एकेकाळी लोकांच्या मनावर राज्य करणारी सोलापुरी चादर का मोजतीये अखेरच्या घटका?

फोटो स्रोत, BBC/Rahul Ransubhe
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी
- Reporting from, सोलापूर
"आता पहिल्यासारखं चादरीमध्ये काही उत्पन्न राहिलं नाही. पूर्वी 10 ते 15 वर्षांखाली आम्ही जी चादर 200 ते 250 रुपयांना विकत होतो त्याच भावामध्ये आजही विकतोय," हे शब्द आहेत सोलापूरचे चादर उत्पादक श्रीनिवास यनगंटी यांचे.
श्रीनिवास हे मागील 20 वर्षांपासून सोलापुरी चादरीचा व्यवसाय करतात. सोलापुरात त्यांचा छोटा चादर कारखाना आहे. पूर्वी ते स्वतःचा ब्रँड चालवायचे. मात्र आता ते त्यांच्या ब्रँडसोबतच इतरही ब्रँड्सना त्यांचे नाव टाकून देण्याचं काम करतात.
हीच परिस्थिती सध्या इथल्या अनेक चादर उद्योजकांची आहे. काहींनी आपले कारखाने बंद करून तिथे कार्यालयं उभारली आहेत. तर काहींनी त्यांच्या चादर कारखान्यात इतर उत्पादन बनवण्यास सुरू केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
पूर्वी वस्त्रोद्यागाचं माहेरघर म्हणून सोलापूर ओळखलं जातं होतं. त्यातही इथली 'जेकार्ड' चादर ही भारतात प्रसिद्ध होत्या.
या चादरींवरचे डिझाईन, आकर्षक रंगसंगती, तिची बनवण्याची पद्धत हीच या चादरीची वैशिष्ट्ये होती.
मात्र आता भारतातील काही राज्यांमध्ये या चादरींची नक्कल करून बनावट चादरी मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. शिवाय राजस्थानी बेडशिट आणि चीनचे ब्लँकेट यांमुळे या चादरीच्या उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे.
या लेखात आपण सोलापूरची चादर व्यवसाय डबघाईला का आला आहे हे पाहूयात.
सोलापूर चादरीची निर्मिती कशी झाली?
सोलापूरचे किसनराव क्षीरसागर यांना सोलापूरी चादरीचे जनक मानले जाते. सर्वांत पहिले 1956 च्या सुमारास त्यांनी पहिली जेकार्ड चादर बनवली होती.

आज सोलापुरात असलेल्या क्षीरसागर टेक्स्टाईलची सुरुवात त्यांनीच केली होती. आज त्यांची तिसरी पिढी या उद्योगात आहे. त्यांचे नातू शशीकांत क्षीरसागर सध्या क्षीरसागर टेक्स्टाईलची सर्व जबाबदारी पाहतात.
सोलापुरी चादर कशी निर्माण झाली याबद्दल ते सांगतात, "आमचे आजोबा किसनराव क्षीरसागर हे सोलापूरच्या एका मिलमध्ये जॉबर म्हणून काम करायचे. तिकडे त्यांचा मिलच्या मालकासोबत काही वाद झाला आणि ते तिथून बाहेर पडले. ही साधारण 1954-56 सालाची गोष्ट आहे. तर 1956 साली त्यांनी त्याच मिलमधले एक डिझाईन जे आज क्षीरसागरच्या नावाने ओळखलं जातं. ते डिझाईन त्यांनी पॅडल लूमवर 200 हुकाच्या जेकार्डवर तयार केलं आणि जी चादर 1956 ला तयार झाली ती आजता गायत अत्याधुनिक मशिन्सवर बनते."

