अनेक पिढ्यांच्या भुकेवर उत्तर शोधणारा शास्त्रज्ञ, पण त्याची ओळख ‘खुनी शास्त्रज्ञ’ अशी का बनली?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
लहानपणी शाळेच्या परीक्षेत एक निबंध लिहायला यायचा. विज्ञान शाप की वरदान? हा विषय शब्दशः जगणारा एक माणूस.
इतिहास या माणसाला फक्त काळ्या किंवा पांढऱ्या रंगात रंगवू शकत नाही. कोणाच्या कुटुंबासाठी तो कर्दनकाळ होता तर कोणाच्या सात पिढ्यांचं आयुष्य त्याने वाचवलं.
या माणसाच्या एका शोधामुळे लाखो लोकांचे जीव गेले पण कोट्यवधी लोकांचे जीव वाचलेही.
कोण होता हा शास्त्रज्ञ, आणि असं काय केलं त्याने ही त्याची गोष्ट.
त्याचं नाव होतं फ्रिट्झ हाबर.
असं म्हणतात की आज जगात जिवंत असलेल्या दर पाचपैकी दोन माणसांचं आयुष्य या माणसाने दिलेलं आहे. पण त्याला ‘खूनी’ असं पण म्हटलं जातं.
अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांनी रासायनिक खतांचा शोध लावला आणि रासायनिक वायूंचाही. पण सोपं नसतं काही. या दोन्ही शोधांनी जगात उलथापालथ माजवली.
देशप्रेम सिद्ध करण्याच्या भावनेने ग्रासलेलं लहानपण
फ्रिट्झ हे एक जर्मन शास्त्रज्ञ होते. ते जन्माने ज्यू असले तरी नंतर त्यांनी धर्मपरिवर्तन केलं आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारला.
त्यांचा जन्म 1868 साली ब्रेस्लाऊ शहरात झाला. हे शहर आता पोलंडमध्ये आहे पण तेव्हा हे शहर प्रशिया साम्राज्याचा भाग होतं.
बीबीसीच्या फोरम कार्यक्रमात अमेरिकन पत्रकार आणि आणि ‘मास्टर माईंड, द राईझ अँड फॉल ऑफ फ्रिट्झ हार्बर’ या पुस्तकाचे लेखक डॅन चार्ल्स म्हणतात, “त्याचा जन्म झाला त्यानंतर काही आठवड्यातच त्याची आई गेली. त्याच्या आत्यांनी त्याला लहानाचं मोठं केलं. बायको गेल्याच्या दुःखात त्याच्या वडिलांनी लहानग्या फ्रिट्झकडे दुर्लक्ष केलं.”
फ्रिट्झ सात वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि नंतर त्याला तीन सावत्र बहिणीही झाल्या.
फ्रीट्झचे त्याच्या सावत्र आईशी चांगले संबंध होते पण वडिलांशी दुरावा कायमच राहिला.
डॅन म्हणतात, “त्या दोघांचे स्वभाव अगदी विरुद्ध होते. फ्रिट्झचे वडील चाकोरबद्ध आयुष्य जगणारे होते तर फ्रिट्झ स्वतः जगावेगळं आयुष्य जगू पाहाणारा होता. त्याच्या वडिलांचं म्हणणं होतं की त्याने घराचा व्यवसाय सांभाळावा, पण त्याला रसायनशास्त्रात रस होता. या मतभेदांनंतर त्याने घर सोडलं.”
फ्रिट्झ यांची जडणघडण समजून घ्यायची असेल तर त्याकाळच्या जर्मनीचा अभ्यास करावा लागेल. एकोणिसाव्या शतकात जर्मनी असा एक देश नव्हता. प्रशिया साम्राज्याची वेगवेगळी संस्थानं होती आणि त्यांच्यात सतत युद्ध चालायची.
1871 साली झालेल्या युद्धाने प्रशिया साम्राज्याचा अंत झाला. वेगवेगळी संस्थान खालसा होऊन जर्मनी हे राष्ट्र तयार झालं.
त्यावेळी फ्रिट्झ तीन वर्षांचे होते. पण राष्ट्र ही संकल्पना उदयाला आल्याने राष्ट्रवाद ही भावना बळकट व्हायला सुरुवात झाली.
देशप्रेम ही संकल्पना नव्याने जन्माला आली आणि या वातावरणाचा लहानग्या फ्रीट्झवर कसा परिणाम झाला ते पुढे येईलच.
