You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खारघर: 'रणरणतं ऊन, गर्दी, दूरवर ठेवलेलं पाणी आणि रुग्णालय...' कार्यक्रमानंतर काय घडलं?
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी
- Reporting from, नवी मुंबईहून
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला त्यावेळी त्यांना मानणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी जमा झाली होती. त्यापैकी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला त्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
या कार्यक्रमाला आलेल्या लोकांपैकी काही जणांशी बीबीसी मराठीने संवाद साधला आणि तिथली नेमकी व्यवस्था कशी होती, कार्यक्रम संपल्यावर नेमकं काय घडलं याबाबत बीबीसीने त्यांच्याकडून जाणून घेतलं.
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात व्यवस्था 20 लाख लोकांची केली होती. पण साधारणपणे 8-9 लाख लोक आल्याची प्राथमिक माहिती आहे.
अनेकजण कार्यक्रमासाठी आदल्या दिवशीपासून पोहचले होते. कार्यक्रम संपल्यावर झालेल्या गर्दीत अनेकांना ऊन्हाचा त्रास झाला. काहीजण या गर्दीत पडले.
त्यामुळे अनेकांना मुक्कामार लागला आहे. कामोठ्याचे एमजीएम हॉस्पिटल, वाशी फोर्टीज, बेलापूर एमजीएम, टाटा मेमोरिअल, नवी मुंबई महापालिका हॉस्पिटल अशा विविध हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 50-60 जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आहे.
एमजीएम हॉस्पिटलमध्ये उष्माघातामुळे 8 रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. 3 जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
हॉस्पिटलच्या या वॉर्डमध्ये जाताना विद्या पाटील (50) बसल्या होत्या. सोबत त्यांचा मुलगाही होता. नेत्यांच्या गर्दीपासून वाचण्यासाठी त्या बाहेरच्या खुर्चीवर बसल्या होत्या.
हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून रुग्णांची व्यवस्था कशी आहे असं त्यांच्या नातेवाईकांना विचारलं असता त्यांनी सांगितले की आता नेते येऊन विचारपूस करत आहेत पण रात्रीपासून आम्हाला कुणी काही खाल्लं का हे देखील विचारलं नाही.
त्यांना कार्यक्रमाबद्दल विचारलं तेव्हा म्हणाल्या, “आम्ही विरारहून 60 लोक आलो होतो. लांब असल्यामुळे आदल्या दिवशीच येऊन थांबलो. सगळी व्यवस्था चांगली होती.
"कार्यक्रम संपल्यावर माझ्या जाऊबाई पार्वती पाटील (55) यांना ऊन्हामुळे त्रास होऊ लागला. मग आमच्या माणसांनी हॉस्पिटलमध्ये आणलं. हे नेते आता येतायेत. पण कोणी साधं बिस्किट पण नाही विचारलं. आम्ही कालपासून आलो आहोत. आता त्यांना डिस्चार्ज मिळतोय,” असं विद्या पाटील यांनी सांगितलं.
'माझ्या मामांना हार्टअॅटक आला'
या कार्यक्रमासाठी लोणावळ्यावरून 12 बसेस भरून भाविक आले होते. त्यापैकी एक निलेश पाठक होते.
त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मामा कैलास दाभाडे (45) यांना हदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
निलेश सांगत होते, “राजकीय नेत्यांशी आम्हाला काही घेणंदेणं नाही. पण अप्पासाहेबांसाठी आम्ही सगळे आलो होतो. राजकीय नेत्यांची भाषणं संपली. पण अप्पासाहेबांचं भाषण सुरू झालं. ते ऐकण्यासाठी सगळे वाट बघत होते. ऊन खूप वाढलं होतं. पाण्याची व्यवस्था होती पण थोडी लांब होती. अप्पासाहेबांचं भाषण संपल्यावर कार्यक्रम संपल्याचं जाहीर केलं.
"त्यावेळी एकाचवेळी छोट्या गेट्समधून सगळे बाहेर पडले. मामींना (कैलास दाभाडेंच्या पत्नी) देखील ऊन्हाचा त्रास होऊ लागला म्हणून त्या बाजूला जाऊन बसल्या.
"खूप गर्दी झाली होती. ज्यांना शक्य त्यांना घेऊन बसमध्ये गेलो. पण मामा पडले आहेत हे नंतर फोन आल्यावर कळलं. मग हॉस्पिटलला आलो. त्यांची तब्येत आता ठीक आहे. पण अजून आम्हाला भेटू देत नाहीत,” असं निलेश यांनी सांगितलं.
'गर्दीत पायालाही लागला मार'
ज्ञानेश्वर पाटील त्यांच्या पत्नी आणि 3 वर्षांच्या मुलीसह सॅण्डहर्स रोडहून महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी पहाटे 4 वाजता निघाले.
कुटुंबासह सकाळी 6 वाजता आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर पोहचले. नियोजन आणि व्यवस्थेबाबत विचारलं असता, सर्व व्यवस्था चांगली होती असं ज्ञानेश्वर पाटील सांगत होते.
कार्यक्रम संपल्यावर खूप गर्दी झाली होती असं पाटील सांगतात.
“पण कार्यक्रम संपल्यावर साधारण 1-1.30 च्या सुमारास निघताना अचानक खूप गर्दी झाली. मी सकाळी फक्त फळं खाल्ली होती. ऊनही खूप वाढलं होतं. मला चक्कर येऊ लागली.
"माझी मुलगी ही पत्नीकडे होती. चक्कर येत असताना पायही घसरला. मग मी पडलो. मला सावरताना माझ्या पत्नीलाही लागलं. पण आता मी बरा आहे,” असं ज्ञानेश्वर पाटील म्हणाले.
नरेंद्र गायकवाड ( वय 45) कार्यक्रमासाठी मुरबाडहून आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर झालेल्या गर्दीमुळे नरेंद्र गायकवाड पाय घसरून पडले.
तेव्हा त्यांच्या डाव्या पायाला लागलं. पायाला जोरदार मार लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
राजकीय स्वार्थाशिवाय इतके लोक बोलवले जातात का? - राज ठाकरे
ही घटना दुःखद असल्याचे राजकीय नेत्यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या.
राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज ठाकरे यांनी रुग्णालयाला भेट दिली.
उपचार घेत असलेल्या अनुयायांना भेटल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "राज्य सरकारकडून हा प्रसंग टाळता आला असता. वातावरण उन्हानं तापलं असताना सकाळी इतक्या लोकांना बोलवायचं. राजभवनावर हा कार्यक्रम करता आला असता. झाली ती गोष्ट दुर्दैवी आहे. सकाळपेक्षा संध्याकाळी कार्यक्रम झाला असता तर प्रसंग टाळता आला असता."
राजकीय स्वार्थाशिवाय इतके लोक बोलवले जातात का? असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी विचारला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)