सोलापूरमध्ये गरिबांची कडक भाकर अशी बनली महिलांसाठी कमाईचं साधन

लक्ष्मी बिराजदार

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/BBC

फोटो कॅप्शन, लक्ष्मी बिराजदार
    • Author, राहुल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी

काही दशकांपूर्वी गरीबांचे अन्न असलेली ज्वारीची भाकर आज श्रीमंतांच्या जेवणातील मुख्य पदार्थ बनत आहे. याचे कारण म्हणजे ज्वारीमध्ये असलेले शरीरास उपयोगी गुणधर्म.

त्यामुळेच अनेक आहार तज्ज्ञ दैनंदिन आहारात ज्वारीचा वापर करण्याचा सल्ला देतात. यामुळेच आता ज्वारीला आणि ज्वारीच्या पदार्थांकडे लोकांचा कल वाढत आहे.

महाराष्ट्रातील सोलापूर हे शहर ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. ज्वारी हे भरडधान्य असून याचे उत्पादन सोलापूरात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

याच ज्वारीपासून बनलेल्या कडक भाकरी आज लोकांच्या पसंतीस तर उतरत आहेतच, याशिवाय या भाकरींनी येथील महिलांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करून दिल्या आहेत.

ही रोजच्या जेवणात वापरल्या जाणारी ही भाकर आज कशाप्रकारे इथल्या महिलांचं आयुष्य बदलत आहे हे जाणून घेणारा हा रिपोर्ट.

सोलापूरातील शेळगी येथील शिवगंगानगरात येथील लक्ष्मी बिराजदार या मुळच्या दौंडच्या. त्यांनी नववीपर्यंत शिक्षण घेतलं. मात्र त्यानंतर त्यांना शाळा सोडावी लागली.

2001 ला त्यांचा विवाह झाला आणि त्या सासरी शेळगी येथे आल्या. आपण काही तरी करावं असा त्यांच्या मनात विचार सुरू होता.

लग्नानंतर त्यांनी ट्यूशन घेण्यास सुरुवात केली. 2011 पर्यंत त्यांनी ट्यूशन घेतल्या मात्र आपण काही तरी व्यवसाय करावा हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.

त्यामुळे त्यांनी आपल्या स्वयंपाकाच्या कलेतच व्यवसाय करायचं ठरवलं आणि कडक भाकरीचा व्यवसाय करण्याचे ठरवले.

2012 ला त्यांनी कडक भाकरीच्या व्यवसायाला सुरुवात केली. परंतु सुरुवातीला त्यांना खूप अडचणी आल्या.

त्याबद्दल लक्ष्मी सांगतात, "हा व्यवसाय आम्ही पन्नास भाकरी पासून स्टार्ट केला आहे. सुरूवातीला आम्ही दोघींनी मिळून हा व्यवसाय चालू केला. आणि या भाकरी विकायला घेऊन गेलो. भाकरी घेऊन गेल्यावर लोक म्हणायला लागले की, भाकरी कोणी विकतंय का? घरातल्या शिळ्या भाकरी कोणी खात नाही तर तुमच्या या शिळ्या भाकरी कोण खाईल का? तेव्हा मी म्हणाले तुम्ही ठेवून तरी बघा, तेव्हा त्यांनी नकार दिला."

"आम्ही खूप विनंती केल्यावर त्यांनी त्यांच्या दुकानात भाकरी ठेवल्या. दोन दिवसात ते 10 पाकीटं विक्री गेले. त्यानंतर ते स्वतःहूनच आम्हाला 20 पाकीट पाहिजे, 30 पाकीट पाहिजे असं सांगू लागले. तर आज मला दररोज 1000-2000 पाकिटांची ऑर्डर असते."

घर

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/BBC

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हळूहळू ऑर्डर वाढू लागल्यानंतर त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिलांचेही प्रमाण वाढले. 2013 मध्ये सुरू झाला संतोषीमाता गृहउद्योगची सुरुवात केली.

दोन महिलांपासून सुरू झालेल्या या व्यवसायात आता 20-25 महिलांना रोजगार मिळालाय. तर या व्यवसायातूनच लक्ष्मी महिन्याला 50-60 हजारांचा निव्वळ नफा कमावत आहेत. त्याच्या कुटुंबियांचीही या व्यवसायात त्यांना खूप मदत मिळते.

त्यांचे पती सुरेश बिराजदार हे स्कूल वॅन चालक आहेत. ते या भाकरीच्या डिस्ट्रीब्यूशनचं काम पाहातात. तर मुलगा निखिल आणि मुलगी निकिता हे मार्केटींग आणि इतर गोष्टी पाहातात. लक्ष्मी यांच्या भाकरींना महाराष्ट्रभरातून मागणी आहे. तसेच त्यांच्या भाकरी अमेरिकेपर्यंतही पोहोचल्या आहेत.

लक्ष्मी यांच्या प्रमाणेच सोलापूरच्या शिंगडगाव येथील अंबिका म्हेत्रे यांनीही कडक भाकरीच्या व्यवसायातून स्वतःचे आणि गावातील इतर महिलांचे आयुष्य बदलले आहे.

अंबिका सुरुवातीला दुसऱ्यांच्या शेतावर मजूरी करायला जायच्या आणि कधी कधी हुरडा पार्टीसाठी हाताने कडक भाकरी बनवून द्यायच्या.

