'मुस्लिम महिला जास्त मुलं जन्माला घालतात,' हेमंत बिस्वा सरमा यांचं हे विधान किती योग्य?

फोटो स्रोत, ANI
- Author, नासिरुद्दीन
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
गेल्या आठवड्यात एका पत्रकार परिषदेत बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी अल्पसंख्याकांची लोकसंख्या, कुटुंब नियोजन, लोकसंख्येशी निगडीत अडचणी, याबद्दलची काही विधानं केली.
ही विधानं होती,
- 'लोकसंख्येचा स्फोट' रोखण्यासाठी अनिवासी मुस्लिमांनी कुटुंब नियोजनाचे मार्ग अवलंबवावेत, कुटुंब लहान कसं राहिल याकडे लक्ष द्यावं.
- लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर एक दिवस कामाख्या मंदिराच्या जमिनीवरही कब्जा केला जाईल.
- अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या सोबत मिळून आम्हाला वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणायचं आहे.
- गरिबी आणि अतिक्रमणासारख्या सामाजिक अडचणी वाढत्या लोकसंख्येतून निर्माण होतात.
- या मुद्द्यावर आम्हाला बदरुद्दीन अजमल यांचा AIUDF पक्ष आणि ऑस आसाम मायनॉरिटी स्टुडंट्स युनियन (AAMSU) सोबम मिळून काम करायची इच्छा आहे.
मुस्लिम लोकसंख्येबद्दल असे दावे अनेकदा केले जातात. आसामाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानामध्ये कितपत तथ्य आहे, ते तपासून पाहूयात.
मुसलमान महिला जास्त मुलं जन्माला घालतात का?
त्यासाठी मुळात प्रश्न असा आहे की आसाममध्ये खरंच मुस्लिम लोकसंख्या वाढतेय का?
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS) ने गेल्या तीन दशकांत केलेल्या 5 पाहण्यांचे अहवाल यासाठीचा महत्त्वाचा पुरावा आहे. यावरून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजतात.
या अहवालांनुसार आसामातला प्रजनन दर हा देशाच्या सरासरी दराच्या जवळपास सारखाच आहे.

फोटो स्रोत, Hafiz Ahmed/Anadolu Agency via Getty Images
एखाद्या लोकसंख्येतील 15 ते 49 वयोगटातील कोणतीही महिला सरासरी किती मुलं जन्माला घालते हे सांगणाऱ्या दराला 'प्रजनन दर' म्हणतात. 2005-06 साली राष्ट्रीय प्रजनन दर 2.7 होता, तर आसामसाठीचा प्रजनन दर 2.4 होता. ताज्या अहवालानुसार आसाममध्ये हा प्रजनन दर 1.87वर आलेला आहे.
प्रजनन दर 2.1 वर आणण्याचं उद्दिष्टं ठेवण्यात आलं असून आसामात हा प्रजनन दर 2.1 च्या उद्दिष्टाच्याही खाली आलेला आहे. म्हणजेच लोकसंख्येची वाढ स्थिरावण्याच्या दृष्टीने आसाम प्रवास करत असल्याचं यावरून दिसतं.
मुसलमानांमध्ये झपाट्याने घटणारा प्रजनन दर
आसाममधल्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास एक तृतीयांश मुस्लिम लोकसंख्या आहे. मग या राज्यात प्रजनन आटोक्यात आणण्यात यश कसं मिळालं? हे फक्त बिगर मुस्लिम लोकसंख्येमुळे घडलंय का? असं नसल्याचं जाणकार सांगतात.
ही आकडेवारी पाहूयात.
गेल्या तीन दशकांमध्ये आसामचा एकूण प्रजनन दर जवळपास अर्ध्याने कमी झालाय. 1992-93 साली 3.53 वर असणारा दर NFHS च्या ताज्या अहवालानुसार 2019-20मध्ये 1.87 वर आलेला आहे.

