'लग्नाला 12 वर्षं झाली, पण मला बायकोबरोबरच इतर पुरुषांविषयीही आकर्षण वाटतं'

बायसेक्शुअल जीवन
    • Author, तुलसी प्रसाद रेड्डी नंगा
    • Role, बीबीसी तामिळ प्रतिनिधी

ग्रामीण भागातील बायसेक्शुअल लोकांचं आयुष्य कसं असतं हे इतर लोकांनाही कळावं यासाठी बीबीसीने हा लेख प्रकाशित केला आहे.

यासाठी बीबीसीने आंध्रप्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या दोन लोकांशी संवाद साधला.

यात एका बायसेक्शुअल पुरुषाची मुलाखत घेतली आहे. तो स्त्री आणि पुरुष अशा दोघांकडेही आकर्षित होतो. त्याचा बॉयफ्रेंड मात्र समलैंगिक असून तो केवळ पुरुषांकडेच आकर्षित होतो.

यातल्या एकाचं नाव भास्कर असून ते विवाहित आहेत. त्यांना मुलंही आहेत. भास्कर जेव्हा आपल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवतात, तेव्हा त्यांचं वर्तन हे पुरूषांप्रमाणे असतं, पण जेव्हा ते दुसऱ्या पुरुषाबरोबर शारीरिक संबंध ठेवतात तेव्हा ते स्त्रीप्रमाणे वागतात.

मूळ नाव उघड न करण्याच्या अटीवर त्यांनी हे सांगितलं.

बीबीसीने भास्करला त्यांच्या आयुष्याशी निगडित काही प्रश्न विचारले असता त्यावर त्यांनी दिलेली उत्तरं पुढीलप्रमाणे-

प्रश्न : तुम्हाला पुरुष आवडतात हे तुम्हाला पहिल्यांदा कधी लक्षात आलं?

उत्तर : मी शाळेत असताना मला याची जाणीव झाली. त्या वयात मुलींशी चांगलं बोललं की चिडवायला सुरुवात होते. त्यामुळे मी मित्रांसोबत फिरायचो. असंच एकदा शाळेत माझा एक मित्र मला म्हणाला की, तुझे ओठ खूप छान आहेत.

त्यानंतर अभ्यासाचं कारण देऊन मी घराबाहेर पडू लागलो.

परीक्षेच्या काळात आम्ही दोघेही बाहेर जाऊन अभ्यास करू लागलो. अशाच एका भेटीत आमच्यात संबंध प्रस्थापित झाले आणि ते पुढे तसेच सुरू राहिले. मग मला याची सवय झाली. माझं मुलांविषयीचं आकर्षण वाढू लागलं आणि यातून मला आनंद मिळू लागला.

प्रश्न : तुम्ही तुमच्या जोडीदाराला कुठे भेटायचा?

कॉलेजमध्ये असताना आम्ही बऱ्याचदा भेटायचो. आम्ही अभ्यास किंवा कामासाठी जातोय असं सांगून घराबाहेर पडायचो. आणि त्यात आम्ही दोघेही मुलं असल्यानं तितकं कोणाच्या लक्षात येत नव्हतं.

आम्ही स्थानिक असल्याने आम्हाला बऱ्याच ठिकाणांची माहिती होती. लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आम्ही डोंगर, शेतं आणि घनदाट जंगलात जायचो.

आता माझं आयुष्य वेगळं आहे. त्याचंही आयुष्य आहे, त्याचा व्यवसाय आहे. आम्हाला कधी भेटायची इच्छा झाली तर मी एकतर त्याच्याकडे जायचो किंवा तो माझ्याकडे यायचा.

प्रश्न : तुमच्या कुटुंबियांना तुमच्यावर कधी संशय आला नाही का?

नाही. मी त्यांच्यासमोर असं कधी वागलोच नाही, त्यांना हे कळलं तर खूप त्रास होईल.

त्यांनी जर विचारलं की, ही व्यक्ती कोण आहे? तर हा माझा जवळचा मित्र आहे, असं मी सांगून टाकायचो. त्यानंतर ते काहीच प्रश्न विचारायचे नाहीत.

जीवन

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कदाचित त्यांना माझ्या विषयी माहितीही असेल. पण ते मला याबाबत कधीच विचारणार नाहीत. कारण त्यांना भीती आहे की, असं काही विचारल्यावर मला त्याचा त्रास होईल.

