एल्टालेना : जे जहाज बुडाल्यामुळे इस्रायलचं अस्तित्व जगाच्या नकाशावरून पुसलं गेलं असतं

एल्टालेनावर बॉम्ब वर्षाव झाल्यानंतर जहाजाने पेट घेतला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एल्टालेनावर बॉम्ब वर्षाव झाल्यानंतर जहाजाने पेट घेतला
    • Author, पॉला रोहास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

22 जून 1948 चा दिवस होता. दुपारचे चार वाजले होते. एकाच महिन्यापूर्वी अस्तित्वात आलेल्या नव्या देशाच्या, इस्रायलच्या पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांनी एक आदेश दिला ज्यामुळे इस्रायलचं अस्तित्वच संपुष्टात आलं असतं.

पंतप्रधानांनी आदेश देताच तेल अवीवच्या किनाऱ्यावर नांगर टाकून उभ्या असलेल्या एल्टालेना जहाजावर बॉम्बवर्षाव व्हायला लागला. आग भडकली आणि काही वेळातच हे जहाज बुडालं.

तेव्हा 16 लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक लोक जखमी झाले होते. पण हे जहाज बुडाल्यामुळे नव्याने तयार झालेल्या इस्रायल देशाचं अस्तित्व जगाच्या नकाशावरून पुसलं जाणार होतं.

तेव्हा इस्रायल आपल्या शेजारी असलेल्या अरब राष्ट्रांशी संघर्ष करत होता. पण हत्यारं आणि सशस्त्र मारेकरी असलेल्या या जहाजात फक्त ज्यू लोक होती.

हा एक असा क्षण होता जेव्हा इस्रायल गृहयुद्धाच्या सीमेवर उभा होता. इस्रायलच्या इतिहासात कधीच गृहयुद्धाचे इतके गहिरे ढग दाटून आलेले नव्हते.

एल्टालेना जहाज बुडून आज 75 वर्षं झालीयेत पण ही घटना इस्रायलच्या इतिहासातलं सर्वात वादग्रस्त प्रकरण आहे. इस्रायलचे दोन संस्थापक नेते डेव्हिड बेन गुरियन आणि मेनाकेम बेगिन एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. या दोघांनीच पॅलिस्टाईनच्या भागात इस्रायल राष्ट्रासाठी लढणारे सशस्त्र बंडखोरांचं नेतृत्व केलं होतं.

या बंडखोरांच्या गटाचं नाव होतं हगानाह मिलिशिया. हे बंडखोर एका शिस्तबद्ध सैन्यात परावर्तित झाले होते. इरगुन नावाच्या दुसऱ्या सशस्त्र बंडखोरांच्या गटाला सैन्यात सहभागी करून घेण्याची प्रक्रिया चालू होती.

या जहाजाचे अवशेष अजूनही तेल अवीवच्या किनाऱ्यावर आहेत. हे अवशेष म्हणजे इस्रायलच्या काही अंतर्गत गटांमध्ये अजूनही चाललेल्या संघर्षाचं प्रतीक आहे असं काही विश्लेषकांना वाटतं.

हार्वर्ड विद्यापीठात ज्यू इतिहासाचे प्राध्यापक असलेले डेरेक पेन्सलार म्हणतात, “तेव्हा इस्रायल एका गंभीर राजकीय संकटात अडकला होता. 1948 मध्ये गृहयुद्धाचे ढग दाटू आले होते, कधीही ठिणगी पडेल अशी शक्यता होती.”

14 मे 1948 ला ‘ब्रिटिश मँडेट ऑफ पॅलेस्टाईन’ म्हणजेच पॅलेस्टाईन भागात ब्रिटिशांचं राज्य संपलं. त्याच दिवशी तेल अवीवच्या कला संग्रहालयात डेविड बेन गुरियन यांनी इस्रायलच्या जन्माची घोषणा केली.

