राहुल गांधी अमेठी सोडून रायबरेलीच्या मैदानात, पण सोनिया गांधींचा बालेकिल्ला ते राखतील का?

राहुल गांधी, सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अनुभव स्वरुप यादव
    • Role, रायबरेली, बीसीसी हिंदीसाठी

शुक्रवारी सकाळपर्यंत कोणालाही या गोष्टीचा अंदाज नव्हता की कॉंग्रेस पक्ष सर्वांना धक्का देणारा निर्णय घेणार आहे.

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत असाच कयास बांधला जात होता की राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवतील आणि रायबरेली मतदारसंघातून कोणाला उभं करावं याबद्दल कॉंग्रेसमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. मात्र गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत जे झालं त्याचा अंदाज कोणालाही नव्हता.

मागील 15 दिवसांपासून राहुल गांधी आणि अमेठी मतदारसंघाविषयी जोरदार चर्चा सुरू होती. या चर्चेला पूर्णविराम देत राहुल गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तर अमेठी मतदारसंघातून कॉंग्रेसचे विश्वासू किशोरी लाल शर्मा यांना तिकिट देण्यात आलं आहे.

राहुल गांधी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेस नेत्यांबरोबरच रायबरेलीतील सर्वसामान्य जनतेमध्येदेखील मोठा उत्साह पाहायला मिळाला.

मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की रायबरेलीची जनता राहुल गांधी यांना निवडून देणार नाही.

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

राहुल गांधी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसतं आहे.

उत्तर प्रदेश कॉंग्रेस समितीचे सदस्य असलेले राहुल बाजपेयी म्हणाले, "राहुल गांधी तरुण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत आहेत आणि देशातील भ्रष्टाचारी सरकारविरुद्ध लढत आहेत. ते रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत हे आमचं सौभाग्य आहे."

गमतीचा भाग म्हणजे कॉंग्रेसचे विश्वासू आणि सोनिया गांधी यांचे प्रतिनिधी किशोरी लाल शर्मा यांनी एक मेला रायबरेली आणि अमेठीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत देखील रायबरेली आणि अमेठीतून कॉंग्रेसच्या तिकिटावर नेमकं कोण उभं राहणार हे किशोरी लाल सांगू शकले नव्हते.

मात्र सकाळी जेव्हा राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याची बातमी आली तेव्हा पाहता

राहुल गांधी

फोटो स्रोत, twitter/@INCIndia

फोटो कॅप्शन, राहुल गांधींनी उमेदवारी जाहीर केली.

पाहता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी गोळा होण्यास सुरूवात झाली.

सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्यासोबत राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोचले होते.

राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर होताच समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांची देखील गर्दी दिसून आली. राहुल गांधी रायबरेलीतून उभे राहणार असल्याकडे कार्यकर्ते वेगळ्या दृष्टीने पाहत आहेत. त्यांना वाटतं आहे की ते इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला रायबरेलीतून निवडून देणार आहेत.

कॉंग्रेसचे कार्यकर्ते असलेले मोहम्मद अक्रम म्हणाले की "गांधी परिवार या मतदारसंघातून नेहमीच जिंकत आला आहे. यावेळेस राहुल गांधी पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते इंडिया आघाडीचा चेहरा आहेत. इथून ते किमान सहा लाख मतांनी जिंकतील."

कॉंग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ

रायबरेली मतदारसंघ गांधी कुटुंबाचा पारंपारिक मतदारसंघ समजला जातो. मात्र काहीवेळा अशीही वेळ आली आहे की ज्यावेळेस गांधी कुटुंबाने आपल्या जवळच्या व्यक्तीला इथून निवडणुकीच्या मैदानात उभं केलं आहे.

सोनिया गांधींच्या आधी राजीव गांधींचे मित्र असलेले कॅप्टन सतीश शर्मा यांनी इथून निवडणूक लढवली होती. मात्र 2004 पासून सोनिया गांधीच रायबरेलीच्या खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत.

