चंद्रशेखर इंदिरा गांधींना म्हणाले होते, ‘काँग्रेसला समाजवादी करेन, नाहीतर पक्ष फोडेन’

चंद्रशेखर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

भारतात पंतप्रधानपदावर विराजमान झालेली व्यक्ती साधारणत: आधी कुठल्या ना कुठल्या मंत्रिपदावर विराजमान होऊन आलेली असते. आजही आणि आधीही, अप्रत्यक्षपणे हा प्रघात राहिलाच आहे. किंवा वरच्या पदाच्या त्या पायऱ्याच म्हणूया.

दोनच पंतप्रधान असे होऊन गेले, जे आधी कुठल्याच मंत्रिपदावर नव्हते, ना राज्यात, ना केंद्रात. पहिले म्हणजे राजीव गांधी आणि दुसरे चंद्रशेखर.

यातील राजीव गांधींना पंतप्रधान पद मिळालं, ते इंदिरा गांधींच्या हत्येनंतर. मात्र, चंद्रशेखर यांना पंतप्रधान पद मिळालं, त्यासाठी जणू त्यांनी एक तपश्चर्याच केली होती.

चंद्रशेखर पंतप्रधान बनण्यापूर्वी राज्य किंवा केंद्र, कुठेच मंत्रिपद उपभोगलं नव्हतं. ते खासदार राहिले आणि थेट देशाचे पंतप्रधान बनले. जणूकाही सरकारमधील 'पंतप्रधानपद' या एकाच पदासाठी ते बनले होते. मात्र, हे सर्वोच्च पदही त्यांच्या वाट्याला केवळ सात ते आठ महिनेचं आलं. तरीही अनेक अर्थांनी त्यांची ही छोटीशी कारकीर्द महत्त्वाची आणि चर्चेत राहणारी ठरली.

चंद्रशेखर यांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यातल्या प्रसंगांमधून त्यांच्या प्रवासावर नजर टाकण्याचा हा प्रयत्न.

लोहियांनाही सुनावणारा नेता

उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील इब्राहिमपट्टीचे राहणारे चंद्रशेखर समाजवादी आंदोलनातील धडाडीचे कार्यकर्ते बनले आणि समाजवादी आंदोलनातून त्यांनी काँग्रेसच्या विचारसरणीची सावलीही अनुभवली. त्या सावलीने आणीबाणीचे चटके देण्यास सुरुवात केल्यानंतर तिथूनही ते बाहेर पडले.

अत्यंत सडेतोड आणि स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा स्वभावगुण बनला होता.

‘जीवन जैसा जिया’ या आपल्या आत्मकथेत चंद्रशेखर राम मनोहर लोहियांशी संबंधित एक प्रसंग सांगतात.

राममनोहर लोहिया

फोटो स्रोत, LOHIA TRUST

फोटो कॅप्शन, राममनोहर लोहिया
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

राम मनोहर लोहियांसारख्या पहाडी व्यक्तीला आपल्या गावात बोलावून, ‘आप खाना खा के निकल जाइए’ असं बेधडकपणे बोलणारा हा माणूस काय निडरवृत्तीचा असेल, याची कल्पना येते.

त्याचं झालं असं होतं की, बलियातील एका वार्षिक कार्यक्रमात समाजवादी चळवळीतले नेते आचार्य नरेंद्र देव यांना बोलावण्याचं ठरलं होतं. पण नरेंद्र देव यांना जाणं शक्य होत नव्हतं, म्हणून त्यांनी राम मनोहर लोहियांना जाण्यास सांगितलं.

लोहियांना कोलकात्यात काही काम होतं, म्हणून ते जाण्यास उत्सुक नव्हते. पण नरेंद्र देवांची विनंती टाळणं शक्य नव्हतं. अखेरीस कोलकात्याला जाण्यासाठी बलियातून सर्व नियोजन करावं, अशी अट घालून ते बलियात आले. पण येईपर्यंत ते कुरकूर करत राहिले. परत जाण्याचं कुठलंच नियोजन केली नसल्याच्या तक्रारींची भुणभुण चंद्रशेखर यांच्यामागे लावली होती. या तक्रारींनी चंद्रशेखर संतापले.

