You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'महाराष्ट्राची हास्यजत्रे'ची टीम म्हणते- 'आम्ही आता थांबतोय, पण....'
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गेली साडेतीन वर्षं खळखळून हसवणारा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम काही काळासाठी ब्रेक घेत आहे... त्यामागचं कारण काय? ही जत्रा पुन्हा कधी प्रेक्षकांसमोर येणार? या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेली लॉली, मामा, यांच्यासारखी कॅरेक्टर्स कशी सापडली?
हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही हास्यजत्रेच्या टीमला भेटलो. बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी निर्माते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक आणि निर्माते सचिन मोटे, अभिनेता प्रसाद खांडेकर, अभिनेता गौरव मोरे, अभिनेता ओंकार भोजने, अभिनेता प्रभाकर मोरे, अभिनेता अरुण कदम, अभिनेत्री नम्रता संभेराव, अभिनेत्री चेतना भट या सगळ्यांशी संवाद साधला.
हास्यजत्रा का ब्रेक घेतीये? हसवून हसवून दमलात की नवीन काही शोधायचं आहे?
सचिन मोटे- आम्ही गेली साडेतीन-चार वर्षं हास्यजत्रा करत आहोत. त्यामुळे आम्हालाही आता थोडं रिफ्रेश होणं गरजेचं आहे. आमचे जे काही कॅरेक्टर्स आहेत, त्यांच्यावर वेगवेगळे प्रयोग झाले आहेत. कुठेकुठे आम्हालाही वाटतं ना की, आता यात काही नवीन घडणं गरजेचं आहे.
आता त्यातला तोचतोचपणा कमी करण्यासाठी काहीतरी करायला हवं. त्यामुळे थोडीशी विश्रांती, क्रिएटिव्ह ब्रेक सगळ्यांना गरजेचा आहे. पण हा मोठा ब्रेक नसेल, आमचे शूटिंग काही दिवसांनी सुरू होतील.
सचिन गोस्वामी- हा जो शो आहे, तो समाजाचंच रूप मांडणारा शो आहे. आम्ही गेली साडेतीन वर्षं आमच्यातच आहोत. आम्हालाही बाहेर पडण्याची गरज आहे. स्टॉक संपत आला आहे. पाहिलेली माणसं मांडून झाली आहेत. झरा मोकळं करणं गरजेचं आहे. सारखं उपसत राहिलो, तर विहिरीला पाणी राहणार नाही.
कोरोना काळात अनेकांचा असा अनुभव होता की, हास्यजत्रेनं स्ट्रेसबस्टर म्हणून काम केलं. मी खूप जणांकडून ऐकलं आहे. तुमच्यापर्यंत जेव्हा असे अनुभव येतात, तेव्हा कसं वाटतं?
सचिन मोटे-एका बाईंनी मला सांगितलं की त्यांचं घराणं पूर्ण संगीताचं घराणं आहे. संगीत हे खरंतर स्ट्रेस बस्टर असतं. पण त्या म्हणाल्या की मला संगीत नकोसं वाटत होतं, माझं गाणंही मला नकोसं वाटत होतं.
त्यावेळी मला हास्यजत्रेतला विनोद हवासा वाटत होता. विनोदानं मला त्या नैराश्यातून बाहेर काढलं. असं जेव्हा शास्त्रीय संगीताच्या घराण्यातली गायिका सांगते, तेव्हा अभिमान वाटतो.
काहींच्या डोक्यात मृत्यूचे विचार होते, त्यातून ते बाहेर पडले.
चंद्रकांत कुलकर्णींनी सांगितलं की, एक सर्जन आहेत ते रिलीफसाठी हास्यजत्रा पाहतात. पोलिसांनीही आम्हाला सांगितलं की, आमचा स्टाफ रिलीफसाठी हास्यजत्रा पाहतो.
समाजातल्या सगळ्या स्तरातून जेव्हा अशा प्रतिक्रिया येतात, तेव्हा आनंद होतो. समाधान वाटतं.
