पंतप्रधान मोदींनी ज्या ब्रुनेईचा दौरा केला, तो देश नेमका आहे तरी कसा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परराष्ट्र दौऱ्यावर आहेत. 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबरला त्यांनी ब्रुनेईचा दौरा पूर्ण केला आणि आता ते सिंगापूर येथे आहेत.
ब्रुनेई हा नेमका कोणता देश आहे, तेथील संस्कृती कशी आहे याविषयी अनेकांना कुतूहल आहे. त्यानिमित्ताने हा लेख.
ब्रुनेई हा आशिया खंडातील छोटाशा देश आहे. या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.
काल (3 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रुनेईतील ऐतिहासिक अली सैफुद्दीन मशीदला देखील भेट दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यात भारत आणि ब्रुनेई या दोन्ही देशांमधील हिंद महासागरातील भागीदारी, व्यापार वाढवण्यावर देखील चर्चा झाली आहे.
या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत ब्रुनेईचे धार्मिक बाबींचे मंत्री पेहिन डाटो उस्ताज हाजी अवांग बदरुद्दीन यांनी केलं.
पंतप्रधान मोदींनी ब्रुनेईत वास्तव्यास असणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांची देखील भेट घेतली.
ब्रुनेई - भारत संबंध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या मशिदीला भेट दिली, तिचं नाव ब्रुनेईचे 28 वे सुलतान उमर अली सैफुद्दीन-तृतीय यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. या मशिदीचं बांधकाम 1958 मध्ये पूर्ण झालं होतं.
याशिवाय ब्रुनेईतील भारतीय उच्चायुक्ताच्या नव्या परिसराचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.
ब्रुनेईत राहणारे भारतीय लोक या दोन्ही देशांना जोडणाऱ्या एका पुलाची भूमिका पार पाडत असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

फोटो स्रोत, PMO INDIA
1920 च्या दशकात कच्च्या तेलाच्या शोधात पहिल्यांदा भारतीय लोक ब्रुनेईत पोहोचले होते. जवळपास साडे चार लाख लोकसंख्या असलेल्या या देशात आज 14 हजार भारतीय राहतात.
ब्रुनेईतील शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात भारतीयांना महत्त्वाचं योगदान दिल्याचं मानलं जातं.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयानुसार भारत आणि ब्रुनेईमध्ये जवळपास 25 कोटी डॉलरचा व्यापार होतो. यामध्ये सर्वात मोठा वाटा हायड्रोकार्बन म्हणजे खनिज तेलाचा आहे.
ब्रुनेई एक मुस्लीम देश आहे. या देशाबद्दल आणखी काही गोष्टी समजून घेऊ.
ब्रुनेई: महत्त्वाच्या तारखा आणि कच्च्या तेलानं बदललं चित्र
ब्रुनेई आशिया खंडातील अतिशय छोटा देश आहे. कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर हे देश ब्रुनेईचे शेजारी आहेत.
या देशाची लोकसंख्या फक्त 4 लाख 61 हजार इतकीच आहे. यावरून हा देश किती छोटासा आहे याचा अंदाज येतो. ब्रुनेई तील दोन तृतियांश लोक मुस्लीम आहेत.
सिरी बेगावन हे बंदराचं शहर ब्रुनेईची राजधानी असून या देशात मलय भाषा बोलली जाते.
बोर्नियो बेटांजवळ असलेल्या ब्रुनेईत सुलतान हसनल यांचं शासन आहे.

फोटो स्रोत, Getty Images
1888 मध्ये ब्रुनेईत ब्रिटिशांची राजवट सुरू झाली होती. 1929 मध्ये इथे कच्चे तेलाच्या उत्पादनास सुरूवात झाली आणि तेव्हापासून या छोटाशा देशाचं चित्र बदलण्यास सुरुवात झाली.
कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या निर्यातीच्या जोरावर हा देश समृद्ध आणि श्रीमंत होत गेला.
दुसऱ्या महायुद्धानंतर उमर अली सैफुद्दीन-तृतीय ब्रुनेईचे सुलतान झाले. 1963 मध्ये ब्रुनेईनं फेडरेशन ऑफ मलेशियाचा भाग न राहण्याचा निर्णय घेतला.
1984 मध्ये ब्रुनेई स्वतंत्र झाला.
2014 मध्ये शरिया कायदा लागू होणारा ब्रुनेई हा आशिया खंडातील पहिला देश ठरला. त्यावेळेस अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी ब्रुनेईच्या या निर्णयावर टीका केली होती.


