‘ती फक्त आठ वर्षांची आहे आणि पाळी सुरू झालीये; डॉक्टर, काय करू?'

    • Author, डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी
    • Role, स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ, बीबीसी मराठीसाठी

त्यादिवशी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आले आणि फोन चेक केला तर माझ्या चुलत भावजयीचे एकदम पाच मिस्ड कॉल्स दिसले.

अचानक काय झालं म्हणून मी लगेच फोन केला तर रडतच होती फोनवर...

" अगं सानूची पाळी सुरू झालीय असं वाटतंय मला. आत्ता कुठे आठ वर्षांची आहे गं ती! असं कसं झालं? काय करू सुचत नाहीये मला..."

तिला शांत करून सानूला लगेच क्लिनिकमध्ये घेऊन यायला सांगितलं.

क्वचित कधीतरी छोट्या मुलींमध्ये योनीमार्गाजवळ काही इजा झालेली असू शकते किंवा लघवीच्या संसर्गामुळे लघवीमध्ये रक्त दिसू शकतं. कोणी या बालिकांना लैंगिक त्रास दिलेला नाही ना हेही तपासून बघावं लागतं.

सानूला व्यवस्थित तपासून झाल्यावर तिची खरंच पाळी सुरू झालीय असं लक्षात आलं.

मुलींना खूप कमी वयात पाळी सुरू होण्याची ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे असं दिसतंय. यामुळे पालक हवालदिल होताना दिसतायेत.

साहजिकच आहे. इतक्या लहान वयात या मुलींना कोणतीही समज नसते. अगदी सॅनिटरी पॅड कसं लावावं, त्याची विल्हेवाट कशी लावावी,शारीरिक स्वच्छता कशी ठेवावी या सगळ्या गोष्टी उमजायचं पण हे वय नाही. मग मुलीच्या आईचीच कसोटी लागते.

काय आहेत यामागची कारणं?

मुलींच्या पाळीचे वय कमी का होत आहे याबद्दल बरेच संशोधन झाले आहे. यामध्ये मुलींचे वाढलेले वजन, प्राणिजन्य प्रोटीनचे अतिसेवन,अनुवंशिकता,कौटुंबिक कलह व ताण विशेष करून वेगळे झालेल्या पालकांच्या मुली अशी काही कारणे सापडली आहेत.

लहान मुलींच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात सोयाबिन हा सुद्धा एक घटक असू शकतो.रोजच्या जीवनात काही वेळा अपरिहार्य असणारी केमिकल्स आणि कीटकनाशके ही या समस्येला कारणीभूत असू शकतात.

मात्र मुख्य कारण व्यायामाचा अभाव आणि त्यामुळे वाढलेले वजन हेच असू शकते.

वयात येणाऱ्या मुलींमध्ये लठ्ठपणाचे वाढते प्रमाण ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. वाढीला लागलेल्या मुलींना जरा जास्त प्रमाणात भूक लागायला लागते .अशावेळी त्यांना कमी कॅलरी असलेला आहार घ्यायची आणि रोज व्यायाम करण्याची सवय लावणे अपरिहार्य आहे.

मोबाईलच्या वापराचा दुष्परिणाम?

पाळी सुरू होण्याच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या हॉर्मोन्सची सुरवात मेंदूमध्ये Hypothalamus या ग्रंथीपासून होते. मुलीचे वय वाढले की एका विशिष्ट वेळी ही ग्रंथी हॉर्मोन्स बनवायला सुरवात करते. त्याचा परिणाम म्हणून मुलींच्या शरीरात बदल होऊ लागतो आणि शेवटी पाळी सुरू होते.

ही विशिष्ट वेळ मेंदू नेमकी कशी निवडतो हे आपल्याला दुर्दैवाने नक्की माहीत नाहीये. पण एक थिअरी अशी आहे की मुलीच्या आजूबाजूला असलेले वातावरण यासाठी कारणीभूत असू शकते. म्हणजे adult content म्हणजे प्रौढांसाठी असलेले कार्यक्रम लहान मुलींनी कळत नकळत जरी बघितले तरी त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. ही अशी दृश्यं सतत बघणारे शरीर आता पुढची वाढ होण्यास योग्य आहे असा मेंदूचा ग्रह होतो आणि हॉर्मोन्स स्त्रवायला सुरवात होऊ शकते. पाळी लवकर सुरू होण्याचे हे एक कारण असू शकते .

असं एक्सपोजर ग्रामीण भागातील मुलींना मिळण्याची शक्यता थोडी कमी म्हणून पाळी लवकर येण्याचे प्रमाण खेड्यात कमी आढळते. अर्थातच हे सर्व मुलींना लागू होऊ शकत नाही. यावरही अजून खूप संशोधन होणे आवश्यक आहे.

टीव्ही,लॅपटॉप्सवरच्या त्या प्रतिमा मुलांच्या मनावर आणि मेंदूवर ठसा उमटवतच असतात हे लक्षात घेतले पाहिजे. हल्ली तर सगळ्या मुलांना अभ्यासासाठी दिलेले लॅपटॉप्स, टॅब, फोन आणि अनलिमिटेड डेटा आहे. मग अजून काय पाहिजे? मुलं नको त्या वयात वाट्टेल त्या गोष्टी बघत आहेत आणि दुसऱ्या खोलीतल्या पालकांना कसलीच कल्पना नाहीये.

