You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आमिर लियाकत हुसैन : मीम्समधल्या या ओळखीच्या व्यक्तीचं निधन, पाकिस्तानमधले होते वादग्रस्त अँकर-खासदार
- Author, सिमोन फ्रेझर
- Role, बीबीसी न्यूज
भारतात जारी होणाऱ्या अनेक मीम्समध्ये किंवा पॅरिडी व्हीडिओच्या शेवटच्या फ्रेममध्ये दिसणारा आश्चर्यकारक दाढीवाला चेहरा सर्वांनाच आठवत असेल. अनेक कॉमिडी व्हीडिओमध्ये त्या चेहऱ्याचा वापर होतो. त्यांचं नाव आहे आमिर लियाकत हुसैन.
पाकिस्तानातील सर्वांत प्रख्यात आणि वादग्रस्त टेलिव्हिजन निवेदकांपैकी ते एक होते. याचं आमिर लियाकत हुसैन यांचं वयाच्या 50 व्या वर्षी निधन झालं. ते कराचीमधल्या राहत्या घरी बेशुद्धावस्थेत आढळले.
त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण, तिथं पोहचताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात येत आहे.
आमिर लियाकत हुसैन टेलिव्हिजनच्या दुनियेतून राजकारणाकडे वळाले आणि इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाकडून खासदार झाले.
आमिर यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. टीव्हीवर ते अपत्यहीन जोडप्यांना मुलं देत असत. तसंच द्वेषयुक्त भाषणामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.
हुसैन यांचं वैयक्तिक जीवन देखील सार्वजनिकरित्या अनेकांसाठी चघळायचा विषय होता. अनेकदा सोशल मीडियावरील त्याच्या कृत्यांमुळे त्याला चालना मिळत होती.
त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या पर्वात त्यांनी तिसरं लग्न केलं. पण, काही महिन्यांतच ते नातं सार्वजनिकपणे आणि कठोरपणे संपवलं.
त्यांची 18 वर्षांची वधू दानिया शाह हिने मे महिन्यात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि हुसैन यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आणि ड्रग्जच्या आहारी गेल्याचा आरोप केला. - पाकिस्तानी खासदाराचा 31 वर्षांनी लहान तरूणीशी विवाह वादाचं कारण का बनलंय?
लग्नाला 'फजिती' असं संबोधत त्यांनी एक व्हीडिओ जारी केला आणि आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं सांगितलं. आपण पाकिस्तानसाठी सर्वकाही केलं, पण सोशल मीडियावरील गोष्टींमुळे निराश झाल्याचं त्यांनी म्हटलं.
आमिर लियाकत हुसैन यांनी त्यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानातील अनेक आघाडीच्या माध्यम संस्थांसाठी काम केलं. एका मोठा वर्ग त्यांचा चाहता होता. पण, अनेकांना त्यांचं काम द्वेषपूर्ण असं वाटायचं.
टीआरपी रेटिंगची हमी देणारा एक वाकबगार वक्ता आणि उत्कृष्ट शोमॅन, अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या शोचं स्क्रिप्टिंग चांगलं असायचं. त्यात धार्मिक प्रवचनांचा समावेश होता. तसंच त्यात गैरवर्तनाचाही समावेश असायचा.
आमिर यांच्या शोमध्ये आपला अनादर करण्यात आला, अशा नियमित तक्रारी त्यांच्या शोमध्ये सहभागी झालेले लोक करत होते. ते इतरांवर ईशनिंदा, विश्वासघात किंवा व्यभिचार यासारख्या कृत्यांचा आरोप करायचे.
सप्टेंबर 2008 मध्ये त्यांनी एक संपूर्ण कार्यक्रम अहमदी मुस्लिमांच्या श्रद्धांचा शोध घेण्यासाठी आयोजित केला होता. अहमदी मुस्लिम हे स्वत:ला मुस्लिम म्हणून ओळखतात आणि कुराणच्या शिकवणींचे पालनही करतात. पण, रूढीवादी मुस्लिम मात्र त्यांना पाखंडी मानतात.
आमिर यांच्या शोमध्ये दोन तज्ज्ञांनी म्हटलं होतं की, जो कोणी खोट्या प्रेषितांशी संबंध ठेवतो तो 'हत्येला पात्र' ठरतो. हा कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर 24 तासांच्या आत सिंध प्रांतातील मीरपूर खास या छोट्या शहरात अहमदी समुदायाच्या एका प्रमुख सदस्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
आमिर यांना त्यांनी पाकिस्तानमधील उदारमतवादी महिलांबद्दल केलेल्या लैंगिक टिप्पणीसाठी देखील लक्षात ठेवले जाईल. यात त्यांनी कलाकार, लेखक किंवा मानवाधिकार कार्यकर्ती महिलांबद्दल टिप्पणी केली आहे.
