'अश्विन' प्रयोगाने राजस्थानचा घात; पंजाबचा निसटता विजय

रवीचंद्रन अश्विन, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स

फोटो स्रोत, TWITTER @DELHICAPITALS

फोटो कॅप्शन, रवीचंद्रन अश्विन

बुधवारी गुवाहाटीच्या मैदानाने आयपीएल पदार्पण केलं. चाहत्यांना चौकार-षटकारांची लयलूट अनुभवायला देणाऱ्या या लढतीत घरचा संघ राजस्थानचा 5 धावांनी पराभव झाला.

पंजाबच्या खेळाडूंचं या विजयात योगदान होतंच पण चर्चा रंगली ती राजस्थानच्या डावपेचांची. विजयासाठी डोंगराएवढं लक्ष्य मिळालेलं असताना राजस्थानने रवीचंद्रन अश्विनला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला.

संघात अनेक फलंदाज असताना हा प्रयोग करण्याची आवश्यकता होती का? असा प्रश्न चाहत्यांना पडला. अश्विन 4 चेंडूत भोपळाही न फोडता बाद झाला. पंजाबने दिलेलं 198 धावांचं लक्ष्य गाठताना राजस्थानने 192 धावा केल्या.

राजस्थानच्या पराभवातही शिमोरन हेटमायर आणि इम्पॅक्ट प्लेयर ध्रुव जुरेलची भागीदारी आशेचा किरण ठरली. या जोडीने पराभव समोर दिसताना वादळी भागीदारी रचत जिंकून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला पण तो अपुरा ठरला.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

नियमित सलामीवीर जोस बटलर दुखापतीच्या कारणास्तव सलामीला येऊ शकला नाही. पण त्याच्या अनुपस्थितीत देवदत्त पड्डीकल, कर्णधार संजू सॅमसन सलामीला येऊ शकले असते पण राजस्थानने अश्विनचा प्रयोग केला.

याआधीच्या हंगामातही राजस्थानने अश्विनला फलंदाजीत बढती दिली होती. पण बुधवारी राजस्थान संघव्यवस्थापनाने अश्विनला थेट सलामीलाच धाडलं.

आयपीएल स्पर्धेच्या गुवाहाटी पदार्पणात सर्वाधिक चर्चा रंगली रवीचंद्रन अश्विनची. गोलंदाज गोलंदाजी करत असताना नॉन स्ट्रायकरवर असलेला फलंदाज क्रीझमध्ये नसेल तर त्याला बाद करता येतं.

अश्विनने बुधवारी झालेल्या लढतीत पंजाबचा कर्णधार शिखर धवनला बाद केलं नाही पण त्याला इशारा दिला. यानिमित्ताने अश्विन यंदाच्या हंगामात अशा पद्धतीने फलंदाजांना बाद करणार का? अशा चर्चेला तोंड फुटलं.

प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने विशेषज्ञ फलंदाजांना बाजूला सारुन रवीचंद्रन अश्विनला सलामीला पाठवल्याने चाहते बुचकळ्यात पडले.

राजस्थानचे घरचे सामने गुवाहाटीत कसे?

बुधवारी आयपीएल स्पर्धेने गुवाहाटीत पदार्पण केलं. राजस्थान रॉयल्सने गुवाहाटीची दुसरं होम ग्राऊंड म्हणून निवड केली आहे. राजस्थान रॉयल्सची एक अकादमी गुवाहाटीत कार्यरत आहे. गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादात पंजाबने 5 धावांनी सामना जिंकला.

राजस्थानने 2020 मध्येच गुवाहाटीत खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कोरोना संकटामुळे स्पर्धेचं वेळापत्रक विस्कळीत झालं.

स्पर्धा काही काळासाठी स्थगित करण्यात आली. स्पर्धेचा उर्वरित टप्पा संयुक्त अरब अमिराती इथे पार पडला. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी गुवाहाटीचं आयपीएल पदार्पण लांबणीवर पडलं होतं.

रवीचंद्रन अश्विन, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स

फोटो स्रोत, IPL/BCCI

फोटो कॅप्शन, प्रभसिमरन सिंहने आयपीएल स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं.

पंजाब आणि राजस्थान दोन्ही संघांनी या सामन्यासाठी संघात कोणताही बदल केला नाही. शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग यांनी 90 धावांची खणखणीत सलामी दिली.

राजस्थानच्या जोस बटलरने प्रभसिमरनचा अफलातून झेल घेतला. त्याने 34 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 60 धावांची खेळी केली. या स्पर्धेतलं प्रभसिमनरचं हे पहिलंच अर्धशतक आहे.

सातव्या षटकादरम्यान अश्विनने चौथा चेंडू टाकायला सुरुवात केली. मात्र त्यावेळी नॉन स्ट्रायकर शिखर धवन क्रीझमध्ये नसल्याचं त्याने पाहिलं. अश्विनने धवनच्या दिशेने कटाक्ष टाकलं. धवन तात्काळ क्रीझमझ्ये परतला.

धवनचा फटका जिव्हारी

भानुका राजपक्षेकडून पंजाबला मोठ्या अपेक्षा होत्या मात्र शिखर धवनचा मारलेला चेंडू त्याला लागला. त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली.

