मातीची भांडी विकणारे मुकेश प्रजापती जमिनीवरून रांगत जिल्हाधिकारी कार्यालयात का पोहोचले?

फोटो स्रोत, SCREENGRAB/X/JITUPATWARI
- Author, शुरैह नियाजी भोपाळ,
- Role, बीबीसी हिंदी
मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यातील मुकेश प्रजापती यांनी केलेल्या एका आंदोलनानं ते चर्चेचा विषय बनले आहेत. मुकेश प्रजापती (वय वर्षे 38) मातीची भांडी विकून उदरनिर्वाह चालवतात. गावात होत असलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात त्यांनी सातत्यानं तक्रारी केल्या आहेत.
अर्थात अद्यापपर्यंत त्यांच्या तक्रारींचा काहीही फायदा झालेला नाही. स्थानिक पातळीवरील जनता दरबारापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांना फक्त एकच उत्तरवजा आश्वासन मिळालं आहे. ते म्हणजे, चौकशी सुरू आहे.
प्रत्यक्षात मात्र कधीही कारवाई होताना त्यांना दिसली नाही.
अखेर कंटाळून त्यांनी गेल्या मंगळवारी (3 सप्टेंबर) एक धाडसी पाऊल उचललं. त्याचीच सध्या चर्चा होत आहे. शिवाय प्रशासनालाही आता कारवाईशिवाय पर्याय उरला नाही.
मुकेश प्रजापतींनी जनता दरबारात हजर राहण्यासाठी जाताना एक वेगळा मार्ग निवडला. त्यांनी आतापर्यंत केलेल्या तक्रारींच्या 1000 पानांचा हार तयार केला. तो हार परिधान केला.
त्यानंतर शर्ट परिधान न करता फक्त तो हार घालून न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जनता दरबारात पोहोचले. पण चालत नव्हे तर जमिनीवरून रांगत (फरफटत) ते तिथं गेले.
तिथं पोहोचल्यावर त्यांनी चक्क डोक्यावर चप्पल ठेवून न्यायाची मागणी केली.
मुकेश प्रजापती हे 200 फुटांपर्यंत जमिनीवरून रांगत गेले. पण त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा होऊ लागली. त्यातून प्रशासनावर दबाव निर्माण झाला.
अखेर जिल्हाधिकाऱ्यांना प्रजापतींनी तक्रार केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश द्यावे लागले.
मुकेश प्रजापतींच्या तक्रार करण्याच्या या अनोख्या मार्गानंतर नीमचचे जिल्हाधिकारी (डीएम) हिमांशू चंद्रा यांनी एक चौकशी समिती स्थापन केली आहे. ही समिती तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे.
शेवटच्या प्रयत्नाला यश
मुकेश प्रजापती नीमच जिल्ह्यातील काकरिया तलाई गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या गावात मागील नऊ वर्षांपासून फक्त कागदावरच विकास झाला आहे.
मुकेश प्रजापती म्हणाले की, "गेल्या सात वर्षांपासून मी गावातील माजी सरपंच पुष्पाबाई मेघवाल आणि त्यांचे पती गोविंदराम गंधवाल यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची तक्रार करत आहे. 2015 ते 2022 यादरम्यान पुष्पाबाई सरपंच होत्या."
"त्यांनी त्यावेळी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. या भ्रष्टाचाराविरोधात मी सगळ्याप्रकारे तक्रार केली. पण, त्याचा काहीही परिणाम झाला नाही."
ते पुढे म्हणाले की, "त्यामुळं मी शेवटचा प्रयत्न करायचा ठरवलं. त्यानंतरही काही झालं नाही तर सगळं कायमचं विसरून जायचं, असं मी ठरवलं होतं."
मात्र, आता मला न्याय मिळेल अशी आशा आहे. यानंतर मी अधिकाऱ्यांसोबत फिरलो. कारण जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी तक्रारदारालाही सोबत ठेवावं, अशा सूचना दिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.
दुसरीकडं माजी सरपंचांचे पती गोविंदराम गंधवाल यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. "पत्नीनं कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. प्रशासन चौकशी करत असून त्यातून सर्व समोर येईल," असंही त्यांनी म्हटलं.
हिमांशू चंद्रा नीमचचे जिल्हाधिकारी आहेत. ते म्हणाले, "तक्रारदाराकडून आम्हाला गावातील अतिक्रमण आणि इतर प्रकरणांसंदर्भातील तक्रारी मिळाल्या आहेत. यासंदर्भात तीन सदस्यांची एक समिती तयार करण्यात आली आहे."
"समितीचे सदस्य प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर अहवाल सादर करणार आहेत. त्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल," असंही त्यांनी सांगितलं.
गावातील भ्रष्टाचाराचा प्रश्न
मुकेश यांचं गाव मध्य प्रदेशच्या सीमेवरचं शेवटचं गाव आहे. या गावापासून एक किलोमीटर अंतरावर राजस्थानची सीमा सुरू होते.
मुकेश मातीची भांडी विकत आणून राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमधील जवळच्या गावांमध्ये त्यांची विक्री करतात. त्यातून दररोज 300-400 रुपयांची कमाई ते करतात.

