You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नागराज मंजुळेंनी झुंडसाठीची कॅरेक्टर्स अशी शोधली
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी
घर में नहीं खाने को और सिंथॉल मंगता नहाने को
येडा समझा है क्या, दिमाग का दही कर रहा है
सेन्सॉर के कारण चूप बैठा है, नहीं तो...
ये भारत क्या है?
झुंड सिनेमातल्या बाबू, डॉन या कॅरेक्टर्सच्या तोंडची ही वाक्यं... म्हटलं तर टाळ्या घेणारे डायलॉग आहेत आणि म्हटलं तर या मुलांचं जगणंच आहे, जे या शब्दांमधून व्यक्त होतंय.
झुंड प्रदर्शित झाल्यापासून त्यातली डॉन, बाबू, संभ्यासारखी अतरंगी पात्रं लोकांना आवडत आहेत. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली, अगदी हालाखीच्या परिस्थितीतली ही पोरं अमिताभ बच्चनसारख्या महानायकासमोर ज्या विश्वासाने उभी राहिली, त्याचं कौतुक होतच आहे. पण त्याचबरोबर नागराजनं ही झुंडची ही टीम शोधली कशी? त्याला त्याची कॅरेक्टर्स सापडली कशी? हे पण जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे.
त्यांची भाषा, त्यांचं असणं, दिसणं जगणं इतकं अस्सल कसं? हा विचारही सिनेमा पाहिला की मनात येतो.
खरंतर पिस्तुल्या, फँड्री, सैराट आणि अगदी आताच्या झुंडपर्यंत नागराज मंजुळेंच्या सिनेमामध्ये असेच चेहरे दिसतात, जे आपल्या आजूबाजूला वावरतानाही सापडू शकतात. या चेहऱ्यांच्या सिनेमातल्या व्यक्तिरेखाही अशाच असतात, ज्यांचं अस्तित्व पांढरपेशा समाजात दबून राहिलं आहे.
याबद्दलची भूमिका नागराज मंजुळेंनी बीबीसी मराठीशी बोलतानाच स्पष्ट केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, माझ्या कथा, माझी पात्रं तशीच आहेत. म्हणून कास्टिंगही तसंच होत आहे. ते खूप स्वाभाविक आहे. तुमचं जे एक्सप्रेशन आहे, तेच तुम्ही लिहिता आणि त्याच पद्धतीचे लोक शोधता, तसंच कास्टिंग करता.
झुंडचं कास्टिंगही नागराजच्या एक्सप्रेशनला साजेसंच झालं आहे आणि ते त्यांचा भाऊ भूषण मंजुळे यांनीच केलं आहे. ते या सिनेमाचे कास्टिंग डायरेक्टर आहेत.
कास्टिंगची सगळी प्रोसेस, डॉन उर्फ अंकुश शोधताना झालेली दमछाक, या मुलांना कॅमेऱ्यासमोर उभं राहाण्यासाठी केलेली तयारी याबद्दल भूषण यांच्याशी बीबीसी मराठीनं संवाद साधला.
कुटुंबापासूनही तुटलेली मुलं
"नागराजकडून जेव्हा स्क्रिप्ट ऐकली, तेव्हाच आपल्याला नागपूरमधली आणि विदर्भातली मुलं हवी आहेत हे नक्की होतं," भूषण सांगत होते.
"मी नागराजचा सख्खा भाऊच आहे, त्यामुळे त्याला काय हवं आहे हे मला नीट समजतं. त्यामुळे कास्टिंगसाठी मी स्वतः, माझी होणारी बायको सरिता, गणेश असे नागपूरला गेलो. जवळपास दोन महिने मी नागपूर आणि भागातल्या झोपडपट्ट्यांमध्ये हिंडून मुलं शोधत होतो.
