मल्लिकार्जुन खर्गे म्हणतात, 'मुस्लीम, मटण आणि मंगळसूत्र; मोदींचं M अक्षरावर प्रेम'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, इकबाल अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'एम शब्दावर खूप प्रेम आहे. त्यामुळेच ते सातत्याने मुस्लिम, मटण आणि मंगलसूत्र यावर बोलत असतात," अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलंय.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी बीबीसीला मुलाखत दिली. त्यात त्यांनी सांगितलं की, "जनता मोदींविरोधात लढते आहे आणि त्यामुळे निश्चितपणे इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होईल."
'जनता स्वत: निवडणूक लढतेय'
लोकसभा निवडणुकीचं चार टप्प्यांचं मतदान आता झालं आहे. अर्थात मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी हा संवाद चौथ्या टप्प्याच्या मतदानाच्या एक दिवस आधी रविवारीच (13 मे) झाला होता.
या मुलाखतीत मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, "निवडणुकीतील आतापर्यतची परिस्थिती पाहता त्यांना वाटतं की मोदी सरकारविरोधात जनताच निवडणूक लढवते आहे आणि त्यामुळे यावेळेस इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होईल.
"जनता स्वत: ही निवडणूक लढवते आहे आणि आम्ही जनतेला साथ देत आहोत. आमच्या आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळणार आहेत, त्यामुळे आम्ही मोदी सरकारला रोखू शकू."
दुसऱ्या बाजूला भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीकडूनदेखील निवडणूक जिंकण्याचा दावा करण्यात येतो आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे अनेक बडे नेते जवळ-जवळ प्रत्येक प्रचारसभेत लोकसभा निवडणुकीत 400 जागा जिंकणार असल्याचा दावा करत आहेत.
भाजपाच्या या टोला लगावताना खर्गे म्हणाले की, "400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याची घोषणा ते आधीपासूनच देत आहेत. आपलं नशीब आहे की ते 600 पेक्षा अधिक जागा जिंकणार असं बोलले नाहीत. कारण भारताच्या संसदेत लोकसभा खासदारांची संख्या 543 आहे.
भाजपाच्या दाव्यांना फेटाळून लावणं हा एक भाग झाला, मात्र इंडिया आघाडी निवडणुकीत जिंकणार याची खात्री त्यांना का आहे, या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं, "बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे मुद्दे आणि गरीबांचं उत्पन्न घटल्यामुळे लोकांमध्ये असंतोष आहे. हेच भाजपाच्या पराभवा मागचं कारण असेल."

खर्गेंच्या मते, आतापर्यंत पार पडलेल्या निवडणुकीत या चार कारणांमुळे जनतेनं भाजपाला नाकारलं आहे आणि जनता इंडिया आघाडीला पाठिंबा देते आहे. त्यामुळेच इंडिया आघाडी निवडणूक जिंकते आहे.
निवडणूक आयोगाबद्दल खर्गे काय म्हणाले?
अलीकडेच निवडणूक आयोगाकडून दोन टप्प्यातील मतदानाची आकडेवारी उशीरा जाहीर केल्याचा मुद्दा चर्चेत होता. कॉंग्रेसनं हा उशीर मान्य नसल्याचं म्हटलं होतं.
खर्गेंनी या मुद्द्यावर इंडिया आघाडीच्या नेत्यांना एक पत्र लिहिलं होतं. निवडणूक आयोगानं खर्गेंच्या या पत्राला 'निवडणूक प्रक्रियेतील एका महत्त्वाच्या घटकावरील हल्ला' ठरवलं होतं.
खर्गेंनी याबद्दल आश्चर्य व्यक्त करताना म्हटलं होतं की, इंडिया आघाडीच्या सहकाऱ्यांना त्यांनी लिहिलेल्या पत्राला तर निवडणूक आयोगानं उत्तर दिलं. मात्र जेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली तेव्हा त्याला उत्तर देणं निवडणूक आयोगाला आवश्यक वाटलं नाही.

बीबीसीबरोबर झालेल्या संवादात खर्गे म्हणाले, ज्या दिवशी मतदान होतं, त्याच दिवशी आकडेवारी जाहीर करण्यात काय अडचण आहे.
त्यांनी सांगितलं, "आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत आहोत. मात्र जेव्हा चुका होतात, त्या आमच्या लक्षात आल्यानंतर, लोकशाहीला योग्य मार्गावर आणण्यासाठी सल्ला देणं हे आमचं कर्तव्य आहे. मात्र ते आमच्यावरच आरोप करतात. जर त्यांनी लगेच आकडेवारी जाहीर केली तर लोकांना वस्तुस्थितीची कल्पना येते."
'मोदी आपल्या कामांसाठी मत मागत नाहीत'
पंतप्रधान मोदी या निवडणुकीला राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असं स्वरुप देऊ इच्छितात का?