या नव्या जर्मनीचा राजा होता कैसर विल्यम. त्याला कळलं होतं की आर्थिक आघाड्यांवर ब्रिटन, फ्रान्स आणि रशियाच्या तुलनेत जर्मनी मागे आहे. त्यामुळे त्याने वैज्ञानिक संशोधनाला तसंच त्या संशोधनाचा उद्योगात वापर करण्याला पाठबळ दिलं.
नव्या जर्मनीत विज्ञान नवं चलन बनलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचवेळी आणखी एक बदल घडत होता – ज्यू धर्मियांविरोधात जर्मनीत नकारात्मक भावना तयार होत होती, ज्यूंना विरोध होत होता. हीच भावना आणखी 30-40 वर्षांनी हिटलरच्या नाझी विचारसरणीचा पाया बनणार होती.
किशोरवयीन फ्रीट्झला ब्रेस्लाऊमध्ये बांधल्यासारखं होतं होतं. तो तिथे असलेल्या आयुष्याला कंटाळला होता. त्याला आकाशाला गवसणी घालायची होती.
फ्रीट्झ आपल्या तरुणपणात लिहितात, “ आयुष्याच्या आणि भविष्याच्या न संपणाऱ्या महासागरात नौका हाकत असताना एकच गोष्ट दिशादर्शक असते, तुमची इच्छाशक्ती. तिला एकच मर्यादा तुमच्या वकुबाची.”
तरुण फ्रीट्झ रसायनशास्त्र शिकायला घर सोडून बर्लिनला गेला. त्याची आकांक्षा होती की एका खेडून साध्या ज्यू मुलाचं रुपांतर एका यशस्वी जर्मन नागरिकात व्हावं.
पण रसायनशास्त्र शिकणं त्याला वाटलं तेवढं सोपं नव्हतं. ते त्यालाही अवघड जात असावं, त्याने आपलं विद्यापीठ बदललं. पदवी घेतल्यानंतरची काही वर्षं तो या ना त्या उद्योगात काम करत होता, मध्येच काही दिवस त्याने आपल्या वडिलांचा व्यवसायही सांभाळायला घेतला.
पण बर्लिनमध्ये असताना फ्रीट्सला जाणवला तिथे वाढत असलेला ज्यू द्वेष. नक्की काय झालं माहीत नाही पण त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला.
या ज्यू द्वेषाने त्यांच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव टाकला, त्यांचा कायम एकच संघर्ष राहिला, जर्मन समाजात त्याला मान-मरातब, कौतुक मिळावं. मी सच्चा जर्मन आहे हे सिद्ध करण्याच्या नादात त्यांनी अनेक गोष्टी केल्या, अगदी लाखो लोकांचे प्राण घेणारा शोधही लावला.
उठसुठ कोणालाही सतत देशभक्ती सिद्ध करायला लावली की काय होतं त्याचं ज्वलंत उदाहरण.
‘खूनी’ शास्त्रज्ञ
बर्लिनच्या भिंतीवर एके ठिकाणी जर्मन भाषेत ‘खूनी’ हा शब्द लिहिला आहे. तो शब्द फ्रीट्झला उद्देशून आहे. त्यांनी लोकांचे जीव कसे वाचवले तिकडे जाण्याआधी त्यांना ‘खूनी’ का म्हणतात हे तर माहीत हवं ना.
पहिल्या महायुद्धाने जगाला काय दिलं असेल तर रासायनिक अस्त्रांचा वापर. त्याआधीही युद्धात माणसं मरत होती पण ती बंदुका, तोफगोळ्यांना बळी पडत होती.
एकाच वेळेस शेकडो लोकांना ठार करण्याची क्षमता असलेले विषारी वायू तोवर वापरात आले नव्हते. या विषारी वायुंची दाहकता एवढी होती की 1925 जिनिव्हा कराराने याचा वापर करण्यावर पूर्ण बंदी घातली गेली.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर ते अधेमधे वापरले गेले पण पहिल्या महायुद्धात ज्या प्रमाणात वापरले गेले त्या प्रमाणात कधीच नाही.
या रासायनिक अस्त्रांचे जन्मदाते होते फ्रिट्झ हार्बर.
फ्रिट्झने रसायनशास्त्रात एक नवीन पद्धत शोधून काढली होती. हीच पद्धत वापरून त्यांनी क्लोरिन वायू तयार केला. पहिल्या महायुद्धात ते जर्मनीच्या रासायनिक अस्त्र विभागाचा प्रमुख होते.
