बार्शीच्या शेतकऱ्याची देशात सरशी, सीताफळाच्या वाणाचं मिळवलं पेटंट

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/BBC
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी
सोलापुरातील बार्शी हे गाव आता नव्याने ओळख निर्माण करत आहे. बार्शी हे भगवंताच्या मंदिरासाठी ओळखले जाते. मात्र, आता त्याची नवी ओळख म्हणजे एनएमके गोल्डन सीताफळामुळेही (NMK Golden) बनतेय.
बार्शीतले शेतकरी नवनाथ कसपटे यांनी शोधलेल्या NMK Golden या सीताफळाच्या वाणाला भारतातलं पहिलं पेटंट मिळालं आहे. केंद्र सरकारच्या 'प्रोटेक्शन ऑफ प्लान्ट व्हरायटी ॲंड फार्मर्स राईट्स' यांच्याकडून 2019 ला त्यांना हे पेटंट देण्यात आलंय.
NMK या नावाचा अर्थ म्हणजे 'नवनाथ मल्हारी कसपटे' या नावाची आद्याक्षरे आणि या सीताफळचा रंग काहीसा सोनेरी असा असल्यामुळे 'गोल्डन' या अर्थाने एनएमके गोल्डन असं या वाणाला यांनी नाव देण्यात आलंय.
या सीताफळाने कसपटे यांना देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात ओळख मिळवून दिली आहे. आज त्यांच्या मधुबन नर्सरीमधून हे सीताफळ संपूर्ण भारतासोबतच दुबई, मस्कत आणि युरोपातही निर्यात होत आहेत.
सीताफळ हे केवळ बांधावर येणारं किंवा जंगलात येणारं फळ आहे. मात्र, याच फळाला बांधावरून शेतात आणून त्याची फायदेशीर शेती करण्याचा प्रयोग कसपटे यांनी यशस्वीपणे करून दाखवला. आज एकरी 12 लाखांपर्यंत उत्पन्न ते सीताफळ शेतीतून मिळवतात.
कसपटे यांना शेतीची आवड असल्याने ते सतत शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात. या प्रयोगशील वृत्तीतूनच त्यांनी क्रॉस पॉलिनेशन पद्धतीतून 3000 हून अधीक सीताफळांच्या जाती विकसित केल्या आहेत. तर यातील 30-40 जातींवर त्यांचे संशोधन सुरू आहे. मागील 45 वर्षांपासून सीताफळाची शेती करणाऱ्या कसपटे यांच्याकडे सीताफळाबाबतीत खूप मोठा अनुभव व ज्ञान आहे. याच अनुभवाच्या जोरावर सीताफळाचं उत्पादन 12 ही महिने कसं घेता येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
त्यांच्याशी बोलताना त्यांचं सीताफळावरील प्रेम हे स्पष्टपणे जाणवतं. ते म्हणतात "सीताफळ हे माझ्यासाठी वरदानच आहे. सीताफळाचं काही वेगळं वाण सापडलं अस आज सुद्धा कोणी सांगितलं की, आम्ही लगेच ते पाहण्यासाठी तिकडे जातो. ते शिकून घेतो, समजून घेतो. कारण एखाद्याने आपलं आयुष्य घातलं असतं आणि आपण ते तासा अर्ध्या तासात ती माहिती घेत असतो. परंतु, ते घेण्यासाठी नशीब पाहिजे आपल्याकडे, आपण तेवढा वेळ दिला पाहिजे."

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/BBC
फुलवली द्राक्षांची बाग
नवनाथ यांचं शिक्षण दहावीपर्यंतच झालंय. 1975 साली 10 वी पास झाल्यानंतर त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. आज सीताफळाच्या शेतीसाठी ओळखले जाणारे कसपटे यांनी सुरुवातीला द्राक्षांची शेती केली आणि त्यामध्येही त्यांनी चांगलं उत्पन्न मिळवल्याचं ते सांगतात.
"1985 ला आम्ही शेतात बोअर मारले. त्याला भरपूर पाणी लागले. ते पाहून मी द्राक्ष शेतीकडे वळलो. मी एक एकरात द्राक्षबाग लावली होती. द्राक्षांची गुणवत्ता पाहाता मला पहिल्या वर्षापासूनच एक्स्पोर्टचा व्यापारी मिळाला. तसंच मला सोलापूर जिल्हातील सर्वात जास्त द्राक्ष निर्यातीचा म्हणून बहुमानही मिळला होता. परंतु द्राक्षांना खूप पाणी लागायचं आणि आमच्या आसपास खूप बोअरवेल झाले त्यामुळे पाणी विभागलं गेलं. याचा परिणाम म्हणजे आज आम्हाला इथं पिण्यालाही पाणी नसतं. आम्हाला टँकर मागवावा लागतो. तेव्हा अशा परिस्थितीत आम्हाला द्राक्षाची शेती करणं कठीण झालं. तेव्हा आम्ही सीताफळाकडे वळालो आणि सीताफळातही द्राक्षाएवढे पैसे मिळतात हे आम्हाला लक्षात आलं."
