You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दीनानाथ दलाल: असा चित्रकार की ज्याचं चित्र समोर आलं तर चित्रावरुन नजर हलणेच अशक्य
- Author, शर्मिला फडके
- Role, कला समीक्षक, बीबीसी मराठीसाठी
चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म 30 मे 1916 सालचा. आज त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांचे निधन 15 जानेवारी 1971 ला झाले होते.
आपल्या चित्रकलेच्या तीन दशकांच्या समृद्ध कारकिर्दीत दलालांनी असंख्य वैविध्यपूर्ण, अभिजात चित्रनिर्मिती केली.
जाहिरात, मुखपृष्ठ, रेखाटने, सुलेखन, व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, व्यंगचित्र अशा अनेक माध्यमांत आणि भारतीय वास्तववादी शैली ते पाश्चात्य आधुनिक नवचित्रवादी, अमूर्त शैलीतही अनेक प्रयोग केले. परंतु तरीही दीनानाथ दलाल हे नाव उच्चारताच माझ्या, आणि खात्री आहे इतरही अनेकांच्या नजरेसमोर प्रामुख्याने येतात ती त्यांनी चितारलेली स्त्री सौंदर्याची मनमोहक, विलोभनीय रूपे.
दलालांवर हे अन्याय करणारे आहे की हा त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण यूएसपी हे सांगता येणं कठीण आहे. दीपावलीचा 1970 सालातला एक दिवाळी अंक माझ्या संग्रहात आहे, त्याच्या मुखपृष्ठावर असलेली स्त्री ही मी पाहिलेली दलालांची पहिली स्त्री.
आधुनिक केश-वेशभूषेतली एक शहरी तरुणी, तिचे पोनीटेलमधे बांधलेले स्वैर केस, स्लीवलेस, मागे बो असलेला ब्लाऊज आणि अंगावरची मॉडर्न प्रिन्टची साडी, हातात ब्रेसलेट, कानात रिंगा असा स्टायलिश मिनिमल लूक आणि तपकिरी, केशरी उजळ रंगाची प्रवाही पार्श्वभूमी. दलालांच्या खास, वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठ शैलीतली सगळी वैशिष्ट्यं त्यात आहेत. आयर्नी अशी की ते त्यांनी केलेलं शेवटचं मुखपृष्ठ.
1971 च्या जानेवारीमधे दलाल गेले. त्या आधी पन्नास ते सत्तरच्या काळात, ज्याला 'दलाल-पर्व' म्हणूनच ओळखले जाते, आणि नंतरही अनेक वर्षे, दीनानाथ दलालांचे अस्तित्त्व मराठी मध्यमवर्गीय घरांमधे दिवाळी अंक, पुस्तकांची मुखपृष्ठे, कॅलेंडर्सच्या माध्यमातून अपरिहार्य सातत्याने समोर राहिले.
दलालांच्या आधी हे स्थान केवळ राजा रविवर्मांना लाभले. दलालांच्या चित्रकलेचं मूळ अधिष्ठानही रविवर्माचंच होतं. अजिंठ्याच्या लेण्यांमधेही हीच स्त्री होती.
दलालांनी चितारलेली स्त्री ही पुढची अनेक वर्षं, कदाचित आजवरही, छापील भारतीय स्त्री सौंदर्याच्या ढोबळ मानकांचा आदर्श बनलेली आहे. पारंपरिक, सौंदर्यवादी भारतीय चित्रकलेचे निकष पूर्णपणे सांभाळत, जे सर्वाधिक ठळकपणे दिसले ते अजिंठा लेण्यांमधील चित्रकलेत, दलालांनी आपली चित्रकला जोपासली. नुसती जोपासली नाही, 'दलाल युग' निर्माण केलं.
खरं तर 'स्त्री' चित्रण किंवा दलालांच्या कुंचल्यातून उतरलेली टिळक, गांधी यांची व्यक्तिचित्र असोत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार अशी इतर कोणतीही चित्र.. अभिजात सौंदर्याचा नमुना वाटण्यामागचं मुख्य कारण होतं त्यांची विलक्षण हुकूमत असलेली, लयदार, प्रवाही रेषा आणि रंगांचा, रचनेचा अप्रतिम समतोल साधणारी खास सौंदर्यदृष्टी.
दलालांची चित्र एकदा नजरेसमोर आली, की त्यातल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीला संपूर्ण न्याहाळल्याशिवाय, चितारलेल्या प्रत्येक रेषेचा डौल पाहिल्याशिवाय आपली नजर दुसरीकडे हलूच शकत नाही.
दलाल जाऊन आता जवळपास पन्नास वर्षे होतील, तरीही त्यांच्या चित्रांमधली ही मोहिनी, हे आकर्षण जराही उणावलेलं नाही, स्त्री सौंदर्याचे निकष, परिमाणं बदलली, तरीही दलालांच्या स्त्री-चित्रणातली अभिजातता कायम राहिलेली आहे.
