'मुलगी इंजिनीअर बनावी म्हणून साठवलेले पैसे बुडाले', FIITJEE क्लासेस अचानक बंद झाल्याचा नेमका गोंधळ काय?

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"मुलगी लहान होती तेव्हापासून 500-1000 रुपये जमा करत होतो. तिचं दहावी झाल्यानंतर तिला इंजिनिअर बनायचं स्वप्न होतं."

नागपुरातील आशीर्वाद नगर इथं राहणारे शेख फिरोज शेख सुभान यांच्या स्वप्नाला चांगलाच धक्का बसला. त्यांनी मुलीला जॉईंट एन्ट्रंस एक्झाम (JEE) च्या तयारीसाठी FIITJEE (फीटजी) कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला होता.

महिन्याला अवघे 8 हजार कमावणारे शेख फिरोज शेख सुभान यांनी त्यासाठी 1 लाख 44 हजार रुपये भरले. पण काही महिन्यांतच कोचिंग सेंटर बंद झाल्यानं त्यांच्यासमोर संकट उभं राहिलं आहे.

आता फोन करतो तर कोणीही, उचलत नाही. आमचे पैसे बुडाले आणि मुलीचं नुकसानही झालं, असं ते बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले.

फीटजीचे कोचिंग क्लासेस अचानक बंद पडल्यानं त्यांचे पैसे बुडाल्यानंतर त्यांनी पुन्हा दुसऱ्याकडून पैसे उसणे घेत मुलीला दुसऱ्या कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला.

पण ही परिस्थिती ओढावलेले शेख फक्त एकटच पालक नाहीत. नागपुरातील 60 पालकांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

त्यावरून कोचिंग क्लासचे चेअरमन डी. के. गोयल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती कोतवाली पोलिसांनी दिली. फीटजीच्या चेअरमनविरोधात दिल्ली, नोएडा इथं सुद्धा गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

नागपुरातील 60 पालकांचे 76 लाख रुपये बुडाले असून कोचिंग सेंटरच्या मालकानं पैसे परत द्यावे अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी कायदेशीर लढा उभारला आहे.

पण, पैसे परत मिळतील की नाही याची शाश्वती शेख यांना नाही. ते म्हणतात, "आम्ही एक दिवस कमावलं नाहीतर उपाशी राहू अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थिती कोर्टात किती चकरा मारायच्या. कामधंदा करायचा की कोर्टात चकरा मारायच्या?" असा सवाल ते उपस्थित करतात.

कर्ज काढून दुसऱ्या क्लासमध्ये घेतला प्रवेश

नागपुरातील आणखी एक पालक सतीष आष्टणकर यांनी पैसे व्याजासहित परत मिळावे अशी मागणी केली आहे. त्यांनीही FIITJEE च्या क्लासेसमध्ये मुलीसाठी 5 ऑक्टोबरला 1 लाख 40 हजार रुपये भरले होते.

सुरुवातीला 5 हजार रुपये भरून या कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी काही महिने पैसेच भरले नव्हते.

ज्या विद्यार्थ्यांनी ट्युशन फी दिली नाही त्यांना बसू देणार नाही, असं बजावल्यानंतर आष्टणकर यांनी ऑक्टोबर महिन्यात 1 लाख 40 हजार रुपये भरले आणि दोनच महिन्यात कोचिंग सेंटर बंद झालं.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र

31 डिसेंबरला मुलांना सांगण्यात आलं की, तुमचे क्लासेस दुसरीकडे होणार आहेत आणि 1 जानेवारीपासून कोचिंग क्लासेस सुरूच झाले नाही.

मुलीचं नुकसान होईल म्हणून आष्टणकर यांनी बजाज फायनान्समधून कर्ज घेतलं आणि मुलीला दुसऱ्या कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश मिळवून दिला.

"एकावेळी लाखभर रुपये कुठून आणणार होतो? दोन महिन्यांपूर्वीच 1 लाख 40 हजार भरले होते. आता इतके पैसे कोण देणार होतं? मुलीचं नुकसानही करू शकत नव्हतो. मग मी कर्ज काढलं आणि मुलीचे पैसे भरले," असं ते म्हणाले.

पालकांनी मुलांना दुसऱ्या कोचिंग क्लासमध्ये शिकवणी लावून दिली आहे. पण, अर्धे शिक्षण या क्लासमध्ये आणि अर्धे दुसऱ्या क्लासमध्ये यामुळे नुकसान झाल्याची भावना विद्यार्थी बोलून दाखवतात.

FIITJEE ने काय कारण सांगितले

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

नागपुरात FIITJEE च्या दोन शाखा होत्या. एक नंदनवन भागात आणि एक धरमपेठ इथं होती. याठिकाणी जवळपास 60 कर्मचारी कार्यरत होते. JEE च्या तयारीसाठी मुलं इथं गर्दी करत होती.

