आपल्या खेळाडूंची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना जेव्हा मोसादने वेचून ठार मारलं..

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नोरबर्तो परेदेस
- Role, बीबीसी मुंडो
जर्मनीनं 1972 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केल्या होत्या. जर्मनी देश म्हणून किती बददला आहे, हे त्यांना या स्पर्धांच्या माध्यमातून सिद्ध करायचं होतं.
1936 मध्येही अॅडॉल्फ हिटलरनंही जर्मनीत ऑलम्पिकचं आयोजन केलं होतं. त्याचा उद्देश भव्य आयोजनाद्वारे जगाला जर्मनीचं सामर्थ्य दाखवणे हा होता.
मात्र, 50 वर्षांनंतरही म्युनिकमध्ये आयोजित स्पर्धेला जग अशा एका दुर्घटनेसाठी ओळखतं, जी अनेक वर्षे जर्मनीसाठी एक मोठी डोकेदुखी ठरली. 5 सप्टेंबरच्या पहाटे 4 वाजता पॅलिस्टिनी कट्टरतावादी गट ब्लॅक सप्टेंबर चे सदस्य सहा फुटी कुंपणावरून उड्या मारून ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये घुसले होते. त्याठिकाणी इस्रायलचे खेळाडू राहत होते.
त्या दिवशी पहाटे सव्वा चार वाजता हल्लेखोरांनी एका मास्टर की (किल्ली)च्या मदतीनं खेळाडुंच्या अपार्टमेंटपर्यंत जाणाऱ्या मार्गाचा दरवाजा उघडला होता. हल्लेखोर आणि खेळाडुंमध्ये या ठिकाणी संघर्षही झाला. त्यानंतर पॅलिस्टिनी कट्टरतावाद्यांनी दोन खेळाडुंना ठार केलं आणि इस्रायलच्या नऊ खेळाडुंसह काही प्रशिक्षकांना बंदी बनवलं.
इस्रायलच्या खेळाडुंना सोडण्याच्या मोबदल्यात 200 पॅलिस्टिनी कैद्यांना मुक्त करण्याची मागणी त्यांनी केली होती. ते कैदी इस्रायलच्या कैदेत होते. पॅलिस्टिनी कट्टरतावाद्यांनी बंदींना एका एअरपोर्टवर नेलं. त्याठिकाणी जर्मनीच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
जर्मनीच्या सुरक्षा दलांच्या या प्रयत्नाने हल्लेखोर पॅलिस्टिनी कट्टरतावाद्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी बंदी बनवलेल्यांची हत्या करायला सुरुवात केली. इस्रायलच्या ऑलिम्पिक समितीच्या सर्व नऊ सदस्यांची त्यांनी हत्या केली. त्यात पश्चिम जर्मनीच्या एका पोलिस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Getty Images
त्या रात्री नेमकं काय घडलं हे तुम्ही इथे सविस्तर वाचू शकता- म्युनिक ऑलिम्पिकमधली 'ती' रक्तरंजित रात्र जेव्हा 11 इस्रायली खेळाडूंची हत्या झाली होती...
इस्रायलचा जर्मनीवर आरोप
जर्मनीचे सुरक्षारक्षक आणि कट्टरतावादी यांच्या चकमकीत आठ हल्लेखोर मारले गेले होते. अदनान अल गाशे, जमाल-अल गाशे आणि मोहम्मद सफादी यांना जर्मनीच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पण नंतर त्यांनाही सोडावं लागलं होतं. पॅलिस्टिनी कट्टरतावाद्यांनी जर्मनीच्या लुफ्तांसा एअरलाईनचं एक विमान अपहरण केलं होतं. त्या तिघांची सुटका करण्याच्या मोबदल्यात विमान सोडण्यात आलं होतं.
