इराणसोबतच्या संघर्षात काय आहे इस्रायलची 'ऑक्टोपस थिअरी?

यायिर लैपिड

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, यायिर लैपिड
    • Author, सुसान किएनपोर
    • Role, बीबीसी न्यूज, दुबई

पुढच्या आठवड्यात इस्रायलच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणार्‍या व्यक्तीने तुर्कस्तानला तातडीची भेट दिली . तुर्कस्तानमध्ये असलेल्या इस्रायली पर्यटकांवर इराणी एजंटकडून हल्ला होण्याची भीती असतानाच या भेटीचं आयोजन करण्यात आलं आहे.

वास्तविक ही परिस्थिती निर्माण व्हायला, एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले इराण आणि इस्रायल यांच्यातील 'शॅडो वॉर' कारणीभूत आहे.

इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून 'शॅडो वॉर' सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर छुपे हल्ले करण्यात आलेत.

इस्रायलला जगाच्या नकाशावरून पुसून टाकायची इच्छा इराणला आहे. त्यामुळे इस्रायल इराणकडे त्यांच्या विरुद्धचा सर्वात मोठा धोका म्हणून बघतो.

दुसरीकडे इराण, इस्रायलकडे अमेरिकेसोबत उभा असलेला देश आणि एक प्रादेशिक शक्ती म्हणून उदयास येताना सर्वात मोठा अडथळा म्हणून पाहतो. 2020 मध्ये इस्रायल आणि इराणमधील तणावाचं नाट्यमय वळण लागलं होतं.

त्याचवेळी इराणचे अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरजादा यांची हत्या इस्रायलने केल्याचा आरोप इराणने केला होता. फखरजादा त्यावेळी तेहरानच्या हद्दीत कार चालवत होते.

रिमोट कंट्रोल मशीनगनचा वापर करून त्यांची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जातं. इस्रायलने या हत्येमध्ये आपला सहभाग असल्याचं कधीच मान्य केलं नाही. पण हे आरोप कधी नाकारलेही नाहीत. फखरजादा हे 2007 नंतर मारले गेलेले पाचवे अणुशास्त्रज्ञ होते.

इस्रायलने हे हत्याकांड कसं घडवून आणलं यासंदर्भातला एक सविस्तर अहवाल न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केला होता.

एकमेकांवर हल्ले करण्याच्या घटना

मात्र, इराणची गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखाने खुलासा केला होता की फखरजादा हे "मागच्या अनेक वर्षांपासून" टार्गेटवर होते. ते म्हणाले की, फखरजादा यांच्याकडे जी माहिती होती त्यामुळे मोसाद चिंताक्रांत झाली होती.

पाश्चात्य गुप्तचर संस्थांच्या मते, फखरजादा अण्वस्त्र बनवण्याच्या गुप्त कार्यक्रमाचे नेतृत्व करत होते.

या प्रकरणाच्या काही महिन्यांनंतर, जो बिडेन अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या वतीने इराणशी होणारी सौदेबाजी सोडून दिली.

इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झालेले फखरजादा याच कारमध्ये प्रवास करत होते.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झालेले फखरजादा याच कारमध्ये प्रवास करत होते.

दरम्यान, इराण आणि इस्रायल एकमेकांविरुद्ध सिक्रेट ऑपरेशन्सच्या मोहिमा चालवण्यात गुंतले होते.

इराणने आखलेली कथित हत्याकांडाची योजना आम्ही हाणून पाडली आहे, असं इस्रायलने जाहीर केलं. अगदी त्याच वेळी इराणने इस्रायलमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्याबाबत अतिशयोक्तीपूर्ण दावे केले.

दोन्ही देशांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

दोन्ही देशांनी एकमेकांच्या मालवाहू जहाजांवर हल्ले केल्याचा दावे केले होते. इराणच्या एका अंडरग्राऊंड न्यूक्लिअर साईटवर इस्रायलने तोडफोड केली असल्याचा दावा इराणने मागच्या आठवड्यात केला होता.

