मोरारजी देसाई : काँग्रेसमध्ये हयात घालवली, पंतप्रधान बनले काँग्रेस सोडल्यानंतरच...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नामदेव काटकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
प्रसंग एक : नेहरूंचे सचिव एम. ओ. मथाई एकदा त्यांच्या एका मित्रासोबत कुतुबमिनार पाहायला गेले होते.
त्या मित्राने कुतुहलाने मथाईंना विचारलं, 'मोरारजी देसाई माणूस म्हणून कसे आहेत?'
मथाई म्हणाले, "हा समोर लोखंडाचा खांब दिसतोय ना, त्याला फक्त गांधी टोपी घातलीत की, तुमच्या समोर मोरारजी देसाई साकार होतील. शरीराने आणि डोक्याने... दोन्ही अर्थांनी ते असेच साधे, परखड आणि कठोर आहेत."
प्रसंग दोन : नेहरूंनीही एकदा मथाईंना सांगितलं होतं की, भारतीय राजकारणातील ज्या दोन अत्यंत प्रामाणिक व्यक्तींशी सामना करावा लागला, ते म्हणजे पुरुषोत्तमदास टंडन आणि मोरारजी देसाई.
खरंतर नेहरूंच्या शेवटच्या काळात मोरारजींशी त्यांचं फारसं पटलं नाही. तरीही नेहरूंचं हे मत होतं.
मोरारजी देसाईंच्या व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवण्यासाठी हे दोन प्रसंग अत्यंत बोलके आहेत.
मोरारजी देसाई भारताचे सहावे पंतप्रधान होते. त्यांचं राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य अत्यंत रंजक आहे.
सर्वाधिक काळ सार्वजनिक आयुष्यात सक्रिया राहिलेले राजकारणी, ‘कामराज प्लॅन’मधील बळी, इंदिरा गांधींशी उडालेले खटके, वयाच्या 82 व्या वर्षी पंतप्रधानपदी विराजमान, मूत्रसेवनाचा प्रयोग अशा अनेक गोष्टींमुळे त्यांची कारकीर्द आणि वैयक्तिक आयुष्य भारतीयांच्या स्मरणात आहे.
नेहरू-गांधी कुटुंबाशी त्यांचा कायमच संघर्ष होत राहिला. इंदिरा गांधींनी त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातून मोरारजींना अर्थमंत्रिपदावरून हटवल्यानंतर तर हा संघर्ष आणखीच चिघळला. पुढे आणीबाणीनंतर ते पंतप्रधानपदी विराजमान झाले.
मोरारजी देसाईंच्या या रंजक प्रवासावर आपण या लेखातून नजर टाकणार आहोत.
प्रशासकीय नोकरी सोडून स्वातंत्र्य लढ्यात उडी
मोरारजी देसाईंचा जन्म 1896 सालचा. 29 फेब्रुवारी जन्मतारीख. लीप वर्ष. म्हणजेच चार वर्षांनी वाढदिवस. यावरून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी आचार्य अत्रेंनी त्यांच्या जन्मतारखेवर कोटी करत टीकाही केली होती.
मोरारजींच्या साठीचा कार्यक्रम मुंबईतील उद्योजक जरा उत्साहानंच साजरं करत होते. त्यावेळी आचार्य अत्रेंच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. मोरारजी हे संयुक्त महाराष्ट्राचे विरोधक होते, त्यामुळे अत्रेंचा देसाईंवर राग होता. संधी मिळताच ते देसाईंवर टीका करायचे.

तर मोरारजी देसाईंचा जन्म गुजरातमधील भदेली गावी झाला. तेव्हा हे गाव बॉम्बे प्रांतात येत असे. मोरारजी 15 वर्षांचे असताना त्यांचं पितृछत्र हरपलं. गुजरातमध्येच मॅट्रिकपर्यंतच्या शिक्षणानंतर ते मुंबईतल्या विल्सन कॉलेजमध्ये शिकण्यास आले. त्यासाठी त्यांनी भावनगर संस्थानच्या स्कॉलरशिप मिळवली.
शिक्षण सुरू असतानाच, म्हणजे 1911 मध्येच त्यांचं गजराबेनशी लग्न झालं होतं. 1917 ला महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून, बॉम्बे प्रांताच्या प्राशासकीय सेवेत रुजू झाले.
