You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वयात येतानाची सर्व लक्षणं दिसत असतानाही पाळी येत नसेल तर? डॉक्टर काय सांगतात?
- Author, डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी
- Role, स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ, बीबीसी मराठीसाठी
"डॉक्टर हिची पाळी सुरू झालीच नाहीये अजून. ती आता सोळा वर्षाची होईल दोन महिन्यात," एक अतिशय काळजीत पडलेली आई सांगत होती.
खरंतर अशा केसेस खूप क्वचित येतात. पण जेव्हा येतात तेव्हा खूप बारकाईने तपासणी करावी लागते.
आधी अशा मुलीची बाकीची शारीरिक वाढ होत आहे का हे बघावे लागते. मुली वयात येतात तेव्हा स्तनाची वाढ हळूहळू सुरू होते. काखेत आणि योनिमार्गाच्या भागात केस येऊ लागतात. याला secondary sexual characters असं म्हणतात. ही सगळी वाढ झाली असेल तर मुलीच्या शरीरात हार्मोन्सचे प्रमाण व्यवस्थित आहे असं आपण सुरवातीला तरी गृहीत धरू शकतो.
मग पाळी न येण्याचे कारण जननसंस्थेमध्ये कुठेतरी विकृती म्हणजे anomaly आहे का ते तपासून बघावे लागते.
वर उल्लेख केलेल्या मुलीची सोनोग्राफी केल्यावर तिला जन्मत: च गर्भाशय नसल्याचे लक्षात आले. तसेच अशा मुलींचा योनीमार्गसुद्धा अर्धवट विकसित झालेला असू शकतो. सोनोग्राफी नंतर अशावेळी MRI ही तपासणी सुद्धा करावी लागू शकते. मुलीचे निदान ऐकून साहजिकच तिचे पालक अतिशय व्यथित झाले. पण आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने आपण आता अशा केसेस मध्ये सुद्धा यशस्वी उपाय करू शकतो.
ही मुलगी विवाह योग्य वयाची होईल तेव्हा तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येईल. पोटाच्या आतले आवरण(peritoneum) खाली खेचून घेऊन कृत्रिम योनीमार्ग तयार केला जाईल. जेणेकरून तिला लैंगिक संबंध ठेवता येऊ शकेल. याच शस्त्रक्रियेमध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरीज योनीमार्गाच्या जवळ आणल्या जातील. म्हणजे पुढे टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान वापरून या अंडाशयातून स्त्रीबीजे काढून घेता येतील.
स्त्रीबीज आणि या मुलीच्या नवऱ्याचे शुक्राणू यांच्या संयोगाने निर्माण केलेला गर्भ दुसऱ्या एका स्त्रीच्या गर्भाशयात वाढवता येईल. ही मुलगी स्वत:च्या अपत्याची आई पण होऊ शकेल. म्हणजे निसर्गाने या मुलीवर केलेल्या अन्यायाचे वैद्यकीय तंत्रज्ञानाने आपण पूर्ण परिमार्जन करू शकतो.
अशा अनेक आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे आज आपली आयुष्ये समृद्ध झाली आहेत. आधुनिक वैद्यकातील छोट्या त्रुटी शोधून काढून उगाच त्याचा बागुलबुवा करण्यापेक्षा आपण त्यामुळे मिळालेल्या वेगवेगळ्या वरदानांबद्दल कृतज्ञ रहायला हवे असे वाटते.
पाळी आली नाहीये किंवा आलीये (म्हणजे गर्भधारणा झाली नाहीये) या दोन प्रश्नांभोवती आम्हां स्त्रीरोगतज्ज्ञांची ओपीडी कायम फिरत असते. या दोन्हीही प्रश्नांची उत्तरं स्त्रियांच्या मनस्तापाला कारणीभूत ठरू शकतात.
पाळी न येण्याची कारणं काय?
स्त्रीचे शरीर आणि मन हे पूर्णपणे हार्मोन्सच्या तालावर नाचत असते. त्यामुळे पाळी वेळेवर येणे ही शारीरिक व मानसिक संतुलनासाठी निकडीची गरज आहे.
मुली वयात यायला लागल्या की त्यांच्या शरीरात वेगवेगळे बदल घडू लागतात आणि मग पाळी सुरू होते. एखाद्या मुलीची पाळी वय वर्षे पंधरा पर्यंत सुरू न झाल्यास ते असाधारण समजले जाते आणि अशा वेळी या मुलीच्या सगळ्या तपासण्या करून पाळी न सुरू होण्याचे कारण शोधणे आवश्यक ठरते.
पाळी सुरू न होण्यामागे जनन संस्थेतील काही जन्मजात व्यंग कारणीभूत असू शकते तसेच काही वेळा काही जनुकीय समस्याही असू शकतात. यातील काही समस्यांना वैद्यकीय उपचार उपलब्ध असतात, तर काही समस्यांच्या बाबतीत फार काही करता येत नाही.
योनीमार्गाचे तोंड (योनिपटल) पूर्णपणे बंद असणे (imperforate hymen) ही एक समस्या असू शकते. अशा मुलींना पाळी सुरू झालेली लक्षात येत नाही, पण महिन्यातून काही दिवस अतिशय पोट दुखते. सोनोग्राफी आणि योनीमार्गाच्या तपासणीत ही समस्या लगेच लक्षात येऊ शकते. मग भूल देऊन योनीमार्गाच्या मुखाशी एक छोटा छेद दिला जातो.
