उष्णतेच्या लाटेसाठी भारत तयार आहे का?

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अमेरिकेचे सायन्स फिक्शन लेखक किम स्टेनली रॉबिन्सन यांची ‘द मिनिस्ट्री फॉर द फ्यूचर’ नामक एक कादंबरी 2020 मध्ये प्रकाशित झाली होती.

या कादंबरीने त्या वर्षात सर्वाधिक विक्री झालेलं पुस्तक होण्याचा बहुमान मिळवला होता.

या पुस्तकात रॉबिन्सन यांनी भारतात उष्णतेच्या घातक लाटेचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये हिट वेव्हमध्ये लाखो लोकांचा मृत्यू होतो.”

पुस्तकात म्हटलंय, “आभाळातून एखाद्या अणु बॉम्बसारखी उष्णता येत आहे. चेहऱ्यावर या उष्णतेचा मारा चापट बसल्यासारखा होतो. डोळे जळतात, प्रत्येक गोष्ट धूसर दिसते, सहन होण्यापलीकडे प्रखर उजेड यावेळी असतो. पाण्यानेही काम भागत नाही. कारण पाणीसुद्धा हवेपेक्षा गरम असतं. लोक अत्यंत वेगाने मरतात.”

जागतिक हवामान बदलाबाबत रॉबिन्सन यांनी केलेलं हे वर्णन घबराट उडवून देणारं असू शकतं. पण हा भविष्यातील संकटाचा एक इशाराही असू शकतो.

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील नवी मुंबईमध्ये कडक उन्हात आयोजित महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघाताने 12 जणांचा मृत्यू झाला. काहींना त्यावेळी रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

उष्णतेच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या देशांच्या यादीत भारताचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं.

भारतात उष्ण दिवस आणि रात्रींच्या संख्येत वाढ झाल्याची नोंद आहे.

2050 पर्यंत यामध्ये दुप्पट किंवा चौपट वाढ होऊ शकते, असाही अंदाज आहे.

उष्णतेची लाट येणं, ही परिस्थिती बराच काळ कायम राहणं, तसंच वारंवार अशी स्थिती निर्माण होणं, असे अंदाजही वर्तवण्यात येतात.

यंदाच्या वर्षी हवामान विभागाने मे महिन्याअखेर सरासरीपेक्षा अधिक तापमान आणि उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे 1901 ते 2018 दरम्यान भारताच्या तापमानात सुमारे 0.7 टक्क्यांची वाढ झाली आहे.

उष्णतेमुळे जास्त मृत्यू?

सरकारी आकडेवारीनुसार, 1992 ते 2015 दरम्यान उष्णतेमुळे 22 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला.

तज्ज्ञांच्या मते, ही संख्या प्रत्यक्षात जास्त असू शकते.

गुजरात येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे संचालक दिलीप मावळणकर म्हणतात, “देशातील उष्णता किती धोकादायक आहे, त्यामुळे मृत्यू होऊ शकतो का, हे अद्याप समजलेलं नाही. आपण यासंबंधित आकडेवारीची नोंद योग्यरित्या करत नाही, त्यामुळे ही आकडेवारी अपुरी वाटते.”

प्रा. मावळणकर यांच्या मते, मे 2010 मध्ये अहमदाबादमध्ये 800 मृत्यू झाले. पूर्वीच्या काळातील मृत्यूंपेक्षा ही संख्या जास्त होती.”

त्यांनी म्हटलं की उष्णतेमुळे अनेकांचा मृत्यू होत आहे, ही बाबत स्पष्ट आहे.

शहरातील तापमान आणि मृतांच्या संख्येचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला होता. याबाबत धोक्याचा इशारा देऊन तीन कलर कोड बनवण्यात आले. यामध्ये 45 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानासाठी लाल रंगाचा इशारा ठरवण्यात आला.

अहमदाबातच्या निष्कर्षांनी प्रेरित होऊन प्रा. मावळणकर यांनी भारतातील पहिला हिट अक्शन प्लॅन बनवण्यासाठी मदत केली होती.

2013 साली हा प्रकल्प सुरू झाला. यामध्ये लोकांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला. बाहेर पडताना पाणी पिऊन निघणं, आजारी पडल्यास तत्काळ रुग्णालयात दाखल होणं, अशा सूचना दिल्या गेल्या.

यानंतर 2018 पर्यंत उष्ण शहरांमध्ये मृत्यूंचं प्रमाण एक तृतीयांशपेक्षा कमी झालं. पण हे नियोजन पुढे चांगल्या पद्धतीने अंमलात आलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

नवी मुंबईतील कार्यक्रमातही अशा प्रकारचं कोणतंच हिट अक्शन प्लॅन लागू केलें नव्हतं. त्यामुळे लाखो लोकांना उघड्यावर एकत्र यावं लागलं.

