चाळीशीच्या आधी पाळी थांबली तर...वेळेआधी पाळी थांबण्याचे दुष्परिणाम काय?

    • Author, डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी
    • Role, स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ, बीबीसी मराठीसाठी

"डॉक्टर, हल्ली खूप कंटाळा येतो सगळ्या गोष्टींचा. सारखी चिडचिड होते. काही करावसंच वाटत नाही"

"डॉक्टर, सगळं अंग दुखतं सतत...तोंडाला चव नाही. रात्री झोप लागत नाही"

"डॉक्टर, कंबरदुखीने त्रस्त झालीये गेले काही महिने. खरंतर सगळेच सांधे दुखतायेत. सारखा 'विकनेस' वाटतो."

"गेले सहा महिने दर 15 दिवसांनी पाळी येतेय आणि खूप जास्त ब्लिडिंग होतंय"

"डॉक्टर, सध्या माझं इतकं प्रचंड वजन वाढतंय. कितीही व्यायाम, डाएट केलं तरी उपयोगच होत नाही. ब्रेस्ट पण खूप दुखतात."

या सगळ्या पेशंटमध्ये एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे हा त्रास मेनोपॉजमुळे आहे याबद्दल ह्या पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांची पूर्ण खात्री पटलेली असते.

आपल्या समाजात सध्या महिलांमधल्या चाळिशीच्या वरच्या कोणत्याही आरोग्य समस्येचे खापर मेनोपॉजवर फोडण्याची फॅशनच आली आहे. हे अतिशय चुकीचे आणि घातक ठरू शकते. खरंतर स्त्रीचे मेनोपॉजचे वय हे साधारणपणे 48-49 आहे, कधी-कधी 50-51पर्यंतही पाळी चालू राहू शकते. पण पन्नाशीनंतर पाळी चालू राहिल्यास अतिशय नियमितपणे स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करून घ्यायलाच हवी.

मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या जनन संस्थेचे काम हळूहळू संथ होत जाते आणि सरतेशेवटी पूर्ण थांबते. हा बदल अतिशय सावकाश आणि स्थिर गतीने होतो. त्यामुळे याचे शरीरावर कोणतेही अतितीव्र परिणाम शक्यतो दिसत नाहीत.

नॉर्मल मेनोपॉजमध्ये पाळी उशीरा उशीरा येत जाते आणि ब्लीडिंग कमी कमी होत जाते. हा आणि हाच पॅटर्न मेनोपॉजमध्ये नॉर्मल समजला जातो.

आपल्याकडे दर 15 दिवसांनी पाळी येऊन प्रचंड रक्तस्त्राव होणाऱ्या स्त्रीला हा मेनोपॉजचा त्रास आहे, हे होणारच असं तिच्या आजूबाजूचे निकटवर्तीय उर्फ स्वघोषित वैद्यकीय तज्ज्ञ (?) पटवून देतात आणि मग तीसुद्धा निमूटपणे हे दुखणं अंगावर काढत राहते.

आता एक अतिशय महत्वाचा मुद्दा...

मेनोपॉजचं वय साधारणपणे 48-49 वर्षे आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर इतरही अनेक व्याधी शरीरात प्रवेश करतात. मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड यासारख्या समस्या चाळिशीनंतर सुरू होतात.

यासाठीच्या तपासण्या नियमितपणे करणे गरजेचे असते. या तपासण्या बहुतेक स्त्रिया अजिबातच करत नाहीत आणि मग होणाऱ्या त्रासाला मेनोपॉजचे नाव देऊन मोकळ्या होतात.

ही लक्षणं मेनोपॉजची की...?

पाळीचे त्रास, सतत वाढणारे वजन, अंगावर सूज,त्वचेचा कोरडेपणा,केस गळणे या सर्व गोष्टी थायरॉईडच्या समस्येमध्ये दिसू शकतात.

योनीमार्गात सतत खाज सुटणे, लघवीचा जंतुसंसर्ग, अशक्तपणा, शरीराचा विशेष करून पायाचा दाह होणे, वजन वाढणे ही लक्षणे मधुमेहाचीही असू शकतात.