आतमध्ये साठलेले रक्त निघून जाऊन या मुलींची जननसंस्था पुन्हा एकदा पूर्ववत होऊ शकते, मात्र याचे निदान वेळेवर होणे अत्यंत महत्त्वाचं आहे.
कोणताही जीव जन्माला येताना निसर्गाचे फासे चुकीचे पडले तर वेगवेगळी जनुकीय व्यंगे निर्माण होऊ शकतात. Turner syndrome हा एक असा प्रकार आहे. स्त्रियांच्या जनुकीय रचनेमध्ये XX अशी दोन गुणसूत्रे असतात. पण Turner Syndrome असलेल्या स्त्रियांमध्ये एकच X गुणसूत्र असते.त्यामुळे त्यांची शारीरिक वाढ योग्य होत नाही तसेच हॉर्मोन्सचे प्रमाण कमी असल्यामुळे पाळी सुरू होण्यास खूप विलंब होणे अथवा सुरूच न होणे अशी लक्षणे दिसतात.
या मुलींची उंची खूपच कमी,आखूड रुंद मान, खालच्या बाजूला असलेले कान, रुंद छाती, कोपरापासून थोडे बाहेर वळणारे हात, टाळूचा वेगळा आकार, बारीक, बाहेर वळलेली नखे अशी अजून काही लक्षणे या मुलींमध्ये दिसून येतात.
वेळेवर निदान झाल्यास या मुलींना योग्य हॉर्मोन्सचे डोस देऊन पाळी सुरू करता येते. अशा मुलींना वंध्यत्वाची शक्यता बरीच जास्त असते पण काही वेळा आधुनिक वैद्यकीय उपचारांनी त्यांना मातृत्वाचा लाभ होऊ शकतो.
पाळी नाही आली किंवा लांबली तर...
पाळी सुरू झाल्यानंतर काही वर्षे ती अनियमित असणे स्वाभाविक आहे पण पाळी वेळेवर येत नसेल आणि मुलीचे वजन वाढत चालले असेल तर स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. ही PCOD ची सुरुवात असू शकते.
पाळी बंद होण्याची वेळ जवळ आली की ती पुढे पुढे जाऊ लागते आणि रक्तस्त्राव कमी कमी होऊ लागतो. मेनोपाजच्या काळात रक्तस्त्राव जास्त दिवस किंवा जास्त प्रमाणात होणे हे नॉर्मल नाही. याकरता लगेच स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
स्त्रियांमध्ये पाळी लांबली तर पाहिलं कारण अर्थातच गर्भारपण हेच आहे. पण बदलत्या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या कारणांमुळे पाळीच्या समस्या उद्भवत आहेत.
कधीतरी एखाद्या महिन्यात खूप मानसिक ताण आला तरी पाळी पुढे जाऊ शकते. मात्र वारंवार असे होणे योग्य नाही. स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया ही प्रत्येक मासिक पाळीच्या चक्रात अंतर्भूत असते. त्यामुळे एखाद्या महिन्यात स्त्रीबीज तयार झाले नाही तर पाळी पुढे जाऊ शकते. याचाच परिणाम म्हणून कधीतरी अंडाशय म्हणजे ओव्हरीवर cyst म्हणजे पाण्याच्या फुग्यासारख्या गाठी निर्माण होतात. त्यातून अजून हॉर्मोन्स तयार होऊन पाळी अजून पुढे पुढे जाते. याचे निदान सोनोग्राफीमध्ये लगेच होते. मग पाळी येण्याच्या गोळ्या दिल्या की हॉर्मोन्सचे प्रमाण कमी होऊन पाळी येते आणि ओव्हरीची गाठ कमी होऊ लागते.
थायरॉईडच्या गोळीचा बागुलबुवा नको
कोणतेही शारीरिक कष्ट नसणे, आहारावर नियंत्रण नसणे याचा परिणाम प्रमाणाबाहेर वजन वाढण्यात होतो आणि पाळी अनियमित होऊ लागते. पाळी अनियमित झाली की वजन अजून वाढते. हे दुष्टचक्र थांबवायला नियमित व्यायाम आणि आहारातील कर्बोदके (भात,बटाटा,साखर,मैदा ,तेल) या गोष्टी खूप कमी करायला हव्यात.
थायरॉईड आणि प्रोलॅक्टीन ह्या दोन हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे पाळीच्या समस्या निर्माण होतात. हायपोथायरॉयडिझम ची समस्या असेल तर योग्य उपचार न घेता कितीही प्रयत्न केले तरी वजन कमी होत नाही आणि पाळीच्या समस्या सुटत नाहीत. एका नियमित गोळीने स्त्रियांचे आरोग्य पूर्णपणे पूर्ववत होऊ शकते. त्यामुळे थायरॉईडच्या गोळीचा उगाच बागुलबुवा करू नये.
अजूनही बरीच कारणे आहेत पाळी अनियमित होण्याची, पण ती सगळीच विस्तृतपणे सांगणं तांत्रिक असेल. पण एकूण या माहितीचा मथितार्थ हा की अनियमित पाळी नियमित व्हावी यासाठी स्त्रियांनी सर्व आघाड्यांवर प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.
कोणतीही गोष्ट अंगावर काढण्यापेक्षा स्त्रीने स्वतःच्या तसंच आपल्या घरातील मुलांच्या आरोग्याबद्दल जागरुक राहून वेळीच उपचार घ्यावेत, आहार-विहाराच्या सवयींमध्ये बदल घडवावेत, जेणेकरून काही समस्या उद्भवल्या तरी त्याचे गंभीर परिणाम होणं टाळता येईल किंवा कमी करता येईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)