लोहिया त्यावेळी प्रचंड लोकप्रिय होते. मात्र, आपल्या प्रामाणिक हेतूंवर संशय घेणाऱ्या लोहियांना चंद्रशेखर म्हणाले, “हमारे कार्यक्रम में आपकी जरूरत नहीं, आप खाना खा के निकल सकते हो”

चंद्रशेखर यांच्या प्रामाणिक सडेतोडपणामुळे लोहिया नरमले आणि त्यांना आपली चूक कळली. अखेरीस लोहियांनी कार्यक्रमाला हजेरी लावून पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

इंदिरा गांधींसमोर काँग्रेस सोडण्याचा इशारा

लोहियांसोबत घडलेला चंद्रशेखर यांच्याबद्दलचा हा एकच प्रसंग नाही.

देशात ज्यावेळी इंदिरा गांधी यांची प्रतिमा ‘आयर्न लेडी’ म्हणून प्रस्थापित झाली होती, ज्यावेळी अनेक बडे नेते इंदिरा गांधींसमोर बोलायला बिथरत असत, त्यावेळी चंद्रशेखर हे इंदिरा गांधी यांच्यासमोर परखडपणे बोलण्याचं धाडस बाळगून होते.

खरंतर हा प्रसंग होता मोरारजींशीसंबंधित. झालं असं की, मोरारजी देसाईंशी काहीशा कारणावरून भांडण झालं. लोकसभेतच दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. चंद्रशेखर त्यावेळी काँग्रेसमध्ये होते.

चंद्रशेखर

फोटो स्रोत, CHANDRASHEKHAR FAMILY

फोटो कॅप्शन, इंदिरा गांधी आणि चंद्रशेखर

इंदिरा गांधींनी चंद्रशेखर यांना वैयक्तिकरित्या गाठत सांगितलं, “मोरारजी भाई बडे है. मैं नहीं चाहती आप पार्टी से बाहर हो. आप माफी माँग लिजिए.”

क्षणाचा विलंब न करता, चंद्रशेखर इंदिरा गांधी यांना म्हणाले, “मैं कोई हिंदू रमणी नहीं हूँ, जो मरते वक्त तक पती का साथ निभाए. स्वाभिमान के साथ जिता हूँ”. हे सांगत त्यांनी पक्षालाही राम राम ठोकण्याचा गर्भित इशारा दिला. असे होते चंद्रशेखर.

‘…तर काँग्रेस तोडून टाकेन’

चंद्रशेखर यांच्या समाजवादी ते काँग्रेस या प्रवासावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यावेळीही आणि आताही घेतला जातो. पण समाजवादी असो किंवा कुठे, जिथे चंद्रशेखर गेले, तिथे त्यांनी समाजवाद रुजवण्याचा प्रयत्न केला, असं म्हणता येईल. त्यांचं राजकारण पाहिल्यास असं दिसतं की, राजकारणाचे डावपेच ते खेळले, पण समाजावादाच्या मुलभूत विचारांशी ते ठाम राहिले.

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर इंदिरा गांधींना ते भेटायले गेले होते. तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांना विचारलं, चंद्रशेखरजी, तुम्ही काँग्रेसला समाजवादी मानता का?

इंदिरा गांधींच्या प्रश्नावर झालेला संवाद चंद्रशेखर यांच्या वैचारिक भूमिका आणि सडेतोडपणाची साक्षच ठरतात. तो संवाद असा झाला :

चंद्रशेखर यांनी इंदिरा गांधींना उत्तर दिलं, काँग्रेस समाजवादी संस्था असल्याचं मला वाटत नाही. पण लोकांना तसं वाटतं.

त्यावर इंदिरा गांधींनी विचारलं, मग तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला आलात?