इतर धर्मांच्या समाजापेक्षा मुस्लिमांचा प्रजनन दर जास्त आहे, ही गोष्ट खरी असली तरी हा दरही झपाट्याने कमी होतोय.
आसाममध्ये 15 वर्षांत हिंदूंचा प्रजनन दर 0.36 ने कमी होऊन 2 वरून 1.59 वर आला. तर मुस्लिमांसाठीचा प्रजनन दर सव्वा अंकांनी घटून 3.64 वरून 2.38वर आला. 2.1 च्या प्रजनन दरात आणि या 2.38 च्या दरामध्ये अगदी किरकोळ अंतर आहे.
NFHS च्या ताज्या अहवालानसुरा आसामात ख्रिश्चन समाजाचा प्रजनन दर सगळ्यात कमी आहे. त्या खालोखाल अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातींचा आहे. त्यानंतर हिंदू आणि मुस्लिम आहेत.
मुस्लिम मुलं जन्माला घालण्यावर भर देत नसल्याचं या घटणाऱ्या प्रजनन दरावरून दिसतं.
शिक्षण आणि मुलं जन्माला घालणं
काहीही असलं तरी शेवटी इतरांपेक्षा मुस्लिमांचा प्रजनन दर जास्त असल्याचं म्हणणारे म्हणतीलच. हे खरं असलं, तरी याचा इतर अनेक गोष्टींशी संबंध आहे.
यातली एक गोष्ट म्हणजे शिक्षण आणि दुसरी म्हणजे मुस्लिमांची आर्थिक परिस्थिती. इतर धर्मियांपेक्षा मुसलमान याबाबतींत मागास आहेत.
प्रजनन दर वाढणं किंवा कमी होणं याचा थेट संबंध महिलांच्या शिक्षणाशी आहे. NFHS ने आपल्या अहवालात याकडे खास लक्ष वेधून घेतलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
12वी पास असणाऱ्या महिलांना कधीही शाळेत जाऊ न शकलेल्या महिलांच्या तुलनेत कमी मुलं असल्याचं निरीक्षण NFHS -5 ने नोंदवलं आहे.
म्हणजेच जर एखाद्या समाजात सुशिक्षित लोकांची विशेषतः सुशिक्षित महिलांची संख्या कमी असेल तर त्या समाजाचा प्रजनन दर जास्त असू शकतो.
2011च्या जनगणनेवरून काही गोष्टी जाणून घेऊयात.
2011सालच्या जनगणनेनुसार आसामातल्या हिंदूंमधला साक्षरता दर 77.67 टक्के आहे. तर दुसरीकडे मुस्लिमांमधील साक्षरता दर 61.92 टक्के आहे. म्हणजे साक्षरतेच्या बाबतीत दोन्ही समाजांमध्ये 15.75 टक्क्यांचा मोठा फरक आहे. इतकंच नाही तर आसामातल्या इतर धर्माच्या समाजांपेक्षा मुस्लिमांमधली साक्षरता कमी आहे.
आसामातल्या मुस्लिम कुटुंबांमध्ये नियोजन पर्यायांचा वापर किती आहे?
चांगलं शिक्षण, आर्थिक परिस्थिती यासगळ्यासोबतच कुटुंब नियोजनाच्या उपायांविषयीची माहिती असण्याशीही प्रजनन दराचा संबंध आहे. ही साधनं सहजपणे उपलब्ध होणं आणि त्यांचा वापर करता येणं महत्त्वाचं आहे.
मुस्लिम कुटुंबं ही कुटुंब नियोजनासाठीच्या पर्यायांचा वापर करत नाही, असं सर्वसाधारण समज आहे. याविषयी लोकांची वेगवेगळी मतं आहेत. आसाममध्ये याबद्दलही वेगळी परिस्थिती दिसते.
2005-06 च्या NFH सर्वेक्षणानुसार आसाममध्ये गर्भरोधकांच्या वापराचं प्रमाण जवळपास राष्ट्रीय सरासरीइतकंच होतं. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर हा दर 56% होता, तर आसाममध्ये 57%.
चौथ्या पाहणीच्या तुलनेत पाचवण्या पाहणीदरम्यान गर्भरोधकांचा वापर वाढला. इतकंच नाही तर या वापराच्या बाबत आसामातल्या शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये फारसा फरक नव्हता.

