म्यानमार भूकंप : शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

म्यानमारमधील मंडाले येथे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या नागरिकांना शोधताना बचावकर्ते

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, म्यानमारमधील मंडाले येथे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या नागरिकांना शोधताना बचावकर्ते
    • Author, जॅक बर्गिस
    • Role, बीबीसी न्यूज

थायलंड आणि म्यानमारमध्ये 28 मार्चला (शुक्रवार) भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 7.7 इतकी होती. म्यानमार आणि थायलंडमध्ये मदत आणि बचावकार्य अद्याप सुरू आहे. बचाव कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत.

भूकंपाचं केंद्र पृथ्वीच्या 10 किलोमीटर खाली म्यानमारच्या मांडले शहराजवळच्या सागाईंग फॉल्टजवळ असल्याचं अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हेने म्हटलंय.

जुंटा सरकारने दिलेल्या माहितीनुसार माहितीनुसार, भूकंपानंतर सुमारे 60 तासांनी आणखी चार जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून देशभरात किमान 1700 लोकांचा मृत्यू झाला असून तर जखमींचा आकडाही 3408 वर पोहोचला आहे.

म्यानमारच्या अग्निशमन सेवेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील सागाईंग शहरातील एका कोसळलेल्या शाळेच्या इमारतीत अडकून पडलेल्या काही नागरिकांना बाहेर काढण्यात आले, बचावकार्यादरम्यान शाळेच्या मलब्याखाली एक मृतदेहदेखील आढळून आला.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

म्यानमार आणि शेजारील थायलंडमध्ये शोधपथकाद्वारे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. अनेकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आलं असलं तरी अद्याप शेकडो नागरिक बेपत्ता असून शोध मोहीम सातत्यानं सुरू आहे.

व्हीडिओ कॅप्शन, थायलंड आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, पाहा थरारक दृश्य

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक बांधकामाधीन इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 18 वर पोहोचली आहे, तर 76 कामगार अद्याप बेपत्ता आहेत.

दरम्यान, शुक्रवारपासून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे तसेच आंतरराष्ट्रीय मदतदेखील म्यानमारला पोहोचू लागली असली तरी, सर्वाधिक प्रभावित भागांपर्यंत वेळेत मदत पोहोचण्यात उशीर होत आहे, त्यामुळे स्थानिक लोकांना हातानेच बचावकार्य करावे लागत आहे.

शनिवारी रात्री, म्यानमारची राजधानी नायपिडॉमध्ये एका रुग्णालयाच्या ढिगाऱ्याखाली 36 तास अडकून पडलेल्या एक वृद्ध महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

रविवारी मंडाले शहरातील एका अपार्टमेंटच्या ढिगाऱ्याखालून 29 नागरिकांना बाहेर काढण्यात आल्याचं स्थानिक अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं.

रविवारी मंडाले शहरातील इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आणखी काही नागरिकांना बाहेर काढण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रविवारी मंडाले शहरातील इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आणखी काही नागरिकांना बाहेर काढण्यात आलं.

शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार 12 वाजून 50 मिनिटांच्या आसपास (6:20 GMT) भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. याच्या 12 मिनिटानंतर दुसऱ्यांदा जोरदार हादरा जाणवला, याची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी होती आणि त्याचं केंद्रबिंदु मंडालेजवळील शहर सागाईंगपासून 18 किमी दक्षिणेस होतं.

भूकंपाचे हे झटके इतके जोरदार होते की मोठमोठाल्या इमारती अचानक हलायला लागल्या. थायलंडच्या राजधानीत बँकॉकमध्ये भूकंपाचे झटके बसल्यानंतर इमारती खाली कोसळताना दिसल्या. लोक त्यापासून दूर पळत होते.

एका इमारतीतल्या स्विमिंग पूलमधील पाण्यात उंच लाटा निर्माण होत असल्याचं एका व्हीडिओत दिसलं. या संदर्भात थायलंडच्या सरकारने एक आपत्कालिन बैठकही केली.

रविवारीही मंडाले शहराच्या वायव्येस 5.1 तीव्रतेच्य भूकंपाचा हादरा बसला. यात एक अपूर्ण टॉवरचा भाग कोसळला, ज्यामुळे येथील अनेक कामगार अडकून पडले.