हास्यजत्रेतली ही लॉली, मामी, तात्या, मामा अशी कॅरेक्टर्स कशी सापडली?
सचिन मोटे- ही एक मोठी प्रोसेस आहे.
मी एखादी संकल्पना मांडतो. उदाहरणार्थ- मुलाचा दहावीचा रिझल्ट लागणार आहे. वडील टेन्शनमध्ये आहेत. आई पण आहे. आणि मुलगा असा आहे की, तो वडिलांना 'बाबा, घाबरू नका. गुलझारही नापास झाले होते. महात्मा गांधीही नापास झाले होते' असं सांगतो. वडील रागीट आणि आई बिचारी सगळं सांभाळून घेणारी आहे. अशी जेव्हा मी कॅरेक्टर्स सांगतो, तेव्हा मग प्रसाद त्यावर स्किट बांधायला घेतो. आम्ही आमचे इनपुट्स देतो.
मग हे सगळं सादर होता होता ओंकार त्यात 'अगं अगं आई' सारखी नवीन गोष्ट शोधतो. नम्रता सोज्वळ आई करते.
सचिन गोस्वामी बसवताना कॅरेक्टर्सचे काही धागे काढून देतात किंवा क्रिएटिव्ह मीटिंगमध्ये आम्ही सुचवतो. आणि आम्ही कलाकार ते हळूहळू फुलवत नेतात.
आमच्या अशा स्कीटमधून काही सीरीज बनल्या- जशी गौरव मोरेच्या लग्नाच्या स्कीटमधून गौरव, मामा आणि मामीची सीरिज तयार झाली. चंद्रभागा कपोलेसारखं कॅरेक्टर तयार झालं.
प्रसाद तुम्ही स्वतः काम करताना लिहिताही. तुम्ही लिहिता लिहिता इम्प्रोव्हाइज करता की कसं? तुमच्या सर्वांची ही प्रोसेस कशी असते?
प्रसाद खांडेकर- आमची क्रिएटीव्ह टीम या सगळ्याचा महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही जे सहा स्कीट्स दोन एपिसोडमध्ये पाहता, त्यामागे ही आठ-दहा जणांची टीम असते. आम्ही दहा ते बारा विषय काढतो, मग नंतर चाळण लावून पाच-सहा विषय शॉर्टलिस्ट करतो. त्यातून मग विषय फायनल करतो.
राहिली गोष्ट लिखाणाची, तर आर्टिस्टपैकी मी आणि समीरदादा लिहितो. आता श्रमेश-प्रथमेश आले आहेत, ते स्वतःचे स्किट्स लिहितात. आणि इम्प्रोव्हायजेशनचं म्हणाल तर मी आमच्या रिर्हसल रूमला ओपीडी म्हणतो. कारण तिथे सगळ्या स्किट्सची चिरफाड होत असते.
शिवाय प्रत्येक कलाकार स्वतः काही तरी नवीन अॅड करतो. म्हणजे शालू हे गाणं मोरेंनी आणलं...ते आम्हाला माहीत नव्हतं. आता ते शालू स्किटमध्ये कसं बसवायचं, त्याला कसं डेकोरेट करायचं हे गोस्वामी-मोटे सर आणि क्रिएटिव्ह टीम ठरवते.
लॉली हे कॅरेक्टर जेव्हा सरांना सापडलं आणि आम्ही जेव्हा ते डेव्हलप केलं, त्यानंतर तिची हेअरस्टाईल काय असेल, ती कशी वागेल या गोष्टी नम्रतानं शोधल्या.
गौरवचं 'आय अॅम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा' किंवा 'अगं अगं आई' ओंकारचं आहे.
नम्रता तुझी प्रोसेस कशी होती?