प्रशासकीय सेवेत जम बसत असताना, देशात स्वातंत्र्यांची चळवळ महात्मा गांधींच्या नेतृत्वात पुढे सरकू लागली होती. या सगळ्या घडामोडींचा प्रभाव मोरारजींवर झाला आणि 1930 साली त्यांनी प्रशासकीय सेवेतून बाहेर पडून, स्वातंत्र्य चळवळीत उतरण्याचा निर्णय घेतला.

1931 साली ते गुजरात प्रांतिक काँग्रेसच्या सचिवपदी निवडून आले. त्यानंतर सार्वजनिक आयुष्यात त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
बॉम्बे प्रांताचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, वन मंत्री अशी पदं भूषवत ते 1952 ते 1956 दरम्यान बॉम्बे प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं.
1957 पासून ते लोकसभेत निवडून येऊ लागले ते अगदी 1977 साली पंतप्रधान होईपर्यंत.
1950-60 च्या दशकात मोरारजींना महाराष्ट्रवासियांचा मोठा विरोध सहन करावा लागला. त्याचं कारण होतं, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला त्यांनी केलेला विरोध.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठी चळवळ उभी करण्यात आली, त्यावेळी मोरारजी देसाई मुंबईला गुजरातला जोडण्याच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे त्यांच्याबद्दल महाराष्ट्रीयांमध्ये एक संतापाची भावना निर्माण झाली.
1958 सालापासून ते केंद्रात मंत्रिपदही सांभाळू लागले. टी. टी. कृष्णमचारी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडील अर्थमंत्रिपद मोरारजींकडे देण्यात आलं, ते अगदी 1963 सालापर्यंत.
1963 साली मात्र त्यांना मंत्रिमंडळातूनच बाहेर व्हावं लागलं, त्यास कारण ठरलं ‘कामराज प्लॅन’.
‘कामराज प्लॅन’चे बळी
1963 साली तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. कामराज यांनी एक योजना आणली. काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी राजीनामे द्यायचे आणि संघटनेत काम करायचं, असा उद्देश या योजनेचा होता. कामराज प्लॅन म्हणून पुढे या योजनेला ओळखलं गेलं.
या योजनेअंतर्गत मोरारजी देसाई, जगजीवन राम, लाल बहादूर शास्त्री, स. का. पाटील यांसारखे केंद्रीय मंत्री, तर अनेक तत्कालीन काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले.
या कामराज प्लॅनबाबत मोरारजी देसाईंची मतं काहीशी वेगळी आणि वादग्रस्त होती. ‘नेहरूंचा कट’ म्हणूनच त्यांनी या प्लॅनकडे पाहिलं.
'कामराज प्लॅन'च्या माध्यमातून नेहरूंनी मुलीच्या म्हणजे इंदिरा गांधींच्या मार्गातील अडथळे ठरतील, अशा नेत्यांना बाजूला केल्याचा आरोप करण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images
कामराज प्लॅनबाबत मोरारजींनी त्यांची मतं ‘द स्टोरी ऑफ माय लाईफ’ या आत्मकथेच्या दुसऱ्या खंडात नोंदवली आहेत.
मोरारजींनी लिहिलंय की, ‘मे-जून 1963 मध्ये लोकसभा स्थगित झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू काश्मीरमध्ये गेले होते, तिथे बिजू पटनाईकही सोबत होते, तेव्हा बिजू पटनाईक यांनी ही योजना पहिल्यांदा सांगितली. त्यानंतर के. कामराज यांनी त्यांची योजना जुलै 1963 मध्ये मांडली.’
शिवाय, कामराज प्लॅनमध्ये ज्या गोष्टी आहेत, त्यावरून तुमच्यावर संघटनेअंतर्गत शंका घेतल्या जातील, असं देसाईंनी थेट नेहरूंनाच सांगितलं होतं.
देसाईंनी आपल्या आत्मकथेत स्वतंत्र प्रकरण लिहून कामराज प्लॅनबाबत शंका उपस्थित केलीय.
इंदिरा गांधींशी वैर भोवलं, उपपंतप्रधान पद गमावलं
पंडित नेहरू यांच्यानंतर पंतप्रधानपदी कोण, अशी चर्चा सुरू झाली, तेव्हा मोरारजी देसाईंचं नाव चर्चेत आलं. मात्र, ती संधी लाल बहादुर शास्त्रींना मिळाली.
