‘तुझ्यात जीव रंगला’फेम अभिनेत्री कल्याणी जाधवचा अपघाती मृत्यू, नेमकं काय घडलं?

'तुझ्यात जीव रंगला' या दूरचित्रवाणी मालिकेत राधा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हिचा कोल्हापुरात अपघाती मृत्यू झाला आहे.

कल्याणीने कोल्हापूर-सांगली महामार्गावर नुकतेच एक हॉटेल सुरू केलं होतं. शनिवारी (12 नोव्हेंबर) रात्री हे हॉटेल बंद करून बाहेर पडत असताना कल्याणीला एका ट्रॅक्टरने धडक दिली.

या धडकेत कल्याणीचा जागीत मृत्यू झाला असून या घटनेची नोंद शिरोली MIDC पोलीस ठाण्यामध्ये झाली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी दिली आहे.

कल्याणी जाधवने 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेसह स्टार प्रवाहावरील 'दख्खनचा राजा ज्योतिबा' आणि सन मराठीवरील 'सुंदरी' या मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. शिवाय, ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय होती.

कल्याणी जाधव ही मूळची कोल्हापूरची आहे. ती कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात राहते.

अभिनयातून वेळ काढून कल्याणीने नुकतेच कोल्हापूरमधील सांगली फाटा परिसरात हालोंडी येथे 'प्रेमाची भाकरी' नावाचं स्वतःचं नवं हॉटेल सुरू केलं होतं. या हॉटेलचं काम ती स्वतः पाहत होती.

मात्र, शनिवारी रात्री हॉटेल बंद करून कल्याणी आपल्या नातेवाईकांसोबत बाहेर पडली. नातेवाईक हे रिक्षामधून तर कल्याणी आपल्या दुचाकीवरून निघाली होती.

काही अंतरावर गेले असता तोल जाऊन कल्याणी हिची दुचाकी जोरात चालत्या ट्रॅक्टरला धडकली.

कल्याणीला रुग्णवाहिकेतून तत्काळ कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी कळवलं.

'प्रेमाची भाकरी' हॉटेल आणि कल्याणी जाधवमध्ये एक भावनिक नातंही होतं. एका आठवड्यापूर्वीच कल्याणी जाधवने आपला वाढदिवस साजरा केला होता. तो दिवसही तिने हॉटेलमध्येच घालवला होता.

आपल्या वाढदिवसानिमित्त कल्याणीने सोशल मीडियावर भाकरी थापतानाचा एक व्हीडिओ शेअर केला.

ही पोस्ट करत तिने लिहिलेलं, 'काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला... मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली... मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्या कडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत .. मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या...'

कल्याणी जाधवने केलेली ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)