त्यांच्या रेषेमधल्या सौंदर्याची आणि रंगलेपनातली ही ताकद आहे. दलालांच्या चित्रांमधे उत्स्फूर्तता होती, जीवनाचा उत्सव होता. अप्रतिम फिगर ड्रॉइंग, स्ट्रोक्सवरचं प्रभुत्व, आकर्षक रंगसंगती, प्रसन्नता, गोडवा, रंगलेपनाच्या खास तंत्रातून त्रिमिती परिणाम साधण्याची किमया हे दलालांच्या चित्रकलेतील वैशिष्ट्य त्यांच्या प्रत्येक चित्रांमधून सहज जाणवते.
दलालांच्या चित्रांमधली पार्श्वभूमी ही एक आवर्जून उल्लेख व्हावा अशी, अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. व्यावसायिक चित्रकलेच्या मागणीनुसार अनेकदा काही ढोबळ, तेच तेच विषय त्यांना चितारावे लागत असले तरी त्या प्रत्येक चित्रांच्या पार्श्वभूमीवर दलाल जो मनोरम रंगांचा, पोतांचा आणि शैलीचा कल्पक खेळ करीत, त्यातून त्यांच्यातला कुशल चित्रकार खऱ्या अर्थाने सामोरा येतो.
पिवळा, लाल, हिरवा, निळा, जांभळा असे गडद रंग दलाल अत्यंत आत्मविश्वासाने, रंगसंगतीमधे यत्किंचितही भडकपणा येऊ न देता वापरतात. त्यामधे प्रकाशाचा अत्यंत आल्हाददायी वापर असतो, ज्यामुळे हे रंग खुलून उठतात.
'रंगांचा जादूगार' असा त्यांचा केला गेलेला उल्लेख संपूर्ण सार्थ आहे. भारतीय लघुचित्रशैलीतले नजाकती सौंदर्य आणि आधुनिक चित्रकलेची रचना यांचा मेळ दलाल सुबुद्धपणे साधतात. दलालांनी रंगवलेल्या 'शृंगार नायिका' बघणे हा तर एक विशुद्ध, नितांतसुंदर अनुभव.
त्यातली पारंपरिक भारतीय संस्कृतीतली सौंदर्य प्रतीके, वेलबुट्टी, कधी निळ्या-गुलाबी कमलपुष्पांच्या हिरव्याकंच पानांची गजबज, पाण्याच्या वलयांमधली प्रतिबिंबे, कधी गुलमोहोरी पाकळ्यांची पखरण, हळदी, शेंदरी फुलांचे बहर.. या शृंगार नायिका कधी वनविहाराला आलेल्या असतात, अशा वेळी दाट मऊशार हिरवळ, सुगंधी फुलांनी डवरलेल्या वेली, कधी गर्द जांभळ्या ढगांमधे चमकणाऱ्या वीजा, वादळात थरारणारे वृक्ष.. नायिकेच्या स्वभावैशिष्ट्यांना दृगोच्चर करणारा निसर्ग, त्यात सुकोमल, अर्धवस्त्रांकित, सुडौल काया, त्यावरचे अलंकार, रेखीव, लोभस, लाडिक चेहरेपट्टीवर मनमोहक विभ्रमांचे खेळ.. दलालांच्या चित्र-नायिका नजर खिळवून ठेवतात, आजतागायत कला-रसिक त्यांना विसरू शकलेला नाही. संस्कृत महाकाव्यांमधल्या अभिजात सौंदर्यलक्षणांचे मूर्त रूप त्यांनी सहजतेनं साकारलं आहे.
साहित्याची मनापासून आवड असणारा हा चित्रकार होता. अंक-पुस्तकाची मुखपृष्ठे म्हणजे केवळ सजावट नसते, दृश्यप्रतिमांद्वारे साहित्याचा आशय समृद्धपणे, समर्थपणे वाचकांपर्यंत पोचविण्याचे ते एक माध्यम आहे हे दलालांनी फार अचूक जाणले होते. दलालांचे हे वेगळेपण, हे वैशिष्ट्य अबाधित आहे.
दलाल आणि मुखपृष्ठ या नात्याची सुरुवात झाली 1944 मधे, जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून जी.डी.आर्ट पदवी मिळाल्यावर त्यांनी दलाल आर्ट स्टुडिओ स्थापन केला. पुस्तकांची मुखपृष्ठे, आतली रेखाटने चितारण्यास सुरुवात केली, आणि मराठी प्रकाशनविश्वात जणू क्रांती झाली.
इतकी मोहक, सुबद्ध आणि विषयानुरुप, वास्तववादी मुखपृष्ठे आधी कधीही रसिकांनी पाहिली नव्हती. गोमांतकातील अभिजात रसिकतेचा जन्मजात वारसा लाभलेल्या या चित्रकाराला वाङ्मय आणि नाट्य यांतही रस होता.