प्रश्न : तुमच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी आहेत का?

माझ्या लग्नाला आज 12 वर्षे झाली. पदवीनंतर माझं लग्न झालं आणि तेव्हापासून आजतागायत माझं वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरू आहे.

मला काही अडचण नाही. मला स्त्री आणि पुरुष अशा दोघांविषयी आकर्षण वाटतं.

प्रश्न : ग्रामीण भागातील लोकांना तुमच्याविषयी काय वाटायचं?

त्यांना वाटायचं की, मी वेगळा आहे. बऱ्याचदा गावातील एखाद्या पुरुषाला त्याची लैंगिक भूक भागवण्यासाठी स्त्री मिळत नसेल तर माझ्या दारावर यायचे.

खेड्यापाड्यात अशा गोष्टी लोकांना लवकर कळतात. काही पुरुष मद्यधुंद अवस्थेत इतर लोकांना सांगतात की, 'मी त्याच्यासोबत हे केलं ते केलं.'

त्यामुळे अशी माहिती गावात लगेचच पसरते. शहरांमध्ये अशी अडचण येत नाही.

प्रश्न : तुमच्यासारख्या लोकांना आयुष्यात कोणत्या अडचणी येतात?

माझ्याविषयी कळल्यानंतर काही लोक जबरदस्तीने माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात.

मला जे आवडते ते मी करतो. पण तुम्हाला आवडत नसलेल्या व्यक्तीसोबत वेळ घालवणं कठीण असतं. दोन-तीन जणांनी येऊन मला शिवीगाळ केली होती.

अशाप्रकारे जेव्हा ते आपल्यावर जबरदस्ती करतात तेव्हा दुखापत होते. दुखापत कशी झाली हे डॉक्टरही सांगू शकत नाहीत.

बायसेक्शुअल आयुष्य

पूर्वी डॉक्टरांशी एकांतात बोलणं अशक्य होतं. आता आमच्याकडे स्वयंसेवी संस्था आहेत. काही वाईट घडत असेल तर ते तुम्हाला मदत करतात, तुम्हाला योग्य उपचार मिळवून देतात.

प्रश्न : समलैंगिक लोक त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न करतात त्याबद्दल काय वाटतं?

एक पुरुष म्हणून जर तुमचं इतर पुरुषावर प्रेम असेल तर तुम्ही स्त्री सोबत लग्न करणं टाळलं पाहिजे. औषधं आणि गोळ्यांनी तुम्ही केवळ दोन महिने तुमच्या पत्नीला सुख देऊ शकता.

पण आयुष्यभर तुम्ही तिला संतुष्ट ठेऊ शकत नाही. याचा दोघांवरही परिणाम होतो. समाज काय विचार करेल या भीतीने लग्न केलं तर आयुष्य खराब होतं

प्रश्न : ट्रान्सजेंडर स्त्री असलेल्या व्यक्तीला तुम्ही काय सल्ला द्याल?

तुम्हाला जे आवडतं त्यावर तुम्ही ठाम असलं पाहिजे. जर तुम्हाला एखादा चांगला माणूस आवडला आणि तुम्हाला त्याच्याबरोबर राहायचं असेल तर सर्वकाही सोडून त्याच्याबरोबर राहायला हवं. पण त्यानंतर तुम्ही इतर कोणाच्याही संपर्कात राहू नका.

प्रश्न: समलैंगिक जोडप्यांना कोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं?

समाजासमोर आपल्या जोडीदाराला मित्र म्हणणं हे सामान्य आहे. पण मैत्री पलीकडे जाऊन त्यांच्यात घट्ट नातं असतं. किरकोळ मतभेदाचा दोघांपैकी एकाच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. समाज त्याला पुरुष म्हणून बघत असल्याने पाठिंबा मिळत नाही.

विवाहित महिलांना त्यांचे पती फसवतात तेव्हा त्यांना समजाकडून पाठिंबा मिळतो, कायदेशीर मदत मिळते. त्याचप्रमाणे समलिंगी जोडप्यांनाही कायदेशीर आधाराची गरज असते.

प्रश्न: तुमच्या कायद्यांकडून काय अपेक्षा आहेत?

साधारणपणे घटस्फोटित महिलेला तिच्या पतीकडून पोटगी मिळते. त्याचप्रमाणे समलैंगिक संबंधात फसवणूक झाली तर त्यातही पोटगी मिळावी.