पण हे कोचिंग सेंटर अचानक बंद झाले. त्यामागचं कारण त्यांनी पालकांनाही सांगितलं नाही. पालकांनी वारंवार संपर्क केला. पण, कोणाकडून काही उत्तर मिळालं नाही.

पालकांनी कोचिंग सेंटरमध्ये शिकवणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारलं तर आमचे पगार झाले नाही, तर आम्ही कसं शिकवणार? असा उलट प्रश्न ते पालकांना करत होते.

कर्माचाऱ्यांचे पगार होत नसल्याने त्यांनीही काम करणं बंद केलं होतं.

धरमपेठ शाखेतल्या कर्मचारी निकिता देशभ्रतार म्हणाल्या की, "कंपनीत अंतर्गत समस्या सुरूच होत्या. सुरुवातीला आमचे दोन महिन्यांचे पगार थकले होते. आम्हाला वाटलं दोन्ही महिन्यांचे पगार सोबतच येतील. पण, तो पगार आलेला नाही.

उलट पुढच्या तीन महिन्यांचे पगार थकले. मग आम्ही किती दिवस पैशांविनाच काम करायचं? आम्ही थकलेल्या पगारासाठी लढाई लढतोय. देशभरातले कर्मचारी मिळून आमची लढाई सुरू आहे.

कितीतरी मेल आणि फोन केले. तरीही कोचिंग सेंटरच्या मॅनेजमेंटकडून काहीच उत्तर मिळत नाही. पालक आम्हाला फोन करतात. त्यांना आम्ही काय उत्तर देणार आहोत?"

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र

पण, FIITJEE चे सगळेच कोचिंग सेंटर बंद झाले असं नाही. कोची, हैदराबादसारख्या शहरात हे कोचिंग सेंटर अजूनही सुरू आहेत. पण, काही शहरातले कोचिंग सेंटर असे अचानक का बंद झाले? याबद्दल आम्ही FIITJEE कंपनीला इमेल केला. त्यावर त्यांच्याकडून उत्तर मिळालं आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी स्वतः कुठलेही कोचिंग सेंटर बंद केले नाहीत. कोचिंग सेंटर चालवणारे त्या त्या ठिकाणचे पार्टनर आणि संपूर्ण टीम अचानक रात्रीतून सोडून गेली. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

पण, सध्याचा गोंधळ हा तात्पुरता आहे. कंपनीचे अधिकारी वाजवी वेळेत सर्व ठिकाणी कोचिंग सेंटर पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असं ते म्हणाले.

काही लोकांनी आमच्या कंपनीविरोधात रचलेला कट असून त्याची चौकशी सुरू आहे. लवकरच सत्य समोर येईल. आमच्या स्पर्धकांनी आमच्याविरोधात वापरलेल्या रणनितीविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत, असं कंपनीचं म्हणणं आहे.

तसेच त्यांनी या सगळ्यांसाठी मॅनेजिंग पार्टनर जबाबदार असल्याचा आरोप केलाय.

ते म्हणतात, " कोचिंग सेंटर चालवणारा प्रत्येक मॅनेजिंग पार्टनर हा त्या सेंटरच्या नफा-तोट्यासाठी जबाबदार असतो. तिथले सर्व निर्णय, पैसे, व्यवस्थापन सगळं ते करतात.

दिल्लीतील कार्यालय फक्त व्यवसाय वाढीसाठी त्यांचा सल्ला घेऊन त्यानुसार त्यांना मदत करते. अनेक मॅनेजिंग पार्टनरकडून गैरव्यवस्थापन आणि शोषण करण्यात आलं. त्यामुळे FIITJEE ची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली.

कंपनीकडून कोअर ग्रुप तसेच सर्व पार्टनर्सला परिस्थिती पूर्ववत करण्यास सांगण्यात आलं. पण, अनेकांनी काहीच केलं नाही. काही पार्टनरने या परिस्थितीचा गैरफायदा घेत प्रवेश थांबवले. त्यामुळे कंपनीवरील आर्थिक संकट आणखी बिकट झालं."

विद्यार्थ्यांचे पैसे परत मिळणार का?

नागपुरात FIITJEE च्या चेअरमनविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पैसे परत देण्याची मागणीही विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.

याबद्दलही आम्ही कंपनीला विचारलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, नागपुरातील केंद्रही त्यांनी स्वतः बंद केलं नाही. मॅनेजिंग पार्टनर आणि टीमनं संगनमत करून कट रचल्यानं ते बंद झालं.

पण, हे केंद्र कायमचं बंद झालं नाही. ते सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असून एप्रिल महिन्यापर्यंत कोचिंग सेंटर सुरू होतील असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र

तसेच एकदा कोचिंग सेंटर सुरू झाले की, या गोंधळामुळे ज्या विद्यार्थ्यांनी कोचिंग सोडलं आणि पैसे अडकले आहेत ते पैसे देखील परत करणार असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)