2024 ची लोकसभा निवडणूक सुरू होण्याआधी सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्या होत्या.

त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघातून कोण उभं राहणार? या गोष्टीबाबत रायबरेलीच्या जनतेमध्ये उत्सुकता होती. सोनिया गांधी जवळपास 20 वर्षे रायबरेलीमधून खासदार होत्या. राज्यसभेच्या खासदार झाल्यावर सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या जनतेचे आभार मानत एक पत्रदेखील प्रसिद्ध केले होते.

काँग्रेस कार्यकर्ते

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, राहुल गांधींच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झालेली कार्यकर्त्यांची गर्दी.

सोनिया गांधी यांनी भावनात्मक पत्रात लिहिलं होतं की "मला माहित आहे की प्रत्येक कठीण प्रसंगी तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठिशी उभे राहिला आहात त्याच प्रकारे यापुढे देखील उभे रहाल."

याआधी अशी चर्चा होती की राहुल गांधी अमेठीतून आणि प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवतील. मात्र आता राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याच्या व्यूहरचनेबद्दल बोलताना रायबरेलीतील ज्येष्ठ पत्रकार महेश त्रिवेदी म्हणाले, "राहुल गांधी आपल्या आईचा वारसा सांभाळण्यासाठी येत आहेत. कॉंग्रेससाठी हा एक सकारात्मक संदेश आहे. किशोरी लाल शर्मा गांधी कुटुंबाच्या जवळचे, विश्वासू आहेत. त्यामुळे ते देखील अमेठीच्या निवडणूक मैदानात भक्कम मांड ठोकून उभे राहतील."

काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत काय?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या शकुंतला मौर्य म्हणाल्या, "रायबरेली मतदारसंघ तर नेहमीच कॉंग्रेसकडे होता आणि यापुढेदेखील राहील."

त्या म्हणाल्या, "या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. पीक पाहिल्यानंतर शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू येतात. असं सरकार असायला हवं का? भारत भूमीला आणि शेतकऱ्यांना कॉंग्रेसने सजवलं आहे. काँग्रेसने कालवे बांधले. आज पाट, कालवे नसते तर शेतकऱ्यांमध्ये पीकाबद्दल उत्साह राहिला नसता."

"शाळा, हॉस्पिटल काँग्रेसने दिले आहेत. मोदींनी बांधलेलं एखादं हॉस्पिटल दाखवलं तर आम्हाला देखील आनंद वाटेल. आम्हाला काम हवं आहे. मोदींची आम्हाला अॅलर्जी थोडीच आहे."

जिल्ह्यातील पत्रकार चांद खान सांगतात, "कॉंग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी या उमेदवारी देऊन मास्टरस्ट्रोक मारला आहे. रायबरेली हा त्यांच्या आईचा मतदारसंघ होता आणि राहुल गांधीकडे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहिलं जातं आहे. राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून देखील निवडणूक लढवत आहेत. जर राहुल गांधींनी रायबरेलीची जागा सोडली तर पोट निवडणूक होईल. त्यावेळेस कदाचित प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवतील."

कॉंग्रेस कार्यकर्ते राहुल बाजपेयी आणि शकुंतला मौर्य
फोटो कॅप्शन, कॉंग्रेस कार्यकर्ते राहुल बाजपेयी आणि शकुंतला मौर्य

रायबरेली मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. इंदिरा गांधी रायबरेलीतून खासदार असतानाच देशाच्या पंतप्रधान होत्या.

मात्र 1977 मध्ये आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांचा जनता पार्टीचे उमेदवार राज नारायण यांनी याच मतदारसंघातून पराभव केला होता. या पराभवानंतर साडे तीन वर्षांच्या आतच, 1980 मध्ये रायबरेलीच्या जनतेने इंदिरा गांधी यांना पुन्हा एकदा निवडून दिलं होतं. अर्थात त्यांनी ही जागा सोडून मेडक मतदारसंघ राखला होता.

