मेनोपॉज म्हणजे काय आणि त्याची लक्षणं नेमकी काय असतात?

जगातल्या प्रत्येक स्त्रीला मेनोपॉज मधून जावं लागतं. आणि साधारणपणे चाळीशीच्या दरम्यान याची लक्षणं दिसायला लागतात.

दरवर्षी 18 ऑक्टोबरला वर्ल्डस मेनोपॉज डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे मेनोपॉजविषय जागरुकता निर्माण करणे हा उद्देश असतो. 

मेनोपॉज म्हणजे काय?

तर मेनोपॉज म्हणजेच मराठीत रजोनिवृत्ती. थोडक्यात बाईची पाळी थांबते त्याला मेनोपॉज म्हणतात. वयाच्या 51 व्या वर्षांपर्यंत स्त्रियांना मेनोपॉज होऊ शकतो.

हा स्त्रियांच्या प्रजननचा शेवटचा टप्पा असतो आणि यानंतर एका वेगळ्या आयुष्याला सुरुवात होणार असते.

 या दरम्यान स्त्रियांची मासिक पाळी अनियमित व्हायला सुरुवात होते. या स्टेजला पेरी-मेनोपॉज म्हणतात. वयाच्या 46 व्या वर्षी हे घडायला सुरुवात होते.

 मेनोपॉज व्हायच्या आधी स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होते, जास्त ब्लिडिंग होतं. मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवायला लागतो. अशा भावना निर्माण होतात, ज्या आधी कधीच अनुभवलेल्या नसतात.

जेव्हा सलग 12 महिने पाळी येत नाही तेव्हा मेनोपॉज झालेला असतो. शेवटची पाळी येते त्याला रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज म्हणता येईल. 

काही स्त्रियांच्या बाबतीत मेनोपॉज खूप लवकर होतो तर काही स्त्रियांच्या बाबतीत नैसर्गिकरित्या किंवा उपचारानंतर मेनोपॉज होतो.

पण असं का होतं?

स्त्रियांमधील हार्मोन्सची पातळी बदलत असते. स्त्रियांची पाळी नियंत्रित करण्यामागे इस्ट्रोजेन या हार्मोनचा वाटा असतो. स्त्रियांच वय जसजसं वाढत जातं तसतसं त्यांच्या अंडाशयातील अंडी कमी होतात. इस्ट्रोजेनची लेव्हल कमी जास्त होत असते, आणि नंतर तर ती कमी होऊन जाते आणि याच दरम्यान मेनोपॉजची लक्षणं दिसून येतात.

 पण एका रात्रीत हे सगळं घडत नाही.

 तर यासाठी बरीच वर्ष जावी लागतात. हे हार्मोन्स टप्प्याटप्प्याने कमी होतात. आणि नंतर अगदीच कमी प्रमाणावर स्थिर राहतात. पण जेव्हा हार्मोन्स कमी होत असतात तेव्हा स्त्रियांच्या शरीरातही बदल घडत असतात. जेव्हा अंडाशयात अंडी तयार होणं थांबतं तेव्हा गर्भधारणा शक्य नसते आणि मेनोपॉज झालेला असतो.

आता मेनोपॉजची लक्षणं बघू..

मेनोपॉज आणि त्याआधीची काही वर्ष स्त्रियांच्या शरीरात वेगवेगळे बदल घडत असतात.

 या काळात इस्ट्रोजेनची लेव्हल कमी होते हे आपण पहिलंच. पण या घटत्या हार्मोनमुळे मेंदू, मासिक पाळी, त्वचा, स्नायू आणि भावना या सर्वांवर परिणाम होतो.

 यात बरीच लक्षणं दिसून येतात. काही स्त्रियांना यातली काही लक्षणं जाणवतील तर काहींना सर्वच लक्षणं जाणवतील, तर काही स्त्रियांना काही जाणवणारच नाही.

यात सर्वसामान्य लक्षणं म्हणजे...

  • अनियमित मासिक पाळी, हेवी ब्लिडिंग
  • हॉट फ्लशेस
  • रात्रीचा घाम 
  • खराब मूड
  • व्हजायनल ड्रायनेस
  • ब्लॅडर प्रॉब्लेम

स्मरणशक्ती कमी होते, एकाग्रता राहत नाही. याला ब्रेन फॉग असंही म्हणतात. सांधेदुखी सुरू होते, त्वचा कोरडी पडते.

 सगळ्याच महिलांना ही लक्षणं जाणवतात असं नाही, पण 75 टक्के महिलांना यातली लक्षणं जाणवतात. तर उरलेल्या एक चतुर्थांश महिलांना गंभीर लक्षणं दिसून येतात.

 ही लक्षणं सरासरी सात वर्षांपर्यंत राहू शकतात. जगातल्या तीनपैकी एका महिलेला याहीपेक्षा जास्त काळ ही लक्षणं जाणवतात. 

 जर एखादी महिला गर्भनिरोधक गोळ्या घेत असेल, तर तिला मेनोपॉज कधी होणार आहे हे समजायला अवघड जातं. या गोळ्या स्त्रियांच्या मासिक पाळीवर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम करत असतात. 

हॉट फ्लश कशामुळे येतात?

