धडधड, थरार आणि ठोका चुकवणारी लढत; लखनौचा निसटता विजय

लखनौ, बंगळुरू

फोटो स्रोत, BCCI- TATA/IPL

फोटो कॅप्शन, निकोलस पूरन

सलग 5 चेंडूत 5 षटकार खेचणाऱ्या रिंकू सिंगची खेळी स्मरणात असतानाच सोमवारी बंगळुरूत चाहत्यांना थरारक सामन्याची पर्वणी मिळाली.

शेवटच्या षटकात पाहुण्या लखनौ संघाला बंगळुरुविरुद्ध 6 चेंडूत 5 धावा हव्या होत्या. या षटकात 2 विकेट पडल्या. मंकडिंगचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही.

अखेरच्या चेंडूवर एक धाव आणि लखनौची शेवटची जोडी मैदानात होती. चोरटी धाव घेत लखनौने अद्भुत विजय साकारला.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

निर्धारित वेळेत षटकं पूर्ण न केल्याने बंगळुरूला 30 गज वर्तुळाबाहेर केवळ 4 क्षेत्ररक्षक तैनात करता आले.

शेवटच्या षटकात लखनौला 5 धावांची आवश्यकता होती. जयदेव उनाडकतने एक धाव काढली पण दुसऱ्या चेंडूवर हर्षल पटेलने मार्क वूडला त्रिफळाचीत केलं.

तिसऱ्या चेंडूवर रवी बिश्नोईने 2 धावा केल्या. चौथ्या चेंडूवर बिश्नोईने एक धाव काढली. पाचव्या चेंडूवर जयदेव उनाडकत बाद झाला. डू प्लेसिसने त्याचा झेल टिपला. शेवटच्या चेंड़ूवर लखनौला एक धाव हवी होती आणि शेवटची जोडी मैदानात होती.

सहावा चेंडू टाकताना हर्षलने नॉन स्ट्राईकवर असणाऱ्या रवी बिश्नोईला बाद करण्याचा प्रयत्न केला कारण तो क्रीझबाहेर होता. पण हर्षलचा प्रयत्न हुकला.

हर्षलने पुन्हा चेंडू स्टंप्सवर मारला पण तो प्रयत्न पंचांनी अवैध ठरवला. कारण नियमानुसार रनआऊटनंतर पुन्हा तसं करता येत नाही.

हर्षलने टाकलेल्या शेवटच्या वैध चेंडूवर अवेश खानने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू विकेटकीपर दिनेश कार्तिककडे गेला. कार्तिकच्या हातून चेंडू अडवताना गडबड झाली आणि तेवढ्यात अवेश आणि रवी बिश्नोई यांनी एक धाव पूर्ण केली आणि लखनौने विजयाचा जल्लोष साजरा केला.

त्याआधी निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉइनस यांनी तडाखेबंद खेळी करत लखनौच्या विजयाचा पाया रचला.

213 धावांचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. काईल मायर्स शून्यावर बाद झाला. दीपक हुड्डा 9 धावा करुन तंबूत परतला. त्याच षटकात कृणाल पंड्या भोपळाही फोडू शकला नाही. राहुलने एका बाजूने नांगर टाकला. बंगळुरू संघाकडून आणि बंगळुरूत खेळण्याचा अनुभव असलेल्या मार्कस स्टॉइनसने 30 चेंडूत 65 धावांची स्फोटक खेळी केली. त्याने 6 चौकार आणि 5 षटकार लगावले. संथ गतीने खेळणारा राहुलही पाठोपाठ बाद झाला. बाकी फलंदाज षटकारांची खैरात करत असताना राहुलने 20 चेंडूत 18 धावांची खेळी केली.

पूरन नावाचं वादळ घोंघावतं तेव्हा

राहुलच्या जागी आलेल्या निकोलस पूरनने पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. पूरनने अवघ्या अर्ध्या तासात सामन्याचं चित्रच पालटून टाकलं.

पूरनने 19 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांसह 62 धावांची अविश्वसनीय खेळी साकारली. पूरनला अयुश बदोनीने चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 35 चेंडूत 84 धावांची थरारक भागीदारी केली.

निकोलस पूरन फलंदाजीला आला तेव्हा लखनौला 56 चेंडूत 114 धावा हव्या होत्या. पूरन बाद झाला तेव्हा लखनौला 18 चेंडूत 24 धावांची आवश्यकता राहिली होती.

पूरनला मोहम्मद सिराजने बाद केलं. पूरन बाद झाल्यानंतर बदोनीने सूत्रं हाती घेतली. बदोनी सामना संपवणार असं चित्र असताना पॅडल स्विप करताना तो स्वयंचलित बाद झाला.

7 धावांची गरज असताना अयुशने मारलेला फटका सीमारेषेपलीकडे गेला पण तो फटका मारल्यानंतर अयुशची बॅट स्टंप्सवर जाऊन आदळली. अयुशने 24 चेंडूत 30 धावांची खेळी केली.

कोहली, डू प्लेसिस आणि मॅक्सवेलची धमाल

लखनौ सुपरजायंट्स, सनरायझर्स हैदराबाद

फोटो स्रोत, BCCI-TATA/IPL

फोटो कॅप्शन, ग्लेन मॅक्सवेल
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

लखनौने नाणेफेक जिंकली आणि इतिहास लक्षात घेऊन क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बंगळुरूने उत्तम अशा खेळपट्टीचा फायदा उठवत दोनशेपल्याड धावसंख्या उभारली.

विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस जोडीने 96 धावांची खणखणीत सलामी दिली. अमित मिश्राने कोहलीला बाद केलं. कोहलीने 44 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 61 धावांची खेळी केली.

कोहलीच्या जागी आलेल्या मॅक्सवेलने वादळी फटकेबाजी करत डू प्लेसिसला चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 50 चेंडूत 115 धावांची दमदार भागीदारी केली.

कर्णधार डू प्लेसिसने 46 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह 79 धावांची खेळी केली. मॅक्सवेलने 29 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांसह 59 धावा चोपून काढल्या.

"माझी बायको आणि माझ्या मुलाला हा पुरस्कार समर्पित करतो. आम्हाला हा सामना जिंकायचाच होता. राहुल आणि स्टॉइनस यांची भागीदारी चांगली झाली. स्टॉइनसच्या खेळीने विजयाच्या आशा जिवंत राखल्या. सामना शेवटपर्यंत गेला तर जिंकू शकतो हे आम्हाला ठाऊक होतं. खेळपट्टी फलंदाजीला अतिशय पोषक होती. त्यामुळे योग्य चेंडूवर टोलेबाजी करणं आणि पॅव्हेलियनमध्ये ठरलेल्या योजनांची अंमलबजावणी करणं हेच काम होतं.

मी दुसऱ्याच चेंडूवर लगावलेला फटका षटकार गेला आणि मला आत्मविश्वास मिळाला. मी माझ्या खेळावर खूप मेहनत घेतो आहे. मला अशाच खेळी करायच्या आहेत. गेले काही वर्ष संघासाठी अशी खेळी करता येत नाही या निराशेत घालवली आहेत. आता मी चांगल्या मनस्थितीत आहे. मला क्रिकेटचा आनंद लुटायचा आहे. चेहऱ्यावर हसू ठेवायचं आहे. संघाला माझ्याकडून जे हवंय ते योगदान देण्याची माझी तयारी आहे", असं पूरनने सामनावीर पुरस्कार स्वीकारताना सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)