भाजप नेत्याकडून काँग्रेस नेत्याच्या पत्नीवर पाकिस्तानी एजंट असल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दिलीप कुमार शर्मा
- Role, बीबीसी
दोन बड्या नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे आसामचं राजकारण चांगलंच तापलं आहे.
मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी जोरहाटचे काँग्रेस खासदार गौरव गोगोई आणि त्यांच्या पत्नीवर आरोप केले आहेत.
हिमंता आणि त्यांच्या पक्षाचे नेते, गौरव गोगोई यांच्या पत्नी एलिजाबेथ कोलबर्न यांच्या परदेशी नागरिकतेवरून प्रश्न उपस्थित करत आहेत.
इतकंच नाहीतर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसोबत संबंध असल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जातोय.
दुसरीकडे गौरव गोगोई यांनी सुद्धा सरमा यांच्यावर पलटवार केला असून, हिमंता सरमा यांना पद जाण्याची भीती असल्यानं ते असे आरोप लावत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
हिमंता बिस्वा सरमा यांचे आरोप
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी 13 फेब्रुवारीला आपल्या एक्स अकाऊंटवरून गोगोई यांच्यावर आरोप केले.
ते लिहितात, "भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्त यांनी पहिल्यांदाच खासदार (गौरव गोगोई) झालेल्यांना स्टार्टअप आणि पॉलिसी फॉर युथसह भारत पाकिस्तान संबंधांवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात आमंत्रित केलं होतं."
महत्वाचं म्हणजे हे खासदार त्यावेळी परराष्ट्र व्यवहारविषयक संसदीय समितीचे सदस्यही नव्हते.
भारतानं आपल्या घरच्या गोष्टींमध्ये उच्चायुक्तालयाच्या हस्तक्षेपाबद्दल आणि हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी असलेल्या संपर्काबद्दल अधिकृतपणे विरोध केला होता."
"अशावेळी गोगोई पाकिस्तानी उच्चायुक्तालयात भेट द्यायला गेले होते. त्यामुळे त्यांच्या या भेटीवर संशय निर्माण होतो," असं हिमंता सरमा यांनी म्हटलं.


पुढे ते असंही म्हणतात की, या बैठकीनंतर 'द हिंदू'मध्ये प्रकाशित झालेल्या लेखात खासदारांच्या स्टार्टअपनं सीमा सुरक्षा दलावर टीका केली होती. सीमा सुरक्षा दल बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांशी ज्या पद्धतीने वागतं त्यावर या स्टार्टअपनंं आक्षेप घेतला होता.
संसदेच्या कामाकाजावेळी गोगोई यांनी विचारलेल्या प्रश्नांचा संदर्भ देत सरमा यांनी त्यांच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित केले. तसेच संवेदनशील असणाऱ्या संरक्षण क्षेत्राकडे त्यांचं लक्ष जास्त असल्याचं म्हटलं.
ते पुढे गोगोई यांच्या पत्नीला उद्देशून म्हणतात, "त्यांचं लग्न ब्रिटीश महिलेसोबत झाल्यानंतर या सगळ्या घडामोडी घडल्या. या महिलेची व्यावसायिक पार्श्वभूमी आणखी अनेक शंकांना जन्म देणारी आहे."

फोटो स्रोत, ANI
याआधी सरमा यांनी एक पोस्ट शेअर केली होती.
"आयएसआयसोबत संबंध, ब्रेनवॉश करण्यासाठी आणि कट्टरपंथी बनवण्यासाठी तरुणांना पाकिस्तानी दुतावासात घेऊन जाणे, तसेच गेल्या 12 वर्षांपासून भारतीय नागरिकत्व स्विकारण्यास नकार देणे या प्रश्नांचं उत्तर मिळण्याची गरज आहे" असं सरमा यांनी म्हटलं होतं.
याआधी भाजप नेते गौरव भाटीया यांनी पीटीआयसोबत बोलताना सांगितलं होतं, "विरोधी पक्षाचे उपनेते गौरव गोगोई यांच्या पत्नी एलिझाबेथ कोलबर्न यांचे पाकिस्तान नियोजन आयोगाचे सल्लागार अली तौकीर शेख आणि आयएसआयसोबत संबंध असल्याचं आढळून आलं आहे."
"ही चिंतेची बाब असून याचा संबंध राष्ट्रीय सुरक्षेसोबत आहे. त्यामुळे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, गौरव गोगोई यांनी पाकिस्तान आणि आयएसआयसोबतच्या संबंधाबद्दल स्पष्टीकरण देतील अशी आहे."
गौरव गोगोई यांनी काय उत्तर दिलं?
भाजपकडून आरोप होत असताना गौरव गोगोई यांनी पीटीआयला बोलताना म्हटलं, "भाजपकडे आता कुठलेही मुद्दे उरलेले नाहीत. ते नेहमी खोट बोलतात."
"मला वाटतं भारतातील जनता राजकारणाबद्दल अधिक जागरूक आहे. त्यांना माहिती आहे की खोटं काय आहे. भाजपनं खोट्या गोष्टी पसरवण्याचं काम करावं आणि आम्ही आपलं काम करत राहू."
"आगामी काळात आसाममध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी आम्ही राज्याशी संबंधित मुद्दे लावून धरणार आहोत."