फ्रिट्सने तयार केलेल्या क्लोरिन वायूचा पहिला उपयोग 1915 साली इप्रस या बेल्जियमधल्या शहरात केला गेला. या अस्त्राची कोणतीही माहिती किंवा बचाव नसलेले 1100 सैनिक मारले गेले.
क्लोरिन वायू शरीरात गेल्यानंतर त्याचा संयोग छातीतल्या पाण्याशी होतो आणि हायड्रोक्लोरिक अॅसिड तयार होतं. हे अॅसिड शरीरातल्या पेशी नष्ट करत जातं आणि माणसाचा मृत्यू होतो. वेळेत उपचार मिळाले तरी फुफ्फुसाचे रोग आणि विकलांगता येऊ शकते.
पण लवकरच क्लोरिन वायूपासून बचाव कसा करायचा याचं तंत्र जर्मनीविरोधी सैन्यांना कळालं.
क्लोरिन हा पाण्यात विरघळणारा वायू आहे, त्यामुळे जर पाण्यात किंवा स्वतःच्या मुत्रात कपडा भिजवून त्याने नाक आणि तोंड झाकलं तर क्लोरिन तिथल्या पाण्यात विरघळतो आणि शरीरात जाऊ शकत नाही.
अशावेळेस डोळ्यांची आग होणं, उलट्या होणं, श्वास घ्यायला अडचण असे त्रास होऊ शकतात पण मृत्यू किंवा विकलांगता ओढावत नाही.
मग फ्रिट्झला गरज पडली ते दुसरा वायू तयार करण्याची. फोसेजिन हा त्यांचा पुढचा शोध होता. याचाही वापर इप्रिसमध्येच केला गेला.

फोटो स्रोत, Getty Images
फोसेजिन हा रंगविरहित वायू होता, ज्याचा वास भिजलेल्या गवतासारखा यायचा. पण वास येण्यासाठी त्याचा प्रचंड प्रमाणात वापर केला असला पाहिजे. इतर वेळी त्याचा वासही यायचा नाही. पण हा वायू अतिशय विषारी होता. तो फुफ्फुसातल्या प्रथिनांशी संयोग पावून रक्ताभिसरण थांबवायचा आणि माणसाचा मृत्यू व्हायचा.
जर्मनीनंतर फ्रान्स आणि युरोपातल्या इतर राष्ट्रांनीही फोसेजिन वापरायला सुरुवात केली.
पहिल्या महायुद्धात जवळपास 91 हजार मृत्यू या विषारी वायुंमुळे झाले.
फ्रिट्झला रासायनिक वायू अस्त्रांचा जन्मदाता म्हटलं जातं. त्यांनी आणखीही एक गोष्ट जन्माला घातली पण त्याकडे येऊच.
पहिल्या महायुद्धाच्या वेळी फ्रिट्झ कैसर विल्यमच्या संशोधन संस्थेत काम करत होते. तिथे त्यांनी क्लोरिन वायूवर प्रयोग करायला सुरुवात केली. त्यांचं म्हणणं होतं की यामुळे युद्ध लवकर संपेल.
इप्रिसमध्ये शत्रू सैन्याचे 1100 सैनिक मेल्यानंतर त्यांना जर्मन सैन्यात कॅप्टनपदी बढती देण्यात आली. ज्यादिवशी आपलं यश साजरं करायला फ्रिट्झ पार्टी करत होते त्याच दिवशी त्यांच्या पत्नीने, क्लाराने आत्महत्या केली.
तिला आपल्या नवऱ्याचं लोकांचे जीव घेणारं काम पसंत नव्हतं.
पण फ्रिट्झ सैन्यासाठी वेगवेगळी रासायनिक अस्त्र तयार करत राहिले.
युद्ध संपलं तेव्हा जर्मनी हरलं होतं. फ्रिट्झने दुसरं लग्न केलं. पण त्यांचं भविष्य अंधकारमय होतं. त्यांना 1915 साली नोबेल पुरस्कारही मिळाला होता पण त्यांना भीती होती की युद्ध गुन्ह्यांसाठी त्यांना पकडलं जाऊन त्यांच्यावर खटला चालेल.