2019 मध्ये ब्रुनेईत एक नवा कायदा लागू करण्यात आला. या कायद्यात समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांना दगड मारून मृत्यूदंड देण्याची तरतूद करण्यात आली होती.
त्यावेळेस या कायद्यावर प्रचंड टीका झाली आणि त्यामुळे हा कायदा मागे घेण्यात आला होता.
ब्रुनेईचे सुलतान एका गुंतवणूक एजन्सी किंवा कंपनीचे देखील प्रमुख आहेत. लंडनमधील डोरचेस्टर आणि लॉस एंजेलिस मधील बेवर्ली हिल्स हॉटेल या जगातील आघाडीच्या हॉटेलचा समावेश या एजन्सीच्या पोर्टफोलिओत आहे.
ब्रुनेईची सत्ता तिथल्या शाही कुटुंबाकडे आहे. या कुटुंबाकडे प्रचंड संपत्ती आहे. या देशातील बहुतांश मलय लोकसंख्येला सर्व सरकारी सुविधा मिळतात आणि त्यांना कर देखील द्यावा लागत नाही.
कसा आहे ब्रुनेई देश?
2019 मध्ये बीबीसीचे प्रतिनिधी जोनाथन हेड यांनी ब्रुनेईचा दौरा केला होता. हा देश कसा आहे आणि इथल्या लोकांचं आयुष्य कसं आहे हे जोनाथन यांनी त्यांच्या वार्तांकनात सांगितलं होतं.
रस्त्याच्या कडेला झाडं, पायी चालण्यासाठी प्रशस्त रस्ते आणि अतिशय उत्तमरित्या नियोजनपूर्वक उभारलेली शहरं. पहिल्या नजरेत असं वाटतं की हे सिंगापूरच आहे.
ब्रुनेईतील मशिदी आलिशान आहेत. तिथे तुम्हाला अरबी भाषेत लिहिलेल्या पाट्या आणि सुलतान हसनअल बोल्किया यांचे फोटो जागोजागी दिसतात.
जगातील ज्या देशांमध्ये अजूनही राजेशाही सुरू आहे, अशा काही देशांमध्ये ब्रुनेईचा समावेश होतो. राजेशाही असल्यामुळे साहजिकच सुलतानाकडेच सर्व अधिकार, सत्ता एकवटलेली आहे.
आशिया खंडातील अनेक देशांप्रमाणे ब्रुनेई देखील आधी ब्रिटिशांची वसाहत होती. त्यानंतर 1984 पर्यंत तो एक संरक्षित देश होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रुनेईच्या सुलतानांनीच मलय मुस्लीम साम्राज्याचा विचार मांडला.

फोटो स्रोत, Getty Images
हा विचार आता ब्रुनेईच्या समाजजीवनात समरस झाला आहे. "ब्रुनेईचं सरकार याला "मलय भाषा", मलय संस्कृती-चालीरिती, इस्लामी कायदे, मूल्यव्यवस्था, शिक्षण आणि राजेशाही व्यवस्थेचं मिश्रण म्हणते. याचं पालन करणं इथं सर्वांसाठी बंधनकारक आहे."
ब्रुनेईचे सर्वच नागरिक मलय नसले तरी इथे सरकारवर टीका करण्यास किंवा वेगळा विचार मांडण्यास स्थान नाही. या देशातील 80 टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे.
स्वातंत्र्यानंतर ब्रुनेईच्या सुलतानांचा कल, देशात इस्लामच्या कडक नियमांची अंमलबजावणी करण्याकडेच राहिला आहे.
आग्नेय आशियातील इस्लामचे जाणकार आणि ब्रुनेईमधील घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवणाऱ्या डॉमिनिक म्युलर यांच्याशी 2019 मध्ये बीबीसी बोललं होतं.
म्युलर म्हणाले होते, "मागील तीन दशकांपासून सुलतान वेगानं धर्माच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. विशेषकरून 1987 मध्ये ते मक्केला गेले होते तेव्हापासून. ते अनेकदा असं म्हणाले आहेत की अल्लाहच्या इच्छेनुसार त्यांना ब्रुनेईमध्ये शरीयत लागू करायची आहे."
"सरकारी इस्लामी विद्वानांना देखील असंच वाटतं. इस्लामी नोकरशहांच्या प्रभावाला कमी लेखू नये. प्रदीर्घ काळापासून इस्लामी नोकरशहा, सुलतानांना आणि जनतेला सांगत आले आहेत की ब्रुनेईमध्ये 'अल्लाहचा कायदा' लागू करावाच लागेल," म्युलर सांगतात.
ब्रुनेईत विरोधी पक्ष नाही, प्रसार माध्यमांना स्वातंत्र्य नाही
स्वतंत्र झाल्यापासूनच ब्रुनेईत विरोधी पक्षांना परवानगी देण्यात आलेली नाही. देशात कोणताही प्रभावी नागरी समुदाय किंवा संस्था नाही.
1962 मध्ये जाहीर केलेलं आणीबाणीचं शासन अजूनही ब्रुनेईत सुरू आहे. त्यामुळे तिथे लोकांना अभिव्यक्ती स्वांतत्र्य नाही.
त्यामुळे प्रसारमाध्यमं मोकळेपणानं बातम्या छापू शकत नाहीत किंवा वार्तांकन करू शकत नाहीत. मर्यादा ओलांडणाऱ्या कार्यालयांवर टाळं देखील लागतं.