या नव्या राष्ट्राला सशक्त आणि एकजूट सैन्याची आवश्यकता होती. त्या आधी काही दशकांदरम्यान उभा राहिलेला ज्यू बंडखोरांचा गट हगानाहचं रूपांतर इस्रायली डिफेन्स फोर्सेस म्हणजेच आयडीएफमध्ये झालं होतं. हनागाहकडे सर्वाधिक सशस्त्र बंडखोर होते.

पण पॅलिस्टाईन भागात आणखी दोन सशस्त्र बंडखोर गट होते – लेजी आणि इरगुन. यांनाही आयडीएफमध्ये सहभागी करून घ्यायचं होतं. ती प्रक्रिया सुरू होती. सुरुवातीच्या काळात हे सगळे बंडखोर गट सैन्यात असूनही आपआपले वेगवेगळे युनिट चालवत होते.

इरगुनचे नेते मेनाकेम बेगिन होते.

एक उद्देश, वेगवेगळी धोरणं

हगानाह, लेजी आणि इरगुन या तिन्ही सशस्त्र बंडखोर गटाचा उद्देश एकच होता. पॅलेस्टाईन भागात ज्यू नागरिकांना संरक्षण देणं, ब्रिटिशांना पळवून लावणं आणि या भागात स्वतंत्र ज्यू राष्ट्र निर्माण करणं. पण हे करण्याच्या त्यांच्या पद्धती फारच वेगवेगळ्या होत्या.

शेवटच्या ब्रिटिश तुकडीला निरोप देताना बेन गुरियन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेवटच्या ब्रिटिश तुकडीला निरोप देताना बेन गुरियन
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1931 मध्ये हगानाहचं विघटन झालं आणि इरगुनचा जन्म झाला. हा गट सुरुवातीपासूनच आक्रमक होता. या गटाचे बंडखोर पॅलेस्टाईन भागात राहाणारे अरब आणि ब्रिटिश दोघांच्या विरोधात लढत होते. ब्रिटनने आपल्या देशातल्या ज्यू लोकांना पॅलिस्टाईन भागात प्रवास करण्यास बंदी घातल्यापासून हा गट ब्रिटिशांच्या विरोधात अधिक सक्रिय झाला.

पेन्सलार म्हणतात, “इरगुनला ब्रिटिश सैनिक किंवा पॅलिस्टिनी नागरिकांवर हल्ला करायला अजिबात संकोच वाटत नव्हता. त्यांनी बाजारपेठांमध्ये मोठे स्फोट केले ज्यामुळे मोठ्या संख्येने लोक मारले गेले. आपण या लोकांना दहशतवादीही म्हणू शकतो. दुसरीकडे हगानाह संयमित गट होता. ते फक्त ब्रिटिशांच्या स्थावर जंगम मालमत्तांचं नुकसान करायचे.”

अर्थात नेहमी असं होत नव्हतं.

एप्रिल 1948 मध्ये इरगुन आणि लेझी या दोन्ही गटांनी एक छोटंसं गाव दायर यासीनवर हल्ला केला. हे गाव जेरुसमेलमच्या जवळच आहे. या हल्ल्यात हगानाहने त्यांना साथ दिली. पण हा हल्ला एका नरसंहारात बदलला आणि जवळपास 100 हून अधिक पॅलिस्टिनी मारले गेले.

हार्वर्डचे प्राध्यापक डेरेक पेन्सलार म्हणतात की, “हगानाहने म्हटलं होतं की आम्ही त्यांना थांबवू शकत नाही पण त्यांनी या हल्ल्याचं रणनैतिक महत्त्व समजून इरगुनला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला असेल याची दाट शक्यता आहे.”

प्राध्यापक पेन्सलार यांच्या मते लेझी गटातल्या बंडखोरांची संख्या कमी होती आणि ते लोकांच्या मनात भीती पसरवण्यासाठी सरळ ‘दहशतवादाचा’ उपयोग करायचे.