चंद्रशेखर म्हणाले, तुम्हाला खरं ऐकायचंय?

इंदिरा गांधींनी होकारार्थी मान हलवल्यावर चंद्रशेखर म्हणाले : प्रजा सोशलिस्ट पार्टीत 13 वर्षे काढली. पूर्ण क्षमतेनं आणि प्रामाणिकपणाने समाजवादाच्या मार्गावर चाललो. तिथं काहीतरी गडबड वाटली, म्हणून तिथून बाहेर पडलो आणि म्हटलं काँग्रेसमध्ये जाऊन काहीतरी करून पाहू.

त्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या, मग काँग्रेसमध्ये येऊन तुम्ही काय करू इच्छित आहात?

चंद्रशेखर म्हणाले, काँग्रेसला समाजवादी बनवू इच्छित आहे.

त्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या, आणि असं नाही झालं तर?

चंद्रशेखर ठामपणे म्हणाले, “काँग्रेसला तोडण्याचा प्रयत्न करेन. कारण काँग्रेस तुटणार नाही, तोवर देशात दुसरं राजकारण उभं राहणार नाही. आधी काँग्रेसला समाजवादी बनवण्याचा प्रयत्न करेन, नाहीतर तोडण्याशिवाय पर्याय उरणार नाही. काँग्रेस वडाचं झाड आहे, त्याच्या खाली दुसरी झाडं जगू शकत नाहीत. त्यामुळे हा पक्ष फुटत नाही, तोवर क्रांतिकारी परिवर्तन शक्य नाही.”

या सगळ्या उत्तरांवर इंदिरा गांधी आवाक् झाल्या. मात्र, त्या या उत्तरांवर रागावल्या नाहीत, उलट इतक्या सडेतोड उत्तरांनी विस्मयचकितच झाल्या.

चंद्रशेखर यांचा सडेतोड आणि रोखठोक स्वभाव सांगणारे हे तीन प्रसंग. मात्र, याच स्वभावामुळे खरंतर त्यांना राजकीय कारकीर्दीत बऱ्याचदा परिणामांना सामोरं जावं लागलं.

ज्येष्ठ नेत्यांना आव्हान देणाऱ्या ‘तरुण तुर्क’ गटाचे प्रमुख

चंद्रशेखर काँग्रेसमध्ये असताना ‘तरुण तुर्क’ गटाचे प्रमुख होते. काँग्रेसमधील तरुण नेत्यांचा हा गट होता.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी या भारताच्या राजकारणात अधिक सक्रीय झाल्या. मात्र, त्यावेळी काँग्रेसमधील पक्षाची धुरा ज्येष्ठांच्या हाती होती. मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, स. का. पाटील, कामराज आणि निजलिंगप्पा यांसारख्या नेतेमंडळींचा शब्द काँग्रेसमधील निर्णय प्रक्रियेत वजनदार होता.

चंद्रशेखर

फोटो स्रोत, Rajkamal Prakashan

याच काळात काँग्रेसमध्ये समाजवादी विचारांच्या तरुणांची सुद्धा एक फळी होती. चंद्रशेखर, मोहन धारिया, कृष्णन कांत, अमृत नाहटा अशा त्यावेळच्या तरुण नेतेमंडळींचा त्यात समावेश होता.

ही गोष्ट साधारण 1967 च्या दरम्यानची. त्यावेळी के. कामराज हे काँग्रेसचे अध्यक्ष होते, तर इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजकीय अभ्यासक उल्हास पवार सांगतात, “काँग्रेसमध्ये त्यावेळी विविध विचारधारांचा संगम होता. समाजवादी आणि गांधीवादी विचारधारा होती, तशीच भांडवलादारी विचारांचे नेतेही होते. मोरारजी देसाईंसारखी मंडळी भांडवलादारी विचारधारेकडे झुकणारी होती. मात्र, चंद्रशेखर, मोहन धारिया ही मंडळी समाजवादी पार्श्वभूमीची होती. त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने ही मंडळी आग्रही होती.”