पुढे लालबहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर पुन्हा पंतप्रधानपदासाठी मोरारजी देसाई यांचं नाव चर्चेत आलं. मोरारजी तेव्हा काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांमधील वरिष्ठ नेतेही होते. स्वत: मोरारजींनीही पंतप्रधानपदाची खुर्ची मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
मोरारजींना पक्षाअंतर्गत आवश्यक समर्थन मिळालं नाही. पंतप्रधानांच्या या लढाईत पक्षात इंदिरा गांधींनी बाजी मारली.
मोरारजी देसाई हे पक्षातील वरिष्ठांपैकी एक होते. त्यांना पंतप्रधान मिळालं नसलं, तरी महत्त्वाच्या पदापासून डावलता येणं शक्य नव्हते. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी मोरारजी देसाईंना उपपंतप्रधान बनवून अर्थमंत्रिपदाची धुरा दिली.

मात्र, काही दिवसातच इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांच्यात मतभेदास सुरुवात झाली.
या मतभेदाचं दृश्यरूप राष्ट्रीय विकास परिषदेत दिसून आलं होतं. ज्येष्ठ पत्रकार इंदर मल्होत्रा यांनी त्यावेळचा प्रसंग सांगितला होता.
राष्ट्रीय विकास परिषदेत एका राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यानं पंतप्रधानपदावरील इंदिरा गांधींना प्रश्न विचारला होता. इंदिरा गांधी त्या प्रश्नाला उत्तर देणाराच, तोच मोरारजी देसाईंनी त्यांना रोखलं आणि म्हटलं की, मी या प्रश्नाचा चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो.
पी. एन. हक्सर यांनी नंतर बीबीसीचे पत्रकार रेहान फजल यांना सांगितलं होतं की, राष्ट्रीय विकास परिषदेच्या या प्रसंगावेळीच इंदिरा गांधींनी ठरवलं होतं की, त्यांच्या मंत्रिमंडळात मोरारजींना स्थान असणार नाही.

पुढे राष्ट्रपती पदाचे उमेदवार, बँकांचं राष्ट्रीयकरण आणि प्रिव्ही पर्स अशा मुद्द्यांवरून इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांच्यात बरेच खटके उडाले. हे मतभेद इतके टोकाला गेले की, इंदिरा गांधींनी मोरारजींना अर्थमंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानंतर मोरारजी देसाईंनी इंदिरा गांधींना पत्र लिहून, उपपंतप्रधानपदावरही राहण्याची इच्छा नसल्याचं कळवलं आणि ते उपपंतप्रधान पदावरूनही पायउतार झाले.
आणीबाणीनंतर पंतप्रधानपदी विराजमान
1977 साली आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि जनता पार्टीचं सरकार आलं. त्यावेळी मोरारजी देसाई पंतप्रधान बनले.
2004 साली माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांनी बीबीसी हिंदीसाठी एक लेख लिहिला होता. त्यात मोरारजींच्या पंतप्रधानपदी निवडीबाबत भाष्य केलं होतं.
गुजरालांनी लेखात लिहिलंय, ‘अनेक विचारधारा आणि लहान-मोठ्या पक्षांना एकत्र करून जनता पार्टी बनवण्यात आली होती. विचारांमधील विरोध बाजूला सारून सगळे एकत्र आले होते. जेव्हा पंतप्रधानपदाची चर्चा सुरू झाली, तेव्हा जगजीवन राम, चौधरी चरण सिंह आणि मोरारजी देसाई यांची नावं समोर आली. जनता पार्टीत जयप्रकाश नारायण यांच्या शब्दाला महत्त्व होतं आणि त्यांची पसंती मोरारजींच्या नावाला होती. त्यामुळे तेच पंतप्रधान बनले.’
पत्रकार कुलदीप नय्यर यांची बीबीसीचे पत्रकार रेहान फजल यांनी मुलाखत घेतली होती. त्यावेळीही त्यांनी याबाबत त्यांना विचारलं होतं, तेव्हा नय्यर यांनी सांगितलं होतं, जनता पार्टीमध्ये जगजीवन राम यांना अधिक समर्थन होतं. मात्र, जयप्रकाश यांचं मत होतं की, जगजीवन राम यांनी संसदेत आणीबाणीचा प्रस्ताव सादर केला होता, त्यामुळे त्यांना पंतप्रधान बनवणं शक्यच नव्हतं.