फोटो स्रोत, Dilip Kumar Sharma
त्यांनी याआधी एएनआयसोबतही चर्चा केली होती. "आसामच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे आरोप लावले जात आहेत."
"माझी पत्नी पाकिस्तानी आयएसआयची एजंट असेल, तर मी भारताच्या रॉ या गुप्तचर यंत्रणेचा एजंट आहे. अनेक गंभीर आरोप असलेले लोक माझ्यावर असे आरोप करत असतील, तर मला काहीही पर्वा नाही."
एलिजाबेथ कोलबर्न कोण आहेत?
गौरव गोगई यांच्या पत्नी एलिजाबेथ या संयुक्त राष्ट्र सचिवालयाच्या एका समितीत इंटर्नशीप करत असताना 2010 मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली.
एलिजाबेथ यांचं कुटुंब लंडनला असतं. या भेटीच्या तीन वर्षानंतर 2013 मध्ये नवी दिल्लीत या दोघांचं लग्न झालं.
एलिजाबेथ यांनी मार्च 2011 ते जानेवारी 2015 पर्यंत सीडीकेएन (Climage Development and Knowledge Network) सोबत काम केलं होतं.
ही संस्था गरीब आणि हवामान बदलामुळे असुरक्षित असलेल्या लोकांचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करते, अशी माहिती संस्थेच्या वेबसाईटवर दिलेली आहे.
या संस्थेसाठी एलिजाबेथ भारत, पाकिस्तान आणि नेपाळमध्ये काम करत होत्या.
हवामान बदलासंबंधी त्यांचे अनेक लेख आताही सीडीकेएनच्या वेबसाईटवर आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
एलिजाबेथ यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली असून सध्या ऑक्सफर्ड पॉलिसी मॅनेजमेंटसोबत काम करतात.
गौरव गोगोई यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात पत्नी ऑक्सफर्ड पॉलिसी मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत असल्याचं लिहिलं आहे.
सरमा इतके आक्रमक का आहेत?
आसाममध्ये गेल्या चार दशकांपासून पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार वैकुंठनाथ गोस्वामी बीबीसीसोबत बोलताना म्हणाले, "गौरव गोगोई आणि हिमंता बिस्वा यांचा वाद जुनाच आहे.
आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या तिसऱ्या कार्यकाळात आपल्याला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळेल अशी आशा सरमा यांना होती. मात्र, तरुण गोगोई यांनी 2014 मध्ये आपला मुलगा गौरव यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं.
गौरव यांना मुस्लिमांची मतं मिळू नये म्हणून मतदारसंघाची पुनरर्चना करून त्यांचा जुना मतदारसंघ कलियाबोर दुसऱ्या मतदारसंघात विलीन करण्यात आला.
पण, गौरव यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक हिंदूबहुल असलेल्या जोरहाट मतदारसंघातून लढली. त्यांनी चांगल्या मतांनी विजयी होत सरमा यांना धक्का दिला आणि आता सरमा यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ते समोर आले आहेत."

फोटो स्रोत, ANI
"भाजप सरकार फक्त आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतेय," असं आसाम विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते देवव्रत सोकिया यांनी म्हटलंय.
ते पुढे म्हणाले, "आमच्या पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचार, जमीन घोटाळा आणि सिडींकेटबद्दलचे कारनामे समोर आणले. त्यामुळे आता सरमा खासदार गोगोई यांच्यावर आरोप करून त्यांची प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
याआधीही त्यांनी असे प्रयत्न केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये जराही तथ्य असेल तर सरकार भाजपचं आहे. त्यांच्याजवळ सर्वशक्ती आहे. त्यांनी चौकशी करावी"
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











