'जोराचा धक्का बसला आणि जणू दगडांचा वर्षाव सुरू झाला'; म्यानमार भूकंपातून वाचलेल्यांचे भयावह अनुभव

फोटो स्रोत, Reuters
- Author, रेचल हेगन, पेनीसा एमोचा
- Role, बीबीसी न्यूज
शुक्रवारी (मार्च 28) आलेल्या भूकंपानंतर म्यानमार आणि थायलंडमधल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. भूकंपाची भीती आणि त्यातून बसलेला मानसिक धक्का त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवतोय.
शुक्रवारी म्यानमारमध्ये आलेल्या 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने दोन्ही देशांतल्या अनेक इमारती उद्ध्वस्त केल्या.
म्यानमारमध्ये भूकंपात एक हजारापेक्षा जास्त लोकांनी त्यांचे प्राण गमावल्याचं सांगितलं जात आहे. तर शेकडो लोक जखमी झालेत.
भूकंपाचे हादरे अतिशय तीव्र होते आणि जवळपास चार मिनिटांपर्यंत ते जाणवत होते असं यंगुन या म्यानमारच्या सर्वात मोठ्या शहरात राहणाऱ्या एका इमसानं बीबीसीशी बोलताना सांगितलं.
बीबीसी वर्ल्ड सर्विसेसच्या न्यूज डे या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, एक डुलकी घेऊन ते उठतच होते तेव्हा त्यांना इमारत हलताना जाणवली.
"भूकंपाचा झटका तीन ते चार मिनिटांपर्यंत जाणवत होता. माझ्या मित्रांकडून सतत मेसेजेस येत होेते. तेव्हा भूकंप फक्त यंगुनपुरताच मर्यादीत नसल्याची जाणीव मला झाली.
देशाच्या दुसऱ्या भागात राहणाऱ्या लोकांनीही भूकंपाचे झटके जाणवल्याचं सांगितलं," असं ते म्हणाले.
म्यानमारसोबतच थायलंड आणि चीनमध्येही भूकंपाचे झटके जाणवले. तीव्र झटक्यांमुळे थायलंडमधली एक 30 मजली इमारत कोसळली.
इमारती अक्षरशः डोलताना पाहून लोक घाबरले आणि रस्त्यांवर पळत होते. काही इमारतींच्या वरच्या मजल्यावरच्या स्विमिंग पूलमधून पाणी खाली रस्त्यावर पडताना दिसत होतं.


'दगडांचा वर्षाव होत आहे, असं वाटलं'
भूकंप आला तेव्हा बँकॉकमध्ये राहणाऱ्या सिरिन्या नकुता त्यांच्या मुलांसोबत घरीच होत्या. रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या की, "पहिले तीव्र झटका आला. मग जमीन हलू लागली. पायऱ्यांवरून गोष्टी खाली आदळत होत्या त्याचे आवाज ऐकू येऊ लागले.
आमच्यावर दगडं पडत आहेत असं वाटू लागलं. मी मुलांना पटकन बाहेर जायला सांगितलं आणि आम्ही वरच्या मजल्यावरून पळत बाहेर पडलो."