काही दिवसांपूर्वीच मोसादशी संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली तीन जणांवर खटला चालवल्याच इराणकडून सांगण्यात आलं होत. खटला भरलेल्या लोकांवर इराणच्या अणुशास्त्रज्ञांच्या हत्येची योजना आखल्याचा आरोप होता.

इराणने म्हटलयं की, इथं एकामागून एक अशा अनेक रहस्यमय हत्या झाल्या आहेत. त्यात दोन एअरोस्पेस अधिकाऱ्यांही मृत्यू झालाय.

या दोघांनाही 'मिशनवर शहीद' असा दर्जा देण्यात आला आहे. तर संरक्षण मंत्रालयाच्या इंजिनिअर्सना औद्योगिक तोडफोडीतील शहीद म्हणून संबोधण्यात आलंय.

मात्र, या मृत्यूंसाठी इस्रायलला जबाबदार धरण्यात आलेलं नाही.

आता या हल्ल्यांचा छुपा खेळ उघडपणे खेळला जातोय

इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या हल्ल्याचा आणि प्रतिहल्ल्यांचा हा खेळ आता उघडपणे सुरू झाल्याचं दिसतंय. अॅपल टीव्हीवरील तेहरान या शोला तर हॉलीवूडची ट्रीटमेंटही मिळत आहे.

या शोमध्ये मोसादचा एक एजंट इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या उच्च सुरक्षा यंत्रणेत घुसखोरी करण्यात यशस्वी होतो असं दाखवण्यात आलंय.

पण जर आपण कल्पनेच्या पलीकडे जाऊन वास्तविक परिस्थितीबद्दल बोललो तर त्याबद्दल तज्ञांच स्वतःच असं एक मत आहे.

कर्नल सैयद खुदाई

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, कर्नल सैयद खुदाई

रिचर्ड गोल्डबर्ग हे , अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात, व्हाईट हाऊस नॅशनल सिक्युरिटी अगेन्स्ट इराणच्या जेनोसाईड वेपन्स प्रोग्रामचे कौन्सिल डायरेक्टर होते.

इराणच्या सुरक्षा व्यवस्थेत घुसखोरी केल्याशिवाय मोहसीन फखरजादाची हत्या शक्य झाली नसती, असं त्यांच मत आहे.

'स्ट्रॅटेजिक सेंटर'

रिचर्ड गोल्डबर्ग म्हणतात, "इराणच्या एवढ्या मोठ्या सुरक्षेतील आण्विक संयंत्रांमध्ये घुसखोरी करणे किंवा त्यातल्या एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं एखादा घरभेदी असल्याशिवाय शक्य नाही हे समजलं पाहिजे."

अशा हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी इराणने या भागातील अमेरिकन आणि इस्रायली ठिकाणांवर हल्ले चढवले असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

इराणने मार्चच्या महिन्यात इराकमधील कुर्दिस्तानमध्ये असलेल्या इस्रायलच्या 'स्ट्रॅटेजिक सेंटर' नावाच्या सेंटरवर हल्ला चढवल्याचं सांगितल जातं.

इस्रायल संचालित तेल टँकरवर इराणनं ड्रोननं हल्ला केल्याचं अमेरिकेनं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, इस्रायल संचालित तेल टँकरवर इराणनं ड्रोननं हल्ला केल्याचं अमेरिकेनं म्हटलं होतं.

इराकच्या तळावर तैनात असलेल्या अमेरिकन सैन्यावर इराण समर्थित कट्टरतावाद्यांनी हल्ला चढवल्याचाही आरोप आहे.

रसद वाहून नेणाऱ्या लष्कराच्या ताफ्यावरही इराणने हल्ला केल्याचा आरोप आहे.

इस्रायलची 'ऑक्टोपस थिरी' काय आहे?

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने अलीकडेच इस्तंबूलमधील आपल्या नागरिकांना शहर सोडण्याचा आणि तुर्कीमधील इतर कोणत्याही शहरात न जाण्याचा इशारा दिलाय.

त्यांना लवकरच कोणत्याही धोक्याचा सामना करावा लागू शकतो. कदाचित इराणी एजंट त्यांना इजा पोहोचवण्याच्या प्रयत्नात असतील.