फिजिओंनी उपचार केले. कोपराला हाडावरच लागल्यामुळे भानुकाला बॅट पकडतानाही त्रास होत होता. अखेर त्याने माघारी परतण्याचा निर्णय घेतला. भानुकाच्या जागी जितेश शर्मा फलंदाजीला आला. जितेशने धवनला चांगली साथ दिली. युझवेंद्र चहलने जितेशची 27 धावांची खेळी संपुष्टात आणली.

चहलची चार षटकं संपताच राजस्थानने त्याच्या जागी ध्रुव जुरेलला संघात सामील केलं. अश्विनच्या कॅरम बॉलवर सिकंदर रझा त्रिफळाचीत झाला. एकीकडे सहकारी बाद होत असतानाही धवनने धावांचा रतीब सुरूच ठेवला.

शाहरुख खानने 10 धावा केल्या. धवनने 20 षटकं खेळून काढत 9 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 86 धावांची खेळी केली. शिखर धवनचं स्पर्धेतलं 50वं अर्धशतक आहे.

रवीचंद्रन अश्विन, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स

फोटो स्रोत, JOE ALLISON

फोटो कॅप्शन, शिखर धवन
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दोन्ही सलामीवीरांच्या दमदार खेळीच्या बळावर पंजाबने 197 धावांची मजल मारली. राजस्थानकडून जेसन होल्डरने 29 धावांत 2 विकेट्स घेतल्या.

या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानच्या डगआऊटमधून यशस्वी जैस्वाल आणि रवीचंद्रन अश्विन बाहेर पडले. वादळी खेळींसाठी प्रसिद्ध जोस बटलर सलामीला का आला नाही याविषयी गोंधळाचं वातावरण दिसलं.

क्षेत्ररक्षणादरम्यान झेल टिपताना बटलरच्या बोटाला लागलं होतं. त्याच्यावर उपचार घेण्यासाठी तो तंबूत परतला होता. डाव संपताना मैदानात नसल्याने त्याला सलामीला येता आलं नाही.

जैस्वालने सॅम करनला पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. मात्र अर्शदीप सिंगने दुसऱ्याच षटकात त्याला माघारी धाडलं. त्याने 11 धावा केल्या. बटलरला आल्या आल्या हरप्रीत ब्रारने जीवदान दिलं.

अर्शदीपनेच अश्विनला बाद केलं. यानंतर जोस बटलर आणि संजू सॅमसनची जोडी जमली. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या जोस बटलरला नॅथन एलिसने बाद केलं. उजव्या यष्टीबाहेरचा चेंडू बटलरने खेळला. बॅटची आतली कड घेऊन चेंडू हवेत उडाला. फॉलोथ्रूमध्ये एलिसने पुढे झेप घेत अफलातून झेल घेतला. त्याने 11 चेंडूत 19 धावांची खेळी केली.

इम्पॅक्ट प्लेयर ध्रुव जुरेलचा 'इम्पॅक्ट'

रवीचंद्रन अश्विन, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स
फोटो कॅप्शन, शिमोरन हेटमायर

बटलर बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने सूत्रं हाती घेतली. पण वाढत्या धावगतीच्या आव्हानासमोर संजूने मारलेला फटका बदली क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावला.

आसामच्याच रियान परागने घरच्या मैदानावर चांगली सुरुवात केली. बिहू नृत्यासाठी प्रसिद्ध झालेल्या रियान परागने 12 चेंडूत 20 धावांची वेगवान खेळी केली. पण नॅथन एलिसने त्याला परतीचा रस्ता दाखवला. त्याच षटकात सूर न गवसलेला देवदत्त पड्डीकलही त्रिफळाचीत होऊन तंबूत परतला. त्याने 26 चेंडूत 21 धावा केल्या.

सामना गमावला अशी स्थिती असताना शिमोरन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनी हिंमत न हारता सातव्या विकेटसाठी 26 चेंडूत 61 धावा चोपून काढल्या.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

या जोडीने नॅथन एलिसने टाकलेल्या 17व्या षटकात 16 धावा कुटल्या. सॅम करनने टाकलेल्या 18व्या षटकात या जोडीने 19 धावांची कमाई केली. अर्शदीपच्या 19व्या षटकातही 18 धावा वसूल केल्या. सलग तीन षटकं जोरदार फटकेबाजी करत या जोडीने अशक्य वाटणारा विजय दृष्टिक्षेपात आणला.

सॅम करनच्या शेवटच्या षटकात पहिल्या चेंडूवर जुरेलने एक धाव काढली. दुसऱ्या चेंडूवर शिमोरनने दोन धावा काढल्या. तिसऱ्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात हेटमायर धावबाद झाला. त्याने 18 चेंडूत 36 धावांची स्फोटक खेळी केली.

त्याने 1 चौकार आणि 3 षटकार लगावले. चौथ्या चेंडूवर बाय मिळाली. अनुभवी जेसन होल्डरला पाचव्या चेंडूवर एकच धाव घेता आली आणि पंजाबने सुस्कारा टाकला. शेवटच्या चेंडूवर जुरेलने चौकार लगावला पण विजयापासून राजस्थानचा संघ 5 धावा दूरच राहिला.

जुरेलने 15 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 32 धावांची खेळी केली. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून युझवेंद्र चहलच्या जागी आलेल्या जुरेलने आपल्या नैपुण्याची चुणूक दाखवली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)