माजी पंतप्रधान चंद्रशेखर हे या 'तरुण तुर्क'चे प्रमुख मानले जात.

बँकांचं राष्ट्रीयकरण, संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, कोळशाच्या खाणींचं राष्ट्रीयकरण अशा आर्थिक क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांच्या दहा मागण्याचा 'दशसूत्री' कार्यक्रम त्यांनी तयार केला आणि काँग्रेसच्या वरिष्ठांसमोर ठेवला.

या दहा मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्नही चंद्रशेखर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. या मागण्यांना समर्थन मिळवण्यासाठी चंद्रशेखर यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी खासदारांच्या स्वाक्षरीची मोहीमही उघडली होती. मात्र, तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री मोरारजी देसाईंचा याला विरोध होता.

या दशसूत्रीची प्रत ज्यावेळी चंद्रशेखर यांनी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष कामराज यांना पाठवली, त्यावेळी मोठा गदारोळ झाल्याचं चंद्रशेखर यांनी आत्मकथेत सांगितलंय. दशसूत्री आर्थिक कार्यक्रमाला पाठिंबा मिळवण्यासाठी चंद्रशेखर यांनी ज्यावेळी देशभरात दौरा सुरू केला, त्यावेळी काँग्रेसच्या पक्षीय वरिष्ठांकडून आदेश काढण्यात आला की, या 'तरुण तुर्कां'ना पक्षीय कार्यलयानं महत्त्व देऊ नये.

मात्र, या तरुण तुर्कांच्या या अनेक मुद्द्यांना इंदिरा गांधींचा पाठिंबा होता. पुढे इंदिरा गांधींनी त्यांच्या काही मागण्या अमलातही आणल्या. त्यात बँकांचं राष्ट्रीयकरण करणे, संस्थानिकांचे तनखे रद्द करणे हे त्यातलेच निर्णय. युवा तुर्कांचा हा एकप्रकारे विजयच होता.

मात्र, पुढे राजकीय घडामोडीतही तरुण तुर्कांचा गट शाबूत राहिला नाही. पुढे इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला विरोध केल्यानं ते पक्षातून बाहेर पडलेच, मात्र अनेकांनी तुरुंगवासही भोगला.

साठचं दशक चंद्रशेखर, मोहन धारिया आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गाजवलं. ज्येष्ठांविरोधात आवाज बुलंद करून, आर्थिक-सामाजिक मुद्दे पुढे रेटण्यासाठी या तरुण तुर्कांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे मानले गेले.

चंद्रशेखर

इंदिरा गांधींना सोडलं, राजीव गांधींच्या पाठिंब्यावर पंतप्रधानपदी

इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीमुळे ते काँग्रेसमधून बाहेर पडले. पुढे त्यांनी जनता पार्टीची कास धरली. जनता पार्टीचे अध्यक्ष बनले.

जनता पार्टीतल्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक असल्यानं आणीबाणीनंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये पंतप्रधानपद मिळेल अशी आशा होती. पण त्यावेळी मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. पंतप्रधान न मिळाल्याने चंद्रशेखर नाराज असल्याच्या चर्चांना त्यावेळी उधाण आलं. त्यात मोराराजींच्या मंत्रिमंडळात त्यांनी कुठलेच मंत्रिपद घेतले नाही त्यामुळे या चर्चांना आणखीच खतपाणी मिळालं.

मात्र, लवकरच त्यांना पंतप्रधान पद मिळणार होतं. मात्र, त्यासाठी व्ही. पी. सिंह यांचं सरकार कोसळणं अपेक्षित होतं. तेही घडलं आणि चंद्रशेखर पंतप्रधान बनले.

व्ही. पी. सिंह यांच्या सरकारला कम्युनिस्ट आणि भाजप अशा दोघांचेही समर्थन होतं. त्याचवेळी लालकृष्ण आडवाणींची रथयात्रा सुरू होती. याच दरम्यान आडवाणींना अटक करण्यात आली. त्यामुळे भाजपनं 6 ऑक्टोबर 1990 ला व्ही. पी. सिंह यांचा पाठिंबा काढून घेतला.