एकूणच जनता पार्टीच्या स्थापनेपासूनच अंतर्गत धुसफूस सुरू होती. चौधरी चरण सिंह हेही पंतप्रधान बनू पाहत होते. इंदर कुमार गुजराल यांनी लिहिलंय की, 1979 च्या दरम्यान काँग्रेसनंही चौधरी चरण सिंह आणि हेमवती नंदन बहुगुणा यांना उकसवलं.
पुढे मधु लिमयेंनी दुहेरी सदस्यत्वाचा (जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) मुद्दा उपस्थित केला.
अशा अनेक कारणांचं निमित्त ठरलं आणि मोरारजींचं सरकार कोसळलं. जनता पार्टीचा म्हणजेच बिगर-काँग्रेस सरकारचा पहिलाच प्रयोग असा फसला.
अशा पद्धतीने मोरारजी देसाईंना पंतप्रधान पदावर केवळ दोनच वर्षे राहता आलं. मात्र, त्यांच्या कारकीर्दीतल्या काही निर्णयांचं कौतुक आजही केलं जातं, त्यात परराष्ट्र धोरण हे एक आहे.
‘भारतरत्न’ आणि ‘निशान-ए-पाकिस्तान’
मोरारजी देसाई हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांना भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांमधील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारतानं त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला, तर पाकिस्तानने त्यांना ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला.
पाकिस्तानने मोरारजी देसाईंचा गौरव करण्याचं कारण त्यांच्या परराष्ट्र धोरणात आहे.
भारत-पाकिस्तान मैत्रीला घट्ट करण्यासाठी मोरारजींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात प्रयत्न केले.
जनता पार्टी केंद्रात सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोरारजींनी अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री नेमलं. वाजपेयींनी भारत-पाक मैत्रीची वाट मोकळी केली आणि त्यामुळेच 17 वर्षांनंतर दोन्ही देशात क्रिकेट स्पर्धा सुरू झाली.

फोटो स्रोत, Rajkamal Prakashn
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक रशीद किदवई यांनी ‘भारत के प्रधानमंत्री’ या त्यांच्या पुस्तकात म्हटलंय की, ‘मोरारजी देसाईंनी पंतप्रधान असताना काश्मीरचा प्रश्न सोडवण्याची योजना बनवली होती. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल जियाउल-हक यांच्यासोबत मोरारजी तसा करारही करणार होते. जिया यांची इच्छा होती की, भारत दौऱ्यावर येऊन यासंबंधी घोषणा करावी. हे सर्व तडीस जाण्यापूर्वीच मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वातील जनता पार्टीचं सरकार कोसळलं.’
काश्मीर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पाकिस्तानसोबत महत्त्वपूर्ण करार करण्याची ही शेवटची संधी होती, असं अनेक परराष्ट्र विषयावरील तज्ज्ञांना वाटतं.
देसाईंचं सरकार 1979 मध्ये कोसळलं. साधारण दशकभरानंतर त्यांना 'निशान ए पाकिस्तान' पुरस्कार घोषित झाला.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या आत्मकथेत मोरारजींनी म्हटलंय, “पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांनी मला सांगितलं होतं की दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी माझ्याकडून जितकी मदत अपेक्षित होती तितकी नेहरूंकडून नव्हती.”
भारताचे पाकिस्तानमधील माजी उच्चायुक्त टी. सी. ए. राघवन यांनी आपल्या 'द पीपल नेक्स्ट डोअर' या पुस्तकात देसाईंना पाकिस्तानने का गौरवलं असावं याची कारणमीमांसा मांडलीय. ते म्हणतात की, “1987 मध्ये खान अब्दुल गफार खान यांना भारतरत्न देण्यात आला. याची परतफेड म्हणून पाकिस्तानने हे पाऊल उचललं असावं. अर्थात, देसाई सत्तेत असताना दोन्ही देशांचे संबंध चांगले होते हे नाकारता येणार नाही.”
