You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मेनोपॉज म्हणजे काय, हे अनेक महिलांनाच माहिती नसतं'
वेबसीरिजचा मुख्य प्रेक्षक युवा वर्ग असतो. त्यांना लक्षात ठेऊनच कार्यक्रमांची निर्मिती केली जाते. मात्र नेटफ्लिक्सवरच्या एका नव्या वेबसीरिजमध्ये 49 वर्षीय महिला केंद्रस्थानी आहे.
आपल्या शरीरातील अंतर्गत अडचणींशी संघर्ष करणाऱ्या महिलांची कहाणी या वेबसीरिजमध्ये आहे. या वेबसीरिजचं कौतुक होतं आहे.
बॉम्बे बेगम्स नावाच्या या वेबसीरिजमध्ये राणी नावाचं पात्र बोर्ड मीटिंगमध्ये असतं. राणी अचानक बोर्ड मीटिंग सोडून बाहेर जाते. राणीची भूमिका पूजा भट्ट यांनी साकारली आहे.
बोर्ड मीटिंगमधील सहकारी राणीने असं का केलं असेल याचा विचार करत असतात. यादरम्यान कॅमेरा हे दाखवतो की राणी वॉशरुममध्ये गेली आहे. तिने तोंडावर पाण्याचा हबकारा मारला.
न्यूज वेबसाईट आर्टिकल14च्या जेंडर एडिटर नमिता भंडारे सांगतात की, असंख्य प्रेक्षकांना वाटलं की राणीला हृदयविकाराचा झटका आला. परंतु मला लक्षात आलं की तिला काय होतं आहे.
राणीला जो त्रास जाणवला त्याला रजोनिवृत्ती असं म्हटलं जातं. रजोनिवृत्ती म्हणजे महिलांना दर महिन्याला येणारी मासिक पाळी येणं बंद होणं.
वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेली राणी ही स्मार्ट आहे, हुशार आहे, रोखठोक आहे. ती मोठ्या बँकेची सीईओ आहे.
पण जेव्हा गोष्टी अंतर्गत आरोग्याबद्दल असतात तेव्हा ती एकदम शांत होते. जेव्हा एक युवा सहकारी राणीला यासंदर्भात विचारते तेव्हा ती काही बोलण्यास नकार देते.
बॅनर्जी सांगतात की, मेनोपॉजबद्दल राणीने काहीही न बोलण्याची काही कारणं असू शकतात.
असा सर्वसाधारण समज आहे की मेनोपॉज अनुभवणाऱ्या महिला बॉस तर्कहीन आणि चिडचिड्या होतात. त्यांना प्रोफेशनल राहायचं असतं आणि आपल्या सहकाऱ्यांना याबद्दल कळावं असं त्यांना वाटत नाही.
आणखी एक कारण होतं ते म्हणजे आपल्या शरीरात होणारा हा बदल स्वीकारणं कठीण जाणं. मेनोपॉजचा त्रास किंवा याचा अनुभव, त्याच्या वेदना महिलांनी एकेकटीनेच सोसाव्यात अशी अपेक्षा केली जाते.
इंडियन मेनोपॉज सोसायटी (आयएमएस) नुसार, देशात आताच्या घडीला 15कोटी स्त्रिया अशा आहेत ज्यांचा मेनोपॉज झाला आहे. जगभरात मेनोपॉजचं सर्वसाधारण वय 51 आहे. भारतात हे वय साधारण 46 आहे.
याची काही सामान्य लक्षणं आहेत-सेक्ससाठी मनाची तयारी नसणं, मूड बदलणं, रात्री अचानक जाग येणं, रात्री घाम फुटणं, हार्मोनमध्ये होणाऱ्या बदलांमुळे अचानक गर्मी जाणवणं.
आयएमएसच्या सचिव आणि महिला रोग विशेषज्ञ डॉ. अनिता शाह सांगतात की, महिला त्यांच्या आयुष्याचा दोन तृतीयांश वेळ मेनोपॉजमध्ये घालवतात. मात्र असं असलं तरी याच्याविषयी महिलांमध्ये जागरुकता नाही.