या सगळ्याचा परिणाम मुलं आणि मुली दोघांवरही होतो आहे ,फक्त स्त्रीच्या शरीराची रचना जास्त गहन आणि गुंतागुंतीची असल्यामुळे परिणाम लगेच जाणवत आहेत.मुलांमध्येही याचे दुष्परिणाम वेगळया स्वरुपात जाणवतात आहेत.लहान वयात वेगवेगळी व्यसने,पोर्नचे व्यसन अशा गोष्टी मुलांमध्ये दिसतात.

लवकर पाळी येणं काळजीचं आहे, कारण...

एकदा पाळी सुरू झाली की मुलींच्या उंची वाढण्यावर मर्यादा येतात .मुलींची उंची निदान त्यांच्या आईएवढी तरी होणे अपेक्षित असते. त्यामुळे सुद्धा फार लवकर पाळी सुरू होणे हा चिंतेचा विषय होतो.

मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असेल आणि तिची उंची आईपेक्षा खूपच कमी असेल, तर कधी कधी अशा केसेस मध्ये सविस्तर तपासण्या करून एन्डोक्रिनोलॉजिस्टच्या सल्ल्याने पाळी तात्पुरती बंद करण्याची इंजेक्शन्स देण्याचा निर्णय घेतला जातो .मात्र हा निर्णय खूप विचार आणि तपासण्या करून मगच घेतला जातो.

योग्य तपासण्या आणि सल्ला घेऊन ही इंजेक्शन्स घेतल्यास दोन ते तीन वर्षे पाळी पुढे ढकलता येऊ शकते आणि त्या दरम्यान मुलीची उंची आणि इतर वाढ व्यवस्थित होऊ शकते.त्यामुळे खूप लवकर पाळी सुरू झालेल्या मुलींच्या पालकांनी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. हा सल्ला वेळीच घेतला तरच फायद्याचा ठरतो .पाळी सुरू होऊन काही महिने लोटले तर उपचारांचा फायदा होण्याची शक्यता कमी होते.

पाळी लवकर सुरु झाल्यास पीसीओडीचे प्रमाण वाढते, पाळीचे त्रास जास्त होऊ शकतात. लठ्ठपणा, मधुमेह अशा समस्या जास्त होऊ शकतात.

भविष्यात ब्रेस्ट कॅन्सर,गर्भाशयाचा कॅन्सर,हृदयरोग याचे प्रमाण सुद्धा जास्त होतं.

पाळी सुरू होण्याच्या एक दीड वर्षे आधीपासूनच काखेत,योनीमार्गाजवळ केस येणे,स्तनांची वाढ सुरू होणे अशी लक्षणे आढळतात.ही लक्षणे फार लवकर दिसायला लागली तर तत्काळ स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

लवकर पाळी आल्यास घ्या ‘ही’ काळजी

सर्वांत आधी तिची पाळी लवकर आलीये यात तिचा काहीच दोष नाही हे घरच्या सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवे .तिला तिचं नेहेमीचं आयुष्य,खेळ इत्यादी तसंच चालू ठेवता येणं अत्यावश्यक आहे.

त्यांना वैयक्तिक स्वच्छता, सॅनिटरी पॅड वापरणे, त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणे या गोष्टी नीट शिकवणे ही आईची जबाबदारी आहेच. पण त्यापलिकडे जाऊन तिचा आत्मविश्वास कमी न होऊ देता सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तिला उत्तेजन देणे हे दोन्ही पालकांचं कर्तव्य आहे. पाळी सुरू झाली म्हणून खेळ,नृत्य इत्यादी छंद चालू ठेवण्यात काहीच अडचण येण्याचे कारण नाही.

खूप घरांमध्ये पाळी सुरू झाल्यावर काही कारण नसताना मुलींचे खेळ,छंद बंद केले जातात आणि त्यांच्या चालण्याफिरण्यावर बंधने आणली जातात .हे चुकीचे,अन्यायकारक आणि मागासलेल्या मनोवृत्तीचे लक्षण आहे. एखादया कोवळ्या पाखराला उडता येण्याआधीच त्याचे पंख कापण्यासारखे आहे.

पाळी सुरू झाल्यावर पहिली एक दोन वर्षे ती अनियमित असणे नॉर्मल आहे. परंतु एकवीस दिवसांच्या आत पाळी येणे, सात दिवसांहून अधिक रक्तस्राव होत राहणे, खूप जास्त रक्तस्राव होणे अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या मुलींच्या हिमोग्लोबिनकडे लक्ष असणे आवश्यक आहे. त्यांचा आहार चौरस असावा.

भात,बटाटा,साखर,मैदा याचे प्रमाण कमी असावे. खरंतर हे प्रमाण प्रत्येक भारतीयांच्या आहारात कमी असणे आजकाल आवश्यक आहे.

पाळी लवकर आलेल्या मुलींवर झालेल्या संशोधनात त्यांना एकटेपणा जाणवणे, व्यक्तिमत्त्व विकास कमी होणे, कमी वयात लैंगिक नात्यांमध्ये अडकणे अश्या गोष्टीचा सामना करायला लागू शकतो असे निष्कर्ष निघाले आहेत. त्यामुळेच या मुलींची केवळ शारीरिक नाही तर भावनिक जपणूक करणंही गरजेचं आहे.

मासिक पाळी हा आजार नाहीये, तर विकसित होणाऱ्या स्त्रीत्वातला एक टप्पा आहे. त्यामुळे लवकर पाळी आलेल्या मुलींना हळूवारपणे या गोष्टीची जाणीव करून दिली तर अचानक झालेल्या बदलामुळे भांबावून जाणार नाहीत, तर हळूहळू त्याचा स्वीकार करायला शिकतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)