हवेतून ब्रेड काढणारा शास्त्रज्ञ
फ्रिट्झला मिळालेला नोबेल पुरस्कार इतिहासातलं सर्वात वादग्रस्त पुरस्कार आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.
हा पुरस्कारला त्यांना मिळाला अशा एका शोधासाठी ज्यामुळे आपले वाडवडील जगले आणि आज आपण जिवंत आहोत.
एकोणिसावं शतक संपत आलं तेव्हा जगाला एका प्रचंड मोठा प्रश्न भेडसावत होता – भूक.
लोकसंख्या वाढत होती, खाणारी तोंड वाढत होती पण जमीन आहे तेवढीच होती. त्यातून जेवढं उत्पन्न येत होतं तेवढंच येणार होतं.
आता भुकेमुळे आणि अन्नासाठी युद्ध होतील अशी चिन्हं दिसायला लागली.
वनस्पतींच्या वाढीसाठी नत्र(नायट्रोजन) आवश्यक असतो हे एव्हाना सर्वाना ठाऊक झालं होतं. नायट्रोजन पृथ्वीवर मुबलक प्रमाणात आहे. वातावरणात 70 टक्क्यांहून अधिक नायट्रोजनच आहे. पण सगळ्यात मोठी समस्याही होती की तो नायट्रोजन वायू स्वरूपात आहे.
वायू नायट्रोजन स्थायू स्वरुपात आणून जमिनीत घालायचा कसा या प्रश्नाशी संशोधक कित्येक दशकं लढत होते. शेतात मेंढ्या बसवणं किंवा कोंबडीखत तयार करणं किंवा फारच झालं तर दक्षिण अमेरिकेतल्या सापडणाऱ्या नायट्रेट संयुगांची माती शेतात टाकणं यापलिकडे कोणाची धाव गेली नव्हती. पण याने खूप फरक पडत नव्हता. तिसरा पर्याय तर फारच खर्चिक होता.
यावर उत्तर शोधलं ते शोधलं फ्रिट्झ हाबर यांनी. 1909 साली त्यांनी नायट्रोजन आणि हायड्रोजनपासून अमोनिया सिंथेसाईज करण्याचं तंत्र विकसित केलं.

फोटो स्रोत, AP
कार्ल बॉश हा केमिकल इंजिनियर त्यांचा सहकारी होता. दोघांच्या कामातून हाबर-बॉश पद्धत जन्माला आली जी आजही वापरली जाते.
आज शेतात भरघोस डवरणारी पिकं दिसतात त्याचं श्रेय या दोघांना.
फ्रिट्झचं कौतुक त्यावेळी ‘हवेतून ब्रेड काढणारा’ शास्त्रज्ञ अशा शब्दात झालं होतं.
याच अमोनियाचा उपयोग नंतर रासायनिक खतांमध्ये केला गेला. रासायनिक खतांचा वापर सर्वदूर सुरू झाला. भारतातही हरित क्रांती झाली.
आपल्या पूर्वजांच्या पिढ्या उपाशी मरायच्या, त्या पोटभर जेवू लागल्या आणि पुढे त्यांनी आपल्यालाही जन्माला घातलं.
जवळपास 4 अब्ज मानवांच्या जन्माचं श्रेय फ्रिट्झला जातं. त्यांनी रासायनिक खतांचा रस्ता सुकर केला नसता तर आज पृथ्वीवर एवढी लोकसंख्याच नसती.
विसाव्या शतकातला हा सर्वात मोठा शोध होता.

फोटो स्रोत, IRRI
पण त्यांनीच रासायनिक अस्त्रांचाही मार्ग मोकळा केला. असं म्हणतात की हिटलरने लाखो ज्यूंना ठार करण्यासाठी गॅस चेंबरमध्ये जे विषारी वायू वापरले तेही फ्रिट्झच्याच संशोधनावर आधारित होते.
फ्रिट्झ यांनी आणखी काही विषारी वायू तयार केले ज्यांना पेस्टिसाईड गॅसेस असं म्हणतात. यातूनच जन्माला आली झायक्लॉन प्रोसस, ज्यामुळे एकाच वेळी हजारो माणसांना मारणं हिटलरला शक्य झालं.
हिटलरच्या छळछावणीत फ्रिट्झचेही अनेक नातलग मारले गेले. त्यांच्याच संशोधनामुळे त्यांना मृत्यू आले.
अर्थात हे पाहायला फ्रिट्झ जिवंत नव्हते.