तज्ज्ञांच्या मते, सुटका केल्यानंतर या तिघांना लिबियाला पाठवण्यात आलं. त्याठिकाणी मुअम्मर गद्दाफीनं हिरो म्हणत त्यांचा सत्कार केला होता. त्यानंतर म्युनिक नरसंहारात इस्रायलच्या खेळाडूंच्या हत्येत सहभागी असलेल्या 'ब्लॅक सप्टेंबर' गटाच्या अनेक सदस्यांना मारण्यात आलं होतं.
इस्रायलच्या गुप्तचर संस्थेवर या हत्यांचा आरोप केला जातो. या हत्या इस्रायलच्या 'रॅथ ऑफ गॉड' म्हणजेच 'ईश्वराचा कोप' नावाच्या एका गोपनीय मोहिमेचा (मिशन) भाग असल्याचं मानलं जातं. या मिशनच्या कचाट्यातून केवळ एक जण वाचला होता. 1990 च्या अखेरच्या काही वर्षांपर्यंत केवळ जमाल अल-गाशे वाचले होते. ते अजूनही लपलले आहेत, असं मानलं जातं.
जवळपास दशकभरापूर्वी इस्रायलच्या काही गोपनीय फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या होत्या. इस्रायलनं या घटनेसाठी जर्मनीच्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं होतं. या फाईल्सनुसार इस्रायलनं जर्मनीच्या सुरक्षा संस्थांवर म्युनिकमध्ये आयोजित स्पर्धांमध्ये त्यांच्या खेळाडुंना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
या हल्ल्यानंतही ऑलिम्पिक स्पर्धा मात्र सुरू राहिल्या. त्यावर्षी पदकतालिकेत सोव्हिएत संघ अव्वल स्थानी होता. त्यांनी 50 सुवर्ण पदकं जिंकली होती. अमेरिका 33 सुवर्ण पदकांसह दुसऱ्यासाठी होता. तर पूर्व जर्मनीनं 20 सुवर्णपदकं जिंकली होती.
'रॅथ ऑफ गॉड'
बीबीसीचे पत्रकार फर्गेल कीन यांचं एक पॉडकास्ट 2014 मध्ये प्रसिद्ध झालं होतं. इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मेयर यांनी देशाच्या संसदेत 'दहशतवादाविरोधात युद्ध' पुकारल्याची घोषणा केली होती, असं त्यांनी या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं.
या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांचा शोध घेण्यासाठी त्यांनी एक गोपनीय समिती स्थापन केली होती. त्यानंतर इस्रायलच्या गुप्तचर संस्थांपैकी एक असलेल्या मोसादला त्या सर्वांची हत्या करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
'रॅथ ऑफ गॉड' मिशनदरम्यान या हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या 'ब्लॅक सप्टेंबर' गटाच्या सदस्यांना संपूर्ण युरोप आणि आखाती देशांमध्ये शोधून-शोधून मारण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
'बदला' घेण्यासाठीच्या या मिशनची जबाबदारी इस्रायलचे एक प्रसिद्ध हेर माइक हरारी यांच्यावर सोपवण्यात आली होती. या मिशनमध्ये एका डझनपेक्षा अधिक पॅलिस्टिनींची हत्या करण्यात आली होती.
मात्र, म्युनिक ऑपरेशनमध्ये नेमके किती कट्टरतावादी सदस्य सहभागी होते, यासदंर्भातील वाद अजूनही कायम आहे. बदला घेण्यासाठीच्या या मिशनमध्ये मोसादच्या काही हेरांना महिलांच्या वेशात बेरुतच्या समुद्र किनाऱ्यावर बोटद्वारे उतरवण्यात आलं होतं.
स्टिव्हन स्पिलबर्गचा चित्रपट 'म्युनिक'
त्याठिकाणी उतरल्यानंतर त्यांनी पॅलिस्टिनी लिबरेशन ऑर्गनायझेशनचे तीन नेते आणि एका कट्टरतावादी गटाच्या सदस्यांची हत्या केली होती. पण या मोहिमेध्ये काही पॅलिस्टिनी आणि लेबनानी नागरिकांचाही मृत्यू झाला होता.