असा प्रश्न विचारल्यावर खर्गे म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कामासाठी किंवा विकासासाठी मतं मागत नाहीत. ते फक्त लोकांवर वैयक्तिक टीका करताना दिसतात.
खर्गेंच्या मते, कॉंग्रेस आपण केलेली कामं दाखवून मतं मागते आहे, भाजपाने मात्र त्यांची आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत.
ते म्हणतात, "आमच्याकडे ज्या गोष्टी सांगायला आहेत, त्या आम्ही सांगत आहोत आणि त्याच आधारावर मतं मागत आहोत. त्यांनी जे काही सांगितलं होतं ते हवेत विरून गेलं. उदाहरणार्थ, मी 15 लाख रुपये परदेशातून आणून देईन, दर वर्षी दोन कोटी नोकऱ्या देईन, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करेन, मी अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन आणेन, हे सर्व कुठं आहे?"
अनेक राजकीय विश्लेषकांना वाटतं की मोदी विरुद्ध राहुल असं वातावरण केल्यामुळे भाजपाला निवडणुकीत फायदा होईल. कारण मोदींसमोर राहुल गांधी कमकुवत दिसतात.
राजकीय विश्लेषकांव्यतिरिक्त कॉंग्रेस सोडून जाणारे अनेक नेते नेहमीच असा आरोप करतात की राजकारणासंदर्भात राहुल गांधी गंभीर नाहीत आणि कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना त्यांच्यापर्यत पोचणं खूप कठीण जातं.

मोदी विरुद्ध राहुल या मुद्द्याबाबत बोलताना खर्गे म्हणाले, "असं बोलणारे लोक प्रसारमाध्यमांमध्ये आणि बाहेर देखील आहेत. आमचा जो नेता कन्याकुमारी ते काश्मीर पायी चालतो, लाखो-लाखो लोकांना भेटतो. त्यांना प्रत्यक्ष वस्तुस्थिती माहित नसेल का? मणिपूरहून मुंबईपर्यत ते आले आणि प्रत्येक वर्गातील लोकांना भेटले. इतकं केल्यानंतर देखील राहुल विरुद्ध मोदी या मुद्द्याची अकारण चर्चा केली जाते."
याची तुलना हिटलरच्या काळात करण्यात येणाऱ्या प्रचाराशी करताना खर्गे म्हणाले, "हिटलरच्या काळात त्याचा प्रचार मंत्री गोबेल्स होता. तो देखील असंच करायचा. काम कमी आणि गप्पा जास्त, लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी खोटी आश्वासनं, भाजपानं आपल्या कामाबद्दल मतं मागितली पाहिजेत."
निवडणूक प्रचारा दरम्यान पंतप्रधान मोदी वापरत असलेल्या भाषेवर टीका करताना खर्गे म्हणाले, "ते 'एम शब्दा'वर खूप प्रेम करतात. त्यामुळेच त्यांच्या तोंडून नेहमी मुस्लिम, मटण, मासे आणि मंगळसूत्र असे शब्द येतात.
मोदी प्रचार सभांमध्ये सातत्याने म्हणत आहेत की, "कॉंग्रेस दलित आणि मागावर्गीयांचं आरक्षण काढून ते मुस्लिमांना देईल."
मोदी असंदेखील म्हणत आहेत की, जर कॉंग्रेसचं सरकार आलं तर महिलांचं मंगळसूत्र काढून घेतलं जाईल.
खर्गेंनी मोदींवर हल्ला करताना म्हटलं, "एखादा पंतप्रधान ज्याला विश्वगुरू व्हायचं आहे, तो मटण, चिकन आणि मंगळसूत्रावर बोलला तर तो विश्वगुरु बनू शकेल का? सर्वात आधी आपल्या देशाला सांभाळा, लोकांना सांभाळा. गरीबांसाठी काहीतरी करा."
कॉंग्रेस पक्ष सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध आहे. मात्र एकाकडून काहीतरी हिस्काऊन घेऊन दुसऱ्याला देण्याचा पक्षाचा अजिबात विचार नाही, या मुद्द्यावर खर्गे यांनी भर दिला.
ते म्हणाले की राज्यघटनेनुसार काम करायचं आहे आणि यामध्ये धर्माच्या आधारावर कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.
अमेठी-रायबरेलीवर काय बोलले मल्लिकार्जुन खर्गे ?
अमेठीमध्ये कॉंग्रेसने स्मृती इराणींना विजयाचा मार्ग सुकर करून दिला आहे का? राहुल गांधी रायबरेलीमधून का निवडणूक लढवत आहेत?