सूरतमध्ये तीस वर्ष क्लिनिक चालवणाऱ्या डॉ. शाह पुढे सांगतात, त्यांच्याकडे येणाऱ्या चाळीस वर्ष वयापुढच्या स्त्रियांना त्यांच्या शरीरात नेमकं काय होतं आहे ते समजत नाही.
याचं कारण आपल्या देशात मासिक पाळी, रजोनिवृत्ती याविषयी सहजपणे चारचौघात बोललं जात नाही.
यासंदर्भात नमिता भंडारे सांगतात, गेल्या काही वर्षांमध्ये मासिक पाळीसंदर्भात जागरुकता वाढली आहे. पॅडमॅन सारखा चित्रपट प्रदर्शित होणं हे याचं उदाहरण आहे. मात्र मासिक पाळीसंदर्भात अजूनही खुलेपणाने चर्चा होत नाही.
पाश्चिमात्य देशांमध्ये यासंदर्भात जागरुकता
एकूण लोकसंख्येपैकी निम्म्या नागरिकांच्या बाबतीत जी गोष्ट घडते त्याविषयी मौन बाळगलं जातं. सगळं काही गुप्त राखलं जातं.
पाश्चिमात्य देशांमध्ये मासिक पाळी संदर्भात जागरुकता झाली आहे.
गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये शालेय अभ्यासक्रमात मेनोपॉजबद्दल माहिती देण्यात आली. अनेक क्लिनिक उघडण्यात आले, जिथे महिला जाऊन आपले प्रश्न मांडू शकतात. त्यांना यासंदर्भात मदत, माहिती, सल्ला मिळू शकतो.
मिशेल ओबामा यांनी मांडली होती अडचण
गेल्या वर्षी अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी मिशेल ओबामा यांना हेलिकॉप्टर मरीन वनमध्ये अचानक उष्णतेचा त्रास जाणवू लागला. तेव्हा जगभरात याची बातमी झाली होती.
एका पॉडकास्टमध्ये त्या म्हणाल्या, मला असं वाटलं की माझ्या शरीरात एखादी भट्टी तयार झाली आहे. भट्टीचं तापमान प्रचंड करण्यात आलं असंच वाटलं जणू. आणि मग एकदम सगळं वितळल्यासारखं वाटू लागलं. हे काय होतंय हे मला कळेचना. हे मी सांभाळू शकत नाही असं वाटलं.
स्त्रीचं शरीर कशातून जातं याची माहिती महत्त्वाची असते. समाजाला याबाबत माहिती असणं आवश्यक आहे. कारण जगात निम्मी लोकसंख्या स्त्रियांची आहे. स्त्रिया असं जगतात जणू काही घडतंच नाहीये.
भंडारे सांगतात की, भारतातल्या महिला जणू काही घडतंच नाहीये अशा पद्धतीने वागतात.
कॉर्पोरेट तसंच राजकारणात अनेक महिला मोठ्या पदांवर काम करतात. मात्र कोणीही याविषयी बोलत नाही.
कारण याविषयी गप्पच राहायचं असतं असं महिलांना शिकवलं जातं. ज्या स्त्रिया अन्य गोष्टींबाबात खुलेपणाने बोलतात त्या यासंदर्भात मात्र गप्पच राहतात.
भारतात जागरूकता कमी
भारतात याविषयी बोललं जात नाही याचं एक कारण असंही असू शकतं जे एका सर्वेक्षणात समोर आलं आहे. 71 टक्के मुलींनी सांगितलं की मासिक पाळी पहिल्यांदा सुरू झाली तेव्हा हे काय असतं याची त्यांना कल्पनाच नव्हती.
जागरुकता अभियान राबवणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की कुटुंबीय, नातेवाईक मुलींना याबद्दल काहीही सांगत नाहीत. मुली पौगंडावस्थेत असतात, मासिक पाळी सुरू होते. तेव्हा मुलींना जी भीती वाटते, अनेक शंका निर्माण होतात त्यांची उत्तरं त्यांना आधी मिळू शकतात.