त्या सांगतात, "सुरूवातीला त्या 250-3000 भाकरी हाताने बनवायच्या. मात्र हळू हळू मागणी वाढू लागल्यानंतर मी पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत दीड लाखाचे लोन घेऊन भाकरी बनवण्याची मशीन घेतली आणि आज या मशीनच्या साह्याने मी दिवसाला 1000-4000 भाकरी बनवते."

अंबिका यांनी या व्यवसायाच्या माध्यमातूनचार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

अंबिका या ज्वारीसोबतच बाजरी, नाचणी आणि मक्याच्याही भाकरी बनवतात. तर या व्यवसायातून त्या महिन्याला 40 हजारांपर्यंत उत्पन्न कमावतात.

अंबिका म्हेत्रे

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/BBC

फोटो कॅप्शन, अंबिका म्हेत्रे

सोलापूरात या भाकरी ढाबे, हॉटेल, किराणा दुकानं तसेच लग्न समारंभ, पार्टी्ज, स्नेहसंमेलनात आपल्याला आवर्जून पाहायला मिळतात.

या भाकरींच्या माध्यमातून सोलापूरात नवनीन डिशेसही तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मसाला भाकर, कडक भाकरीचा चिवडा, कडक भाकर पिझ्झा यासारख्या अनेक डिशेसचा समावेश आहे.

मात्र रोजच्या दैनंदिन जीवनातील भाकरीने व्यवसायाचं रुप कसं बरं धेतलं असेल असा प्रश्न सर्वांनाच पडतो. तो आम्हालाही पडला आणि याचे उत्तर शोधण्यासाठी आम्ही सोलापूरच्या वालचंद महाविद्यालयातील इतिहासाचे प्राध्यापक आणि सोलापूर जिल्हाचे अभ्यासक प्रा. चंद्रकांत चव्हाण यांना भेटलो.

प्रा. चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्याचे शिल्पकार नावाचे एक पुस्तक लिहिले असून यामध्ये सोलापूरातील 30 कर्तबगार स्त्री पुरुषांचा आढावा घेतला आहे.

सोलापूर जिल्हाचे अभ्यासक प्रा. चंद्रकांत चव्हाण

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/BBC

फोटो कॅप्शन, सोलापूर जिल्हाचे अभ्यासक प्रा. चंद्रकांत चव्हाण

ते सांगतात, "सोलापूरमध्ये अलिकडच्या कालखंडामध्ये तुळजापूर असेल, अक्कलकोटचं स्वामी समर्थांचं मंदिर असेल, पंढरपूर असेल ही जी काही देवस्थानं आहेत या देवस्थानांमुळे धार्मिक पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. आणि मग या पर्यटकांसाठी किंवा आठवड्यासाठी, पंधरा दिवसांसाठी बाहेर दूर प्रवासाला जायचं आहे तर याकाळात शिदोरी म्हणून ही टिकाऊ अशी कडक भाकरी घेऊन जाण्याची पद्धत आहे. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून कडक भाकरी निर्मितीचा व्यवसाय हा सोलापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आणि त्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला."

"आज सोलापूरात कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्हाला कडक भाकरी पाहायला मिळते. इतकच काय तर किराणा दुकानांमध्येही आता कडक भाकरी विक्रीला ठेवलेल्या दिसतात. आज भाकरी हा केवळ खाण्याचा भाग न राहता आहाराचा भाग न राहाता तो व्यवसायाचा भाग कधी बनला हे आम्हा सोलापूरकरांनाही कळालं नाही."

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

सोलापूरच्या उद्योगवर्धिनी या संस्थेच्या म्हणण्यानुसार कडक भाकरीच्या या व्यवसायात सोलापूर जिल्ह्यांमध्ये महिलांचे साधारण 1200 बचतगट आहेत तर यामाध्यमातून दिवसाला 50 हजार कडक भाकऱ्या तयार केल्या जातात, आणि त्यातील वीसेक हजार भाकऱ्या हातावर थापल्या जातात.

या व्यवसायाने इथल्या दोन हजार महिलांना रोजगार दिलाय. याशिवाय या भाकरी महाराष्ट्रभर विक्रीसाठी पाठवल्या जातात.

या भाकरीच्या लोकप्रियतेचे अजून एक कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि लोकांची आरोग्याविषयीची जागरूकता यामुळेही ज्वारी खाण्यावर जास्त भर दिला जातो. तसंच अनेक आहार तज्ज्ञ पौष्टीक आहारासाठी ज्वारीचा अन्नामध्ये उपयोग करण्याचा सल्ला देतात.

भारताने 2018 हे वर्ष मिलेट्सच वर्ष म्हणून ज़ाहिर केलं होतं. 2023 हे वर्ष जागतिक मिलेट्स वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्र संघानेही जाहिर केलं होतं.

भारतात भारतात पाच प्रकारचे मिलेट्स उपलब्ध आहेत. त्यात पहिल्या क्रमांकावर ज्वारी येते. तर बाजरी, नाचणी, वरई आणि कोद्रा हे चार बाकीचे प्रकार आहेत.

ज्वारीचे फायदे

ज्वारीही ग्लूटनमुक्त असते. ज्वारीमध्ये ब जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, आणि जस्त यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यासोबतच यात असलेले फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रथिने आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. ज्वारीमध्ये असलेले व्हिटॅमिन बी पचनसंस्थेसाठी फायदेशिर आहे आणि मज्जातंतू पेशींच्या विकासास मदत करते.