जपान : 9 रिश्टर स्केलपर्यंतचे भूकंप होऊनही जीवित आणि वित्तहानी नगण्य असते, कारण...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रूपर्ट विंगफील्ड-हेस
- Role, बीबीसी न्यूज, जपान
बरोबर 13 वर्षांपूर्वी जपानमध्ये मोठा भूकंप झाला होता. या भूकंपानंतर त्सुनामी आली आणि यात फुकुशिमा अणु प्रकल्पात दुर्घटना घडली.
ही घटना जपानी लोकांच्या मनातून पुसली गेलेली नव्हती. इतक्यात सोमवारी घडलेल्या घटनेमुळे ही आठवण परत ताजी झाली. सोमवारी, जपानच्या इशिकावा भागात मोठा भूकंप आला आणि त्सुनामी येण्याची शक्यता निर्माण झाली.
मात्र हे इशारे जपानमध्ये अजिबात असामान्य नाहीत.
जेव्हा मी पहिल्यांदा तिथे गेलो तेव्हा आमची इमारत हादरत होती. मी माझ्या पलंगावरून उठलोच नव्हतो.
पण गेल्या काही महिन्यांत मला भूकंपाच्या धक्क्यांची सवय झाली. जपानमध्ये भूकंपाचे धक्के लगेचच तुमच्या आयुष्याचा एक भाग बनतात. कधीतरी तुम्हाला त्याची सवय लागतेच.
मात्र, तुमच्या मनात नेहमीच एक विचार असतो की पुढचा मोठा भूकंप केव्हा येणार किंवा तुमची इमारत त्यासाठी सुरक्षित आहे का?
2011 मध्ये पृथ्वी दोन मिनिटांसाठी हादरली होती
पण या पिढीने 11 मार्च 2011 रोजी आपल्या आयुष्यातील सर्वांत भीषण भूकंपाचा सामना केला होता.
जमीन दोन मिनिटांसाठी अशा प्रकारे हादरली की संपूर्ण आयुष्यात याचा कोणीही अनुभव घेतला नसेल. वारंवार भूकंपाचे हे धक्के जाणवत होते.
त्या वेळी जो कोणताही व्यक्ती या घटनेचा साक्षीदार असेल तो प्रत्यक्षात किती घाबरला असेल याची केवळ कल्पनाच करता येऊ शकते. पण परिस्थिती याहीपेक्षा गंभीर होणार होती.
40 मिनिटांत पहिली त्सुनामी किनाऱ्याच्या दिशेने आली आणि जपानच्या ईशान्य किनाऱ्यावरील शेकडो किलोमीटरच्या समुद्राभोवतीच्या भिंती तोडून तिथल्या गावाशहरांत शिरली. सेंदाई शहरावर घिरट्या घालणाऱ्या एका हेलिकॉप्टरने ही घटना लाईव्ह टीव्हीवर दाखवली.

फोटो स्रोत, Getty Images
याच दरम्यान, अणुऊर्जा प्रकल्पही धोक्यात असल्याची भीतीदायक बातमी समोर आली.
फुकुशिमामध्ये ही आपत्ती आल्यामुळे लाखो लोकांना त्यांची घरं सोडण्याचे आदेश देण्यात आले. आता तर टोकियोही सुरक्षित आहे की नाही असे प्रश्न उपस्थित होऊ लागले.
या घटनांनी लोकांना मोठा धक्का बसला.
काही महिन्यांनंतर, मी टोकियोमध्ये राहण्यासाठी नवी जागा शोधू लागलो. यासाठी माझ्या पत्नीने भूवैज्ञानिक नकाशांचा अभ्यास केला, कारण तिला मातीच्या खाली खडक कुठे आहेत याची माहिती घ्यायची होती. किंबहुना इमारत किती जुनी आहे याचीही तिने खूप खोलवर चौकशी केली होती.
'आपण 1981 पूर्वी बांधलेल्या इमारतींकडे बघायचं देखील नाही' असं तिचं स्पष्ट मत होतं.
जपानची यशोगाथा
जेव्हा आम्ही 1985 च्या सुमारास बांधलेल्या इमारतीत गेलो तेव्हा आम्ही अन्न आणि पाणी साठवायला सुरुवात केली. बाथरूमच्या सिंकखाली प्री-पॅक जेवणाचे डब्बे ठेऊन दिले. हे डब्बे पाच वर्षांपर्यंत वापरता येऊ शकत होते.