या बातम्याही वाचा :
- ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये संतापाची लाट, पंतप्रधान नेतन्याहूंनी मागितली देशाची माफी
- वेस्ट बँक काय आहे? इस्रायलने इथे हल्ला का केलाय?
- नकबा: 1948 मध्ये काय घडलं? पॅलेस्टिनी याला 'भयंकर आपत्ती' का म्हणतात?
- अनेक पिढ्यांच्या भुकेवर उत्तर शोधणारा शास्त्रज्ञ, पण त्याची ओळख ‘खुनी शास्त्रज्ञ’ अशी का बनली?

सर्वसाधारणपणे ब्रुनेईतील लोक आदरातिथ्य करणारे आणि मदत करणारे आहेत. मात्र शरीयत वर अधिकृतपणे (ऑन रेकार्ड) समोर येऊन बोलण्यास कोणीही तयार होत नाही.
या देशात समलिंगींबाबत जे कठोर कायदे, नियम आहेत त्याबद्दल तिथल्या नागरिकांना काय वाटतं?
2019 मध्ये ब्रुनेईतील एका महिलेनं बीबीसीला सांगितलं होतं की "सुलतानचे शब्द म्हणजेच कायदे आहेत. जरी मृत्यूदंडासाठी कायदा असला तरी ती शिक्षा आता दिली जाणार नाही. मात्र यामुळे प्रशासनाची समलिंगीं विरोधातील भावना कमी होणार नाही."
"हा कायदा समलिंगी महिलांवर लागू होणार नव्हता. मात्र तरीदेखील लोकांनी माझ्या लैंगिक आयुष्याबद्दल माहिती घ्यावी, ही बाब मला सुरक्षित वाटत नाही."
कच्च्या तेलाच्या व्यापाऱ्यातील नफ्यात झाली घट
कच्च्या तेलाच्या जोरावर ब्रुनेई हा देश संपन्न झाला होता. मात्र आता परिस्थिती बदलते आहे.
मागील काही वर्षांमध्ये ब्रुनेईला तोटा सहन करावा लागतो आहे. देशाची अर्थव्यवस्था सुस्तावली आहे, विकास दर घटला आहे.
ब्रुनेई सरकारच्या तोट्यात देखील वाढ झाली आहे. रोजगार ही देखील या देशातील मोठी समस्या आहे.
ब्रुनेईतील काही लोक शेजारीच वसलेल्या मलेशियात जाऊन दारू पितात, संगीत ऐकतात आणि धूम्रपान करतात.
कारण हे सर्व शौक करण्यास ब्रुनेईत बंदी आहे.
याच कारणामुळे ब्रुनेई तील नागरिक मलेशियाच्या बॉर्नियो मधील लिम्बांग शहरात जातात.
या ठिकाणी असलेल्या एका क्लब (बार) मध्ये बीबीसी ब्रुनेईच्या काही बिगर मुस्लीम नागरिकांशी बोललं. बीबीसीनं त्यांना विचारलं की शरीयतच्या नियमांमुळे अडचणी येतात का? त्रास होतो का?
त्यावर त्यांनी उत्तर दिलं की जोपर्यंत आम्हाला इथे (मलेशियातील क्लबमध्ये) येण्याची परवानगी आहे, तोपर्यंत आम्हाला ब्रुनेईत काहीही अडचण नाही.
लिम्बांग हे शहर ब्रुनेईच्या राजधानीपासून दीड तासाच्या अंतरावर आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











