You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
झुंड: 'शूटला बोलवून किडनी विकतील' अशी भीती बाबूला का वाटली?
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
"मी आधी केवळ बदमाशी करायचा विचार करायचो, नागपूरमध्ये तेच चालायचं. पण आता वाटतं की कोणी मोठं बनता नाही आलं तरी चालेल नागराज सरांसारखा एक साधा माणूस बनायला हवं."
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' सिनेमात 'बाबू'चं पात्र साकारलेला प्रियांशु ठाकूर सांगत होता.
"अरे क्या फुर्र फुर्र कर रहा है? इधर क्या खजाना वजाना गाडा है क्या?"
"सेन्सॉर के कारण चूप बैठा है, नहीं तो..."
यासारखे टाळ्या खेचणारे डायलॉग मारणारा, स्वॅगमध्ये वावरणारा प्रियांशु ठाकूरचा 'बाबू' प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. बीबीसी मराठीने त्याच्याशी संवाद साधला.
झुंडच्या आधीचं आयुष्य आणि झुंड रिलीज झाल्यानंतरचं आयुष्य यात खूप फरक झाल्याचं बाबू देखील मान्य करतो.
लोक त्याच्यासोबत सेल्फी काढताहेत, त्याचे डायलॉग म्हणायला सांगताहेत. या सगळ्यामुळे बाबू भारावून गेलाय.
'आता वाटतंय आयुष्य जगण्याची मजा आहे'
बाबू सांगतो, "फिल्म रिलीज झाल्यापासून जेवढं प्रेम मिळतंय ते आधी कधीच मिळालं नव्हतं. मी फिल्म रिलीज झाल्यापासून अजून घरी देखील गेलो नाहीये. आई-वडिलांना सुद्धा भेटलो नाहीये. लोक खूप प्रेम करताहेत, सेल्फीसाठी रांग लावत आहेत. आता काहीतरी केल्यासारखं वाटतंय. वस्तीतले लोकसुद्धा मान देत आहेत. फिल्म आल्यानंतर आता वाटतंय आयुष्य जगण्याची मजा आहे."
बाबूचं झुंडसाठी सिलेक्शन होण्यामागची सुद्धा एक वेगळीच कहाणी आहे. नागपूरच्या एका वस्तीमध्ये नागराज मंजुळे यांचे भाऊ भूषण मंजुळे चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर आहेत. ते नागपूरच्या वस्तीत पात्रांचा शोध घेत होते.
त्यांनी बाबूच्या निवडीबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं, "नागपूरला रेल्वे ट्रॅकच्या बाजूला मला आठ वर्षांचा एक मुलगा चक्क दारू पिताना दिसला. मी त्याला हटकलं, तेव्हा तिथून निघाला. मी पण त्यांच्या मागेमागे गेलो. रेल्वेट्रॅकच्या एका बाजूला गटार होतं. तिथे तो गेला. तिथेच मला बाबू आणि त्याचे मित्र दिसले..."
भूषण यांच्याकडे असलेला हँडीकॅम पाहून हे सगळे दचकले. आधी त्यांना वाटलं मी पोलीस आहे, मग नंतर त्यांना वाटलं की, न्यूजवाले आहोत.
"पण ते पळून जाण्याच्या अवस्थेतही नव्हते. मी त्यांना रिसर्चसाठी कॉलेजमधून आलोय असं सांगितलं. तेव्हा बाबूनं मलाच दमात घेतलं की, अपनी बस्ती को बदनाम नहीं करना."
बाबूला भूषण यांनी नंतर बाजूला नेलं, त्याच्याशी गप्पा मारल्या. संध्याकाळपर्यंत त्याच्यासोबत फिरले. नंतरही ते त्याला भेटत राहिले. त्यातून त्यांना प्रियांशू ठाकूरमधला बाबू अधिकाधिक सापडत गेला.
बाबूनंही स्वतःच्या निवडीबद्दल सांगितलं, "मी आमच्या वस्तीत होतो तेव्हा भूषण दादा कॅमेरा घेऊन आमच्या इथे आले होते. आधी मला माहीत नव्हतं हे कोण आहेत, म्हणून मी त्यांना हलक्यात घेतलं. दोन-तीन दिवसांनी अंकुश आला. नागराज सर आणि इतर लोकांचे फोटो दाखवले. मी 'सैराट' पाहिला होता परशा, आर्चीला ओळखत होतो, पण नागराज मंजुळे माहीत नव्हते."
मुंबईला नेऊन किडनी विकली तर?
"अंकुश आधी माझ्या घरी माझ्या आईशी फिल्मबद्दल बोलायला गेला, तेव्हा माझ्या आईला खरं वाटत नव्हतं. तिनं अंकुशला 'बाबू नाहीये' इथं असं सांगितलं. नंतर मी आईला सांगितलं मी फिल्मसाठी ऑडिशन दिली आणि सिलेक्ट झालो. माझ्या आईला तरी विश्वास बसत नव्हता. तुला कसं निवडतील, असं मलाच तिनं विचारलं. मुंबईला नेऊन किडनी वगैरे विकतात अशी भीतीही घातली. मला पण वाटलं की, खरंच असं झालं तर...?"
"नंतर मला शुटिंगसाठी पुण्याला बोलवलं. तेव्हासुद्धा माझ्या मनात धाकधूक होती की पुण्याला नेऊन किडनी काढून घेतली तर? मग मी माझ्या तीन-चार मित्रांना सुद्धा सोबत घ्या, असं म्हणालो. मी मनात विचार केला माझी काढली तर यांचीसुद्धा काढतील."
बाबूचे या सिनेमातले संवाद चांगलेच गाजताहेत. काही संवाद तर बाबूने स्वतः इम्प्रोवाईज केले आहेत. आता त्याचे मित्र आणि ओळखीचे त्याला रात्री अपरात्री फोन करुन डायलॉग म्हणून दाखवायला सांगतात. बाबूला वाटतं, की लोकांचं हे प्रेम खूप महत्त्वाचं आहे. नागराज मंजुळे यांनी संधी दिल्यामुळे त्याला हे प्रेम मिळत असल्याचं देखील तो आवर्जून सांगतो.
अमिताभ यांना पाहिलं आणि...
पहिल्याच चित्रपटात ही मुलं अमिताभ बच्चन यांच्यासमोर स्क्रीन शेअर करत होती.
अभिताभ बच्चन यांना पहिल्यांदा सेटवर पाहिल्यावर काय झालं हे सांगताना बाबू म्हणाला, "अमिताभ बच्चन सेटवर आल्यावर मला विश्वासच बसत नव्हता. मी 'आ' वासून त्यांच्याकडे पाहात होतो. हेच खरे अमिताभ बच्चन आहेत का, असंही वाटलं. फिल्ममध्ये अमिताभ बच्चन खूप वेगळे दिसतात. त्यांचं काम पण एकदम भारी आहे, ते वन टेकमध्ये सीन ओके करतात. त्यांचं काम पाहून त्यांना सॅल्युट करावसं वाटतं."
बाबूला चांगले वाईट असे दोन्ही प्रकारचे मित्र मिळाले. पैसे मिळतात म्हणून त्याने वाईट मित्रांची संगत धरली होती. पण आता घरी गेल्यावर मित्रांना आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्याचा सल्ला देणार असल्याचं बाबू सांगतो. त्याचबरोबर त्यांना सुधारण्यासाठी मदत करणार असल्याचं देखील तो म्हणतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)