तसं झालं तर महिलांना जे संरक्षण मिळतं ते आम्हालाही मिळेल.

कायदा असेल तर पुन्हा फसवणूक होणार नाही. जर समलैंगिक संबंधात जोडीदार फसवणूक करणारा असेल तर समोरच्या व्यक्तीला मनस्ताप सहन करावा लागतो, कधीकधी तर पीडित व्यक्ती आत्महत्या करते.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

लग्नासारख्या बंधनात तुम्ही तुमच्या हक्कांसाठी आवाज उठवू शकता. सर्वांना समान न्याय देणं न्यायालयाचं कर्तव्य आहे, त्यामुळे अनुकूल निकाल आला तर बरं होईल.

प्रश्न : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली तर तुम्हाला काय फायदा होईल?

समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळाल्यास त्यांना सर्व अधिकार मिळतील. कोणतीही समस्या उद्भवणार नाही आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलेल.

प्रश्न : तुमचे दुसर्‍या पुरुषासोबत संबंध आहेत हे तुमच्या पत्नीला माहीत आहे का?

तिला हे माहीत नाही. जरी तिला हे समजलं तरी मी परिस्थिती नीट हाताळेन.

प्रश्न : तुमच्या पत्नीने तुम्हाला दोघांपैकी एकाची निवड करायला सांगितलं तर तुम्ही काय कराल?

अशा परिस्थितीत बरेच लोक त्यांच्या पत्नीऐवजी त्यांच्या जोडीदाराची निवड करतात. त्यांची पत्नी असेल तरी ते आपल्या जोडीदारासोबतचं नातं सुरू ठेवतात, कारण त्यांना जोडीदारात रस असतो. मला जर अशा परिस्थितीचा सामना करावा लागला तर मी दोघांनाही समान वागणूक देईन.

प्रश्न : सत्य लपवून लग्न करणं चुकीचं वाटत नाही का?

मला लग्न करायचं होतं, त्यामुळे माझ्यात ती अपराधीपणाची भावना नाही. मी लग्न केलंय हे योग्य आहे असं मला वाटतं.

मला माझा अंदाज आहे. मी दोन्ही गोष्टी नीट हाताळू शकतो, म्हणून मी लग्न केलं.

लग्नापूर्वी माझी एक मैत्रीण होती. पण तिच्या आकस्मिक निधनानंतर मला दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न करावं लागलं.

प्रतिकात्मक

फोटो स्रोत, Getty Images

लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्यांपैकी एक मोहम्मद आहे. तो समलैंगिक (गे) म्हणजेच केवळ पुरुषांकडे आकर्षित होतो.

मोहम्मद 22 वर्षांचा असून पदव्युत्तर शिक्षण घेतोय. त्याला स्वतःची ओळख ट्रान्सजेंडर अशी करून द्यायची नाहीये. पण त्याला स्त्रियांविषयी आकर्षण नाही. त्याचा एक पुरुष मित्र देखील आहे.

बीबीसीशी बोलताना त्याने काही प्रश्नांची उत्तरं दिली.

प्रश्न : तुला पुरुषांविषयी आकर्षण आहे हे कसं समजलं?

मी शाळेत असताना माझ्या चुलत भावाने मला पॉर्न व्हीडिओ दाखवले होते. ते व्हीडिओ पाहून मला ते करण्याची इच्छा झाली. मी विचार केला की, मी ही असा प्रयत्न केला तर? त्यानंतर या सगळ्याची सुरुवात झाली.

प्रश्न: तुला पुरुषांमध्ये रस का आहे?

जेव्हा मी स्त्रियांकडे पाहतो तेव्हा मला त्यांच्यात माझी मोठी बहीण, धाकटी बहीण, आई दिसते. मी दहावीत असताना मला पहिल्यांदा हा अनुभव आला. त्यानंतर पुरुषांमध्ये रस वाढला. मला पुरुषांसोबत राहायचं होतं. माझ्या कुटुंबीयांना हे माहीत नाही. मला त्यांना सांगायचंही नाही.

प्रश्न : तुझ्या जोडीदाराशी तुझं नातं कसं आहे?