इस्रायलचे दोन हेरदेखील मारले गेले होते. 1984 मध्ये आलेल्या 'वेन्जन्स' म्हणजेच 'प्रतिशोध किंवा बदला' नावाच्या पुस्तकात कॅनडियन लेखक आणि पत्रकार जॉर्ज जोनस यांनी 'रॅथ ऑफ गॉड' बद्दल बरीच माहिती दिली आहे.
या मिशनबद्दलची माहिती मिळवण्यासाठी त्यांचा मुख्य स्त्रोत होता, युवाल अवीव. ते मोसादचे अधिकारी होते आणि कट्टरतावद्यांचा बदला घेण्यासाठीच्या मिशनमध्ये सहभागी असल्याचा दावाही ते करायचे.

फोटो स्रोत, Getty Images
याच पुस्तकावरून 'म्युनिक' नावाचा चित्रपट तयार करण्यात आला होता. अमेरिकेचे प्रसिद्ध दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी हा चित्रपट तयार केला होता. त्या पुस्तकात बैरूतमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर युरोपातील विविध देशांमध्ये मारण्यात आलेल्या लोकांची यादी देण्यात आली होती.
जोनस यांच्या मते, 16 ऑक्टोबर 1972 ला युरोपात 'रॅथ ऑफ गॉड' मोहिमे अंतर्गत वेल जेवेतर नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती. ते पॅलिस्टिनी भाषांतरकार होते.
हत्यांची मालिका
जेवेतर हेच रोममध्ये ब्लॅक सप्टेंबरचे प्रमुख होते अशा संशय मोसादला असल्याची माहिती अनेक स्त्रोतांद्वारे मिळाली होती. इस्रायलच्या दोन हेरांनी 11 गोळ्या घालत त्यांची हत्या केली होती. इटलीच्या राजधानीत एका अपार्टमेंटमध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती.
त्यानंतर दुसरा क्रमांक होता महमूद हमशारी यांचा. ते फ्रान्समध्ये पीएलओचे प्रतिनिधी होते. फ्रान्समधील ब्लॅक सप्टेंबरचे ते नेते असल्याचं इस्रायलचं मत होतं. 8 डिसेंबर 1972 ला त्यांच्या डेस्क फोनखाली एक स्फोट झाला आणि ते जखमी झाले.
काही आठवड्यांनी त्यांचा मृत्यू झाला. चार महिन्यांनी 6 एप्रिल 1973 ला लेबनानमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅरिसमध्ये मारले गेलेले बासील-अल-कुबैसी पॉप्युलर फ्रंट फॉर लिबरेशन ऑफ पॅलेस्टाइन (पीएफएलपी) चे सदस्य होते.

फोटो स्रोत, Getty Images
या हत्यांची मालिका एवढ्यावरच थांबली नाही. सायप्रसमध्ये पीएलओचे सदस्य झायद मनयासी हे अथेन्समध्ये एका हॉटेलच्या स्फोटात मारले गेले होते. तर युरोपात पीएफएलपीचे प्रमुख असलेले मोहम्मद बोदिया हे एका कार स्फोटात मारले गेले होते.
मोहिमेचा उद्देश
'रॅथ ऑफ गॉड' चा उद्देश म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कट्टरतावाद्यांच्या हातून मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणं हा होता.
इस्रायल विद्यापीठात ज्यूंचा इतिहास आणि संस्कृती या विषयाचे प्राध्यापक माइकल ब्रेनर यांच्या मते, इस्रायलच्या नागरिकांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांना माफ केलं जाणार नाही, हा संदेश देण्याचा उद्देश यामागे होता.
"दोन गोष्टी एकत्र घडल्या. ऑलिम्पिकमध्ये खेळाडुंना बंदी बनवून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसरी म्हणजे जिवंत हाती आलेल्या कट्टरतावाद्यांना ज्याप्रकारे सोडण्यात आलं, त्यामुळं अनेकांना मोठा हादरा बसला," असं ब्रेनर यांचं म्हणणं होतं.