जेव्हा NMK Golden व्हरायटी मिळाली
सीताफळाच्या शेतीकडे वळाल्यानंतर त्यांनी त्यामध्येही प्रयोग करण्यास सुरुवात केली आणि आजतागायत ती सुरू आहे. कसपटे यांनी त्यांच्या 80 एकर क्षेत्रापैकी तब्बल 22 एकर जमीन ही केवळ सीताफळाच्या प्रयोगासाठी सोडली आहे. तर इतर जागेत ते सीताफळाची शेती आणि नर्सरी आहे.
ते सांगतात, "2001 साली मला NMK Golden व्हरायटी मिळाली. त्या व्हरायटीवर आम्ही हळूहळू प्रयोग करत गेलो. कशी दिसते, काय होतंय, किती टिकते हे पाहाण्यासाठी माझे 10-11 वर्ष त्यात गेले. त्यानंतर माझ्या डोक्यात पेटंट घ्यावा असा विचार आला."
"2001 सालीच कायदा आला होता. त्यामुळे त्याबद्दल जास्त काही माहिती उपलब्ध नव्हती. मी 2014 ला पेटंटसाठी अर्ज केला. तेव्हा ते अधिकारी म्हणाले की, पेटंटच्या अधिसुचीमध्ये तुमच्या सीताफळाचे नावच नाहीये. द्राक्ष, केळी, आंबा, पेरु या फळांची नावं आहेत. मात्र सीताफळाचं नाव आमच्याकडून टाकायचं राहून गेलंय. हे सीताफळाचं नाव समाविष्ट करण्यासाठी मला पुन्हा दोन वर्षे वाट पाहावी लागली. त्यानंतर 2019 ला मला सीताफळाचे पेटंट मिळाले."

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/BBC
काय आहेत NMK Golden सीताफळाची वैशिष्ट्ये
या सीताफळाचे वैशिष्ट्याबद्दल कसपटे सांगतात, "यामध्ये नंबर एक क्वालिटीच्या फळांचं प्रमाण खूप जास्त आहे. जवळजवळ 70 टक्के फळं ही एक नंबरची निघतात. यामध्ये 350 ग्रॅम सरासरी वजन निघते. NMK Golden मध्ये बिया कमी आहेत. दिसायलाही गोल्डन रंगाचं, डोळे मोठे, आकर्षक आहे. मार्केटला बाय रोड 6-7 दिवसात कुठेही देशाच्या कानाकोपर्यात पाठवता येते. याची किपींग क्वालीटी चांगली असल्यामुळे, देखणं असल्यामुळे याला चांगलं मार्केट मिळतं."
"मार्केटमध्ये आता जेवढी सीताफळं दिसतात त्यातली 80 ते 90 टक्के सीताफळं NMK Golden हीच दिसतात. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये म्हणजे कन्याकुमारी पासून ते थेट काश्मीरपर्यंत जेवढे सीताफळं दिसतात ते आपण काढलेल्या NMK Golden या व्हरायटीचेच आहेत," असा दावा कसपटे करतात.
सीतफळाचे वैशिष्ट्यचं बनले अडचण
मात्र, या सीताफळाचे वैशिष्ट्यच यासाठी मोठी अडचण ठरली आहे. कारण या सीताफळामध्ये पांढरी आळी निघण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत.
याबाबत विचारले असता कसपटे म्हणाले, "ही गोष्ट खरी आहे की NMK Golden मध्ये अळी निघण्याचं प्रमाण जास्त आहे. परंतु ही आळी कुठल्याही सीताफळामध्ये ही होऊ शकते. परंतु बाळानगर अथवा इतर सीताफळांची टिकवण्याची क्षमता ही एक ते दोन दिवसच इतकीच असते. त्यामुळे लोक खाताना ती फ्रूट फ्लायच्या अंड्यासकट खातात. ती अंडी उबवण्याचा वेळ त्यांना मिळत नाही. त्यामुळे ती दिसून येत नाही. मात्र NMK Golden या सीताफळाची टीकवण क्षमता 6-7 दिवस असल्याने फ्रूट फ्लायची अंडी उबवण्याला वेळ मिळतो आणि परिणामी सीताफळामध्ये अळी दिसून येते."
