एम एफ हुसेन जेव्हा पंढरपूरच्या विठ्ठलासमोर नतमस्तक झाले होते...

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"एक मुस्लीम पांडुरंगाच्या समोर नतमस्तक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू वाहू लागले. तो अनुभव मी आजही विसरू शकणार नाही..." चित्रकार एम एफ हुसेन पंढरपूरच्या मंदिरात गेले, तेव्हाचा प्रसंग सांगताना सिद्धांत ढवळे आठवणींत हरवून जातात.

मकबूल फिदा हुसेन म्हटलं की अनेकांना आठवतात ती करोडोंना विकली जाणारी चित्रं किंवा नग्न चित्रांवरून झालेले वाद. त्यांचं अनवाणी चालणं, आणि माधुरी दीक्षितचा चाहता असणं. पण एम एफ हुसेन हे नाव या वाद आणि चर्चांपुरते मर्यादित नाही. त्यांनी रेखाटलेल्या चित्रांची मोहिनी त्यांच्या मृत्यूच्या अकरा वर्षांनंतरही कायम आहे.

भारतीय कलेला नवी दिशा देणाऱ्या आणि या क्षेत्रात भारताचं नाव जगभरात नेणाऱ्या वासुदेव गायतोंडे, एस एच रझा, एफ एन सुजा, अकबर पदमसी, अमृता शेरगिल अशा मोजक्या चित्रकारांमध्ये हुसेन यांची गणना होते.

हुसेन यांची नाळ महाराष्ट्राशी जोडली गेली होती आणि त्यांचं पंढरपूरशी जवळचं नातं होतं. त्यांचा जन्मच भीमाकाठी पंढरपूरमध्ये झाला होता, ते काही काळ तिथे राहिलेही होते. उतारवायत एका सोहळ्यासाठी तिथे परतले, तेव्हा पांडुरंगाचं पुन्हा दर्शन झाल्यावर भारावूनही गेले होते. पंढरीसोबत हुसेन यांच्या नात्याची ही गोष्ट आहे.

पंढरीचा हुसेन

17 सप्टेंबर 1915 रोजी हुसेन यांचा जन्म झाला, तेव्हाचं पंढरपूर आज ओळखताही येणार नाही, एवढं वेगळं होतं. आज गावाच्या आत असलेला प्रदक्षिणा मार्ग तेव्हा वेशीवर वाटायचा, असं तिथले जुने रहिवासी सांगतात.

विलास कुलकर्णी सांगतात, "तेव्हा हा परिसर पांढरीचा डोला म्हणून ओळखला जायचा. प्रदक्षिणा मार्गावर, आजच्या कालिका मंदिर परिसरात झरीवाड्यामध्ये हुसेन यांचे कुटुंबीय राहायचे. आता त्या जागीही वेगळी इमारत आहे. सुलेमान बोहरा समाजातल्या एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. "

अगदी लहान वयातच हुसेन यांच्या आईचं, झैनब यांचं निधन झालं होतं. आईच्या नसण्याचा आपल्या विचारांवर आणि कलेवरही मोठा परिणाम झाल्याचे उल्लेख हुसेन यांनी पुढच्या काळात अनेक मुलाखतींमध्ये केले आहेत.

इला पाल यांच्या 'हुसेन - पोर्ट्रेट ऑफ ऍन आर्टिस्ट' या पुस्तकात हुसेन यांनी स्वतःच लेखिकेला सांगितलेल्या आठवणींचा समावेश आहे. त्यात पंढरपूरविषयी बोलताना हुसेन यांना आठवतो तो पंढरीतल्या मंदिरांमधला घंटनाद, भजनं, मंजिरासारख्या वाद्यांचे आवाज. घरात आणि आसपास नऊवारी साडीतल्या बायकांचा वावरही त्यांना पुसटसा आठवतो.

हुसेन तेव्हा त्यांच्या आजोबांसोबत, अब्दुल हुसेन यांच्यासोबत राहायचे. त्याचे वडील फिदा हुसेन तेव्हा कामानिमित्त दूरच्या शहरांत असायचे. अब्दुल पत्र्याचे दिवे बनवत, पण स्वतःच्या घरी ते दिवे लावणंही त्यांना परवडत नसे. थंडीत पुरेसं पांघरायलाही काही नसायचं, तेव्हा आजोबा आपल्या नातवाला त्रास होऊ नये म्हणून जीवापाड प्रयत्न करायचे.