व्ही. पी. सिंह यांनी राष्ट्रपतींकडून तीन आठवड्यांचा कालावधी मागून घेतला. मात्र, त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही आणि 7 नोव्हेंबर 1990 ला व्ही. पी. सिंह सरकार कोसळलं. चौधरी देवीलाल हे सरकारमधून बाहेर पडलेच होते. कारण व्ही. पी. सिंह यांनी त्यांचं उपपंतप्रधानपद काढून घेतलं होतं.

या काळात देशात मंडल आयोग लागू केल्यानंतरचा हिंसाचार सुरू होता. रथयात्रेमुळे धार्मिक वातावरण तणावाचं बनलं होतं. असा सगळा गदारोळ सुरू होता.

या स्थितीत चंद्रशेखर यांना पंतप्रधान बनवून काँग्रेसचा पाठिंबा देण्यासाठी राजीव गांधी यांनी वेगवेगळ्या पद्धतीने संपर्क करण्यास सुरुवात केली.

चंद्रशेखर

फोटो स्रोत, CHANDRASHEKHAR FAMILY

एका रात्री चंद्रशेखर यांना रोमेश भंडारी यांचा फोन आला आणि म्हणाले, कॉफी प्यायला या.

चंद्रशेखर यांना कळलं की, एवढ्या रात्री कुणी कॉफी प्यायला बोलवत नाही. त्यांना शंका आलीच. ते निमंत्रणानुसार तिथं गेले, तर रोमेश भंडारींच्या घरी राजीव गांधी बसले होते.

राजीव गांधी चंद्रशेखरना म्हणाले की, देशात स्थिती गंभीर आहे, आपल्याला काहीतरी करायला हवं. तिथंच राजीव गांधी यांनी चंद्रशेखर यांना पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी चंद्रशेखर राष्ट्रपतींना जाऊन भेटले आणि सरकार स्थापनेचा दावा केला.

चंद्रशेखर यांनी 11 नोव्हेंबर 1990 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तेव्हा देशात 70 ते 75 ठिकाणी कर्फ्यू लागला होता. तरुण आत्मदहन करत होते. एकूणच मंडल आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर हिंसा वाढली होती. अशा स्थितीत चंद्रशेखर यांच्याकडे देशाचं नेतृत्व गेलं.

चंद्रशेखर यांच्याकडे खरंतर चारच महिने पंतप्रधानपद होतं, कारण उरलेले तीन महिने ते काळजीवाहूच राहिले.

रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात लक्ष घातलं

चंद्रशेखर पंतप्रधानपदावर विराजमान झाले, तेव्हा राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद ऐन भरात होता. आडवाणींच्या रथयात्रेनं या वादाला हवाच भरली होती. मात्र, चंद्रशेखर यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर यात गांभीर्यानं लक्ष घातलं.

विश्व हिंदू परिषद आणि मुस्लीम इतिहासकारांना चंद्रशेखर यांनी चर्चेसाठी एकाच टेबलावर आणलं होतं. बाबरी पाडकामामुळे या दोन्ही बाजूंनी एकमेकांशी बोलणं बंद केलं होतं. हे बोलणं पुन्हा सुरू करण्याचं काम चंद्रशेखर यांनी केलं.

ज्येष्ठ पत्रकार रशीद किदवाई त्यांच्या ‘भारत के प्रधानमंत्री’ पुस्तकात लिहितात की, ‘चंद्रशेखर सरकारनं बाबरी मशीद आणि राम जन्मभूमी वाद सोडवण्यापर्यंत आणल्यानंच राजीव गांधी आणि त्यांचे निकटवर्तीय बेचैन झाले. त्यांना वाटलं चंद्रशेखर यांनाच या सगळ्याचं श्रेय मिळेल.’

चंद्रशेखर यांनी या प्रयत्नांसाठी राजस्थानचे तत्कील मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची मदत घेतली होती.