फोटो स्रोत, EPA
पाचव्या पाहणीनुसार आसामात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, अनुसूचित जाती आणि जमातींच्या दरम्यान गर्भरोधकांच्या वापराच्या प्रमाणात फारसं अंतर नव्हतं.
प्रत्यक्षामध्ये मुस्लिम समाज (60.1) हा हिंदुंच्या (61.1) फक्त एक टक्के मागे आहे. आणि ख्रिश्चन आणि अनुसूचित जाती-जमातीमध्ये गर्भरोधकांच्या वापराचं प्रमाण हिंदूंपेक्षा जास्त आहे.
आणि जर तिसऱ्या आणि पाचव्या पाहणीतली 15 वर्षं पाहिली तर कुटुंब नियोजनाचे पर्याय वापरण्याच्या हिंदूंच्या प्रमाणात काहीशी घट झाली आहे. तर दुसरीकडे मुस्लिमांमध्ये या वापराचं प्रमाण 14 टक्क्यांनी वाढलंय.
तिसऱ्या पहाणीच्या वेळी हिंदूंमध्ये गर्भरोधकांच्या वापराचं प्रमाण 63.3 टक्के होतं, तर मुस्लिमांमध्ये 46.1 टक्के.
कुटुंब नियोजनाच्या पर्यायांच्या वापराचं मुस्लिमांमधलं प्रमाण वाढून आता 60 टक्के झालेलं आहे.
गर्भधारणा रोखण्याच्या आधुनिक पर्यायांचा वाढता वापर
मुस्लिम समाजाकडून गर्भधारणा रोखण्यासाठीच्या आधुनिक पर्यायांचाही सर्वाधिक वापर होत असल्याचं या पाहणीत आढळतंय.
गेल्या 25 वर्षांत हे प्रमाण जवळपास साडेतीन पटींनी वाढलेलं आहे. दुसऱ्या पाहणीदरम्यान आधुनिक पर्याय वापरणाऱ्या मुस्लिमांचं प्रमाण फक्त 14.9 टक्के होतं.
तर NFHSच्या पाचव्या पाहणीनुसार हे प्रमाण 34.7 टक्के वाढून 49.5 टक्के झालेलं आहे.

दुसरीकडे हिंदूंमध्ये आधुनिक पर्याय वापरणाऱ्यांचं प्रमाण 33 टक्क्यांवरून 42.8 टक्के झालंय.
आधुनिक पर्यायांच्या वापरामध्ये आसामात मुस्लिम समाज इतरांपेक्षा आघाडीवर आहे.
गर्भधारणा रोखण्याचे आधुनिक पर्याय विरुद्ध पारंपरिक पर्याय
गर्भधारणा रोख्यण्यासाठीचे पारंपरिक पर्याय वापरण्याकडे आसाममधल्या लोकांचा कल असल्याचं NFHSच्या सुरुवातीच्या पाहणीपासून आढळलंय.
भारतातल्या इतर राज्यांच्या तुलनेत आसामध्ये पारंपरिक पर्यायांचा जास्त वापर होत असल्याचं NFHS च्या तिसऱ्या पाहणीत आढळलं होतं.

अद्याप न सांगण्यात आलेलं आसामचं वैशिष्ट्यं
NFHS - 5 च्या आतापर्यंत आलेल्या अहवालांनुसार आसाममध्ये
- मुस्लिमांचा प्रजनन दर दरवर्षी सातत्याने तेजीने कमी होतोय. प्रजनन दरातली ही घसरण इतर समाजांपेक्षा जास्त आहे.
- साक्षरता दर इतरांपेक्षा बराच कमी असूनही आसामातल्या मुस्लिमांचा प्रजनन दर इतरांच्या तुलनेत फार जास्त नाही. इतकंच नाही, तर हा दर सातत्याने कमी होतोय.
- मुस्लिम कुटुंब नियोजनाची साधनं वापरत नाहीत, असे मुस्लिमांबाबत पसरवण्यात आलेले समज आसाममध्ये खोटे ठरतात. उलट या धर्माच्या समाजात आधुनिक गर्भरोधकांचा वापर सगळ्यात जास्त होत असल्याचं आकडेवारी सांगते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








