You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानी खासदाराचा 31 वर्षांनी लहान तरूणीशी विवाह वादाचं कारण का बनलंय?
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे 49 वर्षीय नेते आणि खासदार आमीर लियाकत हुसैन सध्या प्रचंड चर्चेत आहेत.
खरं तर, लियाकत हुसैन यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार त्यांनी 18 वर्षांच्या सय्यदा दानिया यांच्या विवाह केला असून हा त्यांचा तिसरा विवाह आहे. दोघांच्या वयामध्ये 31 वर्षांचं अंतर आहे.
लियाकत हुसैन यांच्या ट्वीटच्या एका दिवसापूर्वीच त्यांच्या दुसऱ्या पत्नी सय्यदा तुबा अन्वर यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये घटस्फोटाची माहिती दिली होती.
"जड मनानं मी लोकांना आपल्या जीवनात झालेल्या बदलाची माहिती देऊ इच्छितो. माझं कुटुंब आणि जवळच्या मित्रांना माहिती आहे की, 14 महिने विभक्त राहिल्यानंतर हे स्पष्ट होतं की, आता पुन्हा तडजोड होण्याची काहीही आशा नाही. त्यामुळं मला न्यायालयातून वेगळं होण्याचा पर्याय निवडावा लागला," असं त्यांनी लिहिलं होतं.
"माझ्यासाठी हे किती कठीण होतं हे मी सांगू शकत नाही, पण मला अल्लाहवर विश्वास आहे. मी सर्वांना विनंती करेल की, या कठिण काळात माझ्या निर्णयाचा आदर ठेवावा," असं तुबा अन्वर यांनी याच पोस्टमध्ये लिहिलं होतं.
टीवी होस्ट असलेल्या 28 वर्षीय तुबा अन्वर आणि लियाकत हुसैन यांनी 2018 मध्ये विवाह केला होता. त्यावेळी लियाकत हुसैन यांच्या पहिल्या पत्नींनी त्यांना फोनवरून तलाक दिल्याचा आरोप केला होता.
लियाकत हुसैन यांच्या पहिल्या पत्नी सय्यदा बुशरा इक्बाल यांनी त्यावेळी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे हा दावा केला होता. दुसऱ्या पत्नीसमोर फोन कॉलवर त्यांना तलाक देण्यात आला होता, असं त्यांनी म्हटलं होतं. तुबा यांच्या म्हणण्यावर त्यांनी असं केलं होतं, असंही त्या म्हणाल्या होत्या.
10 फेब्रुवारीलाच आमीर लियाकत हुसैन यांनी त्यांच्या तिसऱ्या लग्नाची माहिती दिली होती.
लियाकत हुसैन यांनी दक्षिण पंजाबच्या लोधरानमध्ये राहणाऱ्या सआदत कुटुंबातील सय्यदा दानिया शाह यांच्याशी निकाह केला आहे, असं सांगितलं होतं. त्यांचं वय 18 वर्षे आहे. शुभचिंतकांनी शुभेच्छा द्याव्या अशी विनंतीही लियाकत यांनी केली आहे.
साधारणपणे पती-पत्नी यांच्यात वयामध्ये 31 वर्षांचं अंतर हे असामान्य असतं. पाकिस्तानात कायद्यानुसार वयाच्या 18 वर्षानंतर लग्नाची परवानगी मिळते. पण पाकिस्तानात कमी वयाच्या मुलींना लग्नासाठी प्राथमिकता दिली जाते का? आणि या देशात ही बाब सामान्य होत आहे का? असे प्रश्न हुसैन यांच्या लग्नानं उपस्थित झाले आहेत.
पाकिस्तानातील ट्विटर यूझर सोहनी यांनी लियाकत हुसैन यांच्या लग्नाबाबत पोस्ट केली आहे. "प्रत्येक वैध बाब ही योग्यच नसते. एका 50 वर्षाच्या व्यक्तीनं 18 वर्षांच्या मुलीशी लग्नं करणं वैध आहे का? हो. पण नवऱ्याच्या तुलनेत वयाची तुलना केली तर मुलगी ही सध्या लहान आहे का? हो. कारण तिचा जन्म झाला होता, तेव्हा नवरा हा 32 वर्षांचा होता," असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
"जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा कमी वयाच्या एखाद्या किशोरवयीन व्यक्तीशी लग्न करता तेव्हा तुम्ही एक चुकीचं संतुलन निर्माण करत असतात. तुमचं व्यक्तिमत्वं आणि जीवन पूर्णपणे तयार होत असतं. पण एका 18 वर्षीय किशोर किंवा किशोरीचं तसं नसतं. तुम्ही त्यांना हवं तसं घडवू शकता आणि त्यासाठी आमीरसारखे लोक असं करतात," असं सोहनी यांनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटलं.