दरम्यान, इस्रायलच्या पंतप्रधानपदावरून आता काहीच दिवसात पायउतार होणारे पंतप्रधान नेफ्ताली बेनेट म्हटले आहेत की, इस्रायल आता 'ऑक्टोपस थिअरी' लागू करणार आहे.

या थिअरीनुसार इराणच्या आण्विक, क्षेपणास्त्र आणि ड्रोन कार्यक्रमांविरुद्ध छुप्या कारवायांना गती देण्याची योजना आहे.

तिसऱ्या कोणत्यातरी देशात जे इराणसाठी अप्रत्यक्षपणे काम करतात त्यांच्यावर हल्ला करण्यापेक्षा या रणनीतीवर अधिक भर दिला जाईल.

इराणचा इशारा

तेहरान विद्यापीठातील प्राध्यापक आणि व्हिएन्ना वाटाघाटीतील इराणच्या अणु करारावरील टीमचे माध्यम सल्लागार मोहम्मद मरांडी म्हणाले, "पाश्‍चिमात्य देशांचा राजकीय आश्रय घेऊन निष्पाप नागरिकांची हत्या घडवणं ही इस्रायलसाठी कोणती नवी गोष्ट नाही. मात्र अपघातात घडलेल्या घटनांना स्वतः केलेले कारनामे म्हणवून घेऊन राजकीय हेतूंसाठी आपल्या क्षमतेची अतिशयोक्ती इस्रायलच करू शकत. आम्ही आत्तापर्यंत धीर धरला होता. पण आम्ही नक्कीच बदला घेऊ."

इराणच्या एलिट कुड्स फोर्सचे प्रमुख जनरल इस्माईल कयानी (हे रिव्होल्युशनरी गार्डचे परदेशी ऑपरेशन युनिट आहे) यांनी जाहीर केलंय की, जगात कुठेही अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात आंदोलन सुरू असेल तर इराण त्याला पाठिंबा देत राहील.

खरं तर, इराणच्या कुड्स फोर्सचे प्रमुख कासिम सुलेमानी यांना ड्रोन हल्ल्यात ठार केल्यानंतर इराणने ही घोषणा केली होती. जानेवारी 2020 मध्ये अमेरिकेच्या या ऑपरेशनमुळे जगभरात खळबळ उडाली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन येत्या काही दिवसांत इस्रायल आणि सौदी अरेबियाला भेट देणार आहेत. बिडेन प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलयं की, इराण आणि इस्रायलमधील युद्ध सध्यातरी चिंताजनक स्थितीत पोहोचताना दिसत नाही.

इस्रायल-इराण वाद

फोटो स्रोत, EPA

ते म्हणाले, "इराण आणि इस्रायल यांच्यातील हा संघर्ष बराच जुना आहे. दोन्ही देश हा खेळ सावकाश खेळतायत. एकमेकांवर मोठे हल्ले करत नाहीत. आणि हे आपण बऱ्याच काळापासून पाहतोय. पण फरक इतकाच आहे की पूर्वी जे छुप्या पद्धतीने चालत होत ते आता उघड उघड सुरू आहे."

वॉशिंग्टन स्थित थिंक टँक, डिफेन्स फॉर डेमोक्रॅसीजचे वरिष्ठ सल्लागार रिच गोल्डबर्ग म्हणतात, "अमेरिकेच्या सिक्रेट ऑपरेशनला मर्यादा असू शकतात. पण जगाला एक मोठा धमाका हवाय. असा धमाका जिथं आपण जागे होऊ आणि इस्रायली हवाई हल्ल्यांचा आवाज ऐकू. "

"पण हे देखील तितकंच खरं आहे की , हे जे शॅडो वॉर सुरू आहे ते हळूहळू सामान्य व्हायला लागलंय. म्हणजे हा लष्करी हल्ला आहे आणि तो थांबवला पाहिजे असं जग म्हणेल तोपर्यंत अगदी सहजपणे, काहीही न बोलता अणु प्रकल्पांवर थेट हल्ला चढवून हे रिकामे होतील."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)