'झुंड'मधला कार्तिक उईके जेव्हा आमीर खानला भेटतो...

    • Author, प्रवीण मुधोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी नागपूरहून

नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटात एक प्रसंग आहे... झोपडपट्टीतील मुलाला आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेविषयी कळतं, तेव्हा तो आंतरराष्ट्रीय काय नि राष्ट्रीय काय, असा प्रश्न विचारतो.

राष्ट्रीय म्हणजे भारत, असं सांगितल्यावर केसांच्या झिपऱ्या डोळ्यांवर आलेला एक पोरगा विचारतो, 'भारत मतलब?'

एका प्रसंगात घरी आलेल्या मुलांना अमिताभ बच्चन पैसे नसल्याचं सांगतात. झोपडपट्टीतल्या पोरांच्या टीममधला तोच झिपरा पोरगा लगेच म्हणतो- शक्कर के डब्बे में भी देख ले...

चित्रपटातले हे संवाद... म्हटलं तर अगदी साधे आहेत, पण दुसरीकडे आपल्या चौकटीपलिकडच्या वास्तवाची जाणीवही करून देणारे आहेत.

या दोन खणखणीत संवादांच्या जोरावर भाव खाऊन जाणारं सिनेमातलं पात्र म्हणजे कार्तिक उईके.

झिपऱ्या केसांचा, वयाच्या मानानं अंगात पुरेपूर आगाऊपणा असलेला कार्तिक सिनेमात दिसतो. पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात तो कसा आहे? झुंडमध्ये निवड होण्याआधीचं त्याचं आयुष्य आणि आताचं त्याचं आयुष्य यात काय बदल झालाय? हे जाणून घेण्यासाठी आम्ही पोहोचलो नागपूरमधल्या महाल भागतल्या चिटणवीसपुरात...

अरुंद गल्लीबोळातून गेल्यावर कार्तिकचं घर आहे. घरी त्याचे आजी, आई-वडील, भावंड होती.

कार्तिकचे वडील ढोलताशा वाजवण्याचं काम करतात. कार्तिकही ढोलताशा वाजवतो. सध्या नववीत शिकणारा कार्तिक झुंडसाठी निवड झाली तेव्हा 9 वर्षांचा होता.

झुंडचे कास्टिंग डायरेक्टर भूषण मंजुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नागपूरच्याच गल्लीबोळातून चित्रपटातली कॅरेक्टर शोधली आहेत.

कार्तिक सांगतो, "ते माझा मित्र सागरकडे आले होते. त्यांनी आधी सागरला गायला सांगितलं. मग अरविंद नावाचा मुलगा आहे, त्याला डान्स करायला सांगितलं. मग माझ्याकडे आले. मला वाटलं कोण आहेत हे. इथं आल्यावर त्यांनी माझा व्हीडिओ काढला. मला काय करायचं याच्या सूचना दिल्या."

तोपर्यंत हे सगळं सिनेमासाठी सुरू आहे, याची कदाचित कार्तिकला कल्पना नव्हती.

दहा दिवसांनी नागराज मंजुळे यांची टीम परत आली. सिनेमा करायचा आहे, शूटिंगसाठी पुण्याला जायचंय असं सांगितलं. कार्तिकची सिनेमासाठी निवड झालीये यावर त्याच्या आईचा विश्वासही बसत नव्हता.

कार्तिक आणि त्याच्या आई-वडिलांना नागराज मंजुळे माहित नव्हते. पण सैराटबद्दल माहितीये का असं विचारल्यावर त्यांना नागराज कोण हे लक्षात आलं. तरीही पुण्याला मुलाला पाठवायचं याबद्दल त्यांच्या मनात धाकधूक होतीच.

कार्तिकचे वडील जयसिंग उईके सांगतात, "त्याला सिनेमासाठी सिलेक्ट केलंय, पुण्याला घेऊन जायचंय असं सांगितलं. मी तीन-चार जणांना त्याबद्दल विचारलं. मला लोकांनी म्हटलं की, आजकाल दिवस वाईट आहेत, लोक काहीही करतात. पुण्याला वगैरे नका पाठवू."

कार्तिकच्या वडिलांनी ही भीती नागराज मंजुळेंच्या टीमला बोलून दाखवली. "तुम्हाला असं वाटत असेल, तर तुम्हीही चला," असं त्यांनी सांगितल्यावर कार्तिक आणि त्याचे वडील पुण्याला गेले.

कार्तिक शूटिंगसाठी पुण्याला पोहोचला. पण सिनेमाची दुनिया कधीच न अनुभवलेल्या कार्तिकसाठी शूटिंगचा अनुभव कसा होता?

कार्तिकच्या आई सत्यवती ऊईके यांनी सांगितलं, "त्याला हसायची सवय होती. शूटिंगच्या दरम्यानही तो हसायचा. पण भूषण सर आणि नागराज सरांनी सांगितलं की, तो लहान आहे. काही कॉमेडी झालं तर तो हसणारचं. त्यांनी त्याला सांभाळून घेतलं. मी पण त्याला समजावलं- इतक्या लांब जाऊन परत यायला नको. मग पुढे त्यानं नीट केलं."

या सिनेमातल्या कार्तिकच्या संवादांचं खूप कौतुक होतंय, पण त्याच्यासाठी हे संवाद पाठ करणं, ते साभिनय म्हणणं हे किती कठीण होतं? त्यानं ते कसं केलं?

"नागराज सर समजावून सांगायचे की, असं नको, असं करायचं. मग मी लक्षात ठेवायचो. अगदी पहिल्याच फटक्यात नाही झालं, तरी मग तीन-चार टेकमध्ये व्हायचं."

झुंडच्या शूटिंगपासून झुंड प्रदर्शित होईपर्यंत कार्तिकला एक वेगळं जग पाहायला मिळालं. वाट्याला कौतुक येतंय....आमीर खाननं हा चित्रपट पाहिला, या मुलांचं कौतुकही केलं.

आमीरसोबतच्या या भेटीबद्दल सांगताना कार्तिकनं म्हटलं, "आम्ही आमीर सरांकडे जेवण केलं. त्यांनी आमच्यासोबत हात मिळवले. तुम्हाला जाऊ देणार नाही असंही म्हणाले. खूप मजा आली आम्हाला."

सिनेमाचं जग हे स्पर्धेचं, अनिश्चिततेचं आहे. त्यामुळे एका चित्रपटावरून भविष्याबद्दल सांगणं घाईचं ठरू शकतं. पण तो एक चित्रपट सामान्य आयुष्य जगणाऱ्या मुलासाठी सकारात्मकता नक्कीच घेऊन येऊ शकतं, हे कार्तिककडे पाहिल्यावर जाणवतं हे खरं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)