नम्रता संभेराव- प्रसाद म्हणाले तसं हे सगळ्यांचे मिळून असलेले प्रयत्न आहेत. जेव्हा आम्ही रिहर्सल करतो तेव्हा आम्ही वेगळे असतो. नंतर जेव्हा मेकअप करतो, कॉश्चुम चढवतो, तो सगळा माहौल येतो तेव्हा आम्ही वेगळे होतो.
आम्ही असं म्हणू की हे स्किट नाहीये, आम्ही एक छोटं नाटुकलं करतो. अनेक इंडस्ट्रीतले लोक जेव्हा आम्हाला भेटतात, तेव्हा ते सांगतात की तुम्ही आता स्किट करत नाही. तुम्ही एक छोटंसं नाटक करतात. कारण इथे शाब्दिक कोट्या होत नाहीत, इथे एक गोष्ट होते.
सिच्युएशनल कॉमेडी करतो. त्यामुळे प्रत्येक वाक्याला कॉमेडी झालीच पाहिजे असा आमचा अट्टाहास नसतो. आमचे सर सांगतात की, ती सिच्युएशन कॉमेडी आहे त्याकडे लक्ष द्या.
बऱ्याचदा असं होतं, आम्ही ऐकतो की, कॅरेक्टर्स आम्ही आधी कुठेतरी पाहिलेले असतात तेच सादर होतात. तुझ्याबाबत असं झालं आहे का? तू जी कॅरेक्टर्स करतेस, मग ती लॉली असो किंवा आई असो...तू कुठे पाहिली आहेस का?
मी पूर्वी खूप ट्रेननं प्रवास करायचे. मी लालबाग-परळसारख्या भागात वाढले आहे. त्यामुळे मी जे कॅरेक्टर्स केली आहेत, त्यातली 90 टक्के कॅरेक्टर्स मला आजूबाजूला दिसली आहेत. माझं ऑर्ब्झर्वेशन थोडं बरं असल्याने मी कॅरेक्टर्सही लवकर ग्रास्प करते. त्यामुळे मग माझ्या आजूबाजूला दिसणारी कॅरेक्टर्स मला इथं वापरायची संधी मिळते.
विनोद करताना हसवण्याचं प्रेशर येतं का?
प्रसाद- भरपूर. आजही सहाशेच्या आसपास एपिसोड केल्यानंतर मागे जेव्हा अॅक्शन म्हटलं की, पोटात गोळा येतो.
ओंकार आणि गौरव, तुम्ही तुमची स्टाईल कशी डेव्हलप केली? आणि केवळ अंगविक्षेपातून निर्माण होणाऱ्या विनोदाकडे कसं पाहता?
ओंकार भोजने- अंगविक्षेप असो किंवा इतर काही, प्रत्येकाचा हेतू एकच असतो...लोकांना हसवण्याचा. कोणाकोणाला तो अतिरेकी वाटू शकतो. पण सगळ्यांचा हेतू हा समोरच्याला हसवणं, त्यांना त्यांची दुःखं विसरायला लावणं हा आहे. आता हळूहळू गोष्टी बदलल्या...हुशार कॉमेडी आली.
गौरव मोरे- मला खरंतर एनएसडीला प्रवेश घ्यायचा होता. पण ते काही झालं नाही. मी खूप नाराज झालो, की कसं होईल आणि काय होईल.
पण मला एका सरांनी नाराज होऊ नको असं सांगितलं. त्यांनी म्हटलं, "तुझं एनएसडीमध्ये झालं नाही कारण तुझं इथे काहीतरी होणार आहे. यानंतर काहीच महिन्यांनी मला हास्यजत्रा मिळालं. आता मला तीन वर्षं झाली आहेत...माझं एनएसडी इथेच सुरू आहे. मी इथेच खूप काही शिकलोय.
आणि कॉमेडीचा विचार म्हणाल तर मी सर जे सांगतील तेच करतो.