पद्मशाली समाज आणि चादर व्यवसाय
1874 साली 'सोलापूर स्पिनिंग अँड विव्हिंग मिल' या नावाने सोलापुरात पहिली कापड गिरणी उभारण्यात आली.
त्यानंतर 'नरसिंग गिरजी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड', 'लक्ष्मी-विष्णू कॉटन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड', आणि 'जामश्री रणजितसिंगजी स्पीनिंग अँड विव्हींग मिल्स कंपनी लिमिटेड' या एकामागून एक अशा एकूण 4 कापड गिरण्या सोलापुरात सुरू झाल्या.

ब्रिटिश काळात सुरू झालेल्या कापड गिरण्यांमुळे सोलापूरलगत असलेल्या कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून अनेक कारागीर कुटुंबासह या शहरात स्थलांतरीत झाले. त्यामुळे सोलापूरात स्थलांतरितांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. यामध्ये आंध्रप्रदेशातील (सध्याचे तेलंगणा) पद्मशाली समाज मोठ्याप्रमाणात सोलापुरात आला.

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/BBC
पद्मशाली समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा विणकामाचा असल्याने त्यांनी येथे लवकरच या शहरात आपलं बस्तान बसवलं.
पुढे या कापड गिरण्या बंद पडल्यानंतर या समाजाने स्वतःचे कारखाने सुरू करण्यास सुरूवात केली. आज सोलापूरात चादर व्यवसायात असलेल्यांपैकी 80 टक्के लोक ही पद्मशाली समाजातीलच आहेत.
चादरीचं अस्तित्व धोक्यात?
या चादरीची लोकप्रियता एवढी वाढली की ही चादरच सोलापूरची ओळख बनली आणि 2005 ला महाराष्ट्रातील पहिलं जीआय मानांकन या चादरीला देण्यात आलं.
अशा या प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या सोलापूरच्या चादरीला आज स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी का धडपडावं लागतंय.
हे कारण जाणून घेण्यासाठी आम्ही सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांना भेटलो. त्यांना आम्ही याबाबत विचारले.
गड्डम सांगतात, "सोलापूरच्या चादरीची मागणी वाढत असल्याने याची नक्कल करण्यास सुरूवात झाली. तामिळनाडूमध्ये इरोडखरूर आणि हरियाणातलं पानीपत तिथे सोलापूरच्या चादरीप्रमाणेच चादर निर्मितीला सुरूवात झाली. त्यांच्या चादरीचा दर्जा हा सोलापुरी चादरींपेक्षा कमी आहे."

"तसेच त्या सोलापूर चादरीच्या तुलनेत हलक्या आहेत. सोलापुरात चादर 100 टक्के कॉटनमध्ये बनवल्या जाते. परंतु ते लोक यामध्ये सिंथेटिक धागा वापरून हलक्या प्रतीची चादर बनवू लागले. शिवाय त्या चादरीवर सोलापूरचे नाव टाकून ते अगदी कमी किंमतीमध्ये बाजारात विकू लागले. यामुळे या राज्यांची स्पर्धा निर्माण झाली."
"आजची जर स्थिती पाहिली तर पूर्वीच्या तुलनेत 25 टक्केच चादरीचं उत्पादन राहिलंय. 75 टक्के उत्पादनात घट झालीये."
तर याच संदर्भात चाटला टेक्स्टाईलचे मालक गोवर्धन चाटलांशीही आम्ही संवाद साधला.
ते म्हणाले, "आताची जी नवीन पिढी आहे ते ब्लँकेट्स, दोहार किंवा रजई वापरतात. यामुळे जो ग्राहक आहे तो वळाला आहे. त्याच बरोबर हरियाणा आणि तामिळनाडूच्या चादरी आहेत, त्यावर सोलापूर नाव टाकूनच त्या विकल्या जातात. त्यांचा दर्जा तितका चांगला नसतो. परंतु सोलापूर नाव टाकले असल्याने ग्राहक त्या घेतो."
"मात्र त्याची क्वालिटी चांगली नसल्याने ग्राहकामध्ये आपण फसल्याची भावना येते आणि सोलापूर चादरीचे नाव खराब होते. त्यामुळे पूर्वी ज्या प्रकारची मागणी असायची ती थोडीशी कमी झाली आहे."

