, तरी मला त्याचा मृतदेह पाहायचा आहे. माझ्या मुलाचा मृतदेह शोधण्यासाठी त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न करावेत, अशी माझी इच्छा आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