म्यानमार

फोटो स्रोत, Getty Images

थायलंडचे उप-पंतप्रधान अनुतीन चार्नवीराकुल यांनी रविवारी सांगितलं की बचावकर्त्यांना ढिगाऱ्याखाली अडकलेली माणसं जीवंत असल्याचे संकेत मिळाले परंतु, त्यांची स्थिती अत्यंत बिकट असून बचावमोहिम राबवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

थायलंडचे उद्योग मंत्री अकिनात प्रोम्फन यांनी सांगितले की, या इमारतीच्या बांधकामात वापरलेल्या स्टीलमध्ये त्रुटी आढळल्या असून, त्याचे नमुने चाचणीसाठी गोळा करण्यात आले आहेत.

ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या कामगारांचे कुटुंबीय आपल्या प्रियजनांच्या सुखरूप परत येण्याची वाट पाहत आहेत.

थांयलंडमधील एक महिला जिचा पती या टॉवरच्या बांधकामात कार्यरत होता ती देखील पतीची आतुरतेने वाट पाहत होती. 'कितीही वेळ लागला तरी मी वाट पाहीन.' अशी भावना तिने बीबीसीसोबत बोलताना व्यक्त केली.

भारतीय नौदलाच्या आयएनएस सातपुडा आणि आयएनएस सावित्री जहाजांद्वारे 40 टन साहित्य मदत म्हणून पाठवण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, भारतीय नौदलाच्या आयएनएस सातपुडा आणि आयएनएस सावित्री जहाजांद्वारे 40 टन साहित्य मदत म्हणून पाठवण्यात आलं आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बचाव पथकं मदतीसाठी पोहोचत आहेत. म्यानमारला मदत पाठवणाऱ्या देशांमध्ये समाविष्ट असलेल्यांमध्ये कोणी किती मदत पाठवली जाणून घेऊया –

  • चीनकडून 82 जणांचे बचाव पथक
  • हाँगकाँगकडून 51 जणांचं पथक रविवारी पोहोचलं
  • भारताकडून बचाव पथक आणि आपत्कालीन साहित्य असलेले मदतीचे विमान रवाना
  • मलेशियाने 50 जणांचे पथक पाठवण्याची घोषणा केली
  • फिलिपिन्स, व्हिएतनाम, इंडोनेशिया, आयर्लंड, दक्षिण कोरिया, रशिया, न्यूझीलंड आणि अमेरिका यांनीही बचाव पथकं पाठवली आहेत
  • यूकेचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅम्मी यांनी 'गरजू नागरिकांच्या मदतीसाठी' 10 दशलक्ष पाऊंडच्या मदतीची घोषणा केली

दरम्यान, म्यानमारच्या सत्ताधारी लष्करी 'जुंटाने' देशाच्या काही भागांवर हवाई बॉम्बहल्ले सुरूच ठेवले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने या हल्ल्यांना 'अतिशय धक्कादायक आणि अस्वीकार्य' असं म्हटलं आहे.

लष्कराला सत्तेवरून हटवण्यासाठी लढणाऱ्या लोकशाही समर्थक बंडखोर गटांकडून सागाईंग प्रदेशातील चौंग-यू टाउनशिपमध्ये हवाई हल्ले केल्याची माहिती आहे.

2021 साली लष्करी राजवटीने बंड करत सत्ता काबीज केली होती, परंतु आता देशाच्या अनेक भागांवर त्यांचे नियंत्रण राहिलेलं नाही, कारण हे भाग वेगवेगळ्या बंडखोर गटांच्या ताब्यात आहेत.

हद्दपार झालेल्या नागरी सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल युनिटी गव्हर्नमेंटनुसार, त्यांच्या सशस्त्र दलाने भूकंपग्रस्त भागांमध्ये दोन आठवड्यांसाठी 'संरक्षणात्मक कारवाई वगळता' कोणत्याही लष्करी आक्रमणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

म्यानमारमधील लोकांना मान्सून हंगाम सुरू झाल्यावर आणखी विस्थापनाचा धोका आहे.

गेल्या वर्षी आलेल्या तीव्र पुरामुळे अनेक घरं आणि सोयीसुविधांचे नुकसान झाल्याची माहिती इंटरनॅशनल रेस्क्यू कमिटीच्या लॉरेन एलेरी यांनी बीबीसी ब्रेकफास्टला दिली.

मान्सुन हंगाम मेपर्यंत सुरु होईल आणि एप्रिलपासून पाऊस पडण्यास सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी दिली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.