अमेठीतून किशोरी लाल शर्मा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्याबद्दल चांद खान म्हणतात, "अमेठी मतदारसंघ कॉंग्रेसची प्राथमिक शाळा आहे. किशोरी लाल शर्मा, गांधी कुटुंबाचे सदस्य असल्या सारखेच आहेत. त्यामुळेच त्यांना अमेठीतून उमेदवारी देण्यात आली आहे."

राहुल गांधी जेव्हा रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोचले तेव्हा भाजपाच्या समर्थकांनी 'राहुल गांधी वापस जाओ' च्या घोषणा देत त्यांना विरोध केला होता.

व्यावसायिक आणि भाजपा समर्थक असलेले अनूप त्रिपाठी म्हणाले की "राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रायबरेलीत आले त्यावेळेस त्यांना विरोध करण्यात आला. कारण सोनिया गांधी मागील पाच वर्षे खासदार असूनदेखील रायबरेलीत आल्या नाहीत. या गोष्टीमुळे रायबरेलीचे लोक नाराज आहेत. काँग्रेसला ही निवडणूक जिंकणं अजिबात सोपं नाही."

दिनेश सिंह आहेत भाजपाचे उमेदवार

दुसऱ्या बाजूस भारतीय जनता पार्टीकडून दिनेश सिंह पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनीदेखील शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा उमेदवारी अर्ज भरला जात असतानादेखील भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. मात्र राहुल गांधींच्या तुलनेत त्यांच्यावेळेस गर्दी कमी होती.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दिनेश सिंह यांनी राहुल गांधींवर टीका करताना म्हटलं, "आज कॉंग्रेसला राहुल गांधी यांच्या पराभवाची भीती वाटते आहे. त्यामुळेच त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व लोक आले आहेत. सोनिया गांधी जर कॉंग्रेसच्या अध्यक्षा नव्हत्या आणि रायबरेलीतून खासदार होत्या तर मग पक्षाच्या अध्यक्षाला रायबरेलीत का येऊ दिलं नाही?

"पहिल्यांदा कॉंग्रेसचा एखादा राष्ट्रीय अध्यक्ष रायबरेलीत आला आहे. जे म्हणतात डरो मत, तेच स्वत: किती घाबरलेले आहेत याचं हे प्रतीक आहे. त्यामुळेच त्यांच्यासोबत सोनिया गांधी, खडगे आणि प्रियंका आल्या आहेत. मात्र माझ्याबरोबर रायबरेलीची जनता आली आहे," दिनेश सिंह म्हणाले.

उमेदवारी अर्ज दाखल करताना दिनेश सिंह.
फोटो कॅप्शन, उमेदवारी अर्ज दाखल करताना दिनेश सिंह.

दिनेश सिंह यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक देखील हजर होते. दिनेश सिंह यांनी दावा केला आहे की त्यांच्यावेळेस लोकांची जास्त गर्दी होती.

हिंदू युवा वाहिनीचे महामंत्री मारुत त्रिपाठी म्हणाले, "ही दिनेश सिंह यांची उमेदवारी नाही तर हा विजयाची मिरवणूक आहे आणि राहुल गांधी यांचा टाटा-टाटा बाय-बाय संपतो आहे."

तर भाजपाचे नेते शशिकांत शुक्ला म्हणाले, "कॉंग्रेसने राहुल गांधी यांना रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. राहुल गांधी अमेठीतून वायनाडला गेले आणि वायनाडहून रायबरेलीत आले आहेत. रायबरेलीतून इटलीला जातील. या उद्दिष्टानिशी आम्ही लोक यंदाची निवडणूक लढवणार आहोत आणि भाजपाच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्यानं विजयी करून कमळाचं फूल फुलवणार आहोत."

गांधी कुटुंबाबद्दल लोक काय म्हणत आहेत

तसं पाहिलं तर रायबरेलीत गांधी कुटुंबाविषयी कोणत्याही प्रकारची नाराजी दिसत नाही. यूपीए सरकारच्या काळात सोनिया गांधी खासदार असताना रायबरेलीत रेल कोच फॅक्टरी, एम्स आणि निफ्ट सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपक्रम मिळाले.

राहुल गांधी आणि सोनिया गांधी.

फोटो स्रोत, ANI

मात्र केंद्रातून यूपीए सरकार गेल्यानंतर सोनिया गांधी यांचं रायबरेलीत येणं कमी झालं होतं. केंद्रात सरकार नसल्यामुळे रायबरेलीच्या जनतेला देण्यासाठी सोनिया गांधींकडे खासदार निधीतून येणाऱ्या योजनांच्या फायद्याव्यतिरिक्त काहीही नव्हतं.

खासदार सोनिया गांधी रायबरेलीत येत नाहीत या मुद्द्यावर भाजपा नेते अनेकवेळा बोलले. मात्र याचा फारसा परिणाम रायबरेलीच्या सर्वसाधारण तरुणांवर झालेला दिसत नाही.

रायबरेलीतील एक तरुण, संजय यादव म्हणाला, "रायबरेलीतून राहुल गांधी यांचा विजय शंभर टक्के निश्चित आहे. इथं जे काही आहे ते सर्व कॉंग्रेसनं केलेलं आहे. मागील दहा वर्षात भाजपाने रायबरेलीत कोणतंही काम केलेलं नाही."

इथलेच अश्विनीदेखील याच मताशी सहमत आहेत. ते म्हणतात, "रायबरेलीत जो काही विकास झाला आहे, तो कॉंग्रेसने केला आहे. भाजपाने मागील दहा वर्षात काहीही केलं नाही. राहुल गांधी यांचा इथून प्रचंड मताधिक्यानं विजय होणार आहे."

Quote

सरकारी नोकरीची तयारी करत असलेल्या जुटी पूजा पटेल यांनी सांगितलं, "राहुल गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी अशीच आमची इच्छा होती. ते इथून प्रचंड मतांनी जिंकतील. ते तरुणांबद्दल बोलतात. आम्ही पीडित लोक आहेत. नोकरीसाठी जागा निघतात मात्र पेपर लीक होतो. राहुल गांधीकडून आम्हाला अपेक्षा आहेत. कारण ते विद्यार्थ्यांबद्दल बोलतात आणि राहुल गांधी खूप सहजपणे इथून जिंकतील."

रायबरेलीतील ज्येष्ठ पत्रकार संजय मौर्य म्हणाले, "खूप दिवसांपासून वाट पाहिली जात होती आणि कयास बांधला जात होता की या मतदारसंघातून गांधी कुटुंबातूनच एखादा उमेदवार उभा राहील. राहुल गांधी आल्यामुळे उत्साह वाढला आहे. दिनेश प्रताप मागील वेळेस यांनी जोमात निवडणूक लढवली होती आणि त्यांना 3 लाख 68 हजार मतं मिळाली होती. मागील वेळेस मोदींच्या नावाची लाट होती. सध्या दिनेश प्रताप सिंह राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. मात्र कोणतीही लाट दिसत नाही. त्यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरेल."

काय आहे जातीय समीकरण?

रायबरेली मतदारसंघात जवळपास 18 लाख मतदार आहेत. तसं पाहिलं तर जातीनिहाय आकडेवारीची कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही. मात्र अंदाजानुसार रायबरेलीत दलित मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.

रायबरेलीत जवळपास 35 टक्के दलित मतदार आहेत. त्यामध्येही सर्वाधिक मतदार पासी समुदायाचे आहेत. त्यांची जवळपास साडे चार लाख मतं आहेत.

तर ब्राह्मण, यादव आणि मुस्लिम मतदारांची टक्केवारीदेखील जवळपास 12-12 टक्के आहे. राजपूत मतदारांची संख्या जवळपास पाच टक्के आहे. तर लोधी 6 टक्के आणि कुर्मी 4 टक्के आहेत.

हेही वाचलंत का?