लग्नाच्या हॉलला लागलेल्या आगीत 100 हून अधिक जणांचा होरपळून मृत्यू

फोटो स्रोत, REUTERS
- Author, इथर शेल्बी
- Role, बीबीसी अरेबियन
इराकमध्ये एका लग्नाच्या हॉलमध्ये लागलेल्या आगीत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. तसेच अनेक लोक जखमी झाल्याचीही माहिती आहे.
उत्तर इराकमधील काराकोश येथे ही घटना घडली आहे. आग लागल्यानंतर त्याठिकाणी दहशतीचं वातावरण पसरल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे. लग्नाच्या हॉलमध्ये लागलेल्या आगीमुळं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती असंही त्यांनी सांगितलं.
काराकोशमधल्या अल-हैतम बँक्वेट हॉलमध्ये हे लग्न होतं आणि 26 सप्टेंबरला आग लागली तेव्हा 19 वर्षांचा गाली नसीम हा त्या ठिकाणापासून काही अंतरावरच होता.
त्याचे पाच मित्र त्या हॉलमध्ये अडकले होते आणि त्यांची सुटका करण्यासाठी त्याने लगेच त्याठिकाणी धाव घेतली.
नसीमने सांगितलं की, "त्या हॉलचा एक दरवाजा बंद होता म्हणून मग आम्ही धक्का देऊन तो दरवाजा उघडला. हॉलमधून आगीच्या मोठमोठ्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. जणू काही नरकाचं दार उघडल्यासारखा तो अनुभव होता. मला शब्दात सांगता येणार नाही एवढं त्याठिकाणचं तापमान वाढलं होतं."
या आगीत सुमारे 115 जणांचा मृत्यू झाला असून 150 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
दुर्घटना कशी घडली?
या लग्नातल्या वधू-वरांच्या नृत्याच्या पहिल्या फेरीनंतर ही आग लागल्याचं सांगितलं जातंय.
या घटनेबाबत बोलताना नसीम म्हणाला की, "ही एक शोकांतिका होती. मी काहीही करू शकत नव्हतो आणि त्या भयानक आगीपासून दूर पळून गेलो."
फोनवर नसीमचा आवाज सांगत होता की तो खूप थकला आहे. त्याने सांगितलं की, "अग्निशमन दलाचे जवान तिथे आल्यानंतर, मी माझ्या मित्रांना शोधण्यासाठी आत धावलो आणि बाथरूममध्ये मला 26 मृतदेह दिसले. एका कोपऱ्यात 12 वर्षांची मुलगी पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होती."

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA
इराकच्या नागरी संरक्षण माध्यमांचे प्रवक्ते गदत अब्दुल रहमान यांनी बीबीसीला सांगितलं की, हॉलमध्ये पेटवलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागली. इराकमध्ये असणारं हे शहर ख्रिश्चन बहुल आहे.
ते म्हणाले की, हॉलमध्ये ज्वलनशील पदार्थांचा वापर करण्यात आला ज्यामुळे आग लागली.
नसीमचं असं म्हणणं आहे की त्या हॉलमधून आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी एकही दार नव्हतं त्यामुळे परिस्थिती अधिक वाईट झाली होती. आग लागल्यानंतर लग्नाला उपस्थित असलेले सगळे लोक मुख्य प्रवेशद्वाराकडे पळाले आणि त्यामुळे गोंधळ उडाला.
काही मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं
त्याचे मित्र सुरक्षित असल्याचं नसीमने सांगितलं. आग लागली तेव्हा 17 वर्षांचा टॉमी उदय मुख्य दरवाजातून बाहेत पडला. यामुळे तो या आगीतून वाचू शकला.
त्याने सांगितलं की, "मला त्या हॉलच्या छतातून मोठ्या प्रमाणात काळ्या धुराचे लोट निघताना दिसले, म्हणून मी पटकन तिथून बाहेत पळ काढला. अवघ्या पाच मिनिटांत संपूर्ण जागा उद्ध्वस्त झाली."
बुधवारी 50 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाकीचे दुसऱ्या दिवशी दफन करायचे होते. मात्र अजूनही अनेक लोक त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.

आग लागली तेव्हा गझवान त्याची 33 वर्षीय पत्नी, चार वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीपासून दूर गेले होते. त्यांचं कुटुंब कुठे आहे हे त्यांना माहित नव्हतं.
गझवान यांची बहीण असलेल्या इसान यांनी बीबीसीला सांगितलं की, "जेव्हा त्यांची दुसरी मुलगी, त्या हॉलमधून बाहेर आली तेव्हा तिचे शरीर जवळजवळ पूर्णपणे जळलेलं होतं."
इसान यांनी सांगितलं की त्यांचा भाऊ गझवान आता वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये जाऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा शोध घेतो आहे.
लहान मुलांना या आगीचा सगळ्यात जास्त फटका बसलाय
इराकच्या मोसुलमध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्यांसाठी बनवण्यात आलेल्या वैद्यकीय केंद्रातील डॉक्टर वाड सालेम यांनी बीबीसीला सांगितलं की जळालेल्या लोकांपैकी 60 टक्के लोक गंभीर आहेत.
ते म्हणाले की, "बहुतेक लोकांचे चेहरे, छाती आणि हात भाजले आहेत. महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे."
मुख्य परिचारिका इसरा मोहम्मद यांनी रात्रभर जखमींवर उपचार केले. त्यांनी बीबीसीला सांगितलं की ते सुमारे 200 रुग्णांवर त्यांनी त्यादिवशी उपचार केले होते.

फोटो स्रोत, REUTERS
त्यांनी सांगितलं की, "मी जे काही बघितलं ते अत्यंत वेदनादायक होतं. मी त्यात अशा लोकांना पाहिलं जे 90 टक्के जळाले होते. दवाखान्यात पोहोचल्यानंतर तब्बल 50 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली."
मोहम्मद म्हणाले की रुग्णालयात औषधे आणि इतर सुविधांचा तुटवडा आहे आणि पीडितांची संख्या जास्त असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नसीम आणि त्याच्या मित्रांच्या मनावर हा अपघात आता कायमचा कोरला गेलाय.
त्यांनी सांगितलं की, "मला नेमकं काय वाटतंय हे मी सांगूच शकत नाही. मला अशी किमान तीन कुटुंबं माहिती आहेत ज्यातला एकही माणूस वाचू शकला नाही. ज्या राज्यात ही घटना घडली फक्त तिथेच नाही तर संपूर्ण इराक शोक करतो आहे."
(दलिया हैदर यांचा रिपोर्ट)
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