क्विझ शो आणि उत्पादनांची विक्री (कार, मोटारसायकली आणि घरगुती इलेक्ट्रॉनिक्स वस्तू) हे त्यांच्या शोचे एक मोठे वैशिष्ट्यं होतं. 2013 मध्ये तर त्यांच्या शोमध्ये बेवारस मुलंही झळकली.
हे पाऊल लहान मुलांना चांगल्या आयुष्याची संधी देण्याच्या उद्देशानं होतं. त्यामागे केवळ रेटिंग वाढवण्याचा प्रयत्न नव्हता, असं त्यावेळी आमिर यांनी ठासून सांगितलं.
"मूल देण्याआधीच आम्ही रेटिंगमध्ये अव्वल होतो. आम्ही ही मुलं अक्षरश: कचऱ्यातून आणलीय आणि गरजू लोकांपर्यंत पोहचवलीय," असं आमिर यांनी त्यांच्या वेबसाईटवर सांगितलं होतं. तिथं त्यांनी स्वत:चं वर्णन 'ट्रूली अ लिजेंड' असं केलं आहे.
दांभिकता आणि विभागणीचे प्रतीक
- आबिद हुसेन, बीबीसी उर्दू, इस्लामाबाद यांचे विश्लेषण
आमिर लियाकत हुसैन हे पाकिस्तानच्या टेलिव्हिजन विश्वातील मोठं नाव होतं. त्यांनी मनोरंजन आणि आधुनिक पाकिस्तानी समाजाच्या दांभिकतेचं प्रतीक म्हणून 2 दशकं इथल्या सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवलं.
धर्म, राजकारण आणि शो-बिझच्या केंद्रबिंदूवर त्यांनी योग्य वेळी योग्य असा निशाणा साधला. ते एक अँकर, एक राजकारणी, एक महत्त्वाकांक्षी अभिनेता, एक मॉडेल आणि एक ब्रँड अॅम्बेसेडर होते. त्यांचे स्वतःचे कपड्यांचे ब्रँड देखील होते.
त्यांच्या खेळावरील शोमुळे प्रशंसा आणि तिरस्कार समान प्रमाणात निर्माण होत असे. ते बक्षिसं तर देत असत, पण धार्मिक फतवे काढण्यात आणि पत्रकार आणि इतरांविरुद्ध भडकावणारी, खोटी विधानं जारी करण्यात ते तितकेच पुढाकार घेत होते.
पाकिस्तानच्या टीव्ही इतिहासातील सर्वांत लोकप्रिय धार्मिक कार्यक्रम ते घेत होते. जिओ टीव्हीवरील त्यांच्या या कार्यक्रमात इस्लामिक मूल्यांवरील प्रवचनांचा भरणा केलेला असायचा.
आमिर यांच्या मृत्यूची बातमी वणव्यासारखी पसरली. सुरुवातीला अनेकांना धक्का बसला. पण, त्यानंतर आमिर यांच्याविषयीच्या प्रतिक्रिया ते जिवंत असताना जशा दोन प्रकारच्या होत्या तशाच मृत्यूनंतरही दिसून आल्या. राजकीय नेत्यांच्या शोकसंवेदनांसोबतच, त्यांच्या हजारो अनुयायांकडूनही दु:खाचा वर्षाव होत होता.
पण, अनेक पाकिस्तानी नागरिक मृताबद्दल बोलताना त्याच्या वाईट प्रवृत्तीवर बोलतानाही दिसून येत आहेत. ते इतरांना आमिर यांच्या वादग्रस्त विधानांची आणि भूतकाळाची आठवण करून देत आहेत.
MQM पक्षाने काढून टाकेपर्यंत म्हणजे 2002 ते 2008 पर्यंत आमिर हुसैन हे संसदेचे सदस्य होते. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या काळात 2004 ते 2007 दरम्यान त्यांनी धार्मिक व्यवहार राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं.
राजकारणी म्हणून त्यांच्याशी संबंधित अनेक घटना आठवतात. एकदा आत्मघाती बॉम्बस्फोटांनंतर त्यांच्या कामावर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना ओलीस ठेवलं होतं.
तर दुसर्या एका प्रसंगी, त्यांनी ब्रिटीश-भारतीय कादंबरीकार सलमान रश्दी यांना 'मृत्यूस पात्र' म्हणून घोषित केलं होतं. या अशा टिप्पण्यांमुळेच आमिर यांना अखेरीस पदाचा राजीनामा द्यावा लागला.
2018 मध्ये ते पुन्हा राजकारणाकडे वळाले. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (PTI) ते सामील झाले आणि पुढच्या वर्षी पुन्हा पाकिस्तानी संसदेचे खासदार म्हणून निवडून आले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)