यामुळे अनेक कारखानदार आता चादरीचा व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायात वळाले आहेत. काहींनी कारखान्याला लग्न कार्यालयात बदललंय. तर काही जण बांधकाम व्यवसायात वळाले आहेत. परंतु ज्यांना सोलापूरची चादर टिकावी असं वाटतंय ते अजूनही या व्यवसायात टिकून आहेत.
परंतु त्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये सर्वांत पहिली अडचण ही कामगारांची आहे. तरुणपीढी या व्यवसायात येण्यास इच्छूक नाही असं उद्योजक सांगतात.
यनगंटी सांगता, "आता मोठे ब्रँड काय करतात, तर छोटे कारखानदार जे असतात त्यांच्याकडून ब्रँडचं नाव टाकून घेतात. कारण त्यांच्याही शोरुमला आता पहिल्यासारखं गिऱ्हाईक राहिलं नाही. आता लोकांना युज अँड थ्रो पाहिजे, हलकं पाहिजे. मग ते पॉलिस्टर असो की काही असो. पहिल्यासारखं कॉटनला मागणी नाहीये. आता आमच्या ब्रँडला मागणी नसल्याने आम्ही बाकी कुणाचे नावं टाकायचे असतील तर त्यांची नावं टाकून त्यांना देऊ शकतो."
प्रशिक्षित कामगारांची कमतरता
सोलापूरच्या चादरीला स्पर्धेसोबतच अजून एक प्रश्न भेडसावत आहे. तो म्हणजे कारागिरांचा. सध्या सोलापुरातील उद्योजकांना प्रशिक्षित कारागिरांची मोठी समस्या भेडसावत आहे. त्यामुळे अनेकवेळा कारखान्यांचे काम बंद ठेवावे लागत असल्याचं उद्योजक सांगतात.

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/BBC
चाटला सांगतात, "सोलापुरात जे आमचे पद्मशाली तेलगू भाषक लोक आहेत हे तेलंगणामधून आलेले आहेत. तेलंगणामधून येताना त्यांनी आपल्यासोबत विणण्याची कला आणली. तेव्हा हातमागावरील विणण्याची कला आम्ही दाखवली. त्यानंतर आता हातमागाची कला पॉवरलूमने घेतली."
"आता हे जे काम आहे, कौशल्यावर आधारित काम आहे. या व्यवसायात स्किल लेबर नवीन तयार होत नाहीये. जे आहेत ते जुने आहेत. जी वयस्कर होत आहेत तेच लोक आहेत. नवीन पिढी यामध्ये येत नाहीये."
तर श्रीनिवास यांनाही ही समस्या भेडसावत आहे. ते सांगतात "आता कामगारही पूर्वीसारखं कोणी मिळत नाही. जे पूर्वीचे कामगार आहेत तेच काम करत आहेत. आम्ही जो पर्यंत चालवतो तोपर्यंत हा कारखाना चालवणार. आमची मुलं आहेत ती शिकलेली आहेत. ते त्यांच्या हिशोबाने जाणार. ते या व्यवसायात यायला नको म्हणतात. यामध्ये काही राहिलं नाही. एवढं भांडवल टाकून उत्पन्न नाही."
निक जोनसचा सोलापूर चादरीचा शर्ट
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांचे पती निक जोनस यांनी 2021 मध्ये सोलापूर चादरीचा शर्ट घातलेला फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला होता. त्यावेळी त्याची चांगलीच चर्चा झाली होती.
विशेष म्हणजे त्याने वापरलेली चादर ही चाटलांचीच होती. त्यामुळे गोवर्धन चाटला या चादरीच्या माध्यमातून फॅशन इंडस्ट्रीत काही करता येतंय का या विचारात आहेत.

