खारघर कार्यक्रमाची चौकशी हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून व्हावी - शरद पवार

खारघर कार्यक्रमाची चौकशी विद्यमान न्यायाधीशांकडून व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

आज (21 एप्रिल) प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या आयोजनावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.

ते म्हणाले, "खारघरचा कार्यक्रम हा राज्यसरकारचा होता. त्याच्या नियोजनाची जबाबदारीही त्यांची होती.

इतक्या उन्हात हा कार्यक्रम घेण्यात आला. उष्माघातामुळे लोक मृत्युमुखी पडले."

"ठोस आकडा कोणाला माहिती नाही. कोणी 10 म्हणतं कोणी 15 तर कोणी 26 म्हणत आहेत. सरकारला इतकी गर्दी जमवून आगामी निवडणूकीसाठी अनुकूल वातावरण तयार करायचं होत? त्याची किंमत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मोजावी लागली.

"या संपूर्ण प्रकरणाची हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी झाली पाहीजे आणि संपूर्ण परिस्थिती देशासमोर आली पाहीजे," असं पवार म्हणाले.

खारघर कार्यक्रम आयोजकांवर कठोर कारवाई व्हावी - उद्धव ठाकरे

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी धर्माधिकारी यांचे अनुयायी लाखोंच्या संख्येनी उपस्थित होते.

त्यापैकी काहींना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यात 14 जणांचे मृत्यू झाले. या गोष्टीची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

जर लोकांना सुविधा मिळाल्या नाहीत तर मग या कार्यक्रमाच्या आयोजनावर जो पैसा खर्च करण्यात आला तो नेमका कशासाठी, याचं उत्तर सरकारने द्यावं.

या घटनेची निष्पक्षपणे चौकशी व्हावी आणि या गलथान कारभारासाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 16 एप्रिलला महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

या कार्यक्रमादरम्यान उष्माघाताचा त्रास होऊन 14 जणांचा मृत्यू झाला, पण याच कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली आणि त्या चेंगराचेंगरीत काही जणांचा मृत्यू झाला असा आरोप विरोधकांनी केला आहे.

या चेंगराचेंगरीची जबाबदारी घेत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली गेली.

नवी मुंबईतील खारघर इथे आयोजित या कार्यक्रमाला काही लाख माणसं उपस्थित होती. नवी मुंबई परिसरात आज पारा चाळीशीपल्याड गेला होता. याचा त्रास सोहळ्याला उपस्थित काही नागरिकांना झाला.

उष्माघाताचा त्रास झालेल्यांना तातडीनं रुग्णालयात हलवावं लागलं.

कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 16 एप्रिलला रात्री आठच्या सुमारास पोहोचले.

मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- संजय राऊत

दरम्यान या कार्यक्रमात झालेले मृत्यू हे उष्माघाताने झालेले नसून चेंगराचेंगरीने झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की ‘खारघर येथे जो हल्लकल्लोळ माजला, जी चेंगराचेंगरी झाली ते पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घ्यायला हवा.देवेंद्र फडणवीस आज विरोधी पक्षनेते असते तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात जाऊन त्यांनी धुडगूस घातला असता.” तसंच मृतांचा आकडा जास्त असून सरकार ते लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही यासंदर्भात एक व्हीडिओ ट्विट केला आहे. त्यात ही चेंगराचेंगरी कुठे झाली असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

कुटुंबातील सदस्यांवर कोसळलेली आपत्ती-धर्माधिकारी

महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल सारे ‘श्री’ सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. ‘श्री’ सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी काही सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्देवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दु:ख शब्दांत व्यक्त करण्यापलिकडचे आहे, अशी प्रतिक्रिया आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, "मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. ‘श्री’ सदस्य परिवाराची एकमेकांच्या बरोबरीने राहण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे, त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांबरोबर कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो. तसेच त्यांच्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची शक्‍ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो".

"घटनेचं कोणीही राजकारण करू नये,असे आवाहन त्यांनी केलं. खारघरमध्ये झालेला प्रकार दुर्देवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे", असं धर्माधिकारी म्हणाले.

राजकीय स्वार्थाशिवाय इतके लोक बोलवले जातात का? - राज ठाकरे

उपचार घेत असलेल्या अनुयायांना भेटल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "राज्य सरकारकडून हा प्रसंग टाळता आला असता. वातावरण उन्हानं तापलं असताना सकाळी इतक्या लोकांना बोलवायचं. राजभवनावर हा कार्यक्रम करता आला असता. झाली ती गोष्ट दुर्दैवी आहे. सकाळपेक्षा संध्याकाळी कार्यक्रम झाला असता तर प्रसंग टाळता आला असता."

राजकीय स्वार्थाशिवाय इतके लोक बोलवले जातात का? असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी विचारला.

अनुयायांपेक्षा अमित शाहांची वेळ पाहिल्यानं दुर्घटना - संजय राऊत

"केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वेळेची सोय पाहिली गेल्याचं मला वाटतं. हा कार्यक्रम उन्हं टळल्यानंतर संध्याकाळी केला असता तर बरं झालं असतं. पण गृहमंत्री अमित शाह यांना वेळ नव्हता," असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. ते आज (17 एप्रिल) पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत पुढे म्हणाले की, "आम्हाला या सोहळ्यावर टीका करायची नाही. कारण आम्ही स्वत: अप्पासाहेबांना मानतो. त्यांचं मानवतेचं काम मानतो. तरी जे मृत्यू झाले ते दु:खदायक आहे."

"समोर बसलेले सहा-सात लाख लोकांची सोय न पाहता, व्यासपीठावरील अप्पासाहेब वगळता इतर राजकीय नेत्यांची सोय पाहिली गेली. अप्पासाहेब आणि समोर बसलेला समूह राजकीय नव्हता. पण भक्तांपेक्षा राजकीय नेत्यांची सोय पाहण्यात आल्यानं ही घटना घडली," असंही संजय राऊत म्हणाले.

दुसरीकडे, रात्री उशिरा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या अनुयायांची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "अमित शाहांना जायचं होतं म्हणून हा कार्यक्रम भरदुपारी घेतला असेल तर चौकशी कोण कुणाची करणार? ढिसाळ नियोजनामुळे या कार्यक्रमाला झालर लागली."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत म्हणाले, “मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल.”

यावेळी माध्यम प्रतिनीधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “उष्माघाताचा त्रास झाल्याने श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही श्री सदस्यांवर प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले.”

“एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या,” अशीही माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

रायगड जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्याच्या समारोपानंंतर जमलेल्या सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये 14 जण मृत्यूमुखी पडले आहेत.

घटना दुर्दैवी आणि वेदनादायी - देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदर घटनेबाबत दुःख व्यक्त केलं.

ट्विट करून ते म्हणाले, "आज सकाळी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात सहभागी काही श्रीसदस्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे."

"मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारमार्फत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली आहे."

"जे लोक उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

स्वतः मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट देत माहिती घेतली आणि डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन संपूर्ण समन्वय ठेवून असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत," असंही फडणवीस यांनी म्हटलं.

विरोधकांची टीका

उष्माघाताने काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली.

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे पाटील म्हणाले, "आज सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक गंभीर आहेत. हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे. यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)