या लग्नावर टीका करणाऱ्या सोहनी एकट्या नाहीत. "अनेक वयस्कर मुलं हे तरुण मुलींनी त्यांच्या इशाऱ्यावर चालावं यासाठी त्यांच्याशी नातं जोडतात आणि त्या अल्पवयीन नाहीत, असं म्हणत ते योग्य असल्याचं ठरवतात. ते याचा विचार करत नाहीत का, की ते 25 वर्षांचे होते तेव्हा ती केवळ 10 वर्षांची असेल?", असं फलक नावाच्या एक दुसऱ्या यूझर लिहितात.
"खरं दुर्दैव म्हणजे, बहुतांश पाकिस्तानी पुरुष आमीर लियाकत सारखेच आहेत. त्यांच्या पत्नी आणि मुलांना सोडून ते लहान मुलीसारखी नवरी शोधतात. समाजात दबदबा तयार करण्यासाठी ते तसं करतात. ही विखारी पद्धत सुरू असून तिचा स्वीकारही केला जात आहे," असं महीन गनी लिहितात.
काही ट्विटर यूझर्सनं दोघांच्या वयातील अंतराबाबतचे मीम्सही शेअर केले आहेत.
मात्र, टीकांच्या या वातावरणात अनेक यूझर असंही म्हणत आहेत की, सर्व पाकिस्तानी पुरुष आमिर लियाकत सारखे नसतात.
आधीही होती लग्नाची अफवा
2021 मध्ये अभिनेत्री आणि मॉडेल हानिया खान यांनी त्या लियाकत हुसैन यांच्या पत्नी असल्याचा दावा केला होता. त्यानंतर लियाकत हुसैन यांनी एक व्हीडिओ संदेश जारी करत या अफवांना पूर्णविराम दिला होता.
त्यांची एकच पत्नी असून तिचं नाव तुबा असल्याचं त्यांनी व्हीडिओ मॅसेजमघ्ये म्हटलं होतं.
सौंदर्यासाठी कमी वयाची नवरी शोधतात पाकिस्तानी?
या मुद्द्यावर बीबीसी उर्दूनं अनेक लोकांशी चर्चा केली आणि त्यातून कमी वयाच्या मुलीशी लग्नं करण्यामागची अनेक कारणं समोर आली होती, त्यातील सर्वात पहिलं कारण म्हणजे, सौंदर्य.
कराचीत राहणारे समीर खान यांना तीन मुलं आहेत. "आम्ही जेव्हा मुलगी पाहायला जातो तेव्हा सौंदर्य पाहतो, पण जेव्हा आम्ही मुलीसाठी मुलगा शोधतो तेव्हा आणि त्याचं वय नव्हे तर त्याचा पैसा आणि शिक्षण पाहतो," असं खान यांनी बीबीसीला बोलताना सांगितलं.
"मी माझ्या मुलासाठी कमी वयाची नवरी आणेल म्हणजे, ती दीर्घकाळ सुंदर दिसेल. मला वाटतं की, 80 टक्के लोकांना सुंदर सून हवी असते," असं समीर खान म्हणतात. पण सौंदर्य हेच एकमेव कारण आहे का?
"कमी वयाची मुलगी शोधण्यामागे आणखी एक मोठं कारण आहे. ते म्हणजे वय जितकं कमी असेल मुलं जन्माला घालण्यासाठी तेवढाच अधिक काळ मिळतो. लग्नाच्या सुरुवातीला मुलं नको असतील, तरी नंतरही पति-पत्नीकडे यासाठी वेळ असतो," असं समीर खान याबाबत म्हणाले.
"तरुण मुलींवर सहज नियंत्रण मिळवता येतं"
कराचीच्या राहणाऱ्या आयेशा (नाव बदललेलं) त्यांच्या लग्नाच्या अनुभवाच्या आधारावर हे मान्य करतात की, कमी वयाची मुलगी लग्नासाठी शोधण्यामागे हे कारण असतं की, पुरुष त्यांच्या मुलांना व्यवस्थित मोठं करू शकतील.
मात्र, त्यांनी आणखी एक कारण सांगितलं. "प्रत्येकालाच जगावर राज्य करायची इच्छा आहे. विशेषतः सासूला अशी सून हवी असते जिला त्यांच्या पद्धतीनं वागवता येईल. त्यासाठी कमी वयाच्या मुली हव्या असतात. जास्त वयाच्या मुलींचा स्वतःचा असा विचार असतो, त्या पद्धतीनं त्या कामं करतात. त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं कठिण असतं," असं त्यांचं म्हणणं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)