चंद्रशेखर यांच्या मध्यस्थीमुळे विश्व हिंदू परिषद आणि बाबरी मस्जिद अॅक्शन कमिटी हे दोन्ही पक्ष या मतापर्यंत आले की, बाबरी मशीद-राम जन्मभूमी वाद न्यायालयाच्या माध्यमातून सोडवण्यावर तयार झाले.

भारत के प्रधानमंत्री

फोटो स्रोत, RAJKAMAL PRAKASHN

त्याचसोबत, चंद्रशेखर यांनी मशीद-मंदिर वाद सोडवण्यासाठी ऐतिहासिक, पुरतत्वशास्त्रीय, वैधानिक आणि महसूल नोंद अभ्यास यासाठी चार समित्या स्थापन करण्यात यशस्वी झाले. या समित्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली की, विहिंप आणि बीएमएसीने दिलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करणं.

बाबरी मशीद आमि राम जन्मभूमी वादाबाबत त्यांनी केलेले हे प्रयत्न त्यांच्या कारकीर्दीला लक्षात ठेवणारे ठरले.

मात्र, चंद्रशेखर यांना नोव्हेंबर 1990 ते जून 1991 असा सातच महिने त्यांना कार्यकाळ मिळाला. राजीव गांधींच्या पाठिंब्यावर हे सरकार होतं. खूप टीका झाली या सरकारवर. अर्थसंकल्पही मांडता आला नाही, इतकं अस्थिर सरकार होतं हे. पण ज्यावेळी राजीव गांधी पाठिंबा काढतायेत, अशी कुणकुण लागली, तेव्हा पाठिंबा काढण्याआधीच चंद्रशेखर यांनी राजीनामा दिला.

‘चंद्रशेखर : द लास्ट आयकॉन ऑफ आयडियालॉजिकल पॉलिटिक्स’

भारताचं आठवं पंतप्रधान पद सांभाळलेले चंद्रशेखर पंतप्रधान निवासात कधी रमलेच नाहीत. त्यांनी पंतप्रधानपदाचं कामही बऱ्याचदा हरियाणातील भोंडसीस्थित आश्रमातून केलं.

त्यांच्यातील विनम्रता अनेकदा दिसून आली. सुरक्षारक्षांना चहा देण्यापासून परदेशात गेल्यानंतर सुरक्षारक्षकांच्या जेवणाची आवर्जून विचारपूस करण्यापर्यंत. खरंतर पंतप्रधान म्हणून त्यांनी दोनच परदेश दौरे केले.

जवळपास चार-पाच दशकं राजकारणात राहिलेले चंद्रशेखर यांना शेवटच्या काळात पत्नीच्या एका वाक्यावर त्यांच्या मनात अतोनात घालमेल झाली. आत्मकथेत त्या वाक्याचा ते उल्लेख करतात. एक दिवस त्यांच्या पत्नीनं विचारलं, “आप ने बच्चों के लिए कुछ भी किया नहीं.”

चंद्रशेखर

फोटो स्रोत, CHANDRASHEKHAR FAMILY

चंद्रशेखर लिहितात, पत्नीचं ते वाक्य ऐकून मन भरून आलं, काहीच उत्तर देऊ शकलो नाही!

चंद्रशेखर यांच्यावर बरेच आरोप झाले. मात्र, विचारधारेच्या बाबतीत ते ठाम होते, असं त्यांचं मावळतं राजकारण पाहिलेली माणसं सांगतात.

त्यांचे निकटवर्तीय राहिलेल्या हरिवंश यांनी पुढे त्यांचं चरित्र लिहिलं. त्या चरित्राचा मथळा चंद्रशेखर यांच्या बहुतांश राजकीय कारकीर्दीवर एकप्रकारचं भाष्यच आहे. चरित्राचा मथळा आहे, ‘चंद्रशेखर : द लास्ट आयकॉन ऑफ आयडियालॉजिकल पॉलिटिक्स’.