ही जी सगळी मुलं आहेत, ती समाजापासूनच तुटली नाहीयेत तर घरापासून, कुटुंबापासूनही तुटली आहेत. जगण्याच्या संघर्षात ही मुलं त्यांच्या पालकांपासून दुरावलेली असतात. रुढ चौकटीतलं आयुष्य नाहीये. पण ही मुलं मनानं चांगली आहेत."
'अपनी बस्ती को बदनाम मत करना'
टाळ्या खेचणारे डायलॉग मारणारा, स्वॅगमध्ये वावरणारा बाबू...जसा सिनेमात टशनमध्ये दिसतो, तशाच टेचात भूषण यांना भेटला होता.
"नागपूरला रेल्वे ट्रॅकच्या बाजूला मला आठ वर्षांचा एक मुलगा चक्क दारू पिताना दिसला. मी त्याला हटकलं, तेव्हा तिथून निघाला. मी पण त्यांच्या मागेमागे गेलो. रेल्वेट्रॅकच्या एका बाजूला गटार होतं. तिथे तो गेला. तिथेच मला बाबू आणि त्याचे मित्र दिसले...," भूषण सांगत होते.
भूषण यांच्याकडे असलेला हँडीकॅम पाहून हे सगळे दचकले. आधी त्यांना वाटलं मी पोलिस आहे, मग नंतर त्यांना वाटलं की, न्यूजवाले आहोत.
"पण ते पळून जाण्याच्या अवस्थेतही नव्हते. मी त्यांना रिसर्चसाठी कॉलेजमधून आलोय असं सांगितलं. तेव्हा बाबूनं मलाच दमात घेतलं की, अपनी बस्ती को बदनाम नहीं करना."
बाबूला भूषण यांनी नंतर बाजूला नेलं, त्याच्याशी गप्पा मारल्या. संध्याकाळपर्यंत त्याच्यासोबत फिरले. नंतरही ते त्याला भेटत राहिले. त्यातून त्यांना प्रियांशू ठाकूरमधला बाबू अधिकाधिक सापडत गेला.
तिथल्याच झोपडपट्टीत राहणारा हा मुलगा, आई आजूबाजूच्या बंगल्यात कामाला जाणारी.
पण केवळ बाबूचीच पार्श्वभूमी अशी नव्हती. सिनेमातली बहुतांश मुलं अशाच घरातून आली होती, जिथलं वातावरण पांढरपेशा समाजाच्या कुटुंबाच्या चौकटीला हादरा देणारं होतं.
मध्यमवर्गीय चौकटीपलिकडचं जग
भूषण सांगतात, "नागपूरमध्ये मी कास्टिंगसाठीच फिरताना रस्त्यावरच अँजेल आणि आलम भेटले. पाहिली तेव्हा ही एकदम टपोरी पोरं वाटली. असाच टाइमपास करत असतील असंच वाटलं. पण त्यांच्या मागे गेलो, तेव्हा इस्लाम कॉलेजच्या गेटवर गेलेली दिसली. तिथेच त्यांचं कास्टिंग केलं."
याच अँजेलच्या घरातला एक किस्सा भूषण यांनी सांगितला. भूषण त्याच्या घरी गेले तेव्हा त्याची आजी बिडी ओढत होती, आजोबा गांजा पिऊन होते आणि हा बाजूला जाऊन बिडी पिऊन आला.
झोपडपट्टीतील मुलाला आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेविषयी कळतं, तेव्हा तो आंतरराष्ट्रीय काय नि राष्ट्रीय काय, असा प्रश्न विचारतो. राष्ट्रीय म्हणजे भारत, असं त्याला सांगितलं जातं. तेव्हा, 'भारत मतलब?' असा प्रश्न तो विचारतो. चित्रपटातील हा साधा, निरागस क्षण... पण आपल्याला खाडकन एका वास्तवाची जाणीव करून देतो. कार्तिकचं पात्र आपल्याला वास्तवात आणतो.