काही काळानं हुसेन कुटुंब इंदूरला आणि पुढे गुजरातमध्ये बडोद्याला फिदा यांच्यासोबत राहायला गेलं आणि पंढरपूरशी त्यांचा संपर्कही तुटत गेला.

ते नंतर बऱ्याच दशकांनी पंढरपूरला परतले.

मायभूमीची भेट

1995 साली पंढरपूर युवक बिरादरीनं हुसेन यांना 'पंढरी भूषण' पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्याचं ठरवलं. या संस्थेचे सिद्धार्थ ढवळे त्याविषयी सांगतात, "आम्ही एम एफ हुसेन यांना हा पुरस्कार द्यायचं ठरवलं होतं. पण हुसेनना भेटायचं कसं, असा प्रश्नच होता."

हुसेन यांचा शोध घेत ढवळे यांनी सहकाऱ्यांसोबत मुंबई गाठली. ज्या गॅलरीत हुसेन यांच्या चित्रांचं प्रदर्शन होतं, तिथे जाऊन त्यांना भेटले. सिद्धार्थ सांगात, "त्या दिवशी त्यांनी आम्हाला दोनच मिनिटं वेळ दिला, आम्हाला म्हणाले माझ्या मुलीच्या घरी या, तिथे बोलू आणि कार्ड वगैरे दिलं. आम्ही दुसऱ्या दिवशी घरी गेलो, या पुरस्काराची सगळी संकल्पना त्यांना सांगितली. त्यांना इतकं भरून आलं! ते म्हणाले मी येईन, कुठल्याही परिस्थितीत."

ढवळे यांना तारीख नेमकी आठवत नाही, पण त्या काळच्या काही वृत्तपत्रांमध्ये 23 नोव्हेंबर 1995 साली या कार्यक्रमासाठी एम एफ हुसेन पंढरपूरला आल्याचे उल्लेख आहेत. तनपुरे महाराजांच्या मठात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पण ऐनवेळी मोठी अडचण उभी राहिली.

सिद्धार्थ ढवळे सांगतात, "कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी आम्हाला अनोळखी माणसाचा फोन आला की हुसेन महाराष्ट्रात नाहीत, ते या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही. आम्ही हबकलोच. पण मग फोनाफोनी सुरू झाली, त्यांच्या घरच्यांशी संपर्क केला."

हुसेन यांच्या बहिणीनं तेव्हा ग्वाही दिली की, 'त्यानं तारीख दिली आहे ना तुम्हाला, मग तो जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी येईल.'

आयोजकांनी मग ठरल्याप्रमाणे संध्याकाळी तयारी सुरू केली. हुसेन तेव्हा दिल्लीहून विमानानं पुण्याला निघत होते. पुण्यातून ते गाडीनं पंढरपूरला पोहोचले, तोवर मध्यरात्र केव्हाच उलटून गेली होती.

सिद्धार्थ ढवळे त्या कार्यक्रमाचं वर्णन करताना म्हणतात, "संध्याकाळी सहाला ठरलेला कार्यक्रम रात्री दीडला सुरू झाला, पण तनपुरे महाराजांच्या मठात गर्दी टिकून होती. अडीच-तीन वाजेपर्यंत लोक बसून होते, मंत्रमुग्ध होऊन पाहात-ऐकत होते. पंढरपूरमध्ये असं आधी आणि नंतर कधी घडलं नाही."

पहाटे हुसेन गावातच आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी गेले. पण त्याआधी आणि दुसऱ्या दिवशीही त्यांनी लोकांसमोर अगदी उत्स्फूर्तपणे काही चित्रंही रेखाटली.

"ते चित्रं काढत होते आणि लोक एवढे भारावून गेले होते. त्यांनी कार्यक्रमातच पहिल्यांदा गणपतीचं चित्र काढलं. एका चित्राची संकल्पना अशी होती की एक माता आपल्या मुलाला दूध पाजते आहे," सिद्धार्थ ढवळे त्या आठवणींत हरवून जाऊन सांगतात.

दुसऱ्या दिवशी चौफाळ्याजवळून जात असताना त्यांनी अचानक गाडी थांबवायला सांगितली आणि अचानक एक बैल घेऊन यायला सांगितलं. एका गवळ्यानं धावत जाऊन बैल आणला, त्यावर हुसेन यांनी चित्र रेखाटलं. ते माधुरी दीक्षितचं असल्याचं सांगितलं."