माझा जोडीदार एका मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मी त्याला वारंवार भेटू शकत नाही. तो सुट्टीच्या दिवशी आल्यावर आम्ही एकत्र राहतो. बाकीच्या दिवशी मी सगळ्यांसोबत असतो.

प्रश्न : ग्रामीण भागात तुमच्या सारख्या लोकांचं आयुष्य कसं आहे?

खेड्यांपेक्षा शहरांमध्ये गोष्टी खूप सोप्या असतात. अशी अनेक ठिकाणं आहेत ज्याची कोणालाच माहिती नाही. काही ठराविक ठिकाणी आलो तुम्ही रूम घेऊन राहू शकता.

आयुष्य

मी माझ्या गावात दहावीपर्यंत शिकलो. माझा मेहुणा मला दिवसा शाळेत सोडायला यायचा. त्यामुळे तो मला गावापासून थोडं लांब असलेल्या जंगलात घेऊन जायचा आणि माझ्याशी जवळीक साधून शारीरिक संबंध ठेवायचा.

प्रश्न: तू डॉक्टरांकडे गेलास तर ते तुझ्याशी कसे वागतात?

स्वयंसेवी संस्थांच्या मदतीमुळे रुग्णालयात गेल्यावर आम्हाला आदराने वागवले जाते.

ते इतरांशी जसे वागतात तसेच आमच्याशी वागतात. शिवाय सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही देतात.

प्रश्न : तू कधी लग्नाचा विचार केला आहेस का?

एका विशिष्ट वयानंतर या सगळ्यापासून दूर होऊन समाजात एक मान्यताप्राप्त व्यक्ती व्हावं लागतं. जर मला लग्न करावंसं वाटलं तर करेन.

अजून पर्यंत तरी मला स्त्रियांविषयी कोणतीही भावना नाहीये. घरातील लोकांना माझं लग्न लावून द्यायचं आहे. मला वाटतं लग्नाआधी मी त्या मुलीला माझ्या भावना सांगून मग लग्न करायला हवं.

प्रश्न : तुला मैत्रिणी आहेत का?

मी अद्याप कोणत्याही मुलीसोबत डेटवर गेलेलो नाही आणि तसा कधी विचार माझ्या मनात आलाच नाही.

प्रश्न: तुझ्या कुटुंबियांना याविषयी कळलं तर तुझं यावर काय मत असेल?

आमच्या घरात याविषयी कल्पना नाही. एकदा माझ्या आईने मला मुलांशी जवळीक करताना पाहिलं होतं. त्यावेळी तिने हे चुकीचं असल्याचं मला बजावलं होतं.

आयुष्य

पण मी एकासोबत नात्यात आहे हे त्यांना माहीत नाही. मी दहावीपर्यंतच गावात शिकलो. आता मी जास्त गावी जात नाही.

प्रश्न : सरकारकडून तुला काय अपेक्षा आहेत?

जर सरकारला आमच्यासाठी काही करायचं असेल तर त्यांनी फक्त आम्हाला हव्या त्या व्यक्तीसोबत राहू द्यावं. न्यायालयानेही आम्हाला एकत्र राहण्यासाठी परवानगी द्यावी. पण समाजानेही आम्हाला साथ दिली पाहिजे.

भास्कर आणि मोहम्मद या दोघांनीही सांगितलं की बऱ्याच स्वयंसेवी संस्था त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या आहेत..

मदतीसाठी तत्पर असणाऱ्या स्वयंसेवी संस्था

मदनपल्ली व्हिलेज रिहॅबिलिटेशन सोसायटी ही एक स्वयंसेवी संस्था आहे. ही संस्था ग्रामीण भागात राहणाऱ्या समलिंगी, उभयलिंगी लोकांच्या कल्याणासाठी काम करते.

ही संस्था नियमित वैद्यकीय तपासणी शिबिर घेते. साधारणपणे दर सहा महिन्यांनी या वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतात.

या शिबिरादरम्यान सुरक्षित लैंगिक संबंधासाठी जेल, निरोध इत्यादींचे वाटप केले जाते.

संस्थेच्या संचालिका जयन्ना यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "मी 2004 पासून या संस्थेसोबत काम करत आहे. या 20 वर्षांत आम्ही जवळपास 3400 लोकांची मदत केली आहे."

"आता आम्ही त्यांना आवश्यक सेवा देत आहोत. एचआयव्ही पीडितांना औषधं देत आहोत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)