पाकिस्तानातील दलित हिंदू सिनेटर कृष्णा कुमार कोहली का चर्चेत आहेत?

पाकिस्तानी माध्यमांमध्ये हिंदू सिनेटर कृष्णा कुमारी कोहली चर्चेत आहेत. पाकिस्तानी माध्यमं त्यांना 'हिंदू दलित सिनेटर' म्हणत आहेत.

कोहली पाकिस्तानमधील विरोधी पक्ष असलेल्या पिपल्स पार्टीच्या सिनेटर आहेत. त्या 2018 साली पीपीपीच्या तिकिटावर पाकिस्तानातील सिंध प्रांतातून आरक्षित जागेवरून जिंकल्या.

शुक्रवारी, 4 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या सिनेटच्या अध्यक्षीय खुर्चीवर कृष्णा कुमारी कोहली होत्या आणि त्यांच्या अध्यक्षतेतच भारत-प्रशासित काश्मीरबाबत एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

भारताच्या संसदेतही अनेकदा लोकसभा अध्यक्षांच्या गैरहजेरीत एखाद्या वरिष्ठ खासदाराकडे लोकसभा अध्यक्षांच्या आसनाची तात्पुरती जबाबदारी दिली जाते.

शुक्रवारी पाकिस्तानी सिनेटमध्ये अध्यक्षांच्या आसनावर कोहली होत्या आणि ही बातमी पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चेचं केंद्र बनली.

पाकिस्तानमधील 'द एक्स्प्रेस ट्रिब्युन' या इंग्रजी वर्तमानपत्रात लिहिलंय की, "हिंदू सिनेटरच्या अध्यक्षतेत पाकिस्तानी सिनेटने शुक्रवारी भारत-प्रशासित काश्मीरमधील लोकांच्या एकजुटीबाबत सर्वसंमतीने प्रस्ताव मंजूर केला. सिनेटनं 5 ऑगस्ट 2019 रोजी भारतातील मोदी सरकारच्या त्या निर्णयाला फेटाळलं, ज्याद्वारे जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला होता."

पाकिस्तानमधील सत्ताधारी तहरिक-ए-इन्साफ पार्टीचे सिनेटर फैसल जावेद खान यांनी ट्वीट करून म्हटलंय की, "एका हिंदूने पाकिस्तानी सिनेटमध्ये काश्मीरवरील सत्राचं अध्यक्षस्थान भूषवलं. सिनेटच्या अध्यक्षांनी आमच्या सहकारी कृष्णा कुमार कोहलींना हा सन्मान दिला. पाकिस्तानने भारताला काश्मीरबाबत मोठा संदेश दिलाय. पाकिस्तान अल्पसंख्यांकांसोबत उभा आहे, मात्र भारत अल्पसंख्यांकांविरोधात आहे."

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांनीही ट्वीट करून म्हटलंय की, "सिंध प्रांतातून सिनेट असलेल्या कृष्णा कोहली काश्मीरच्या एकजुटीवरील सिनेटच्या सत्रात अध्यक्षा राहिल्या. हा तो पाकिस्तान आहे, ज्याचं नेतृत्व पीपीपी करते. देशभक्ती, समानता असणारा पाकिस्तान."

स्वत:ला हा सन्मान मिळाल्यानंतर कृष्णा कोहली यांनी ट्वीट केलंय की, "काश्मीरच्या एकजुटीच्या दिवशी भारतानं अवैध ताबा मिळवलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील सद्यस्थितीवर चर्चेसाठीच्या सिनेट सत्राचं अध्यक्षस्थान मिळणं सन्मानाची बाब आहे. पाकिस्तानच्या संसदेची सदस्य बनण्याची संधी दिल्याबद्दल पाकिस्तानची संसद आणि अध्यक्ष बिलावल भुट्टो यांचे आभार."

सोशल मीडियावरील युजर अयाज गुल नी सिनेट अध्यक्षांचा व्हीडिओ ट्वीट करत म्हटलंय की, "अल्पसंख्यांक हिंदू दलित समूहातील पाकिस्तानच्या महिला सिनेटर कृष्णा कुमार कोहली सिनेट सत्राचं अध्यक्षपद भूषवत आहेत."

मोदींच्या नावानं संदेश

कृष्णा कुमारी कोहली यांनी सिनेटचं अध्यक्षपद भूषवताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं संदेशही दिलाय. त्या म्हणाल्या, "मोदींना मी हा संदेश देऊ इच्छिते की, हा पाकिस्तानचा चेहरा आहे. मोदींना आम्ही सांगू इच्छितो की, त्यांची मनमानी आम्ही सहन करणार नाही."

कृष्णा कुमारी कोहलींना आंतरराष्ट्रीय महिला दिनावेळीही सिनेटचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं. 2018 साली त्या सिनेट म्हणून निवडून आल्या आहेत.

सिंध प्रांतातील नगरपारकर भागातील धाना गावच्या त्या रहिवासी आहेत. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, "मी या पदावर पोहोचल्याबद्दल स्वत:ला नशीबवान समजते."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)