"लुफ्तांसाचं विमान अपहरण हे जर्मनीचंच कारस्थान असल्याचाही संशय होता. काहीही करून त्यांना जर्मनीच्या बाहेर पाठवावं आणि पॅलिस्टिनी कट्टरतावाद्यांपासून सुटका मिळवणं हा, त्यामागचा उद्देश होता,'' असंही ब्रेनर सांगतात.
त्यामुळं दुहेरी अन्याय झाल्याची भावना इस्रायलला होती. म्हणूनच जर्मनीला जे करता आलं नाही, ते करून दाखवलं हे सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इस्रायच्या दृष्टीनं त्यांची मोहीम फत्ते झाली होती.
तिसरा हल्लेखोर
मिशनचे उद्देश पूर्ण झाले होते. विदेशात इस्रायलच्या विरोधात कोणीही पुन्हा असा हल्ला करण्याचं साहस करून नये, हे सुनिश्चित करणं हा त्यातला पहिला उद्देश होता.
दुसरा उद्देश, सरकार नागरिकांना न्याय मिळवून देण्यास सक्षम आहे, हे इस्रायलच्या नागरिकांना दाखवून देणं हा होता. पण इस्रायलच्या संस्थांना पूर्ण 'बदला' घेण्यात अपयश आलं. कारण इस्रायलच्या गुप्तचर संस्थांना तिसऱ्या हल्लेखोराचा शोध घेता आला नाही.
तिसरे हल्लेखोर जमाल अल गाशे होते. 1999 मध्ये 'वन डे इन सप्टेंबर' या माहितीपटात जे झळकले होते. त्यात त्यांनी चेहरा झाकलेला होता.
"म्युनिकमध्ये मी जे केलं त्याचा मला अभिमान होता. कारण त्यामुळं पॅलिस्टिनी चळवळीला भरपूर मदत झाली," असं ते या माहितीपटात म्हणाले होते.
"म्युनिकच्या घटनेपूर्वी आमच्या संघर्षाबाबत जगाला काहीही माहिती नव्हती. पण त्या दिवशी संपूर्ण जगामध्ये पॅलिस्टाईनचं नाव गाजलं होतं."
'50 होलोकॉस्ट'
जर्मनीच्या दौऱ्यावर आलेले पॅलिस्टिनी राष्ट्राध्यक्ष मेहमूद अब्बास यांनी म्युनिक नरसंहारासाठी माफी मागण्यास नकार दिला होता.
त्याउलट बर्लिनमध्ये जर्मन चान्सलर ओलफ स्लोज यांच्याबरोबर एका पत्रकार परिषदेत त्यांनी इस्रायलवर '50 होलोकॉस्ट' चा आरोप केला होता.
50 वर्षांपूर्वी म्युनिकमध्ये झालेल्या नरसंहारासाठी माफी मागण्याबाबत जर्मनीच्या एका पत्रकारानं पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींना प्रश्न विचारला होता. त्यावर "आपण इतिहासात आणखी मागं जायचं ठरवलं, तर माझ्याकडे इस्रायलनं घडवलेले 50 नरसंहार आहेत," असं उत्तर मेहमूद अब्बास यांनी दिलं होतं.
"50 नरसंहार, 50 होलोकॉस्ट, आणि आजपर्यंत रोज, इस्रायलचं सैन्य आमच्या नागरिकांच्या हत्या करत आहे," असंही अब्बास म्हणाले होते.
अब्बास यांच्या वादग्रस्त भाषणाचा जर्मनी आणि इस्रायल दोन्ही देशांच्या सरकारांनी निषेध केला आहे. अब्बास यांचं वक्तव्य हे 'केवळ अपमान नसून, एक मोठं असत्य' होतं, अशी प्रतिक्रिया इस्रायलचे पंतप्रधान यायर लॅपिड यांनी दिली.