त्यावेळेचे काही फोटो आणि चित्रं ढवळे यांनी आजही जपून ठेवली आहेत. ते सांगतात, की हुसेन चित्र काढताना लोक भारावून ते दृष्य पाहात होते. विठ्ठलाची पंढरी त्या क्षणी जणू हुसेन यांचीही पंढरी बनून गेली होती आणि हुसेन जणू विठ्ठलाशी एकरूप झाले होते.

झरीवाड्याची भेट

हुसेन यांना त्यांचा जन्म झाला, ते त्यांचं जुनं घर पाहायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच सिद्धार्थ ढवळे त्यांना झरीवाड्यात घेऊन गेले. "ते म्हणाले मला इथे एकांत हवाय, कोणही नको आणि आम्हा सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं, जमिनीवर एक जवळचंच पोतडं टाकलं आणि तिथे तास दीड तास निवांत पडून राहिले. समोर एक छत्री आणि कंदिल तिथे अडकवलेला होता, त्याकडे ते पाहात बसले."

पंढरपूरच्या मुस्लीम बांधवांनी अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये हुसेन यांचा सत्कार करायचं ठरवलं. ते लोक तिथे गेले आणि हुसेनना विचारलं, बाबा आम्ही तुमच्या नात्यातले आहोत, आम्हालाही तुमचा सत्कार करायचाय.

पण हुसेन यांनी साफ नकार दिला असं सिद्धार्थ सांगतात, "हुसेन म्हणाले ज्या मुलानं एवढा आटापीटा करून मला इथे बोलवलं, त्याची परवानगी घेतल्याशिवाय मी तुमचा सत्कार घेणार नाही. मी तेव्हा पुढची व्यवस्था पाहण्यासाठी दुसरीकडे गेलो होतो. माझी आणि त्या लोकांची वेळेत भेट होऊ शकली नाही, तेव्हा हुसेन सत्कार न स्वीकारता पुढच्या भेटीच्या ठिकाणी आले."

ठरल्या जागी सिद्धार्थ ढवळे त्यांना भेटले आणि सगळे मंदिरात गेले.

... आणि हुसेन विठ्ठलासमोर नतमस्तक झाले

सिद्धार्थ सांगतात, "पांडुरंगाकडे पाहताच हुसेन एवढे भारावून गेले की त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.. ते पाहून सगळेच गहिवरले.

"मंदिरात त्यांनी कागद मागितला, ब्रश तर त्यांच्याकडे नेहमीच असायचा. मग तिथेच ऑफिसात बसून त्यांनी चित्र रेखाटलं. त्यात एक स्त्री पायात चाळ आणि हातात वीणा घेऊन विठ्ठलासमोर उभी आहे. मातृत्व, भक्ती आणि कला या तिन्हीचा संबंध तिथे आम्हाला दिसला."

संध्याकाळी चारच्या दरम्यान हुसेन पुण्याला रवाना झाले, ते पंढरीच्या आठवणी मनात ठेवूनच.

काही टीकाकारांना हुसेन यांचं वागणं आणि त्यांची चित्रं बाजारू वाटायची, पण ते अशा आरोपांनी कधी डगमगले नाहीत. पुढे नव्वदच्या दशकातच हुसेन यांच्या चित्रांवर हिंदुत्ववाद्यांनी टीका करायला सुरूवात केली. देशभरात हजारो ठिकाणी त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. अगदी पंढरपुरातल्या कोर्टातही त्यांच्यावर खटला दाखल झाला.

या सगळ्याला कंटाळून आणि कलेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यांना 2006 साली, वयाच्या नव्वदीत देश सोडून जावा लागला आणि त्यांनी पुढे कतारचं नागरिकत्व स्वीकारलं. पण आपल्या देशाला ते कधीच विसरू शकले नाहीत.

अगदी पंढरपुरातही अनेकांनी त्यांच्या भेटीच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत.

सिद्धार्थ ढवळे आवर्जून सांगतात, "आज आपल्या देशात काय चाललं आहे हे तुम्हीही पाहताय, मीही बघतोय. पण तो माणूस, एक मुस्लीम असूनही पांडुरंगाच्या समोर नतमस्तक झाला आणि विठोबाला पाहताच त्याच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू वाहू लागले. तो अनुभव आम्ही विसरूच शकत नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)