1944 मध्ये मध्यपूर्वेतले ब्रिटनचे रेसिडंट मिनिस्टर लॉर्ड मॉयने आणि 1948 साली संयुक्त राष्ट्रांचे मध्यस्थ फॉल्क बर्नोट यांच्या हत्येसाठी लेझीला जबाबदार समजलं जातं.

किंग डेविड या हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात 90 लोक मारले गेले होते. या हल्ल्यामागे इरगुनचा हात होता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किंग डेविड या हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात 90 लोक मारले गेले होते. या हल्ल्यामागे इरगुनचा हात होता

या गटांमध्ये मतभेद एवढे वाढले की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हगानाहने इरगुनच्या अनेक सदस्यांना पकडून ब्रिटिश प्रशासकांच्या ताब्यात दिलं. हगानाहला वाटत होतं की इरगुनच्या सशस्त्र कारवाया इस्रायलच्या स्वातंत्र्य चळवळीत अडचणी आणू शकतात.

दोन विरोधी नेते

हे दोन्ही नेते दूरदर्शी होते आणि ज्यू राष्ट्रवादी होते पण ते सोडलं तर दोघांमध्ये काही साम्य नव्हतं. इस्रायलला स्वातंत्र्य कसं मिळणार याबद्दलही या दोघांचे विचार एकदम वेगळे होते. अगदी सौंदर्यशास्त्र, भाषा आणि देशाच्या आर्थिक योजना काय असाव्यात याबद्दलही दोघांचे विचार एकदम विरुद्ध होते.

बेन गुरियन पॅलेस्टाईनमध्ये ब्रिटिश शासनकाळात सरकारच्या सहकार्याने लोकांसाठी काम करणाऱ्या इस्रायल ज्यू संस्थेचे प्रमुख होते. समाजवादी आणि लोकशाबी विचारांचा पगडा त्यांच्यावर होता.

पेन्सलार म्हणतात, “त्यांचा कामगार चळवळींवर विश्वास होता. त्यांना वाटत होतं की देशाच्या अर्थव्यवस्थेवर सरकारचं नियंत्रण असावं. कामगार त्यांना आपला आदर्श समजायचे भले मग त्यांनी अगदी थोडाच काळ कामगार म्हणून का केलेलं का असेना.”

बेन गुरियन यांच्या स्वप्नातला इस्रायल सामुहिक शेतीत अग्रेसर, मजबूत आणि उत्पादक कामगारांचं प्रतीक होता.

ते धर्मनिरपेक्ष आणि डाव्या विचारांचे पाईक होते. पॅलेस्टाईन भागतली जमीन हळूहळू ताब्यात घेण्यात यावी आणि तोवर ब्रिटिशांना सहकार्य करत राहावं जोवर इस्रायलच्या स्वातंत्र्यावर एकमत होत नाही असं त्यांचं मत होतं.

बेन गुरियन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बेन गुरियन

पेन्सलर म्हणतात की मेनाकेम बेगिन यांच्या बरोबर उलट होते. त्यांचं कुटुंब पोलंडमध्ये ज्यू नरसंहारात बळी पडलं होतं. त्यांना वाटायचं की, “नव्या ज्यूंनी क्रांतिकारी, विद्रोही आणि लढवय्य असायला हवं. एक ज्यू साठा सर्वात मोठी गोष्ट लढत लढता युद्धात मरण पावणं ही आहे.”

बेगिन स्टायलिश सुट घालायचे. त्यांनी उत्तम शिक्षण घेतलं होतं. ते भावनांना हात घालणारी भाषणं करायचे. ते कट्टरवादी आणि धार्मिक होते. अनेकदा ते ज्यू नरसंहाराची उदाहरणं देऊन आपलं भाषणं नाट्यमय करायचे.

पेन्सलर म्हणतात की, “दोन्ही नेत्यांमध्ये कितीही फरक असला तरी त्यांच्या मतभेदांचं मुळ सत्तेत होतं.”

बेन गुरियन कामगार ज्यूवादाचं नेतृत्व करत होते. 1948 साली इस्रायल अस्तित्वात आल्यानंतर पुढची तीन दशकं याच विचारसरणीने इस्रायलला आकार दिला आणि इथल्या राष्ट्रीय संस्थांची रुपरेषा आखली.