इस्ट्रोजेनची लेव्हल कमी व्हायला लागली की, स्त्रियांना तोंडावर गरम वाफा जाणवू लागतात. शरीराच्या थर्मोस्टॅटमध्ये बदल घडू लागतो.

 बऱ्याचदा शरीराचं तापमान बदललं की तुमच्या मेंदूतील हार्मोन्स त्याला संतुलित ठेवतात. पण जेव्हा इस्ट्रोजेनची कमतरता जाणवायला लागते, तेव्हा थर्मोस्टॅट खराब होतं. मेंदूला वाटतं की शरीराचं तापमान वाढायला लागलंय, पण खरं तर तसं नसतं.

 इस्ट्रोजेनमुळे तुमच्या मुडवरही परिणाम होतो. हार्मोन्स मेंदूच्या रिसेप्टर्समधील केमिकल्सशी संवाद साधतात ज्यामुळे तुमचा मूड कंट्रोल हपतो. पण हार्मोन्सची पातळीच जर कमी झाली तर तुम्हाला चिंताग्रस्त व्हायला होतं, मूड खराब होतो.

मेनोपॉज दरम्यान इतरही हार्मोन्समध्ये बदल होतो का? 

तर हो.. प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन सारख्या हार्मोन्सची पातळी खालीवर होते. पण ज्यापद्धतीने इस्ट्रोजेन कमी होतं आणि आणि जो परिणाम होतो, त्यासारखं काही होत नाही.

 प्रोजेस्टेरॉन स्त्रीच्या शरीराला दर महिन्याला गर्भधारणेसाठी तयार करतं. पण जेव्हा ओव्हुलेशन थांबतं, मासिक पाळी थांबते तेव्हा ते याची लेव्हल कमी होते.

 टेस्टोस्टेरॉनचा संबंध स्त्रियांची सेक्स ड्राइव्हशी आणि एनर्जी लेव्हलशी जोडला जातो. 

मेनोपॉजसाठी कोणती टेस्ट करता येते का?

तर मेनोपॉज कधी होणार याचं निदान करण्यासाठी काही चाचण्या मार्केटमध्ये आल्या आहेत. पण तज्ञ सांगतात की, वयाची एकदा पंचेचाळीशी गाठली की, याचा काही उपयोग होत नाही.

 त्यामुळे तुमच्या मासिक पाळीचा जो पॅटर्न आहे त्याविषयी आणि सोबतच तुम्हाला जी काही लक्षणं जाणवतात त्याबद्दल एखाद्या डॉक्टरशी बोला. 

 या टेस्टमध्ये एफएसएच (फोलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन्स) नावाच्या हार्मोनची लेव्हल मोजतात. पण हार्मोन्सची लेव्हल नेहमीच वर आणि खाली होत असते. त्यामुळे मेनोपॉज नक्की कधी होणार याविषयी टेस्ट करून तरी सांगता येत नाही.

 मासिक पाळी अनियमित असेल तरीही स्त्रियांमध्ये गर्भधारणा होऊ शकते. त्यामुळे वयाच्या 55 वर्षांपर्यंत गर्भनिरोधक वापरा असा सल्ला तज्ञमंडळी देतात. 

मेनोपॉजची लक्षणं कमी करण्यासाठी काही उपचार उपलब्ध आहेत का?

हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (एचआरटी) मध्ये इस्ट्रोजेन सारख्या हार्मोन्सची लेव्हल वाढवली जाते. त्यामुळे मेनोपॉजच्या काळात ही लक्षणं दिसून येत नाहीत.

पण ज्यांच्यामागे कॅन्सर, रक्ताच्या गुठळ्या आणि हाय ब्लड प्रेशर अशा आजारांचा इतिहास आहे त्यांच्यासाठी ही थेरपी योग्य नाही.

लक्षणं कमी करण्यासाठी स्त्रिया काय करू शकतात? 

संतुलित आहार घ्या, फॅट्सचं प्रमाण कमी आणि कॅल्शियमचं प्रमाण वाढवल्यास हाडं मजबूत होतात, हृदय योग्य पध्दतीने काम करतं, चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा.

हॉट फ्लश आणि हृदयविकार टाळण्यासाठी धूम्रपान, दारू पिणं थांबवा.

सोया आणि रेड क्लोव्ह मध्ये प्लान्ट इस्ट्रोजेन असतं. त्याच्या सेवनाने त्रास थांबवता येतो. व्हिटॅमिन डी घेतल्यास हाडांचं आरोग्य सुधारता येईल असं बऱ्याच संशोधनामध्ये म्हटलंय.

मेनोपॉज नंतर काय बदल घडतात? 

तुमची शेवटची पाळी येऊन गेल्यानंतर वर्षभराने तुम्ही पोस्ट मेनोपॉज स्टेजमध्ये आलेल्या असता. 

आता इस्ट्रोजेनचं प्रोडक्शन पूर्णपणे थांबलेलं असतं. त्यामुळे तुमची हाडं आणि हृदयावर दीर्घकालीन परिणाम जाणवायला लागतो. आता तुमची वाटचाल वृद्धत्वाकडे सुरू असते. 

आता आयुर्मान वाढत चाललंय. त्यामुळे स्त्रिया मेनोपॉजनंतर त्यांच्या आयुष्याच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त आयुष्य जगत आहेत.