प्रबीर पूरकायस्थ यांची अटक बेकायदेशीर, सुप्रीम कोर्टाने दिले सुटकेचे आदेश

प्रबीर पुरकायस्थ

फोटो स्रोत, Getty Images

'न्यूजक्लिक'चे संस्थापक संपादक प्रबीर पूरकायस्थ यांची अटक बेकायदेशीर असल्याचं न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठानं म्हटलंय. या खंडपीठात सुप्रीम कोर्टातील आणखी दोन न्यायमूर्तींचा समावेश होता.

प्रबीर पूरकायस्थ यांची अटक आणि त्यानंतर त्यांना ताब्यात ठेवणं कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर असल्याचं न्या. भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटलंय.

पूरकायस्थ यांच्या अटकेवेळी अटकेचा आधार काय होता हे सांगण्यात आलं नसल्याने अटक रद्द करण्यात येत असल्याचं न्यायालयाने म्हटलंय.

प्रबीर पूरकायस्थ यांना कनिष्ठ न्यायालयाने ठरवून दिलेली रक्कम जमा केल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकते.

चीनकडून अवैध फंडिंग घेतल्याच्या आरोपांखाली गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात पूरकायस्थ यांना UAPA कायद्याखाली अटक करण्यात आली होती.

प्रबीर पूरकायस्थ यांचे वकील काय म्हणाले?

प्रबीर पूरकायस्थ यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करताना म्हटलं होतं की, "प्रबीर पूरकायस्थ ताब्यात घेण्यात आलं, तेव्हा त्यांना अटक करण्याच्या कारणाबाबत माहिती देण्यात आली नाही, खरंतर ही माहिती लेखी स्वरूपात द्यायला हवी होती."

यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी दिल्ली पोलिसांची बाजू मांडताना सांगितलं की, "पूरकायस्थ यांना कोणत्या कारणास्तव अटक करण्यात आली आहे याची माहिती देण्यात आली होती."

ते म्हणाले की, यूएपीएअंतर्गत ही माहिती लिखित स्वरूपात देणे बंधनकारक नाही.

प्रकरण काय होतं?

गेल्या वर्षी, 2024 च्या ऑक्टोबरमध्ये दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिक या न्यूज वेबसाइटशी संबंधित अनेक पत्रकारांच्या घरांवर छापेमारी केली होती.

ऑगस्ट 2023 मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानंतर हा छापा टाकण्यात आला होता.

न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीत न्यूजक्लिक वेबसाइटवर चीनचा प्रचार करण्यासाठी अमेरिकन कोट्याधीशाकडून निधी घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.

प्रबीर पूरकायस्थ

फोटो स्रोत, ANI

यानंतर पोलिसांनी वेबसाईटवर गुन्हा दाखल केला. मात्र, न्यूजक्लिकने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. वृत्तानुसार, याच प्रकरणात हा छापा टाकण्यात आला होता.

ज्या लोकांवर छापा टाकण्यात आला, त्यात वेबसाइटचे संस्थापक आणि संपादक प्रबीर पूरकायस्थ, पत्रकार अभिसार शर्मा, अनिंद्यो चक्रवर्ती, भाषा सिंह, व्यंगचित्रकार संजय राजौरा, इतिहासकार सोहेल हाश्मी यांचा समावेश होता.

छापेमारीत पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप, संगणकासह इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत.

दिल्ली पोलिसांनी दहशतवाद विरोधी कायदा 'यूएपीए' अंतर्गत गुन्हा दाखल केला होता आणि या प्रकरणी न्यूजक्लिकचे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक केली होती.

तत्पूर्वी, 2021 मध्ये न्यूज वेबसाइट आणि तिच्या निधी स्रोताची चौकशी सुरू करण्यात आली होती.

त्यावेळी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वेबसाइटवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर ईडीनेही याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.