1945 मधे दलालांनी 'दीपावली' या वार्षिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला आणि त्यानंतर सातत्याने, पुढची पंचवीस वर्षे या अंकातून साहित्य-चित्र रसिकांच्या नजरेचे पारणे फिटले. अंकातले साहित्य दर्जेदार असेच, शिवाय या अंकाचे कालातीत वैशिष्ट्य ठरलेल्या बारामास, रागरागिण्या, ऋतू, नवरस, शृंगार,मेघदूत अशा संस्कृत साहित्यावर आधारित अनेक देखण्या, आशयगर्भ चित्रमालिका, त्याशिवाय अर्कचित्रे, हास्यचित्रे, व्यक्तिचित्रे, व्यंगचित्रेही दलालांनी सादर केली. त्यांच्या अष्टनायिकांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले, घराघरातील भिंती सजविल्या.
जुन्या पिढीच्या अनेक रसिकांच्या संग्रही त्या आजही आहेत. मात्र केवळ संस्कृत अभिजात नायिकांचे चित्रण हीच दलालांची खासियत नव्हती. स्वातंत्र्योत्तर भारतातला हा आधुनिक, मुक्त विचारांचे वारे वाहणारा लक्षवेधी कालखंड होता. मराठी मध्यमवर्गीय, शहरी घरांतल्या स्त्रिया नुसत्या शिकतच नव्हत्या, तर घराबाहेर पडून आत्मविश्वासाने नोकरी करायला लागल्या होत्या. आपल्या आवडी-निवडी, छंद जोपासत होत्या.
दलालांच्या स्त्री चित्रणात याचे प्रतिबिंब अचूक पडलेले आढळते. दलालांची या काळात चितारलेल्या अनेक मुखपृष्ठांवरची स्त्री आत्मविश्वासू, आधुनिक आहे, केवळ पेहेरावातच नाही, तर विचारांमधेही. तिच्या शारिर बोलीतून ते दृगोच्चर होते. ही स्त्री डौलदार आहे, तिची चेहरेपट्टी भलेही पारंपरिक भारतीय सौंदर्य निकषांनुसार रेखीव, मनमोहक असो, पण ते केवळ नखरेल नाही, खेळकर, मिश्किल, नर्मविनोदी, बौद्धिक दर्जा दर्शवणारे भाव त्यावर आहेत. तिच्या हातात पुस्तके आहेत, पर्स आहे जी केवळ शोभेची वाटत नाही.
आधुनिक, बदलत्या जीवनशैलीही नाते सांगणाऱ्या स्त्रिया आहेत. भारतातील इतर प्रांतातील, आदिवासी स्त्रियाही दलालांनी चितारल्या. या कामासोबत जाहिराती, दिनदर्शिका, मुखपृष्ठे याद्वारेही दलाल उत्तमोत्तम कलेचा आविष्कार करतच होते. धार्मिक, देवादिकांची त्यांची चित्रेही दलालांचं खास वैशिष्ट्य दर्शवतात.
दलाल हे चतुरस्त्र संपादक होते, मराठीतील त्या काळातील प्रत्येक नामवंत लेखक, कवी, समीक्षकांचे 'दीपावली' हे व्यासपीठ होते, आणि प्रत्येक दर्जेदार पुस्तकाचे मुखपृष्ठ दलालांचेच होते. असंख्य पारितोषिके, रसिकांचे उदंड प्रेम त्यांना लाभले. रविवर्मांच्या चित्रकरितेचा वारसा जोपासणार्या दलालांना मिळालेले प्रेम आणि लोकप्रियताही त्याच्याच तोडीची होती. मात्र तरीही दीनानाथ दलालांच्या हृदयात खोलवर एक अनाकलनीय खंत कायम राहिली.
कला-समीक्षकांनी आपल्याला कायम एक व्यावसायिक चित्रकार मानले, सर्जनशील चित्रकलेचा दर्जा त्यांनी दिला नाही, आपण व्यावसायिक कामांमधे गुंतून रहाण्यापेक्षा स्वत:ला हवी तशी पेंटींग्ज करायला वेळ दिला असता तर कदाचित हे साध्य होऊ शकले असते अशी खंत. 1970 सालच्या रुद्रवाणी दिवाळी अंकात त्यांच्या मनातला हा सल त्यांनी उघड केला.
दलालांमधला चित्रकार इतक्या उदंड लोकप्रियतेनंतर, रसिकांच्या प्रेमाच्या वर्षावातही अंतर्यामी असा अस्वस्थ राहिला. एका सर्जनशील, संवेदनशील कलावंताच्या मनातच अशी खंत, ही वेदना निर्माण होऊ शकते. दलालांची काही र स्केचेस, उदा. कोंबड्यांची झुंज किंवा काश्मीरच्या प्रवास वर्णनातली रेखाचित्रे पाहिली तर दलालांना आयुष्याने जरा अधिक काळ बहाल केला असता तर त्यांनी त्यांची ही इच्छाही अत्यंत समर्थपणे पूर्ण केली असती यात काहिच शंका वाटत नाही. दुर्दैवाने हा अवधी त्यांना मिळाला नाही.
1971 मध्ये दीपावलीचा 'रौप्यमहोत्सव' समारंभ पार पडला आणि वयाच्या अवघ्या 54व्या वर्षी आपली असंख्य अभिजात चित्रसंपत्ती मागे ठेवून या कलावंताने चित्रमैफलीचा निरोप घेतला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)