पुरस्कार जाहीर झाल्यापासून पुढची दोन वर्षं पाकिस्तानात प्रचंड राजकीय उलथापालथ घडत होती, अखेर 1990 साली मोरारजी देसाई 95 वर्षांचे असताना त्यांना हा पुरस्कार दिला गेला.
‘आय बिलिव्ह इन डूईंग थिंग्स राईट’
मोरारजी देसाई खरंतर गांधीवादी. महात्मा गांधींपासून प्रेरणा घेत त्यांनी प्रशासकीय नोकरी सोडून स्वातंत्र्य चळवळीच्या अग्निकुंडात उडी घेतली. तत्कालीन बॉम्बे काँग्रेसमध्ये ते सक्रिय झाले.
सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या मोरारजींचा पक्षाअंतर्गत उजव्या विचारांच्या प्रवाहात ते होते. पुढे भारताचे पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या धोरणांमध्येही या गोष्टीचा प्रभाव दिसून आला.
जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात भारत साम्यवादी विचारसरणीच्या सोव्हिएत संघाकडे झुकलेला होता. त्यातूनच ‘अलिप्ततावादी’ धोरण चालवलं गेलं. मात्र, मोरारजींनी हे धोरण फारसं अवलंबलं नाही. त्यांनी तत्कालीन भारतीय धोरणांमध्ये अस्पृश्य मानल्या गेलेल्या भांडवलदारी अमेरिकेशी मैत्रीसाठी पावलं उचलली.

फोटो स्रोत, AP
अमेरिका दौरा करत मोरारजींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक कार्टर यांची वॉशिंग्टनमध्ये भेट घेतली. तसंच, 1978 साली कार्टर यांना भारत दौऱ्यावरही बोलावलं.
अमेरिकेशी जुळवून घेण्याचं धोरण जरी मोरारजींचं होतं, तरी त्यांनी देशहिताला बाजूला सारलं नाही. अण्वस्त्रांबातच्या चर्चेवेळी मोरारजींनी अमेरिकेचा दबाव स्वीकारला नाही.
त्यांच्यावर उजव्या विचारांचा नेता म्हणून कायमच आरोप होत आला. एकदा त्यांना या आरोपाबाबत विचारलंही गेलं, त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर त्यांच्या हजरजबाबीपणाचा दाखला देणारं होतं. मोरारजी म्हणाले, ‘येस, आय अॅम राइटिस्ट, बिकॉज आय बिलिव्ह इन डूईंग थिंग्स राईट’.
स्वत:चं मूत्र पिण्याची सवय
मोरारजींच्या आणखी एका गोष्टीची बरीच चर्चा झाली, ती म्हणजे स्वत:चं मूत्र पिण्याची सवय. ते केवळ स्वतःचं मूत्र पित नसत, तर तसं पिण्याबाबत ते समर्थन करत. त्यांचं हा युक्तिवादही बहुतांश भारतीयांच्या पचनी पडला नाही.

फोटो स्रोत, PHOTO DIVISION
यासंबंधी एक किस्सा भारतीय गुप्तचर संस्था 'रॉ'चे माजी अधिकारी बी. रमन यांनी 'काऊ बॉईज ऑफ रॉ' या पुस्तकामध्ये लिहिला आहे.
1978 साली मोरारजी देसाई फ्रान्स सरकारचे पाहुणे म्हणून गेले होते. तेव्हा आर. डी. साठे हे फ्रान्समध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्यरत होते. मोरारजी हे साठेंच्या घरी थांबले होते.
मोरारजी फ्रान्समधील दौरा आटोपून भारतात परतल्यानंतर, साठे घरी बसले असताना, त्यांच्या नोकरानं मद्य आणून दिले. तेव्हा साठेंनी पत्नीला विचारलं की, "तू नवीन ग्लास वापरतोयस ना?"
मग त्या साठेंच्या पत्नी म्हणाल्या, "मोरारजी स्वतःचं मूत्र पिण्यासाठी कोणता ग्लास वापरत होते, ते मला माहीत नाही. त्यामुळे मी सगळे जुने ग्लास फेकून दिले."
अशा नाना गोष्टींनी मोरारजींचं आयुष्य भरलं आहे. 10 एप्रिल 1995 रोजी त्यांचं निधन झालं. निधनावेळी ते शंभराव्या वर्षात होते.