तर 1977 मध्ये इस्रायलचे पंतप्रधान बनणारे मेनाकेम बेगिन यांनी संशोधकनात्मक ज्यूवाद मजबूत केला. त्यांना असा इस्रायल हवा होता जो जॉर्डन नदीच्या दोन्हीकडे पसरलेला असेल. आज इस्रायलच्या राजकारणात बेगिन यांच्याच वैचारिक वारसदारांचा प्रभाव आहे, ज्यात लिकुड पार्टीही येते.

एल्टालेना संकटाच्या वेळेस या दोन्ही नेत्यांमधले वाद पराकोटीला पोचले होते.

संकट

एल्टालेना जहार अमेरिकेन नौसेवेत होतं. जेव्हा हे जहाज अमेरिकन नौदलातून निवृत्त करण्यात आलं तेव्हा इरगुनच्या वित्तीय शाखेने विकत घेतलं.

इस्रायलच्या स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर काही दिवसांनी एल्टालेना जहाज फ्रान्सचं किनारपट्टीवरचं शहर मार्सेलहून 900 लोकांसह निघालं. या जहाजावर असणारे बहुतांश लोक ज्यू नरसंहार पीडित होते जे स्वयंसेवक म्हणून इस्रायलला जात होते. या जहाजावर काही सशस्त्र बंडखोरही होते.

मेनाकेम बेगिन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेनाकेम बेगिन

पण याखेरीज जहाजावर मोठ्या प्रमाणात हत्यारं, ज्यात पाच हजार रायफल्स, 450 सब-मशीन गन, डझनभर हत्यारबंद गाड्या आणि जवळपास 25 लाख गोळ्या होत्या.

याच वेळी संयुक्त राष्ट्रांनी एक करार घडवून आणला ज्याच्या अंतर्गत इस्रायल आणि शेजारच्या अरब राष्ट्रांनी युद्धविराम घोषित करायचा होता. यातली एक मुख्य अट अशी होती की या भागात आता नवी शस्त्रं येणार नाहीत.

पण बेगिन यांनी पंतप्रधान बेन गुरियन यांच्याकडे एल्टालेनाला तेल अवीवमध्ये आणू देण्याची परवानगी मागितली. बेन गुरियन यांनी नकार दिला. जहाज केफार वितकीनच्या बंदरावर पाठवण्यात आलं आणि 20 जून 1948 रोजी या जहाजाने तिथे नांगर टाकला.

बेगिन जहाजावर असलेली हत्यारं आयडीएफ (इस्रायली सैन्य) मध्ये काम करणाऱ्या इरगुन गटांना देऊ पाहात होते. पण बेन गुरियन यांचा या प्रस्तावावर भरोसा नव्हता. दोन्ही माजी सशस्त्र गटांचे नेते आणि आताच्या इस्रायलचे राजकीय नेत्यांमधला तणाव वाढला होता.

बंडखोर गट इरगुन इस्रायली सैन्यात सहभागी करून घेतला असला तरी स्वतःती वेगळी तुकडी संचलित करत असे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बंडखोर गट इरगुन इस्रायली सैन्यात सहभागी करून घेतला असला तरी स्वतःती वेगळी तुकडी संचलित करत असे

या तणावाच्या काळात इरगुन गटाकडे हत्यारं जाणं बेन गुरियन यांना योग्य वाटत नव्हतं. काही इतिहासकारांना असंहा वाटतं की गुरियन यांना भीती होती की बेगिन बंडखोरी करून सत्तापालट करू पाहात आहेत.

केफार वितकीन बंदरावर जहाज पोचल्यानंतर यातले प्रवासी उतरून गेले आणि सशस्त्र बंडखोरांनी हत्यारं उतरवायला सुरुवात केली.