फोटो स्रोत, Getty Images
एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना थायलंडमधल्या बांग सुई जिल्ह्याचे उप पोलिस आयुक्त वोरापत सुखताई सांगत होत्या की, एक टॉवर इमारती खाली पडली आणि लोकांच्या किंचाळण्याचा आवाज त्यांच्या कानी पडला.
"मी तिथे पोहोचलो तेव्हा लोक मदतीसाठी ओरडत होते. भूकंपात शेकडो लोक जखमी झाल्याचा आमचा अंदाज आहे. पण नेमका आकडा किती ते अजूनही स्पष्ट झालेलं नाही," ते म्हणाले.
भूकंपामुळे झालेला प्रचंड विध्वंस पाहता नेपिडॉ जनरल हॉस्पिटलला 'मास कॅज्युअल्टी एरिया' घोषित करण्यात आलेलं आहे.
रुग्णालयाच्या बाहेर अनेक लोक स्ट्रेचरवर झोपलेले दिसत आहेत. काही लोकांना सलाईन लावण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय मदतीचं आवाहन
म्यानमारमध्ये 2021 पासून लष्करी प्रशासन आहे. भूकंपातून सावरण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय मदतीचं आवाहन केलं आहे.
सर्वसाधारणपणे लष्करी प्रशासन कोणाकडूनही मदत घेत नाही.
म्यानमार देशाच्या सहाही भागात आपत्कालीन परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे.
लष्कर प्रशासनाचे प्रमुख मिन ऑन्ग हल्येंग यांनी नेपीडॉ रुग्णालयाचा दौरा केला. त्यानंतर इतर देशांना त्यांनी मदतीचं आवाहन केलं.
"आंतरराष्ट्रीय समुदाय आम्हाला शक्य तितकी मदत करतील अशी आशा आम्हाला आहे," असं ते म्हणाले.
लष्कराचं प्रशासन असल्याने म्यानमारशी संपर्क करण्यात अडचणी येतात. तिथे इंटरनेटच्या वापरावर बंधनं आहेत. आता भूकंपामुळे तर अनेक भागांशी संपर्क तुटलाय.
त्यामुळेच स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थांशी बीबीसीलाही संपर्क करता आलेला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
थायलंडच्या राजधानीत, बँकॉकमध्ये मेट्रो आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आल्यात. तिथं राहणाऱ्या सुजसान्ना वारी-कोवेक्स सांगतात, "मी हॉटेलात बसून बिलाची वाट पहात होते. तेव्हा अचानक जमीन हलू लागली.
आधी मला भास होतो आहे, असं वाटलं. पण आजुबाजुला सगळेच एकमेकांकडे पहात होते. मग आम्ही तिथून पळ काढला."
देवोरा पनमॅस या तर त्यांच्या खुर्चीवर फोन चाळत बसल्या होत्या. भूकंपाच्या हादऱ्यांमुळे खुर्चीच पलटली.
"मी आरामखुर्चीत बसले होते. खुर्ची अचानक जोरजोरात हलू लागली. त्यानंतर ती उलटली आणि माझं डोकं जमिनीवर आपटलं."
पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या इमारती
गेल्या दशकभरात देशात एवढा मोठा भूकंप आला नसल्याचं बँकॉकमध्ये राहणाऱ्या बीबीसीच्या पत्रकार बुई थू सांगत होत्या.
सोशल मीडियावरच्या फोटोत म्यानमारच्या दुसऱ्या मोठ्या शहरातली, मांडलमधली एक इमारत पडताना दिसत आहे.
त्यात ऐतिहासिक शाही महालाचा काही भागही होता. 90 वर्ष जुनी ही इमारत कोसळली. या शहराला यंगुनशी जोडणाऱ्या महामार्गाचा एक भाग पूर्णपणे दुभंगला आहे.
थायलंडमधली एक 30 मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली.
राष्ट्रीय लेखापरिक्षा विभागाचं कार्यालय म्हणून या इमारतीचं बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून सुरू होतं. त्यात जवळपास 5.9 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली होती.
वैद्यकीय मदत मिळण्यात अचडणी
या गगनचुंबी इमारतीच्या खाली 81 मजूर गाडले गेले असल्याचं म्हटलं जातंय. थायलंड आणि म्यानमार दोन्ही देशांतून हे मजूर कामासाठी आलेले होते.
शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत पिवळ्या रंगाचं हेल्मेट घातलेले सुरक्षा रक्षक त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत गोते.
घटनास्थळी थोड्या दूरवर एका पूलावर उभं राहून बचाव कार्य पाहणाऱ्या पत्रकारांना तीन मजली उंच काँक्रीटचा ढिगारा दिसत होता.
इमारतीच्या चारही बाजुने पांढरे तंबू ठोकण्यात आले होते. अनेक गाड्या, रुग्णवाहिका रस्त्यावर उभ्या होत्या.
ढिगारा साफ करण्यासाठी क्रेन्स आणि इतरही मोठे मशीन्स घटनास्थळी आणले गेले होते.
ढिगाऱ्यातून सुखरुप बाहेर येणारे मजूर पूर्णपणे मातीनं भरले होते. मजूर अजूनही जिवंत कसे याचंच सर्वांना आश्चर्य वाटत होतं.

भूकंप सुरू झाला तेव्हा 30 वर्षांचे नुकुल खेमुथा इमारतीच्या पाचव्या मजल्यावर काम करत होते. हादरे बसल्यावर त्यांनी वर पाहिलं आणि सगळा मजला हलताना दिसला. त्यात भेगा पडत असतानाही त्यांनी पाहिल्या.
त्यांच्या सोबत काम करणारा एक साथीदार दहाव्या मजल्यावर बाथरूमचा वापर करण्यााठी गेला होता. तो अजूनही सापडला नसल्याचं ते सांगत होते.
"आम्ही सगळे ओरडत होतो आणि एकमेकांचा हाथ पकडून सोबत पळण्याचा प्रयत्न करत होतो," असं ते म्हणाले.
बीबीसीचे पत्रकार त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा ते एका बाजूला शांत बसून, धुम्रपान करत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. भीती आणि उदासी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

18 वर्षांचे एडिसोर्न काम्फासॉर्न सहाव्या मजल्यावरून काही सामानाची ने-आण करत होते तेव्हा त्यांना भूकंपाचे झटके जाणवले. वर पाहिलं तेव्हा बांधकामासाठी वापरण्यात येणारी क्रेन त्यांना हलताना दिसली.
"काहीतरी भयंकर होणार आहे याची मला जाणीव झाली. मी पळालो. पण इमारत कोसळायला मिनिटभरही लागला नाही. अचानक सगळीकडे धूळ, धूर पसरू लागली आणि डोळ्यासमोरचं सगळं काही काळं झालं.
मला श्वासही घेता येत नव्हता. जवळ मास्कही नव्हता," असं ते म्हणाले.
बाहेर आल्यावरही त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी बोलता आलेलं नाही. त्यांचा फोन हरवला आहे. असा अनुभव आयुष्यात कधीही आला नसल्याचं ते सांगत होते. त्यांचं मरण त्यांनी पाहिलं होतं.
सुरक्षारक्षकांचं लक्ष अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात लागलं असल्यानं वाचलेल्या लोकांना कोणत्याही वैद्यकीय सुविधा मिळालेल्या नाहीत.
आत्तापर्यंत किती लोकांचा मृत्यू झाला याची पक्की आकडेवारी माहीत झालेली नाही. मात्र, हजारो लोक मारले गेले असल्याची शंका अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हे या भूवैज्ञानिक संस्थेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