छातीत धडधडणे, एकदम घाम येणे, डोकेदुखी, मुंग्या येणे, मूड्सचे बदल हे वाढलेल्या रक्तदाबामुळेही किंवा क्वचित हृदयरोगाचे लक्षण असू शकते.

संधीवाताची सुरुवातसुद्धा साधारण चाळिशीनंतर होऊ शकते.

त्यामुळे स्वतःच हा त्रास मेनोपॉजचा आहे असे निदान न करता डॉक्टरांचा सल्ला वेळेत घ्यावा हे उत्तम

पाळी लवकर थांबण्याची कारणं काय?

चाळीस वर्ष वयाआधी पाळी थांबली तर त्याला 'premature मेनोपॉज' असं म्हणतात. चाळीस ते पंचेचाळीस या वयात पाळी थांबली तर त्याला 'early मेनोपॉज' असं म्हटलं जातं.

सध्या चालू असलेल्या संशोधनातून असे दिसते की भारतीय स्त्रियांमध्ये जगातील इतर स्त्रियांच्या मानाने पाळी लवकर थांबण्याचे प्रमाण थोडे जास्त आहे. असे का हे शोधण्यासाठी बरेच संशोधनात्मक निबंध लिहिले गेलेले आहेत. यातून पाळी लवकर थांबण्यामागची काही कारणे आपल्याला समजली आहेत, पण बऱ्याचशा गोष्टींचा अजून खुलासा झालेला नाही.

स्त्रियांची आर्थिक बिकट परिस्थिती, कुपोषण, कौटुंबिक मानसिक ताण, अचानक आलेले वैधव्य, घटस्फोट अशा घटकांमुळे स्त्रीला वेळेआधी मेनोपॉज येऊ शकतो.

स्त्रीने गर्भनिरोधक गोळ्या कधीच न वापरणे, कमी वयात मुले आणि जास्त संख्येने मुले होणे, कधी गर्भपात न होणे अशी हिस्टरी असलेल्या स्त्रियांमध्ये पाळी लवकर थांबू शकते.

काही जुनी आयुष्यभर चालणारी दुखणी म्हणजे autoimmune diseases, कॅन्सरसाठी दिलेली chemotherapy, radiotherapy यामुळे सुद्धा पाळी लवकर थांबू शकते.

वेळेआधी पाळी थांबल्याचे दुष्परिणाम

भारतीय स्त्रियांची मानसिकता बघता पाळी कधीही थांबली तरी त्यांना आनंदच होतो. 'गेली मेली ब्याद ,बरं झालं!' अशीच त्यांची भावना असते.

पण पाळी चालू आहे म्हणजे स्त्रीच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन हॉर्मोन्स व्यवस्थित काम करत आहेत असा असतो.

स्त्रीच्या पूर्ण शरीराचे आणि मनाचे स्वास्थ्य राखणे, विशेषतः हाडे, हृदय निरोगी ठेवणे हे हॉर्मोन्सचे काम असते. स्त्रीच्या लैंगिक आयुष्यावरही हॉर्मोन्सचाच प्रभाव असतो.

पाळी वेळेआधी बंद झाली तर या हॉर्मोन्सचं प्रमाण झपाट्याने कमी होतं आणि मग शरीरावर आणि मनावर त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात.

मेनोपॉज आलेल्या स्त्रियांमध्ये हृदयविकाराचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. तसेच लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेह, नैराश्य याचं प्रमाण ही प्रचंड वाढत आहे.

हाडांची ठिसूळता वाढल्यामुळे साध्या कारणाने सुद्धा हाडे fracture होऊ शकतात आणि ती लवकर भरून न आल्याने अंथरुणाला खिळायची वेळ येऊ शकते.

मेनोपॉजनंतर योनीमार्गात कोरडेपणा येणे, लैंगिक संबंधांची इच्छा कमी होणे, त्यामुळे वैवाहिक आयुष्यात कुरबुरी, मग जोडीदाराशी भांडणे आणि नैराश्य ही दुष्ट साखळीच तयार होते.

