ऑस्ट्रेलियात निवडणुकीच्या काळात 'पाळीव' मगरी का आल्या चर्चेत ?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, टिफनी टर्नबुल
- Role, बीबीसी न्यूज
तुमच्याकडे पाळीव प्राणी आहेत का? किंवा नसतील तर कोणते प्राणी तुम्हाला पाळायला आवडेल. कुत्रा, मांजर हेच ना. पण जर तुम्हाला असं कळलं की एखाद्याने मगर पाळली आहे तर तुमची काय प्रतिक्रिया असेल त्यावर?
ऐकण्यास हे जरी विचित्र आणि अविश्वनीय वाटत असलं तरी हे सत्य आहे.
ऑस्ट्रेलियाचा उत्तर प्रांतात ( Northern Territory- NT) आपल्याला हे बघायला मिळेल. या प्रांतात निवडणुका देखील होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये देखील पाळीव मगरींचा मुद्दा चर्चेत येत आहे.
डार्विनपासून एक किमी दक्षिण बॅचलरमध्ये ट्रेवर सुलिवन यांनी एक-दोन नव्हे चक्क 11 मगरी पाळल्या आहेत. या मगरी त्यांच्यासोबतच राहतात.
या 11 मगरींपैकी एकाचं नाव ‘बिग जॅक’ असं असून 'जॅक द बॉक्स' खेळणीवरुन हे नाव ठेवण्यात आलं आहे.


नियमांतील बदल काय आहेत?
बावीस वर्षांपूर्वी सुलिवन यांच्या मुलीच्या वाढदिवशी 'बिग जॅक'चे त्यांच्या आयुष्यात पदार्पण झाले.
तेव्हापासून या ‘बिग जॅक’ मगरीवर घरातील सगळ्यांचा जीव आहे.
सुलिवन त्यांच्या 80 एकरात पसरलेल्या घरात राहणाऱ्या 11 मगरींविषयी सांगतात, ‘या 11 मगरींमधील एक मगर खूप लहान आहे तर दुसरी 4.7 मीटर (15.4 फुट) लांब असून तिने बहुदा दोन विश्वयुद्धही पाहिलेत.’
मोठ्या मगरीने एका माणसाला ठार केल्याचाही दावा सुलिवन करतात. तिचा वापर वैज्ञानिक संशोधनातही करण्यात आला आहे.
सुलिवन यांच्या घराचा भाग होण्यापूर्वी ती मगर एका क्रोकोडाइल पार्कमध्ये होती, जेथे भांडणात या महाकाय मगरीचा खालच्या जबड्याचा अर्धा भाग तुटून पडला होता. तर एकदा विषबाधेमुळे ती मगर मरणासन्न अवस्थेत पोहोचली होती.

आपल्या पाळीव मगरींविषयी बीबीसीशी बोलताना 60 वर्षिय सुलियन आनंदाने सांगतात की, मगर हा प्राणी, पाळीव प्राण्यांमधील 'हार्ले डेव्हिडसन' आहे असं समजावं.
मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाळीव प्राण्यांचा मुद्दा शनिवारपासून (24 ऑगस्ट) प्रामुख्याने समोर आलाय.
जनसामान्यांपुढे महागाई आणि गुन्हेगारीसारखे मुद्दे आहेच त्यात सुलिवनसारख्यांसाठी घरातील पाळीव प्राण्यांवरून उपस्थित होणारा मुद्दा हा जिकरीचा आहे. त्यातच सत्ताधारी लेबर पक्षाकडून मगरींना घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवण्यास बंदी घालण्याची चर्चा केली आहे.
ऑस्ट्रेलियातील उत्तर प्रांत काही शेवटच्या स्थानांपैकी एक आहे जिथे मगरींना पाळीव प्राण्यांच्या रुपात ठेवण्याची परवानगी आहे. परंतु सरकारने आता मानव आणि मगर दोघांच्याही कल्याणासाठी चिंता व्यक्त केली आहे.

इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

काय आहेत नियम?
उत्तर प्रांतातील (एनटी) जवळपास 250,000 रहिवाशांपैकी काहींकडे पाळीव मगरी आहेत.
पर्यावरण मंत्र्यांच्या कार्याकडून सांगण्यात आले की, निवडणुकीचं वातावरण असल्याने ते याबाबत ठराविक आकडा सांगू शकत नाहीत. मात्र, पूर्वीच्या अंदाजानुसार परमिटधारकांची संख्या शंभरच्या आसपास ठेवण्यात आली आहे.
अशा अनेक मगरींचे एकतर जन्मापासूनच पालनपोषण करण्यात येते किंवा शेत किंवा जंगलात अडचणी उत्पन्न झाल्यानंतर आणले जाते.
प्राण्यांना घरात कोणत्या परिस्थितीत आणि कुठं ठेवलं जाईल याबाबतही कठोर नियम बनवण्यात आले आहेत.
उदाहरणार्थ लहान असताना म्हणजे 60 से.मी. लांबीपर्यंत यांना शहरक्षेत्रात ठेवता येते. तर, एकदा ते एक वर्षाचे झाले की, त्यांना अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणे किंवा शहरी भागाबाहेर नेणे अत्यंत आवश्यक असते.

फोटो स्रोत, Tom Hayes
आधीच्या नियमांनुसार, मगरी ठेवण्यासाठी मालकांना कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची किंवा ज्ञानाची गरज नव्हती.
या भागात मगरी बाळगणे किंवा त्यांना वाचवणे ही या परिसराची खासियत असल्याचे टॉम हेस यांचे म्हणणे आहे, तर त्यामुळेच त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी या भागात येण्याचा निर्णय घेतला.
40 वर्षीय टॉम हेस आपल्या वडिलांसोबत NTच्या यात्रेदरम्यान मेरी नदीत महाकाय मगरींसोबत मासेमारी करत आणि एक दिवस स्वत:ची मगर पाळण्याचं स्वप्न पाहत मोठे झाले.
टॅटू आर्टिस्ट टॉम हेस बीबीसीला सांगतात, “मी अशा प्रकारची व्यक्ती नाही की ज्या व्यक्तीला वीकेंडला मित्रांसोबत बार्बेक्यू करायला मगर हवी असते. माझी इच्छा होती की मी या गरीब प्राण्यांना येथे आणू शकेन जेणेकरून ते त्यांचे जीवन जगू शकतील आणि लोकांच्या हाताने मरणाच्या भीतीपासून ते दूर राहू शकतील.”
हेस एका मोठ्या आकाराच्या मगरीला दत्तक घेण्याच्या तयारीतच होते की, NT सरकारने घोषणा केली की मगरींना पाळीव प्राणी म्हणून ठेवण्याचं नवीन परमीट जारी करण्यात आलेलं नाही. या आदेशाने हेस निराश झाले.
मगरींना कैदेत ठेवणं कितपत योग्य
NT पर्यावरण मंत्री केट वर्डन म्हणाले की, हा निर्णय “सार्वजनिक चर्चेनंतर आणि “वैयक्तिक सुरक्षा आणि पशू कल्याण चिंतेला लक्षात घेऊन करण्यात आला आहे.”
विद्यमान परवानग्या वैध राहतील, परंतु परवानग्यांचे हस्तांतरण करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
वर्डेन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, “अशा मोठ्या प्राण्याला कैदेत ठेवणे योग्य नाही, हे आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल.”
त्यांनी यावेळी काही मगरींनी त्यांच्या मालकांवर केलेल्या हल्ल्यांदेखील उल्लेख केला.
या नियमांमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्राणीप्रेमींचा हा मोठा विजय आहे.

फोटो स्रोत, Getty Images
वर्ल्ड ॲनिमल प्रोटेक्शनच्या ऑलिव्हिया शार्लटन यांनी असा युक्तिवाद केला की, मगरी पाळणाऱ्या काही लोकांचा हेतू चांगला असू शकतो, परंतु कोणताही वन्य प्राणी कैदेत मुक्तपणे जगू शकत नाही.
त्या आपल्या निवेदनात म्हणतात, “70 वर्षांपर्यंत जगणाऱ्या या मगरींना जंगलात जशी जागा आणि स्वातंत्र्य मिळतं तसं कैदेत मिळू शकत नाही.”
आरएसपीसीए एनटीचे चार्ल्स गिलियम म्हणाले की, मगरींच्या हिंसक प्रवृत्तीमुळे मगरींना स्वीकृत मानकांनुसार राहणीमान आणि वैज्ञकीय सेवा मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना योजनांची अंमलबजावणी करणे कठीण झाले आहे.
याबाबत ते एक उदाहरण देतात, “मी फक्त एका पशुचिकीत्सकाला ओळखतो, जो या मगरींसाठी काम करण्यास तयार आहे.”