दैवाचे फासे पहा, लाखो ज्यूंचं शिरकाण ज्या अस्त्रामुळे झालं त्याचा शोध लावणारा संशोधक जन्माने ज्यू होता.
दुःखद अखेर
पहिलं महायुद्ध जर्मनी हरलं त्याचा फटका फ्रिट्झलाही बसला. काही काळ ते या भीतीखाली जगत होता की रासायनिक वायू तयार केल्याबद्दल त्यांना शिक्षा होईल.
दुसरीकडे जर्मनीवर जेत्या राष्ट्रांनी जबर दंड बसवला होता. त्या राष्ट्राची वाताहत होत होती. दंडाचे पैसे भरण्याच्या नादात अर्थव्यवस्था डबघाईला आली म्हणण्यापेक्षा शिल्लकच राहिली नव्हती.
याच काळात फ्रिट्झने जर्मनीला कर्जातून मुक्त करण्यासाठी समुद्राच्या पाण्यापासून सोनं तयार करण्याचा प्रयोग करून पाहिला पण तोही यशस्वी झाला नाही.
ज्यू विद्वेष शिगेला पोचला होता. 1930 चं दशक उजाडलं होतं. एक उंचीने ठेंगणा माणूस जर्मन जनतेला ऐश्वर्याची आणि साम्राज्याची स्वप्न दाखवायला लागला होता. आपल्यावर ही वेळ आली ती ज्यू लोकांमुळे हे ठसवत होता. त्याचं नाव अडोल्फ हिटलर.
बीबीसी रेडियो 4 चे प्रतिनिधी ख्रिस बॉल्बी यांना फ्रिट्झची मुलगी इव्हा यांनी सांगितलं होतं, “एक काळ असा आला की ते (फ्रिट्झ) त्यांच्या विद्यापीठात गेले तर तिथल्या एका हमालाने त्याचा अपमान करून सांगितलं की चालते व्हा, इथे ज्यूंना प्रवेश नाहीये.”
त्यांनी राजीनामा दिला.
ज्या जर्मनीसाठी एवढं केलं तोच देश आपल्याला असं वागवतोय हे अपेक्षाभंगाचं आणि मानभंगाचं दुःख फ्रिट्झला सहन होणारं नव्हतं.
ज्यू द्वेष एवढा ठासून भरला जात होता की त्यात फ्रिट्झने स्वीकारलेला ख्रिश्चन धर्म, जर्मन समाजाने त्यांना आपलंस करावं म्हणून केलेले प्रयत्न, अगदी रासायनिक वायू तयार करून जर्मनीला युद्धात आघाडी मिळवून देणं हे सगळं पुसलं जात होतं.
यानंतर फ्रिट्झ काही काळ अज्ञातवासातही गेले. 1934 मध्ये त्यांचा हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला.
मानवजातीसाठी एवढा मोठा शोध लावूनही त्यांचं कार्य थोडंसं दुर्लक्षितच राहिलं. त्यांचे मित्र आणि सहकारी अल्बर्ट आईनस्टाईन जेवढे मोठे झाले, जेवढा मान त्यांना मिळाला, तेवढा फ्रिट्झ यांना मिळालाच नाही. त्यांचा वारसा कायम वादग्रस्त राहिला.
ख्रिस बॉल्बी आपल्या लेखात त्यांच्या मानसपुत्राने त्यांच्याबदद्ल केलेल्या लिखाणाचा उल्लेख करतात.
फ्रिट्झ यांचा मानसपुत्र म्हणजे इतिहासकार फ्रिट्झ स्टर्न. ते लिहितात, “हाबर यांनी केलेलं कार्य गुंतागुंतीचं आहे. ते नीट उलगडून समजून घ्यावं लागेल. त्यांनी आपलं आयुष्य विज्ञानाला वाहिलं होतं. पण आपलं देशप्रेम सतत सिद्ध करण्याच्या नादात त्यांनी युद्धात वापरल्या जाणाऱ्या विषारी वायूंचा शोध लावला. पहिला महायुद्धात या वायुंमुळे हाहाकार उडाला.”
आईनस्टाईन यांनी स्वतः फ्रिट्झबद्दल म्हटलं आहे, “जर्मन ज्यूच्या कहाणीचा दुःखान्त म्हणजे हाबर यांचं आयुष्य आहे. जर्मनीवर त्यांनी एकतर्फी प्रेम केलं.”
हेही वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता








