राहुल गांधींच्या जागी अमेठीतून निवडणूक लढवणारे केएल शर्मा कोण आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसने शुक्रवारी (3मे) उत्तरप्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.
रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
राहुल गांधी पहिल्यांदाच रायबरेलीमधून निवडणूक लढवणार आहेत.
रायबरेलीच्या जागेवर भाजपने दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

फोटो स्रोत, ANI
मागील लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधींनी त्यांचा पराभव केला होता.
सोनिया गांधी 2004 पासून 2024 पर्यंत रायबरेली मतदारसंघातून खासदार राहिल्या आहेत.
यावेळी सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. सोनिया गांधी आता राज्यसभेच्या खासदार आहेत.
लोकसभा निवडणूक 2024 च्या बीबीसीच्या विशेष बातम्या इथे वाचा
केएल शर्मा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर प्रियांका गांधी काय म्हणाल्या?
काँग्रेसने अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपकडून स्मृती इराणी रिंगणात आहेत.
गेल्या वेळी स्मृती इराणी यांनी अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव केला होता.
राहुल गांधी आता रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत त्यावर स्मृती इराणी म्हणाल्या, "पाहुण्यांचे स्वागत आहे. त्यांचं स्वागत करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. गांधी घराण्याने अमेठीतून निवडणूक न लढवणं आधीच आपला पराभव मान्य करण्यासारखं आहे."
स्मृती इराणी म्हणाल्या, "इथे विजय मिळेल अशी जराशी सुद्धा खात्री वाटत असती तर त्यांनी राहुल गांधींना इथून तिकीट दिलं असतं."

फोटो स्रोत, Getty Images
प्रियांका गांधी वाड्रा यावेळी निवडणूक लढवत नसल्याचं काँग्रेसची यादी समोर येताच स्पष्ट झालं आहे.
या निवडणुकीत त्या अमेठी किंवा रायबरेलीमधून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात होती.
प्रियंका गांधी वाड्रा यांनी सोशल मीडियावर किशोरी लाल शर्मा यांना अमेठी मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून जाहीर करताना लिहिलं आहे की, "किशोरी लाल शर्मा आणि आमच्या कुटुंबीयांचे फार पूर्वीपासून घनिष्ठ संबंध आहेत. अमेठी आणि रायबरेलीच्या लोकांच्या सेवेसाठी ते नेहमी तत्पर असतात. लोकसेवेची त्यांची तळमळ हे एक उदाहरण आहे."
प्रियांका गांधी यांनी पुढे लिहिलंय की, "किशोरी लालजी यांना काँग्रेस पक्षाने अमेठीमधून उमेदवारी देणं ही आनंदाची बाब आहे. किशोरीलाल यांची कर्तव्यनिष्ठा आणि समर्पण पाहता निवडणुकीत त्यांना नक्कीच यश मिळेल."
राहुल गांधी आणि अमेठीची जागा
2004 साली राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर या जागेवरून ते सातत्याने खासदार म्हणून निवडून आले आहेत.
पण 2019 मध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला.
मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती आणि तिथून ते खासदार झाले होते.
यावेळीही राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. या जागेवर मतदान पार पडलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सोनिया गांधी यांनी 1999 मध्ये अमेठी मतदारसंघातूनच राजकारणाचा श्रीगणेशा केला होता.
यानंतर 2004 साली सोनिया गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय मिळवला.
त्याच वर्षी राहुल गांधीही अमेठी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.
2019 सोडता काँग्रेसने 1977 आणि 1998 मध्ये अमेठीसाठी गांधी घराण्याचा उमेदवार दिला नव्हता.
अमेठी मतदारसंघाचा इतिहास
अमेठी आणि रायबरेली या जागांवर गांधी घराण्याचं वर्चस्व मानलं जातं.
1952 आणि 1957 मध्ये फिरोज गांधी या जागेवरून खासदार म्हणून निवडून आले होते. 1967 मध्ये इंदिरा गांधी रायबरेलीतून लढून लोकसभेत पोहोचल्या.
इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये रायबरेलीची जागा जिंकली. मात्र, आणीबाणीनंतर 1977 मध्ये त्यांना इथे पराभव स्विकारावा लागला.

फोटो स्रोत, ANI
1980 मध्ये इंदिरा गांधी रायबरेलीमधून पुन्हा निवडून आल्या. सोबतच आंध्रप्रदेशातील मेडकमधूनही त्या निवडून आल्या.
1980 मध्ये अमेठीतून गांधी कुटुंबाची राजकीय सुरुवात झाली. त्यानंतर संजय गांधी या जागेवरून विजयी होऊन संसदेत पोहोचले.
संजय गांधींच्या निधनानंतर 1981 मध्ये राजीव गांधी याच मतदारसंघातून संसदेत पोहोचले. ते ह्यात असेपर्यंत त्यांनी ही जागा सुटू दिली नव्हती.
मात्र, 1991 ते 1999 या काळात गांधी घराण्यातील एकाही सदस्याने या जागेवर निवडणूक लढवलेली नाही.
कोण आहेत किशोरी लाल शर्मा?
अमेठीतून निवडणूक लढवणारे किशोरीलाल शर्मा गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात.
काँग्रेसकडून तिकीट मिळाल्यानंतर किशोरी लाल शर्मा म्हणाले की, "मी खरगेजी, राहुलजी, सोनियाजी आणि प्रियंका यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी दिली आहे."
ते म्हणाले, "मी कठोर परिश्रम करीन. मी 40 वर्षांपासून या भागाची सेवा करतो आहे. 1983 मध्ये काँग्रेसचा युवा कार्यकर्ता म्हणून इथे आलोय तेव्हापासून मी सातत्याने कार्यरत आहे. राजीवजींनी मला इथे आणलं होतं आणि त्यानंतर मी इथेच राहिलो."
राहुल गांधींनी लढाईच मैदान सोडलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या प्रश्नावर ते म्हणाले, "राहुल गांधी लढाई सोडणार नाहीत, ते संपूर्ण देशाची लढाई लढत आहेत."
हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीत असं म्हटलंय की, किशोरी लाल शर्मा हे गांधी कुटुंबाशी संबंधित रायबरेली, अमेठी येथील प्रकरणांमध्ये संपर्क सूत्र आहेत.
किशोरीलाल शर्मा हे मूळचे पंजाबचे आहेत. 1983 मध्ये ते काँग्रेस कार्यकर्ता म्हणून अमेठीत आले.
किशोरीलाल शर्मा राजीव गांधींच्या जवळचे कार्यकर्ते होते असं म्हटलं जातं.
राजीव गांधींच्या निधनानंतरही त्यांनी अमेठीच्या जागेवर काँग्रेसचं काम करणं सुरूच ठेवलं. 1990 च्या दशकात जेव्हा गांधी कुटुंब अमेठीच्या निवडणुकीच्या राजकारणापासून दूर गेलं तेव्हाही किशोरी लाल शर्मा या जागेवर सक्रिय होते.
1999 मध्ये सोनिया गांधींच्या पहिल्या निवडणुकीतील विजयात किशोरी लाल शर्मा यांची महत्त्वाची भूमिका होती असं म्हटलं जातं.











