पत्रकार तुषार खरात यांना अटक; मंत्री जयकुमार गोरेंशी संबंधित हे प्रकरण काय?

'लय भारी' या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना अटक करण्यात आली आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुषार खरात यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर तुषार खरात यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तुषार खरात यांच्यावर अॅट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी इत्यादी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडूज, दहवडी, म्हसवड, तलभीड, सोलापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तुषार खरात हे 'लय भारी' नावाचं युट्यूब चॅनल चालवतात. याआधी त्यांनी वेगवेगळ्या माध्यम समूहांसोबत काम केलं आहे.
जयकुमार गोरे यांच्याविरोधात एकतर्फी बातम्या दाखवून बदनामी केल्याचा आरोप तुषार खरात यांच्यावर करण्यात आला आहे.


तर, तुषार खरात यांची अटक बेकायदशीर असल्याचं विरोधी पक्षानं म्हटलं आहे. खरात यांची अटक म्हणजे स्वतंत्र पत्रकारितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याची टीकाही केली जात आहे.
पण हे नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.
5 मार्च रोजी काय घडलं?
5 मार्च 2025 रोजी शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केला.
राऊत म्हणाले, "जयकुमार गोरे यांच्याबाबत घडलेला एक प्रकार समोर येतोय. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यांने विनयभंग आणि छळ केल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला काही दिवसांनी विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे."
5 मार्च रोजी जयकुमार गोरे विधीमंडळात दाखल झाले असता ते पत्रकारांशी संवाद साधू लागले.
यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी उल्लेख केलेल्या प्रकरणात कोर्टानं आपल्याला निर्दोष मुक्त केल्याचं सांगितलं.
गोरे म्हणाले, "2017 साली माझ्याविरोधात एक गुन्हा दाखल झाला होता. 2019 साली या प्रकरणी निकाल लागला. निकालाची प्रत माझ्याकडे आहे. निकालामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे."
तेव्हा पत्रकार तुषार खरात यांनी गोरे यांना विचारलं की, "तुम्ही हात जोडून माफी मागितली आणि आक्षेपार्ह फोटो पाठवले असं त्या महिलेचं म्हणणं आहे, हे खरं आहे की खोटं आहे?"
यावर उत्तर देताना जयकुमार गोरे म्हणाले की, "तुषारजी तुम्हाला खूप गडबड आहे. मी उत्तर देतोय, मग विचारा तुम्ही."
"माझी कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे. या संदर्भात ज्यांनी ज्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे. त्यांच्यावर मी आजच हक्कभंगाचा प्रस्ताव सभागृहात आणणार आहे," असं गोरे पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, Jaykumar Gore/ Facebook
पण तुम्ही आक्षेपार्ह फोटो पाठवले होते की नाही, हे खरंय की खोटं तेवढं सांगा ना, असा प्रश्न खरात यांनी केला.
त्यावर उत्तर देताना गोरे म्हणाले, "मी तेच सांगतोय, कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे. मी कुठलेही आक्षेपार्ह फोटो पाठवलेले नाही. कोर्टापेक्षा तुम्ही पण मोठे नाही असं माझं म्हणणं आहे."
यावेळी दुसऱ्या एका केसमध्ये गोरेंबाबत सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलंय, हे तुषार खरात यांनी सांगितलं.
त्यावर गोरे म्हणाले, "तुषारजी, पत्रकार म्हणून आपली पत्रकारिता फार उच्च दर्जाची आहे. त्यानंतर त्यांनी मोबाईल हातात धरून बातम्या दाखवायला लागले. एक पत्रकार माझ्याविरोधात गेल्या दीड वर्षांपासून सातत्यानं एकतर्फी बातम्या लावतो. 85 बातम्या आहेत. अशा पत्रकारांना उत्तर द्यायला मी बांधील नाही."
हक्कभंग प्रस्ताव दाखल
6 मार्च रोजी जयकुमार गोरे यांनी विधिमंडळात पत्रकार तुषार खरात यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे.
यावेळी बोलताना गोरे म्हणाले, "लय भारी या यूट्यूब चॅनेलवर किमान 87 व्हीडिओ क्लिप माझ्या आणि कुटुंबाच्या बदनामीसाठी टाकणं दीड वर्षं सुरू आहे. लय भारी चॅनेल आणि त्यांचे पत्रकार तुषार खरात यांच्याविरोधात मी हक्कभंग प्रस्ताव दाखल करत आहे. न्यायालयानं मला निर्दोष मुक्त केलं आहे."
तुषार खरात यांच्याबरोबरच संजय राऊत आणि रोहित पवार यांनी बेछूट आरोप केल्यामुळे त्यांच्याविरोधातही हक्कभंग प्रस्ताव दाखल केल्याचं जयकुमार गोरे यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
6 मार्च रोजी दुपारच्या सुमारास, या प्रकरणातील संबंधित महिलेनं जयकुमार गोरे यांच्याविरोधात 17 मार्चपासून उपोषणाला बसणार असल्याचं म्हटलं.
महिला म्हणाली, "आम्ही तुम्हाला जीवे मारू, कुटुंबाला त्रास देऊ, अशी धमकी मला देण्यात आली. त्यामुळे ऑक्टोबर 2019 मध्ये मी ती केस मागे घेतली. मी म्हणाले की, मला लेखी लिहून हवं की, मी पुन्हा असं करणार नाही. कुठल्याहीप्रकारचा त्रास देणार नाही. मग जयकुमार गोरे यांनी मला माफीनामा लिहून दिला."
खरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल
जयकुमार गोरे यांनी 9 मार्च रोजी सातारा जिल्ह्यातल्या दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये तुषार खरात यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यात तुषार खरात यांनी 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आलाय.
FIR मध्ये नमूद केलंय की, "तुषार खरात यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून वारंवार माझ्याविरुद्ध जाणीवपूर्णक मानहाणीकारक पोस्ट प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध दिवाणी आणि उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे.
"तुषार खरात यांनी माझ्या परिचयाच्या बळवंत पाटील यांना बोलावून घेतलं आणि म्हणाले की, जयकुमार गोरे यांना मिटवून घ्यायला सांगा, अन्यथा त्यांचे मंत्रीपद मी घालवणार आहे. मला जयकुमार गोरे यांना 5 कोटी रुपये द्यायला सांगा."
तुषार खरात यांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांविषयी त्यांची भूमिका स्पष्ट करणारा एक व्हीडिओ पोस्ट केला आहे.
त्यात खरात म्हणतात, "मी जयकुमार गोरेंशी कायदेशीर पातळीवर लढत होते. पण त्यांनी माझ्याविरोधात धादांत खोटा गुन्हा दाखल केला आहे. जयकुमार गोरेंच्या खऱ्या गोष्टी मी चव्हाट्यावर आणल्या म्हणून ते अशाप्रकारे राग काढत आहेत. पण मी लोकशाहीसाठी लढत होतो आणि अजूनही लढत राहिल."