झिपऱ्या केसांचा, वयाच्या मानानं अंगात पुरेपूर आगाऊपणा असलेला कार्तिक... खर्रा खा रहे हो क्या, असं दटावणाऱ्या अमिताभसमोर तितक्याच टेचात नाही असं उत्तर देत उभा राहिलेला चिमुरडा.
सिनेमात तो अमिताभ यांना जसा भेटलाय, तसाच भूषण यांना प्रत्यक्षातही भेटला होता...खर्रा खाताना. त्यावेळी जेव्हा भूषण यांनी त्याला हटकलं होतं, तेव्हाही त्यानं तशाच टशनमध्ये उत्तर दिलं होतं- नाही, सुपारी खातोय.
"मध्यमवर्गीय घरात अगदी मोठं झाल्यावरही आपण सिगारेट ओढतो हे पालकांना कळलं तर कसं वाटेल, या दडपणात मुलं असतात. आणि त्याच्या अगदी विरुद्ध अशी ही परिस्थिती. पण या सगळ्या मुलांना वेगवेगळ्या वेळी भेटत होतो, त्यांचा अंदाज घेत होतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे ही मुलं मनानं खूप चांगली आहेत," भूषण सांगतात.
या मुलांची भाषाही तशीच होती, जशी आम्हाला हवी होती, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
दीड महिने शोधल्यावर शेवटी 'डॉन' सापडला
झुंडमधलं सगळ्यांत महत्त्वाचं पात्र होतं डॉन ऊर्फ अंकुश मेश्रामचं. अंकुश गेडामनं ही व्यक्तिरेखा साकारली होती. डॉनच्या व्यक्तिरेखेतले सगळे भावनिक चढ-उतार त्याने कमालीच्या उत्कटपणे साकारले. पण या अंकुशनं आयुष्यात कधी कॅमेरा फेस केला नव्हता... इतकंच काय त्याला सिनेमांबद्दल कधी फारसं आकर्षण नव्हतं किंवा त्याबद्दल काही माहितीही नव्हती.
मग पाच वर्षांपासून पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेला हा मुलगा डॉनच्या कॅरेक्टरमध्ये कसा शिरला? मुळात तो सापडला कसा?
भूषण सांगतात की, जवळपास सगळी मुलं मिळाली होती, पण डॉन सापडलाच नव्हता. त्याचं एक चित्र माझ्या डोळ्यांसमोर होतं आणि तसा मुलगाच मिळत नव्हता. नागपूरमधला मुक्काम हलवायची वेळ आली होती. जाऊ दे, पुढच्यावेळेस जाऊ तेव्हा पाहूया असं नागराजनंही म्हटलं. निघण्याच्या आधी असेच गाडीतून फिरत होतो. गणपती विसर्जनाचा दिवस होता. गड्डी गोदामच्या भागातून मिरवणूक चालली होती आणि एक मुलगा मिरवणुकीसमोर नाचत होता. त्याला पाहून मी तिथेच थांबलो.
भूषणनं त्याचं वर्णन केलं- त्यानं डोक्यावर खोट्या केसांचा मोठ्ठा विग घातला होता. जर्सी-बर्मुडा घातला होता आणि नाचत होता. त्याच्या पायाला स्प्रिंग लावल्यासारखं वाटत होतं, अंगात लयबद्धता होती...
"त्याला तसं पाहिल्यावरच लक्षात आलं की, डॉन सापडला."
गड्डी गोदामजवळच्याच एका झोपडपट्टीत अंकुश राहातो. घरची परिस्थिती हालाखीची... वयाच्या दहाव्या वर्षापासून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी लहानमोठी कामं करायला लागला होता.
आजूबाजूचा संघर्ष, कोलाहलच कदाचित अंकुशनं 'डॉन' साकारताना जिवंत केला, असं सिनेमा पाहताना वाटत राहतं.
