एका छोट्या कॅप्सूलची दहशत... जवळून जाणंही बेतू शकतं जीवावर...

मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियात एक छोटी रेडिओ अॅक्टिव्ह (किरणोत्सारी) कॅप्सूल गायब झाल्याने खळबळ उडाली होती. बरीच शोधाशोध करून हरवलेली ही कॅप्सूल सापडली.
ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, "आपत्कालीन कर्मचाऱ्यांना ही कॅप्सूल भूशाच्या ढिगाऱ्यात सापडली."
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना , 1400 किलोमीटरच्या प्रवासात ही कॅप्सूल गायब झाली होती.
कॅप्सूल गायब झाल्यावर एकच खळबळ उडाली. त्यानंतर शोधमोहीम सुरू झाली.
ही कॅप्सूल अत्यंत धोकादायक असून रिओ टिंटो नावाच्या खाण कंपनीकडून गहाळ झाली होती. याबाबत कंपनीने माफी देखील मागितली आहे.
कॅप्सूलचा आकार किती होता?
8 मिलीमीटर लांब आणि 6 मिलीमीटर रुंद असणाऱ्या या कॅप्सूलमध्ये सीजियम-137 हे रेडीओऍक्टिव्ह मुलद्रव्यं होतं. याच्या संपर्कात आल्याबरोबर त्वचेची जळजळ आणि इतर गंभीर आजार उद्भवू शकतात.
त्यामुळे या कॅप्सूलचा शोध घेण्यासाठी आपत्कालीन सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विशेष उपकरणांचा वापर केला.

फोटो स्रोत, Reuters
बुधवारी शोधाशोध सुरू झाली होती.
ताशी 70 किलोमीटर स्पीडने जाणाऱ्या गाडीत विशेष उपकरणं बसविण्यात आली होती. या गाडीने कॅप्सूलचं रेडिएशन डिटेक्ट केलं.
रस्त्यापासून दोन मीटर अंतरावर ही कॅप्सूल पडली असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.
ऑस्ट्रेलियन सैन्याच्या वतीने या कॅप्सूलची तपासणी सुरू असून ही कॅप्सूल आता पर्थमधील सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आलीय.
पश्चिम ऑस्ट्रेलियातील किम्बर्ली येथील खाणीत ही कॅप्सूल ठेवण्यात आली होती. वाहतुकीदरम्यान ही कॅप्सूल गहाळ झाली असली तरी यामागे नेमकी काय कारणं होती याची चौकशी करणार असल्याचं कंपनीने म्हटलंय.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे मुख्य आरोग्य अधिकारी अँड्र्यू रॉबर्टसन सांगतात की, "या कॅप्सूलच्या आसपास असणं म्हणजे एका तासात तुमच्या शरीराचे 10 एक्सरे काढण्याइतकं गंभीर असतं."

या परिसरात सापडली कॅप्सूल...
कॅप्सूलचा शोध घेण्यासाठी 1350 किलोमीटरच्या परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.
वाळवंट असलेल्या या भागात लोकवस्ती विरळ आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील पाचपैकी एक व्यक्ती पर्थ शहराबाहेर राहतो यावरूनच इथल्या लोकसंख्येचा अंदाज येतो.
ही कॅप्सूल खाणकाम करणाऱ्या कंपनीच्या ट्रकमधून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येणार होती. ही कॅप्सूल 12 जानेवारीला मूळ ठिकाणावरून हलवून पर्थ शहरातील स्टोरेज फॅसिलीटी सेंटरमध्ये पाठवली जाणार होती.
25 जानेवारीला या कॅप्सूलचा बॉक्स टेस्टिंगसाठी उघडण्यात आला तेव्हा त्याची मोडतोड झाल्याचं आढळून आलं. शिवाय त्यातली रेडिओएक्टिव्ह कॅप्सूलही गायब होती. ज्या बॉक्समध्ये ही कॅप्सूल ठेवण्यात आली होती त्याचे चार नटबोल्ट ही गायब होते.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रांझिट दरम्यान बसलेल्या धक्क्यांमुळे नट बोल्ट सैल झाले असावेत आणि जो गॅप तयार झाला होता त्यातून कॅप्सूल बाहेर पडली असावी असं अधिकऱ्यांचं म्हणणं आहे.
रिओ टिंटो ही खाण कंपनी आपली प्रतिष्ठा सुधारण्याच्या प्रयत्नात असतानाच हा प्रकार घडला.
2020 मध्ये ही कंपनी वादात सापडली होती. लोखंडाचं मायनिंग करण्यासाठी या कंपनीने ऑस्ट्रेलियातील जुकान गॉर्ज भागातील 46,000 वर्ष जुन्या गुहा सुरुंग लावून उडवल्या होत्या. त्यानंतर जो वाद निर्माण झाला होता यात कंपनीच्या बऱ्याचशा अधिकऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या.
शिवाय मागच्या वर्षी कंपनीची संसदीय चौकशी झाली होती, यात कंपनीमध्ये लैंगिक छळाच्या अनेक घटना घडल्याचं उघड झालं होतं.
कंपनीतल्या 20 महिलांना बलात्कार आणि लैंगिक छळाच्या घटनांना सामोरं जावं लागलं असल्याची माहिती कंपनीच्या इंटर्नल रिव्हूमधून समोर आली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