फोटो स्रोत, MLS.ORG.IN
10 मार्चला तुषार खरात यांना मुंबईतून अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर रात्री उशिरा वडूज येथील रुग्णालयात त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
दरम्यान, न्यायालयासमोर तुषार खरात यांना हजर करण्यात आल्यानंतर त्यांना 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
'सत्तेचा गैरवापर'
पत्रकार तुषार खरात यांच्या घटनेचा निषेध करत असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
X या समाजमाध्यमावर त्यांनी लिहिलंय, "लय भारी या पोर्टलचे संपादक तुषार खरात यांना त्यांची बाजू मांडूही न देता अटक करण्यात आली. या देशात पत्रकारिता करणे किती अवघड झाले आहे याचा हा ढळढळीत पुरावा आहे. लोकतांत्रिक व्यवस्थेचा संकोच करणाऱ्या या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतो. पत्रकार तुषार खरात यांची मुक्तता झालीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय की, "तुषार खरात यांची अटक हा स्वातंत्र्य, लोकशाही मानणाऱ्या जनतेसाठी आघात आहे. जयकुमार गोरे यांनी झुंडशाहीचा कहर केला आहे. सत्ता आणि पोलिसी बळाचा गैरवापर करुन गोरे यांनी तुषार खरात यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन अटक करायला भाग पाडले."
तुषार खरात यांना झालेली अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय.
"एका महिलेवर झालेल्या अन्यायाला ज्यांनी वाचा फोडली. तसंच मागासवर्गीय आणि ओबीसी समाजाच्या जमिनी बळकावणे, कोविडच्या काळात मेडिकल कॉलेजमध्ये भ्रष्टाचार करून मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे, अशी अनेक प्रकरणं चव्हाट्यावर आणली. ते माण खटाव येथील पत्रकार तुषार खरात यांना झालेली अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे.
"सरकारची मनमानी खपवून न घेता अशाप्रकारे जनतेच्या हितासाठी निःस्वार्थीपणे लढणाऱ्या प्रामाणिक पत्रकाराचा आवाज कुणी दाबत असेल तर त्यांच्या मागे आम्ही भक्कमपणे उभं राहू. सर्व मीडियाही त्यांच्या पाठीशी राहील, ही अपेक्षा," असं रोहित पवार म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
दरम्यान, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघानं तुषार खरात यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आल्याची कृती चुकीची आणि आकसापोटी करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
तुषार खरात यांच्या पत्रकारितेबाबत आक्षेप असू शकतात. त्यासाठी अन्य कादेशीर मार्ग उपलब्ध असताना त्यांना आकसानं गुन्ह्यात अडकवून कायद्याचा गैरवापर करणं हे चुकीचेच आहे.
त्यामुळे राज्य सरकारनं या प्रकरणात चुकीचे घडू नये, खरात यांना चुकीच्या प्रकरणात अडकवले जाऊ नये म्हणून योग्य ती पावलं उचलावीत, अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघानं केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