दुसऱ्या महायुद्धात नाझींनी सुमारे 60 लाख ज्यूंची हत्या ज्याठिकाणी केली, त्याच जर्मनीच्या भूमीवर हे बोलणं अधिक वाईट असल्याचंही ते म्हणाले होते.
म्युनिक हल्ल्याची जबाबदारी घेणारा कट्टरतावादी गट ब्लॅक सप्टेंबरचे धागेदोरे फतह या अब्बास यांच्या राजकीय पक्षाशीही जोडले गेले होते.
अन्यायाची भावना
नरसंहारानंतर हे संकट सोडवण्यासाठी जर्मनीनं जो मार्ग अवलंबला तो योग्य नव्हता. त्यामुळंच म्युनिक नरसंहाराच्या 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तच्या कार्यक्रमांबाबत बरीच चर्चा झाली, याकडंही इतिहासकार मायकल ब्रेनर लक्ष वेधतात.
"पीडित कुटंबांना, अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही अशी भावना आहे," असंही ब्रेनर सांगतात.
1972 मध्ये म्युनिकमध्ये मारल्या गेलेल्या खेळाडुंच्या नातेवाईकांनी 50व्या स्मृती दिनाच्या सोहळ्यावर बहिष्कार टाकणार अशी घोषणा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला केली. नुकसान भरपाईवरून जर्मन सरकार आणि त्यांच्यात असलेला वाद, हे त्यामागचं कारण असल्याचं सांगण्यात आलं.
जर्मन सरकारनं म्युनिकमधील पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा तर केली, मात्र त्याची रक्कम किती असणार हेच जाहीर केलं नाही.
"जर्मनी घटनेची प्रत्यक्ष जबाबदारी स्वीकारत नाही, तोपर्यंत आम्ही मेमोरियल सर्विसमध्ये (स्मृती दिन सोहळ्यात) जाणार नाही," असं अँकी स्पिट्झर रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. अँकी यांचे पती या हल्ल्यात मारले गेले होते.
म्युनिक स्पर्धांमध्ये खेळाडुंची सुरक्षा आणि सुरक्षेत झालेली चूक यामुळं नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी जर्मनीची असल्याचं, पीडितांच्या नातेवाईकांनी म्हटलं.
द टाइम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्टनुसार, "जर्मनीच्या नरसंहारानंतर लगेचच पीडितांच्या कुटुंबांना जवळपास 4.19 दशलक्ष (20 लाख डॉलर) दिले आणि 2002 मध्ये त्यांना आणखी 30 लाख युरो दिले."
नुकसान भरपाईबाबत एकमत
अनेक आठवड्यांच्या तणावपूर्ण चर्चेनंतर आणि जर्मनी नरसंहाराच्या 50व्या स्मृती दिनाच्या पाच दिवसांपूर्वी, गेल्या बुधवारी खेळाडुंच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून आणखी 28 दशलक्ष युरो देण्यावर एकमत झालं आहे.
इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इस्साक हरझोग यांनी जर्मनीच्या या पावलाचं स्वागत केलं आणि हे पाऊल महत्त्वाचं असल्याचं सांगितलं.
इस्रायलनं कायम 'रॅथ ऑफ गॉड' मोहीम त्यांनी राबवल्याचं कधीही मान्य केलेलं नाही. पण इस्रायल अण्वस्त्रांबाबत जशी उत्तरं देतं, तसंच हे उत्तर आहे, असं ब्रेनर म्हणतात.
"इस्रायलनं अण्वस्त्र तयार केली आहेत, हे इस्रायलमध्येही सर्वांनाच माहिती आहे, पण ते कधीही ते अधिकृतरित्या मान्य करत नाही. पण हे सर्वांना माहिती आहे, हेही त्यांना ठाऊक आहेच," असंही ब्रेनर म्हणतात.
"हे सर्व एखाद्या खेळासारखं आहे, जो खेळ त्यांना अगदी अनुकूल असा आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