2011 साली जी भीती वाटली होती, ती भीती कालच्या सोमवारी पाहायला मिळाली. पण भूकंपामुळे जपानची यशोगाथा देखील रचली.
जपान हा देश भूकंप तीव्रतेच्या आधारावर मोजत नाही.
ते जमीन किती वेळा हादरली ते पाहतात. यावेळी भूकंपाची तीव्रता 1 ते 7 पर्यंत असते. आणि सोमवारी इशिकावा मध्ये झालेला भूकंप 7 तीव्रतेचा होता.
इथले रस्ते आणि पूल मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झालं असलं तरी बहुतेक इमारती अजूनही सुस्थितीत उभ्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
एक प्रकारे, टोयामा आणि कानाजावा सारख्या मोठ्या शहरांमध्ये सामान्य जीवन पुन्हा पूर्वपदावर आलं आहे.
मी काशीवाझाकी जवळ राहणाऱ्या एका जवळच्या मित्राशी बोललो तेव्हा तो म्हणाला, "हे खरं तर खूप भीतीदायक होतं."
त्याने सांगितलं, "आतापर्यंत मला यापेक्षा मोठा भूकंप कधीच जाणवला नाही. आम्हाला समुद्रकिनारा सोडून दूर जावं लागलं पण, आता आम्ही घरी परतलो आहोत आणि सर्व काही ठीक आहे."
अभियांत्रिकीत मिळवलेलं यश
एक शतकापूर्वी म्हणजेच 1923 मध्ये टोकियोला विनाशकारी भूकंप पाहावा लागला होता. तेव्हापासून त्यांनी आपल्या अभियांत्रिकीत यश मिळवायला सुरुवात केली.
ग्रेट कांटो भूकंप म्हणून ओळखल्या जाणार्या या भूकंपात शहराचा मोठा भाग जमिनीला समतल झाला होता. युरोपियन शैलीत बांधलेल्या आधुनिक विटांच्या इमारती कोसळल्या होत्या.
या अपघातानंतर जपानचा पहिला भूकंप प्रतिरोधक बिल्डिंग कोड तयार करण्यात आला. तेव्हापासून, बांधलेल्या सर्व नवीन इमारतींमध्ये स्टील आणि काँक्रीटचा वापर करणं अनिवार्य झालं. त्याच वेळी, लाकडी इमारतींसाठी जाड खांब असणं फार महत्त्वाचं होतं.
प्रत्येक वेळी जेव्हा जपानमध्ये मोठा भूकंप येतो तेव्हा नुकसानीचं मूल्यांकन करून हे नियम बदलले जातात. सर्वांत मोठा बदल 1981 मध्ये करण्यात आला. त्यानुसार सर्व नवीन इमारतींसाठी नवीन भूकंप नियम लागू करण्यात आले.
1995 च्या कोबे भूकंपानंतर यादी आणखीन लांबवली.

फोटो स्रोत, Getty Images
2011 मध्ये 9.0 तीव्रतेचा भयंकर भूकंप आला होता. यावेळी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे यश दिसून आले. 1923 मध्ये जपानच्या राजधानीत जो भूकंपाचा धक्का बसला होता तितक्याच तीव्रतेचा हा भूकंप होता.
1923 मध्ये शहर जमिनदोस्त झालं, यावेळी 1.4 लाख लोक मृत्यूमुखी पडले. तर 2011 साली आलेल्या भूकंपात इमारतींच्या खिडक्या तुटल्या पण मोठमोठ्या गगनचुंबी इमारतींना काहीही झालं नाही.
केवळ त्सुनामीनेच हजारो लोकांचे बळी घेतले, मात्र भूकंपामुळे एकही व्यक्ती मरण पावला नाही.
सोमवारी झालेल्या भूकंपात इशिकावा येथील लाकडी घरं कोसळली असून एक आधुनिक इमारतही कोसळली. मात्र, वृत्तवाहिन्यांनी लगेचच ही इमारत 1971 मध्ये बांधल्याचं वृत्त दिलं.
या अपघातात काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.
पण पृथ्वीवर असा विरळाच देश असेल ज्याने इतके भूकंपाचे धक्के सहन करूनही कोणतंही नुकसान सोसलेलं नाही. जपानची गोष्टच वेगळी आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