महिला मेनोपॉजच्या टप्प्यातून जातात तेव्हाही अशीच भीती आणि शंकाकुशंकांना त्यांना सामोरं जावं लागतं. या टप्प्यात महिलांचं वजन वाढतं, मूड स्विंग होतात. अनेक महिलांना त्यांचा काळ सरला असं वाटू लागतं. आता आपल्याकडे कोणीही लक्ष देणार नाही असं त्यांना वाटू लागतं.
भंडारे पुढे सांगतात, आमचं शरीर बदलतं मात्र याकरता आम्हाला तयार केलं जात नाही. आईदेखील याविषयी फार काही सांगत नाही. मेनोपॉजविषयी गुप्तता बाळगली नाही तर आम्ही हे अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो.
ही परिस्थिती बदलण्यासाठी इंडियन मेनोपॉज सोसायटी काम करते आहे असं डॉ. शाह यांनी सांगितलं.
मोठया वयाच्या बायका आपल्या सुनेला, नातीला क्लिनिकमध्ये घेऊन येतात तेव्हा मी त्यांना याची सविस्तर माहिती देते.
याच्या शारीरिक आणि मानसिक लक्षणांबद्दल सांगते. या टप्प्याकरता मदत आणि उपचार उपलब्ध आहेत. बहुतांश महिलांना स्क्रीनिंग प्रोग्रॅमविषयी माहितीच नसतं.
माहितीचा अभाव आणि मासिक पाळीकडे लांछन म्हणून पाहिलं जाणं यामुळे लाखो स्त्रिया याविषयी काहीही बोलत नाहीत आणि एकटीने हा त्रास सोसतात.
मेनोपॉजवर आधारित कार्यक्रम
या विषयावर पेनफुल प्राईड नावाचा लघुपट प्रदर्शित झाला होता. हा लघुपट अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे. या लघुपटाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. मात्र व्यावसायिक पद्धतीने तो प्रदर्शित करण्यात आलेला नाही.
दिग्दर्शिका सुमित्रा सिंह यांनी जेव्हा हा लघुपट तयार केला तेव्हा त्या 28 वर्षांच्या होत्या. मला याविषयी कळलं तेव्हापासून या विषयावर काहीतरी कर असं सांगण्यात आलं.
मेनोपॉजचा टप्पा अनुभवणाऱ्या स्त्रीचं पात्र पल्लवी जोशी यांनी साकारलं आहे.
सुमित्रा सिंह सांगतात, त्या पात्राची सेक्समधली रुची कमी होत गेली. यामुळे नवरा सोडून तर देणार नाही याची भीती तिला वाटत राहते. याच कारणामुळे त्याचं अफेअर तर सुरू होणार नाही ना असंही वाटतं.
त्या सांगतात, मेनोपॉजच्या काळात तिचं कुटुंब तिला कशा पद्धतीने मदत करतं हे दाखवण्यात आलं आहे. हा आजार नसून आयुष्यातला एक टप्पा आहे.
या विषयावर अजून बोललं गेलं पाहिजे, खुलेपणाने चर्चा व्हायला हवी असं भंडारे यांना वाटतं. बॉम्बे बेगम्स आणि पेनफुल प्राईज सारख्या कलाकृती तयार व्हायला हव्यात.
मासिक पाळीसंदर्भात बोलायला आपण सुरूवात केली आहे. मेनोपॉजविषयी जागरुकता व्हायला, खुलेपणाने चर्चा व्हायला आणखी वेळ लागेल. पंधरा कोटी महिलांच्या शरीराची आवश्यकता, चिंताच नाही असं वाटतं.
मला खात्री वाटते की परिस्थिती बदलेल. पाच वर्षांपूर्वी मासिक पाळी, सॅनिटरी पॅड्स, डाग याविषयी आपण बोलत नव्हतो. आज त्याविषयी बोलू लागलो आहोत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)