पण तू फिल्टरपाड्यासारख्या ठिकाणाहून आला आहेस. तू जिथून आला आहेस, ती मूळं तुझ्या कामात दिसतात? किंबहुना महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचंच हे वैशिष्ट्य आहे की, इथं महाराष्ट्रातले वेगवेगळ्या प्रकारचे भाषेचे लहेजे पाहायला मिळतात.
गौरव मोरे- याचं सगळं क्रेडिट गोस्वामी-मोटे सरांना जातं. त्यांनी आम्हाला नेहमी सांगितलं की, तुम्ही जिथून आला आहात ते लोकांना कळू द्या.
माझ्या इथे इतके नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत. त्यांनाही माहितीये आपला शो रात्री नऊ वाजता दिसतो ते. त्यांना भलेही माझं नाव घेता येत नसेल, पण ते मला 'ए, कॉमेडी' म्हणून हाक मारतात.
प्रसाद खांडेकर- म्हणूनच या कार्यक्रमाचं नाव महाराष्ट्राची हास्यजत्रा आहे. इथे तुम्हाला आगरी पण ऐकायला मिळेल, खान्देशी पण मिळेल आणि सातारीही मिळेल.
अरुण कदम- शाहीर साबळेंपासूनचा माझा प्रवास आहे. इथे आम्हाला खूप सिच्युएशनल गोष्टी सापडल्या आहेत. अमुक गोष्ट केली तर विनोद होऊ शकतो हे कळलं.
आता माझ्या आगरी कॅरेक्टरचं सांगायचं तर मी एका हळदीला गेलो होतो, तिथे सापडलं.
प्रभाकर, तुम्ही मच्छिंद्र कांबळेंसोबत वस्त्रहरण सारखं नाटक केलं होतं. हास्यजत्रातही वेगळ्या पद्धतीचं नाटकच आहे. पण ते रेकॉर्डेड आहे. टीव्हीखेरीज यूट्यूबसारख्या माध्यमांवरही पाहायला मिळतं. या दोन्ही फॉरमॅटमध्ये काय फरक दिसतो?
प्रभाकर मोरे- मला खूप लाऊड बोलायची सवय होती. कारण नाटकामध्ये, वस्त्रहरणमध्ये खूप लाऊड बोलायला लागायचं. आता इथे कसं आतनं जरा जरी आवाज आला की, मोठ्यानं होतंय म्हटलं की मी मागे!
पण याचा माझ्या कामामध्ये खूप फरक पडला. कारण गोष्टी 'सटल' करायला लागल्यामुळे तो विनोद असा उंचीवर गेला. तो तेवढा जात नव्हता, असं आता मला वाटतं.
या ब्रेकमध्ये काय मिस कराल?
चेतना भट- इथलं काम खूप मिस करू. कारण इथे काम करून जे समाधान मिळतं ना, ते महत्त्वाचं आहे. तो ब्रेक हवा आहे हे मान्य आहे, पण तो खूप मोठा कोणाकडूनच नाही होणार.
विनोदावरच्या मर्यादा वाढल्या आहेत असं वाटतं? व्यंगचित्रावरून किंवा काही शोवरून पटलं नाही म्हणून हिंसक घटना घडल्याच्या घटना आहेत.
सचिन गोस्वामी- आम्ही हसविण्यासाठी काय काय करायला हवं यापेक्षा काय करायला नको याची लिस्ट मोठी आहे. पूर्वीप्रमाणे विनोदाकडे मोकळेपणानं, व्याप्तपणानं पाहणारा प्रेक्षक कमी झाला आहे ही खंत आहे.
सचिन मोटे- प्रेक्षकांनीच आता विचार करायला हवं की, आपण विनोदाला कोणत्या पद्धतीनं घेतोय. आज आम्हाला खूप स्ट्राँगली विनोदाच्या माध्यमातून सोशल किंवा पॉलिटिकल मांडता येत नाही. पण आम्ही एवढा तरी विचार करतो की, आमचं प्रत्येक स्किट अगदी प्रोग्रेसिव्ह नसलं तरी रिग्रेसिव्ह तरी नसावं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)