या प्रश्नाचं उत्तर देताना खर्गे म्हणाले की अमेठीत स्मृती इराणी सहज जिंकतील असं भाजपाला वाटतं. ते म्हणाले की जर विजय इतकाच सोपा असेल तर भाजपाने घरी बसलं पाहिजे. प्रचार करायची गरज काय.
ते म्हणाले की, अमेठी-रायबरेली कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. तिथे कॉंग्रेसचे पाठीराखे आहेत.
खर्गे म्हणतात, "सोनिया गांधी यांच्या तब्येतीमुळे आम्हीच त्यांना सांगितलं की तुम्ही निवडणूक लढवू नका आणि राज्यसभेवर जा. रायबरेलीतून नेहमी त्यांच्याच कुटुंबातील सदस्य निवडणुकीस उभे राहत आले आहेत. या रिकाम्या जागेवर आम्ही राहुल गांधी यांना निवडणूक लढवण्याचा आदेश दिला. अमेठीतून दोन्ही लोकसभा मतदारसंघात काम करणाऱ्या एका चांगल्या कार्यकर्त्याला निवडणुकीत उभे राहण्याची संधी देण्यात आली."
खर्गेंचं म्हणणं आहे की, अमेठीतील लढाई स्वत: प्रियंका गांधी लढत आहेत.
मागील काही कालावधीपासून राहुल गांधी सामाजिक न्यायाबद्दल बोलत आहेत. अशा स्थितीत 90 च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान नरसिंहा राव आणि तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांनी राबविलेल्या उदारीकरणाच्या धोरणावर कॉंग्रेस पक्ष पुनर्विचार करतो आहे का?
याचं उत्तर देताना खर्गे म्हणाले, वेळोवेळी त्या त्या परिस्थितीनुसार पक्ष त्याचं धोरण ठरवतो.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, सामाजिक न्यायाचा मुद्दा घेऊन कॉंग्रेस पक्ष उत्तर भारत आणि विशेषकरून हिंदी पट्टीत आपली राजकीय मूळं पुन्हा एकदा मजबूत करण्याचा प्रयत्न करतो आहे का?
यावर बोलताना खर्गे म्हणाले की काँग्रेस पक्ष काहीतरी भरीव पावलं टाकू इच्छितो. त्यासाठीच पक्षाने गरीब, तरुण, शेतकरी, महिला आणि मजूरांसाठी 'पाच न्याय' आणले आहेत.
ते म्हणतात, "एकीकडे उद्योगही वाचले पाहिजेत आणि दुसरीकडे आपले मजूरदेखील वाचले पाहिजेत. आम्ही असं धोरण आखू की ज्यामुळे देशाची प्रगती होईल."
राहुल गांधी यांच्याबद्दल लोक असंदेखील म्हणतात की ते उद्योग-व्यवसाया विरोधात बोलतात. कॉंग्रेस पक्षाचं यावर काय मत आहे?
या प्रश्नावर खर्गे विचारतात की काँग्रेस पक्षाने आधी जी धोरणं राबविली आहेत त्यामुळे एखादा उद्योग बंद पडला का?
ते म्हणतात, "जेव्हा एखादा नवीन निर्णय घेतला जातो, तेव्हा तो परिस्थितीनुरुप घ्यायचा असतो. आम्हाला वाटायचं की श्रीमंतांवर अधिक कर आकारला पाहिजे, भाजपाने हा कर आणखी कमी केला. आम्हाला वाटायचं की शेतकऱ्यांवर जीएसटी कर लागू व्हायला नको, मात्र त्यांनी शेतकऱ्यांवर देखील जीएसटी कर लागू केला."
केजरीवाल प्रचारासाठी इतर राज्यांमध्ये देखील जाणार का?
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची जामिनावर सुटका झाली आहे आणि त्यांनी निवडणुकीचा प्रचारदेखील सुरू केला आहे. मात्र इंडिया आघाडीकडून दिल्ली आणि पंजाब व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये देखील केजरीवाल प्रचार करणार आहेत का?
यावर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, इंडिया आघाडीचा प्रचार करण्यासाठी ज्या नेत्याची जिथं आवश्यकता असेल तिथे त्याला पाठवलं जाईल.

फोटो स्रोत, ANI
अनेक राजकीय विश्लेषक सांगतात की, जर भाजपाच्या काही जागा कमी झाल्या तर जे पक्ष सध्या एनडीएमध्येही नाहीत आणि इंडिया आघाडीत देखील नाहीत अशा पक्षांचं महत्त्व खूपच वाढेल.
बीजेडी, वायएसआर, बीआरएस सारख्या इंडिया आघाडी आणि एनडीए बाहेर असणाऱ्या पक्षांच्या संपर्कात कॉंग्रेस पक्ष आहे का?
यावर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, निवडणुकीनंतर इंडिया आघाडीकडून हे सर्व ठरवलं जाईल.