पण एल्टालेनाला आयडीएफच्या एका रेजिमेंटने आणि इस्रायली नौदलाच्या तीन युद्धनौकांनी घेरलं म्हणजे ती हत्यारं सैन्य ताब्यात घेऊ शकेल.

तणाव वाढला आणि गोळ्या झाडल्या गेल्या. दोन्हीकडचे लोक मारले गेले.

यानंतर बेगिन यांनी एल्टालेनाला तेल अवीवला परत येण्याचा आदेश दिला. इथे इरगुनच्या समर्थकांची मोठी संख्या होती.

यानंतर आयडीएफने घोषणा केली की हे जहाज शत्रू आहे आणि इस्रायली वायूदल आणि नौदलाला यावर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले.

पण पायलटांनी हल्ला करायला नकार दिला. इस्रायलच्या युद्धनौकांनी बॉम्ब गोळ्यांचा मारा केला खरा, पण तो नेम धरून केला नाही, बॉम्ब जहाजावर न पडता आसपास पडले.

तेल अवीवच्या किनाऱ्यावर डॅन हॉटेलसमोर एल्टालेनाने नांगर टाकला. इथे तेव्हा इस्रायली नागरिक, पत्रकार आणि संयुक्त राष्ट्रांचे पर्यवेक्षक उपस्थित होते.

पण बेन गुरियन मागे हटले नाहीत. 22 जूनला दुपारी चार वाजता त्यांनी एल्टालेनावर हल्ला करण्याचे आदेश दिले.

एल्टालेना राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक बनलं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एल्टालेना राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक बनलं

एक बॉम्ब जहाजावर पडला आणि जहाजाला आग लागली. इरगुनचे बंडखोर आणि आयडीएफचे सैनिक किनाऱ्यावर एकमेकांना भिडले. तेल अवीवच्या काही भागांत संघर्षही झाला.

गृहयुद्धाचे ढग दाटले आणि मेनाकेम बेगिन यांनी ‘एका ज्यूने दुसऱ्या ज्यूला मारायला नको’ असं म्हणत मेनाकेम बेगिन यांनी आत्मसमर्पण केलं.

पेन्सलार म्हणतात की, “एल्टालेनाच्या युद्धातला सर्वात महत्त्वाचा पैलू जे झालं तो नाही तर जे झालं नाही तो आहे.”

“इरगुनमध्ये असे अनेक कमांडर होते जे जहाजावर बॉम्बगोळे पडल्यानंतर बदला म्हणून हल्ला करण्यासाठी आणि नवीन सरकार उखडून फेकण्यासाठी तयार होते. पण बेगिन यांनी ही लढाई थांबवण्यासाठी आपली पूर्ण नैतिक शक्ती पणाला लावली. त्यांच्या राजकीय जीवनातला हा सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरला. त्यांनी इस्रायलचं गृहयुद्ध थांबवलं.”

पेन्सलार यांच्या मते या घटनेनंतर एल्टालेना इस्रायलमध्ये एकतेचं प्रतीक बनलं.

1948 साली इस्रायलमध्ये जे मतभेद होते त्यांचा आजच्या काळाशी सरळ काही संबंध नाही. पण पेन्सलार यांन वाटतं की आजही इस्रायलमध्ये असे लोक आहेत ज्यांना वाटतं की इरगुनवर झालेला हल्ला चुकीचा होता. त्याबद्दल काहींना आजही वाईट वाटतं.

आज इरगुनचे वैचारिक वारसदार सत्तेत आहेत. पण इस्रायलमध्ये आजही अनेक लोकांना वाटतं की देशाची विचारधारा आजही डाव्या विचारांचं उच्चवर्गीय लोक ठरवतात.

पेन्सलार म्हणतात की त्या काळाची भाषा आता इस्रायलमध्ये पुन्हा कानावर पडतेय. तेव्हा इरगुन सर्वसामान्य लोकांचं तर हगानाह सत्तेचं प्रतीक होतं.

ते म्हणतात, “राग हा एक शक्तीशाली राजकीय विचार आहे.”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)