फोटो स्रोत, SHURAIHNIAZI
मुकेश यांना दोन मुलं आहे. दोन्ही मुलं अभ्यासात हुशार आहेत. नीमचच्या सरकारी शाळेत ही मुलं शिकत असून शाळेच्याच वसतीगृहात राहतात.
अडीच ते तीन हजार लोकसंख्या असलेलं मुकेश यांचं गाव सर्वात मागासलेल्या गावांपैकी एक असल्याचा त्यांचा दावा आहे. स्थानिक भ्रष्टाचारामुळं गाव जास्त मागासलेलं राहिल्याचंही ते म्हणाले.


पण गावातून ते एकटेच भ्रष्टाचाराविरोधात तक्रारी का करत आहेत? असा प्रश्न त्यांना विचारला.
यावर ते म्हणाले की, "सरकारकडून गावासाठी येणारा पैसा सर्वसामान्य लोकांचा असतो. त्या पैशाचा योग्य वापर व्हावा असं मला वाटतं. त्यामुळंच मी या भ्रष्टाचाराविरोधात उभा राहिलो आहे."
"गावच्या सरपंच आणि त्यांच्या पतीनं गावातील एक संपूर्ण तलावच नष्ट केला आहे. त्या तलावातील 35-40 लाख रुपये किंमतीची माती त्यांनी विकली आहे," असा आरोपही त्यांनी केला.
तसंच गावात कोणतेही गटार, रस्ता असे काम झालेलं नसल्याचं ते म्हणाले. पण कागदावर सर्व विकास झालेला आहे, त्यामुळं याला विरोध करण्यासाठी मी तक्रारी केल्या असं त्यांनी सांगितलं.
गावातील दुसऱ्या एका गावकऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, "गावात प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करण्यात आला आहे. पण, प्रत्येक जण मुकेश प्रजापती यांच्याप्रमाणं याविरोधात उभा राहू शकत नाही. इथं अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं," असंही ते म्हणाले.
भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं
मध्य प्रदेशातील या प्रकारचं हे काही पहिलंच प्रकरण नाही. याआधी जुलै महिन्यात मंदसौरमध्येही एक वृद्ध शेतकरी लोटांगण घालतच जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. त्यांच्या जमिनीवर भू-माफियानं कब्जा केला होता.
त्या शेतकऱ्याच्या कृतीनंतर प्रशासनानं कारवाई सुरू केली होती.
दरम्यान, मुकेश प्रजापती यांचं हे प्रकरण समोर आल्यानंतर राजकारणही तापलं आहे.

फोटो स्रोत, SHURAIHNIAZI
मध्य प्रदेशातील मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसते प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी एक्सवरील(जुनं ट्विटर) पोस्टमध्ये लिहिलं की, "नरेंद्र मोदीजी, हे आपल्या 'नव्या भारता'चं चित्रं आहे!
"लाडली बहना योजना आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या नावावर तुम्ही राज्यातील जनतेकडे मतं मागितली होती. मात्र मध्य प्रदेश या भ्रष्ट सरकारच्या ताब्यात देण्यात आलं आहे."
"आज राज्यातील प्रत्येक क्षेत्रात आणि विभागात माफिया आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचं वर्चस्वं आहे. त्यांच्या वाढत्या दहशतीमुळं न्याय मिळवण्यासाठी मध्य प्रदेशातील जनतेला रांगण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. कृपया नीमचमध्ये झालेल्या घटनेची चौकशी करा," असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











