You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
झुंडमध्ये रिंकू राजगुरू जी भाषा बोलते ती कोणती आहे? ही भाषा शिकवणारी शाळा माहितीये?
- Author, कैलाश पिंपळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतला आहे. पण चित्रपटाची कथा ही नागपुरातली आहे. त्यामुळे मराठी वाक्यं, लहेजाही मधूनमधून कानावर पडतो.
पण झुंडमध्ये अजून एक भाषा ऐकायला मिळते. अभिनेत्री रिंकू राजगुरुनं जी व्यक्तिरेखा साकारली आहे, तिचे संवाद ऐकल्यानंतर पटकन ही भाषा कोणती हे लक्षात येत नाही.
या चित्रपटात रिंकू आणि तिचं कुटुंब गोंदियामधल्या एका अतिशय छोट्या गावातलं दाखवलंय. ते जेव्हा सिनेमात एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर ही भाषा नेमकी कोणती असा प्रश्न दिसतो.
ही भाषा आहे गोंडी... महाराष्ट्रातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या आदिवासी भागातील गोंड आदिवासी समुदायात बोलली जाणारी गोंडी भाषा. ही गोंडी भाषा प्रामुख्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, महाराष्ट्र या राज्यांमधील आदिवासी समुदायात बोलली जाते.
गोंडी भाषेचं शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा
महाराष्ट्रात गोंडी भाषेतून शिक्षण देणारी पहिली शाळा गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे फेब्रूवारी 2021 मध्ये सुरू करण्यात आली. या शाळेचं नावं आहे पारंपारिक 'कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल.'
मराठी- इंग्रजीच्या रेट्यात गोंडी भाषा, संस्कृती आणि परंपरा लुप्त होऊ नये या उद्देशाने ही शाळा सुरू करण्यात आली.
सध्या या शाळेत 45 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय अभ्यासक्रमासोबतच गोंडी लिपी, गोंडी संगीत, संस्कृती, जंगल आणि जंगलातील आयुर्वेदिक औषधींची माहिती विद्यार्थांना देण्यावर जास्त भर दिला जातो.
"आजूबाजूच्या 20 गावातील लोकांकडून ग्रामसभेत हा निर्णय घेऊन लोकसहभागातून ही शाळा सुरू करण्यात आली. या शाळेसाठी लागणारा खर्च गावकरी आणि पालक स्वत: वर्गणी गोळा करुन करतात.
या शाळेत विद्यार्थांना दोन वेळा जेवण, गणवेष, शालेय साहित्य आणि खेळाचे साहित्य दिले जाते. त्यासोबत मराठी, इंग्रजी आणि इतर विषयाची माहितीही या शाळेत दिली जाते," असं संयुक्त गाव गणराज्य ग्रामसभा परिषद, मोहगावचे अध्यक्ष देवसाय आतला सांगतात.
या शाळेला शासनमान्यता मिळावी यासाठी संयुक्त गाव गणराज्य ग्रामसभा परिषदकडून पाठपुरावा केला जात आहे.
गोंडी भाषा शिकवणाऱ्या अशा शाळांना शासनाने पाठिंबा द्यायला पाहिजे आणि गोंडी भाषेचा समावेश शालेय अभ्याक्रमात करायला पाहिजे, असं अध्यक्ष देवसाय आतला म्हणतात.
या शाळेतील शिक्षकांचं शिक्षण मराठी भाषेत झाल्याने त्यांना गोंडी लिपीचं ज्ञान नाही, त्यामुळे त्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी छत्तीसगढ़ला जावं लागतं.
"आमचं शिक्षण मराठी शाळेत झाल्याने आम्हाला स्वत: अभ्यास करुन येऊन मुलांना शिकवावं लागतं. छत्तीसगढमधील गोंडी शाळेत शिक्षक प्रशिक्षण घेऊन येतात त्यानंतर ते येथील मुलांना शिकवतात," असं या शाळेतील शिक्षक देवू नरोटे सांगतात.
गोंडी भाषा कुठे बोलली जाते?
महाराष्ट्रातील 2,72,564 गोंड आदिवासींपैकी चंद्रपूर जिल्ह्यात 61 टक्के, यवतमाळमध्ये 31 टक्के आणि नांदेडमध्ये 5 टक्के गोंड आदिवासी राहतात. त्यांपैकी 1,54,111 गोंडांची गोंडी ही मातृभाषा आहे.
सर जॉर्ज ग्रीअर्सनच्या मते गोंडी बोली तेलुगूपेक्षा तमिळ आणि कन्नडशी जास्त मिळतीजुळती आहे. तथापि सोळाव्या शतकातील राजगोंड राजांच्या सुवर्ण मोहरांवरून काही तेलुगू भाषिक आख्यायिकांविषयी माहिती मिळते.
गोंडी प्राचीन भाषा
"महाराष्ट्र, ओडीसा, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यात बोलली जाणारी गोंडी ही अत्यंत प्राचीन भाषा आहे. अंदाजे 2000 ते 2500 वर्षांपूर्वी या भाषेचा जन्म झाला. ही भाषा तामीळ, तेलगू किंवा संस्कृत भाषेतून आली नाहीये. या भाषेचा जन्म वेगळ्या भाषापरिवारातून झाला आहे," असं भाषातज्ज्ञ गणेश देवी सांगतात.
संविधानाच्या आठव्या सूचित गोंडी भाषेचं नाव असायला पाहिजे होतं. कारण ती प्राचीन भाषा आहे. या भाषेत कथा, कविता, व्याख्यानं, साहित्य उपलब्ध आहे. म्हणजे एक संपूर्ण संस्कृती गोंडी भाषेत पाहायला मिळते, असंही गणेश देवी सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)