मात्र, मगरींच्या मालकांनी सांगितलं की, त्यांना नियमांत केलेल्या या बदलांबाबत माहिती नव्हती, आणि आता त्यांच्या या पाळीव प्राण्यांचं काय होणार, या चिंतेत ते अडकले आहेत.
याबाबत हेस म्हणतात, “जरी तुम्ही त्या साडे चार मीटर लांब मगरीबरोबर सोफ्यावर बसून टीव्ही बघू शकत नसले, तरी पाळीव प्राणी म्हणून त्यांच्याबरोबर जे एक भावनिक नातं निर्माण झालं आहे त्याचं काय?”
या मुद्द्यावर, त्यांनी सरकारवर योग्य सल्लामसलत टाळण्यासाठी व्यापक मगर व्यवस्थापन योजनेतील नवीन नियम लपवल्याचा आरोप केला.
पर्यावरणविषयक बाबींवर विरोधी पक्षाचे प्रवक्ते जो हर्सी म्हणतात, “कंट्री लिबरल पार्टी परमिट सिस्टम अंतर्गत मगरींना पाळीव प्राणी म्हणून ठेवण्याच्या स्थानिकांच्या अधिकारांचे समर्थन करते आणि निवडून सत्तेत आल्यास या नियमांवर विचार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.”
सगळ्या अपेक्षा निवडणुकांवर
हेस आणि सुलिवन दोघांनीही परमिट धारकांसाठी अधिकचं प्रशिक्षण आणि आवश्यक गोष्टींसाठी व्यापक समर्थन असल्यांचं म्हटलं.
सोबतच, मगरींना पाळीव प्राणी म्हणून ठेवणं धोक्याचं असल्याच्या मुद्द्यालाही ते नाकारतात. मगरींचं पालनपोषण हे सोपं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
सुलिवन म्हणतात, “जंगलात राहताना त्यांना आपल्या जागेसाठी भांडावं लागतं. पोटासाठी शिकार करावी लागते. आपल्या शत्रुंचा सामना करावा लागतो. आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जंगलातील जीवन त्यांच्यासाठी फार कठीण आहे, येथे मगरी कैदेत जरी असल्या तरी त्यांची योग्य काळजी राखली जाते, नियमितपणे त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना दिल्या जातात.”
सुलिवन यांच्यासाठी हा निर्णय चुकीच्या वेळी आला आहे. गेल्याच वर्षी त्यांनी त्यांचं घर आणि प्राणी विक्रीसाठी सूचीबद्ध केले जेणेकरून त्यांना न्यूझीलंडमध्ये त्यांच्या जोडीदारासोबत राहता येऊ शकेल.

फोटो स्रोत, Getty Images
सूचीबद्ध करण्यामागे त्यांना अशी आशा होती की, त्यांच्यासारखी काही मुले मिळतील जे त्यांच्या वन्य प्राण्यांची योग्यरित्या काळजी घेऊ शकतील.
मात्र, या नवीन नियमांमुळे सुलिवन विचित्र स्थितीत अडकले आहेत. त्यांच्याकडे 80 एकर जमीन आणि 11 मगरी तर आहेत मात्र त्यांच्या स्थलांतरासाठी सुलिवन यांच्याकडे परवानगी नाही.
यावर सुलिवन म्हणतात, मी आपल्या मगरींना इच्छामृत्यू देणार नाही, “जोपर्यंत नियम बदलत नाहीत तोपर्यंत मी येथेच राहणार आहे.”
सुलिवन यांच्या सगळ्या अपेक्षा स्थानिक निवडणुकांवर अवलंबून आहेत. या मुद्दा त्यांना प्रभावित करेल असे सुलिवन यांना वाटते.
मात्र, हेस यांना असं वाटत नाही. ते म्हणतात की, निवडणुकीतील असे अनेक मुद्दे आहेत ज्यांच्या आधारे मतांचा निर्णय व्हायला हवा.
मात्र, त्यांना अशी अपेक्षा आहे की, एक दिवस दोन्ही पक्षांना कळेल की हा सगळा प्रकार त्यांच्या जीवनावर करण्यात आलेला हल्ला आहे. आणि यात बदल घडून येईल याबाबत ते आशावादी आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