पुढे ते सांगतात, "योग्य उपाययोजना केली तर या किडीचा नायनाट करता येतो. थोडी मेहनत आणि संयम ठेवलातर कोणीही सीताफळाची शेती यशस्वीपणे करू शकतं. आज NMK Golden च्या माध्यमातून आम्ही वर्षाला जवळपास एक कोटी एवढं उत्पन्न मिळवतो. तर सिझन चांगला असला तर हे उत्पन्न 7-8 कोटींएवढंही आम्हाला मिळालं आहे. आमच्याप्रमाणेच इतर शेकऱ्यांनाही या सीताफळाने लक्षाधीश बनवलं आहे."
या किडीबाबत आम्ही राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. वाळूंज यांना विचारले असता ते म्हणाले, "महाराष्ट्रात जी काही कोरडवाहू पिके घेतली जातात त्यामध्ये, सीताफळ, डाळींब, आवळा, जांभूळ, बोअर ही पीके प्रामुख्याने येतात. या सर्वांना कीडीचा धोका असतोच. त्यामुळे फक्तत NMK Golden लाच कीड लागते असे म्हणता येणार नाही. याशिवाय सध्याचे बदलते हवामान यामुळेही फळांवर कीड लागण्याची शक्यता वाढली आहे. मात्र योग्य फवारणी केली असता या कीटकांपासून पिकांना वाचवता येऊ शकते."

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/BBC
सीताफळावरील संशोधनात 'डॉक्टरेट'
कसपटे यांच्या सीताफळावरील कार्यासाठी त्यांना 2015 मध्ये केंद्र सरकारचा पीक वाण संरक्षणाचा 'प्लँट जिनोम सेव्हीयर फार्मर' हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तर त्यांच्या 'एनएमके 1 गोल्डन'च्या संशोधनाबद्दल बेंगळुरूच्या नॅशनल व्हर्चुअल युनिव्हर्सिटी फॉर ॲग्रो एज्युकेशनकडून डॉक्टरेटही मिळाली आहे.
तर 2021 साली किंगडम ऑफ टोंगा या देशाच्या माकंगा राष्ट्रकुल विद्यापीठाने 'नवीन सत्यता विकासासाठी मानद डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी दिली आहे, तर NMK Golden या व्हरायटीवर पंजाबच्या मोहाली विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने 3 वर्ष कसपटे यांच्या शेतामध्ये राहून पीएचडी केलीये.
दुष्काळी भागात सीताफळ शेती फायदेशीर
कसपटे हे त्यांच्या मधुबन नर्सरीमार्फत या NMK Golden च्या रोपांची विक्रीही करतात. तसंच सीताफळ शेती कशी करावी याचं एक दिवसांच विनाशुल्क ट्रेनिंगही शेतकऱ्यांना देतात. सीताफळ शेतीला पाणी जास्त लागत नाही. त्यामुळे दुष्काळी भाग आणि जीथे पाऊस कमी पडतो अशा शेतकऱ्यांनी ही फायदेशीर शेती करावी असं ते सांगतात.
"सीताफळाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय आहे, तर उन्हाळ्यातील जानेवारी ते जून ही सहा महिने या झाडांना अजिबात पाणी द्यायचं नाही. जसं एखाद्या माणसाला 24 तासांमध्ये 8 तास झोपेची गरज असते. तसंच याचं सुद्धा वैशिष्ट्य आहे की, एक वर्षामध्ये 6 महिने याला झोपेची गरज आहे आणि या झोपेच्या काळामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्ब करायचा नाही. गाढ झोप होऊ द्यायची. याला पाणी द्यायचं नाही. खत द्यायचं नाही. औषध द्यायचं नाही. कुठल्याही प्रकारची मशागत करायची नाही. स्प्रे करायचा नाही. काहीही करायचं नाही. जैसे थे.. आता तर पाऊस संपलाय. आणखी एक महिना पाणी कुठेही असतं. यामुळे मला सीताफळाकडे वळता आलं."
आणखी चार वाणांचे पेटंट
NMK Golden नंतर अजून चार सीताफळांची वाण त्यांनी पेटंटसाठी पाठवले आहेत.
या प्रत्येक वाणाच्या वाणाचा त्यांनी तीन वर्षे बारकाईने अभ्यास केला आहे. त्याची गुणधर्म, त्याचा आकार, चव या सर्वांचे परिक्षण केल्यानंतर त्यांनी यांचा पेटंटसाठी विचार केला आहे. यामध्ये सीतारामफळ, समृद्धी, सुंदर आणि आर्वी या चार वाणांचा समावेश आहे.
यामधील आर्वी हे वाण ऑफ सिझनला ज्यावेळी बाजारात एकही सीताफळ राहाणार नाही त्यावेळी म्हणजेच उन्हाळ्याच्या काळात ही या फळांचं उत्पादन घेता येणं शक्य आहे. म्हणजेच आता सीताफळाचं उत्पादन 12 ही महिने घेणं शक्य होईल असा दावा नवनाथ कसपटे करतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)