हिट अक्शन प्लॅनच्या त्रुटी

सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे आदित्य वालियाथन पिल्लई आणि तमन्ना दलाल यांनी शहर, जिल्हा आणि राज्य पातळीवर बनवण्यात आलेल्या 37 हिट अक्शन प्लॅनचा अभ्यास केला. यामध्ये त्यांना काही त्रुटी आढळून आल्या.

अनेक ठिकाणी ही योजना स्थानिक परिस्थिती लक्षात ठेवून बनवण्यात आली नव्हती, ही एक कमतरता होती.

37 अक्शन प्लॅमनध्ये केवळ स्थानिक पातळीवरील कमाल तापमानाला निर्धारित करण्यात आलं होतं. मात्र, हे स्पष्ट नाही की यामध्ये आर्द्रतेचा विचार केला होता की नाही.

पिल्लई म्हणाले, “आम्ही हवामान विभागाचा अंदाज पाहून स्थानिक पातळीवर हिट वेव्हची व्याख्या ठरवावी, असा सल्ला देतो.”

प्रा. मावळणकर यांच्या मते, “त्यासाठी गावपातळीवर अधिक हवामान केंद्र स्थापन व्हावेत.”

धोका असलेल्या समूहांचा विचार नाही

इतर संशोधकांच्या मते, उष्णतेचा सर्वाधिक धोका असलेल्या समूहगटांना ओळखून त्यांच्यासाठी धोरण बनवण्यात त्रुटी राहिल्या.

बाहेर काम करणारे शेतमजूर, बांधकाम कामगार, गर्भवती महिला, वयोवृद्ध आणि बालक उष्णेबाबत सर्वाधिक संवेदनशील आहेत.

भारतात तीन चतुर्थांश कामगार उष्ण ठिकाणी काम करतात. उदा. बांधकाम आणि खाण मजूर.

नॉर्थ कॅरोलिनाच्या ड्युक युनिव्हर्सिटीतील संशोधक ल्यूक पारसन्स यांच्या मते, “पृथ्वीची उष्णता वाढत चाललेली आहे. अशा स्थितीत कामगार घराबाहेर सुरक्षितपणे आणि प्रभावीरित्या काम करण्याची क्षमता गमावत आहेत. अवजड कामे करताना शरीराचं तापमान वाढतं. बाह्य उष्णतेमुळे ते कमी करणं त्यांना शक्य होत नाही.”

पिल्लई यांच्या मते, “भारतात अशा ठिकाणांची नोंद करावी लागेल, जिथे लोक उष्णतेत काम करतात. त्यांच्याकडे कुलर आहे का, किंवा ते सुटी घेऊ शकतात का, हे पाहावं लागेल.”

एका शहरात तीन टक्के परिसरातच धोक्याच्या पातळीतील 80 टक्के लोक राहत असतील, असंही होऊ शकतं.

‘भारतीय लोक उष्णता गांभीर्याने घेत नाहीत’

पिल्लई आणि दलाल यांच्या मते, भारतात उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी बनवलेल्या योजनांमध्ये पुरेसा पैसा नाही. त्यांच्याकडील कायदेशीर अधिकारही मर्यादित आहेत.

उष्णतेच्या लाटेवरील उपाय सोपे असू शकतात.

जसे खुल्या किंवा उष्ण ठिकाणी जास्तीत जास्त झाडे लावणं, उष्णता कमी करणाच्या दृष्टीने इमारतींची किंवा परिसराची रचना करणं, असे उपाय करता येतील.

कधी कधी लहानसहान उपायही अत्यंत फायदेशीर ठरतात.

उदा. अहमदाबादमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, एअरकंडीशनविना ठेवलेल्या रुग्णांना वरच्या माळ्यावरून खाली आणल्यास त्यांचा जीव वाचू शकतो.

पार्सन्स म्हणतात, “अधिक उष्णतेत काम करण्यास निर्बंध घातल्यानंतरही फरक पडू शकतो.”

उष्णतेमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम

लॅन्सेट या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, भारतात 2000 ते 2004 आणि 2017 ते 2021 दरम्यान उष्णतेमुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रमाणात 55 टक्के वाढ पाहायला मिळाली.

भीषण उष्णतेमुळे 2021 साली भारतात 167.2 अब्ज तास कामाच्या तासांचं नुकसान झालं. या कारणामुळे जे नुकसान झालं ते भारताच्या 5.4 टक्के जीडीपीइतकं आहे.

महाराष्ट्रात ज्याठिकाणी 12 जणांचा बळी गेला, तिथे रविवारी तापमान 38 डिग्री सेल्सियस होतं.

फोटोंमध्ये दिसून येतं की लोक कडक उन्हात बसलेले आहेत. त्यांच्यासाठी कोणताही तंबू उभारलेला नाही.

काही लोकांनी छत्री घेतलेली होती तर काहींनी रुमाल डोक्यावर घेतले होते.

“मी दिल्लीत राहतो. इथे तापमान 50 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचतं. पण मी पाहतो की खूपच कमी लोक उन्हापासून बचावासाठी छत्री घेऊन निघतात.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)