यावर उपचार आहेत?

हे परिणाम कमी व्हावेत यासाठी वेळेआधी पाळी थांबली असेल तर अशा स्त्रियांना हॉर्मोन्सच्या गोळ्या देऊन त्यांची पाळी निदान वयाच्या पंचेचाळीस वर्षांपर्यंत चालू ठेवणे हिताचे आहे.

एरवी पस्तीस वयानंतर आम्ही कोणत्याही स्त्रीला हॉर्मोन्स देणे टाळतो. कारण त्यांच्या शरीरात नैसर्गिक हॉर्मोन्स असतात. पाळी लवकर थांबलेल्या स्त्रियांच्या शरीरातील हॉर्मोन्स संपत आलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम होत असतात.

अशा वेळी हॉर्मोन्सच्या गोळ्या घेण्यामुळे या स्त्रियांच्या आरोग्याचे धोके बरेच कमी होऊ शकतात.

एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे पाळी वेळेवर आली नाही म्हणजे मेनोपॉज आला असा निष्कर्ष काढण्याआधी काही तपासण्या करणे अतिशय गरजेचे आहे.

बऱ्याच स्त्रियांना अनियमित पाळीचा त्रास असतो. पस्तीस वयानंतर पाळी लांबल्यास काही स्त्रिया थांबली असेल पाळी अशी चुकीची समजूत करून घेतात.वेळेवर वैद्यकीय सल्ला घेत नाहीत आणि मग अचानक खूप रक्तस्त्राव सुरू होतो. सर्व साधारणपणे पाळी थांबण्याचे वय स्त्रियांमध्ये 48-49 आणि त्यापुढे आहे हे लक्षात घ्यायला हवे.

पस्तीस वयानंतर आरोग्याच्या कोणत्याही तक्रारीला मेनोपॉज असेल असे समजून दुर्लक्ष करणे ही खूप मोठी चूक स्त्रिया करतात आणि आरोग्याची अपरिमित हानी करून घेतात. वेळेआधी पाळी थांबणे हे इतकेही कॉमन नाहीये आणि त्यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला आणि तपासण्या अतिशय गरजेच्या आहेत हे लक्षात असू द्या.

पूर्वीच्या मनाने सर्वांचेच आयुर्मान वाढल्यामुळे मेनोपॉज आलेल्या स्त्रियांची संख्या वाढत चालली आहे. मेनोपॉज नंतर स्त्रियांचे आयुष्य कमीत कमी वीस ते तीस वर्षे शिल्लक असणार आहे. आपल्या समाजात चाळिशीनंतर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची वृत्ती खूप कमी स्त्रियांमध्ये दिसते. वर उल्लेख केल्याप्रमाणे मेनोपॉज नंतर स्त्रियांच्या आरोग्याचे रक्षण करणारे हॉर्मोन्स संपतात आणि मग त्या वेगवेगळ्या आजारांना बळी पडू शकतात.

या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन वेळेआधी पाळी थांबू नये यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम हवाच.

काही व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्वे यांचाही फायदा दिसून आला आहे. भात, बटाटा, साखर, मैदा म्हणजे कर्बोदके आहारातून खूप कमी करणे आणि रोज किमान ४५ मिनिटे व्यायाम करणे यामुळे स्त्रिया त्यांचे आरोग्य उत्तम राखू शकतात.

खरंतर बदलत्या काळानुसार स्त्रियांनी मेनोपॉजबद्दलही आधीच प्लॅनिंग करून त्याचा त्रास कमीत कमी कसा करता येईल हे ठरवायला हवं. त्यासाठी मानसिक आणि शारीरिकरित्या स्वतःला नीट ठेवणे, आपल्या शरीरातील बदल सकारात्मकतेने स्वीकारणे आवश्यक आहे. तरच हा अवघड काळ सोपा होऊ शकतो.

हेही वाचलंंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)