फोटो स्रोत, Instagram @nickjonas
याविषयी सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो. ते म्हणाले "मी कधीही असा विचार केला नव्हता की, सोलापूर चादरीचा वापर एक जॅकेट म्हणूनही होऊ शकतो. तर सोलापूर चादरीचा उपयोग फक्त पांघरण्याकरता न होता एक फॅशन म्हणूनही होतोय."
"परवाच एका लग्नासाठी त्या कुटुंबाने सोलापूर चादरीचा जॅकेट आवर्जून बनवून घेतला. तर हा ॲक्सेप्टन्स येतोय. जर एक प्रकारे लोक हे स्वीकारत असतील तर आम्ही उद्योजक म्हणून त्यात काय नावीण्य देता येईल याचा विचार करतोय," चाटला सांगतात.
1990 च्या दशकात सोलापुरात 8000 चादरींचे कारखाने होते. यातून वर्षाला 700 कोटींच्या चादरींचे उत्पादन होत होते.
मात्र ही संख्या कमी होऊन आज केवळ 2000 च्या जवळपास चादर कारखाने उरले आहेत. तर यांमधून 100 ते 125 कोटींचे उत्पादन होत आहे.
तसंच पूर्वी 30 हजार कामगारांना रोजगार मिळायचा तो आज केवळ 5 हजारांवर आला आहे. या सर्व अडचणींमुळे अनेक कारखानदारांनी चादरीचं उत्पादन बंद करून टॉवेल बनवण्याकडे लक्ष दिलं आहे.
टॉवेल उत्पादनाकडे वाटचाल
शशीकांत क्षीरसागर यांनीसुद्धा आता चादरींसोबतच टॉवेलही बनवायला सुरूवात केलीये.
"आम्ही 56 मशीन बसवल्या आहेत मात्र आता फक्त 28 मशीन चालू आहेत. पण चांगली गोष्ट ही आहे की या मशीनवरही टेरी टॉवेल बनतं. ज्याला टर्किश टॉवेल म्हणतात. आणि हा माल पूर्ण भारतात विकला जातो. यालाही मार्केटमध्ये चांगली मागणी आहे."
एकूणच सोलापूरच्या चादरींच्या उलाढालीविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांची भेट घेतली.

फोटो स्रोत, BBC/Rahul Ransubhe
राजू राठी यांचा स्वतःचा टॉवेलचा व्यवसायही आहे. त्यांना चादरीच्या सद्यस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले, "हा व्यवसाय कमी व्हायला लागला म्हणून काही काही लोकांनी उत्पादन बदललं. गावाकडे सगळीकडे टेरी-टॉवेलला जास्त मागणी होती त्यामुळे ते सर्व तिकडे वळाले. त्या लूमवरच आम्हाला टेरीमोशन लावून ते करता आलं. त्यामुळे आम्ही जेकॉर्डमध्ये टॉवेलचं उत्पादन चांगल्या पैकी घेत आहोत. आज एवट्या सोलापूरमधून 800 ते 900 कोटींचे टॉवेल एक्स्पोर्ट होतात."
परंतु सोलापूर चादर एक्सपोर्ट होते का? हे विचारले असता त्यांनी
"चादर पूर्वी एक्स्पोर्ट व्हायची मात्र आता होत नाही," असं उत्तर दिलं.

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/BBC
सोलापूरची ओळख असलेली चादर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. उद्योजक स्पर्धेत टिकण्यासाठी चादर निर्मितीत काही बदल करता येतील का हे तपासत आहे. तर दुसरीकडे सरकारनेही या उद्योगाला पूनरूज्जीवन मिळावं यासाठी काही विशेष योजना आणाव्यात अशी मागणी उद्योजक करत आहेत आहे.
महाराष्ट्रातील पहिलं जीआय मानांकन मिळालेल्या या सोलापूरी चादरीचा अस्तीत्व टिकवण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणं गरजेचं आहे.
(बीबीसीसाठी कलेकिक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