सिनेमातली इतर लहान-मोठी पात्रंही अशीच आसपासच्या परिसरातून घेतलेली आहेत. म्हणजे सिनेमात अंकुशच्या आईचं पात्र साकारणाऱ्या खरंतर बाबूच्या आई आहेत. रिंकू राजगुरुच्या वडिलांची भूमिका करणारे हे अंकुशचे वडील आहेत. स्वतः भूषण मंजुळेही रझियाच्या नवऱ्याच्या भूमिकेत आहेत.
कॅमेऱ्यासमोर उभं राहायलं 'अशी' तयार झाली मुलं
ही सगळी मुलं सापडल्यानंतर पुढची प्रोसेस कशी झाली? ग्लॅमरच्या झगमगाटापासून कोसो दूर असलेल्या मुलांना थेट अमिताभ बच्चन यांच्यासमोर उभं करण्यासाठी तयार कसं केलं?
या प्रश्नाचं उत्तर देताना भूषण यांनी सांगितलं, "आम्ही मुलं शॉर्टलिस्ट केल्यानंतर नागपूरच्या आमदार निवासात त्यांची ऑडिशन झाली. मी जेव्हा सुरुवातीला भेटलो होतो, तेव्हा त्यांना कॉलेज प्रोजेक्ट आहे, शॉर्ट फिल्म करतोय असं काहीबाही सांगत होतो. नंतर त्यांना फिल्म करतोय असं सांगितलं, पण त्यांना त्याचं गांभीर्य कळलं नव्हतं. मग ऑडिशन झाली, नागराज आले होते. त्यांना आम्ही सांगितलं की, तुम्हाला पुण्याला यावं लागेल, तेव्हा त्यांना खऱ्या अर्थानं आपण काय करतोय हे कळलं."
या मुलांना नंतर पुण्याला आणलं. तिथे महात्मा फुले सोसायटीमध्ये एक बंगला घेतला होता. तिथेच नागराज आणि त्यांच्या क्रूसोबत ही मुलं राहायची. तिथे त्यांचं वर्कशॉपही झालं.
अर्थात, झुंडमध्ये फुटबॉल महत्त्वाचा आहे. त्यांना फुटबॉल यायचा का की त्यांना शिकवलं होतं? हा प्रश्न स्वाभाविक होता.
भूषण यांनी सांगितलं की, ही मुलं आधीपासूनच बऱ्यापैकी फुटबॉल खेळायची. अर्थात, हे आम्हाला नंतर कळलं.
नागराज यांनीही बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, शूटच्या आधी जवळपास दीड वर्षं ही मुलं माझ्यासोबत होती. शूट लांबल्यामुळे आम्हाला अधिक वेळ मिळाला. आमचा सेट पुण्यातून काढला. नाहीतर आधी आम्ही फिल्म पुण्यात करणार होतो. त्यातही वेळ गेला आणि आम्हाला वर्षं-दीड वर्षं मिळालं. नाहीतर आधी तीन-चार महिने ही मुलं माझ्यासोबत असणार होती, ती पुढे दीड वर्षं राहिली.
एवढ्या तयारीनंतर ही मुलं कॅमेऱ्यासमोर उभी राहिली. सिनेमा प्रदर्शित झाला. या मुलांना सिनेमानं जसं एका वेगळ्या जगात आणलं, तसंच या मुलांचं जगही आपल्यासमोर मांडलं. अभिनय करतानाच ही पोरं त्यांचं खरंखुरं जगही एकाअर्थानं लोकांसमोर मांडत होती. वरकरणी ही मुलं वांड, अगदी कधीकधी वाया गेलेलीही वाटू शकतील. पण मनातनं त्यांचा निरागसपणा कायम आहे.
भूषण यांनी सांगितलं, "नंतर-नंतर ही मुलं माझ्यासाठी खिशातून चपात्या घेऊन यायची. फिरत असेल, खायला प्यायला कधी वेळ मिळेल, आपण घेऊन जाऊया खायला ही एकच जाणीव त्यांच्या या कृतीतून दिसायची. अशावेळी या मुलांचा चांगुलपणा प्रकर्षानं जाणवायचा."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)